Thursday, April 5, 2018

Samas Navava Shashvat Nirupan समास नववा शाश्वत निरुपण


DashakChoudava Samas Navava Shashvat Nirupan 
Samas Navava Shashvat Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Brahma or Parabrahma. Brahma is permanent means Shahvat. Brahma never goes or never comes, it is always there.
समास नववा शाश्वत निरुपण 
श्रीराम ॥
पिंडाचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्मा विवेक ।
पिंड अनात्मा आत्मा येक । सकळ कर्ता ॥ १ ॥
१) आपण पिंडाचें कौतुक पाहिलेम. आत्मानात्मविवेकानें पिंडरचना शोधून पाहिली. त्यांत असें प्रत्ययास आलें कीं, पिंड किंवा देह अनात्मा आहे आणि आत्मा एक आहे व सर्वकर्ता  आहे.  
आत्म्यास अनन्यता बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली ।
आतं पाहिजे समजली । ब्रह्मांडरचना ॥ २ ॥ 
२) "  मी आत्मा आहे " असें वेदांतशास्त्र सांगतें. विवेकानें त्याचा अनुभव आला. आतां ब्रह्माण्डरचना समजावून घेणें जरुर आहे.    
आत्मानात्माविवेक पिंडी । सारासारविचार ब्रह्मांडी ।
विवरविवरों हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥
३) पिंडाची रचना समजण्यास आत्मानात्मविवेक लागतो तसा ब्रह्मांड रचना समजण्यास सारासार विचार लागतो. सतत असा विचार करीत गेलें म्हणजे त्याची गोडी चाखावयास मिळते. 
पिंड कार्य ब्रह्मांड कारण । याचें करावें विवरण ।
हेंचि पुढें निरुपण । बोलिलें असे ॥ ४ ॥ 
४) पंचभूतात्मक ब्रह्मांड हें पिंडाचें मूळकारण आहे. ब्रह्मांड कारण तर पिंड त्याचे कार्य आहे. याचें विवेरण करण्यासाठीं या समासांत तोच विषय सांगितला आहे.  
असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे ते शाश्वत ।
जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ॥ ५ ॥
५) असार तें नाशवंत तर शाश्वत तें सार होय. ज्याचा आज ना उद्या नाश होतो तें सार नव्हे.  
पृथ्वी जळापासून जाली । पुढें ते जळीं मिळाली ।
जळाची उत्पत्ती वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥
६) पाण्यापासून पृथ्वी झाली. पण पुढें ती पाण्यांत विरली. तेजापासूनच पाण्याची उत्पत्ती होतें. 
तें जळ तेजें शोषिलें । महत्तेजे आटोन गेलें ।
पुढें तेजचि उरलें । सावकाश ॥ ७ ॥
७) तेज पाणी शोषून टाकतें. महातेजानें सारें पाणी आटून गेलें. पुढें तेज तेवढें काय तें उरलें.    
तेज जालें वायोपासुनी । वायो झडपी तयालागुनी ।
तेज जाउनी दाटणी । वायोचीच जाली ॥ ८ ॥
८) वायूपासून तेज झालें. वायु तेजाला विझवून टाकतो. मगतेज जाऊन वायु जिकडे तिकडे गच्च भरुन राहतो. 
वायो गगनापासुनी जाला । मागुतां तेथेंचि विराला ।
ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥
९) वायु आकाशापासून झालेला असतो. आणि फिरुन तो आकाशांतच विरतो. वेदान्त शास्त्रामध्यें कल्पांत कसा होतो त्याचे हें वर्णन आहे. 
गुणमाया मूलमाया । परब्रह्मीं पावती लया ।
तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥ १० ॥
१०) नंतर गुणमाया व मूळमाया या परब्रह्मामध्यें लय पावतात. त्या ब्रह्माची नीट कल्पना येण्यास विवेक आवश्यक आहे.  
सर्व उपाधींचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट ।
निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळां ठाईं ॥ ११ ॥
११) सर्व उपाधींचा शेवट झाला म्हणजे तेथें दृश्यचा मागमूस उरत नाहीं. त्याठिकाणीं सगळीकडे गच्चपणें भरलेलें निर्गुण परब्रह्म असतें. 
उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला ।
मायात्यागें शाश्र्वताला । वोळखावें ॥ १२ ॥
१२) मोठा कल्पांत होऊन सारें विश्र्व नाहींसें झालें तरी परब्रह्म नाश पावत नाहीं. मायेचा त्याग करुन अशा त्या शाश्वताला ओळखावें.
देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण ।
निर्गुणज्ञानें विज्ञान । होत असे ॥ १३ ॥
१३) अंतरात्मा हा खरा देव आहे. तो सगुण आहे. त्याच्या आधारानें निर्गुणापर्यंत पोंचता येतें. निर्गुणाचें ज्ञान झालें कीं विज्ञान प्राप्त होतें. 
कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ ।
मिथ्यत्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥
१४) मानवी कल्पनेच्या पलीकडे असणारें ब्रह्म अत्यंत निर्मळ आहे. त्याच्या ठिकाणीं मायेचा मल नाहीं. त्याच्या ठिकाणीं सारें दृश्य होतें आणि जातें. पण तें खोटेपणानें घडतें. 
जें होतें आणि सवेंचि जाते । तें तें प्रत्ययास येतें ।
जेथें होणें जाणें नाहीं तें । विवेके वोळखावे ॥ १५ ॥
१५) जें होतें आणि कालांतरानें नाहींसे होतें. तें  दृश्य अनुभवाला येते. पण परब्रह्मामध्यें होणें नाहीं व जाणें नाहीं. तें विवेकानें अनुभवास आणावें.  
येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान ।
हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥ १६ ॥
१६) एक ज्ञान व दुसरें अज्ञान आणि तिसरें विपरीत ज्ञान अशी हीं त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी क्षीण झाली कीं विज्ञान प्रगट होतें.  
वेदांत सिधांत धादांत । याची पाहावी प्रचित ।
निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७ ॥
१७) वेदान्य, सिद्धान्त म्हणजे शास्त्र प्रततीति आणि धादांत म्हणजे आत्मप्रतीति या सार्‍या प्रचिती ताडून पाहाव्या. निर्विकार परब्रह्म निरंतर जसेच्या तसेंच असते. हेंच प्रचीतीला येईल.   
तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें ।
मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ १८ ॥
१८) परब्रह्म ज्ञानदृष्टीनें पाहावें. तें तसें पाहून त्याच्याशी तदाकार व्हावें. याला मुख्य आत्मनिवेदन म्हणतात. 
दृश्यास दिसतें दृश्य । मनास भासतो भास ।
दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥
१९) दृश्याला दृश्य दिसतें. मनाला भास होतो. पण परब्रह्म दृश्य आणि भास यांच्यापलीकडे अविनाशपणें असतें. असें अविनाशपणें राहणारें तेंच परब्रह्म होय. 
पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहेअंतरीं ।
अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥
२०) दृश्याच्या दृष्टीनें पाहायला गेलें, तर तें परब्रह्म कोठच्या कोठें दूर आहे असेम वाटते. पण तें सर्व ठिकाणीं आंत बाहेर भरलेले आहे. तें अनंत आहें. त्यास कोठेंच अंत नाहीं. त्याची बरोबरी करणारी वस्तूच विश्वामध्यें नाहीं. 
चंचळ तें स्थिरावेना । निश्र्चळ तें कदापी चळेना ।
आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥
२१) जें चंचळ असतें तें कधीं स्थिरपणानें राहात नाहीं. जें निश्चळ असतें त्यांत कधीं अस्थिरपणा असत नाहीं. आकाशामध्यें आभाळ येतें व जातें तरी आकाश जसेंच्या तसेंच राहातें. असेंच परब्रह्म निष्चळ आहे.  
जें विकारें वाढे मोडे । तेथें शाश्वतता कैंची घडे ।
कल्पांत होताच विघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥
२२) ज्याच्यामध्येम विकार होतो आणि त्यामुळें जें वाढतें आणि मोडतें, त्याच्या बाबतींत शाश्वतपणाची अपेक्षा करता येत नाहीं. कल्पांतसमयीं विकारशील सारें पार नाश पावतें.   
जें अंतरींच भ्रमलें । मायासंभ्रमें संभ्रमलें ।
तयास हें कैसे उकले । आव्हान चक्र ॥ २३ ॥
२३) ज्याच्या अंतर्यामी भ्रमाचें ठाण आहे, मायेच्या अमलानें जें गोंधळून गेलें आहेत, त्यांना हें विलक्षण अवघड चक्र उकलणें शक्य नाहीं. भ्रमानें पछाडलेल्या माणसांना हीं अवघड समस्या सुटत नाहीं. 
भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेनें सिधांत कळेना ।
भिडेनें देव आकळेना । आंतर्यामीं ॥ २४ ॥
२४) दृश्याच्या दडपणानें भ्रमांत राहणार्‍या माणसाला व्यवहाराचें स्वरुप कळत नाहीं. त्याच दडपणानें त्याला शास्त्रसिद्धांत काय आहें तेही कळत नाहीम. आणि त्याच दडपणानें अंतर्यामी राहणारा अंतरात्मा त्याला आकलन होत नाहीं.  
वैद्याची प्रचित येईना । आणि भीडहि उलंघेना ।
तरी मग रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ ॥
२५) रोगी वैद्याचें औषध घेतो आहे पण गुण येत नाहीं भिडेंने तो दुसर्‍या वैद्याकडेही जात नाही. असा रोगी कांहीं वाचत नाहीं हे समजून चालावें.  
जेणें राजा वोळखिला । तो राव म्हणेना भलत्याला ।
जेणें देव वोळखिला । तो देवरुपी ॥ २६ ॥
२६) जो राजाला बरोबर ओळखतो तो भलत्यालाच राजा म्हणणार नाहीं. त्याचप्रमाणें जो देवाला बरोबर ओळखतो तो भलत्यालाच देव म्हणणार नाहीं. तो स्वतः देवरुपच बनून जातो. 
जयास माईकाची भीड । तें काये बोलेल द्वाड ।
विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥
२७) ज्याला मायिक दृश्याची भीड पडतें, जो दृश्याच्या तडाख्यांत असतो, तो अर्धवट, देवाबद्दल बरोबर सांगणें शक्य नाहीं. आपण विचार केला तर या सर्व गोष्टी उघडपणें कळतात.   
भीड मायेऐलीकडे । परब्रह्म तें पैलीकडे ।
पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥ 
२८) मायेचे दडपण अलीकडे आहे. परब्रह्म मात्र मायेच्या पलीकडे आहे. माया अलीकडे व परब्रह्म पलीकडे हा कायमचा प्रकार आहे.        
लटिक्याची भीड धरणें । भ्रमें भलतेंचि करणें ।
ऐसी नव्हेंती लक्षणें । विवेकाचीं ॥ २९ ॥
२९) जें खरें नाहीं त्याची भीड धरायची मायेच्या भ्रमानें भलतेंच कांहीं तरी करायचे, हीं कांहीं विवेकाची लक्षनें खासच नाहींत. 
खोटें अवघेंचि सांडावें । खरें प्रत्ययें वोळखावें ।
मायात्यागें समजावें । परब्रह्म ॥ ३० ॥
३०) जें मायिकआहे, खोटें आहें, तें सगळेंच्या सगळें सोडावें. स्वतः अनुभव घेऊन खरें काय तें ओळखावें. मायेचा त्याग करुन परब्रह्माचें दर्शन घ्यावें.  
तें मायेचें जें लक्षण । तेंचि पुढें निरुपण । 
सुचितपणें विवरण । केलें पाहिजे ॥ ३१ ॥
३१) त्या मायेचे लक्षण पुढच्या समासांत नीट सांगितलें आहे. शांत मनानें त्याचे विवरण करावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शाश्वतनिरुपणनाम समास  नववा ॥
Samas Navava Shashvat  Nirupan
समास नववा शाश्वत निरुपण 



Custom Search

No comments:

Post a Comment