Tuesday, June 19, 2018

Samas Sahava BhddhiVad Nirupan समास सहावा बुद्धिवाद निरुपण


Dashak Aekonvisava Samas Sahava BhddhiVad Nirupan 
Samas Sahava BhddhiVad Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Leader and his behavior with people. Name of this Samas is BuddhiVad Nirupan.
समास सहावा बुद्धिवाद निरुपण 
श्रीराम ॥
परमार्थी आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं ।
कां जे विवरविवरों चुकी । पडोंचि नेदी ॥ १ ॥
१) जो परमार्थी असतो आणि विवेकीही असतो, त्याचे करणे लोकांमध्यें मान्य होते. आपण जें करायचें त्यावर पुनः पुनः विचार करुन तो आपल्या हातून चूक होऊं देत नाहीं. हे त्याचे कारण होय. 
जो जो संदेह वाटे जना । तो तो कदापी करीना ।
आदिअंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥
२) ज्या ज्या कृतीमुळें लोकांच्या मनांत संदेह निर्माण होईल असें कोणतेंहि कर्म तो केव्हांहि करीत नाहीं, प्रत्येक गोष्टीचा आरंभ व अखेरचा परिणाम यांचा बरोबर विचार तो आधींच करुन ठेवतो. 
स्वता निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना ।
कठीण आहे जनार्दना । राजी राखणें ॥ ३ ॥
३) माणूस जर स्वतः निःस्पृह नसेल तर त्याचे बोलणें फारसे कोणी मानीत नाहीं. जनीजनार्दनाला म्हणजें लोकांना खूष ठेवणें फार कठीण आहे.   
कोणी दाटून उपदेश देती । कोणी मध्यवर्ती घालिती ।
ते सहजचि हळु पडती । लालचीनें ॥ ४ ॥
४) गुरुपणाच्या व्यवहारांत कोणी जबरदस्तीनें उपदेश देतात. तर कोणी मध्यस्थी घालून उपदेश देतात. पण लोभीपणामुळें अशा गुरुंचे महत्त्व  आपोआपच कमी होत जातें.  
जयास सांगावा विवेक । तोचि जाणावा प्रतिकुंचक ।
पुढें पुढें नासक । कारबार होतो ॥ ५ ॥
५) कांहीं वेळेस असें होतें कीं, ज्याला उपदेश करायचा तो स्वतःच विरुद्ध असतो. असें असेल तर पुढें सर्व कारभार नासून जातो.  
भावास भाऊ उपदेश देती । पुढें पुढें होते फजीती ।
वोळखीच्या लोकांत महंती । मांडूंचि नये ॥ ६ ॥
६) कांहीं ठिकाणी भाऊच भावास उपदेश करतो. पण पुढें त्याची फजिती होते. म्हणून ओळखीच्या लोकांमध्यें गुरुपणा मिरवूं नये. आणि त्यांना उपदेश देऊं नये.  
पहिलें दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे । 
अविवेकी ते जैसे तैसें । मिळती तेथें ॥ ७ ॥
७) आरंभी गुरुपणाचा तोरा कांहीं दिवस चालतो. पण कांहीं दिवसांनमतर तो नाहींसा होतो. विवेकी माणसांना हा प्रकार पसंत पडत नाहीं. अशा गुरुपाशी अविवेकी माणसेंच कशीतरी जमतात.
भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हाहि फटकाळ विचारु ।
नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥
८) नवरा शिष्य व बायको गुरु हा सुद्धा एक अव्यवहारीपणाचा, अविवेकीपणाचा प्रकार आहे. भ्रष्टाचाराचे इतर प्रकार  अशाच तर्‍हेचे असतात. 
प्रगट विवेक बोलेना । झांकातापा करी जना ।
मुख्य निश्र्चय अनुमाना । आणूंच नेदी ॥ ९ ॥
९) असले भ्रष्टाचरी गुरु, खर्‍या परमार्थाचा विचार स्पष्टपणें सांगत नाहीत. लोकांपुढें लपवाछपवी करुन त्यांना नादी लावतात. मुख्य आत्मज्ञानाचा निश्र्चय त्यांच्या कल्पनेंतही येऊं देत नाहींत. अशा रीतीनें तें लोकांना फसवतात.  
हुकीसरिसा भरीं भरे । विवेक सांगता न धरे ।
दुरीदृष्टीचे पुरे । साधु नव्हेती ॥ १० ॥
१०) असे गुरु मनाच्या लहरीप्रमाणें कशाच्या तरी भरीला पडतात. कोणी विवेकाच्या गोष्टी सांगू लागला तर ते त्या ऐकत नाहीत. हे असले गुरु किंवा महंत दूरदृष्टीचे खरे साधु नव्हेत.
कोण्हास कांहींच न मागावें । भगवद्भजन वाढवावें ।
विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥
११) साधूनें कोणापाशीं कांहीं मागूं नये. त्यानें भगवंताचे भजन वाढवावे. विवेकाच्या जोतावर लोकांना त्यानें भगवंताकडे वळवावें. 
परांतर रक्षयाचीं कामें । बहुत कठीण विवेकवर्में ।
स्वइच्छेनें स्वधर्में । लोकराहाटी ॥ १२ ॥
१२) लोकांचे अंतःकरण कसें राखावें, या कामांतील विवेकाचे वर्म आकलन होण्यास फार कठीण आहे. कारण बहुजनसमाज आपापल्या इच्छेप्रमाणें व स्वभावाप्रमाणें वागत असतो.   
आपण तुरुक गुरु केला । शिष्य चांभार मेळविला ।
नीच यातीनें नासला । समुदाव ॥ १३ ॥
१३) समजा, एखाद्या माणसानें मुसलमान गुरु केला. एक चांभार शिष्य म्हणून मिळवला अशा या प्रकारानें लोकसमुह नासतो, विघटीत होतो. 
ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या ।
संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥
१४) ब्राह्मणमंडळ्या मिळवाव्या, भक्तमंडळ्यांना मान द्यावा. आणि जगांत संतमंडळ्यांचा शोध घ्यावा. 
उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें ।
निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥
१५) समाजनेत्यानें जें उत्कट आणि भव्य असेल तें घ्यावें. जे तेजोहीन, गतिहीन व बलहीन असेल त्याचा त्याग करावा. आपल्या निःस्पृहपणानें जगांत प्रसिद्ध व्हावें. 
अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें ।
गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥
१६) त्याचे अक्षर सुंदर असतें. वाचणें चांगलें असते. वाचलेल्या भागाचा तो चांगला अर्थ सांगतो. त्याचे पाठांतर उत्तम असते. त्याचेगाणें, नाचणें सुंदर असतें.
दीक्षा बरी मीत्री बरी । तीक्ष्ण बुधी राजकारणी बरी ।
आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ १७ ॥
१७) त्याची दिक्षा छान असते, त्याची मैत्री सुरेख असते. राजकारणांत त्याची तीक्ष्न बुद्धि चांगली चालते. सर्व क्षेत्रांत वावरणारा हा पुरुष अलिप्तपणें वागून स्वतःस सांभाळतो.   
अखंड हरिकथेचा छंदु । सकळांस लागे नामवेदु ।
प्रगट जयाचा प्रबोधु । सूर्य जैसा ॥ १८ ॥
१८) त्याला अखंड हरिकथेचा छंद असतो. तो लोकांना नामस्मरणास लावतो. त्याचे ज्ञान सूर्यासारखें तेजस्वी व उघड असते.  
दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निवऊं जाणे ।
सकळांचे मनीचें जाणे । ज्याचें त्यापरीं ॥ १९ ॥
१९) दुर्जनाला कसें सांभाळावें हें तो जाणतो. तसेच सज्जनाच्या मनाला शांति कशी द्यावी हें त्याला माहित असते. ज्याच्या त्याच्यापरीनें प्रत्येक माणसाच्या अंतरांत काय आहे हें तो जाणतो.
संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे ।
अखंड अभ्यासीं लगटे । समुदाव ॥ २० ॥   
२०) त्याच्या संगतींत राहिलेला माणूस आंतून बदलतो. त्या माणसाच्या ठिकाणीं उत्तम गुण प्रगट होतात. त्या महंताच्याजवळ असलेला शिष्य परिवार मनापासून परमार्थाच्या अभ्यासाला लागतो.     
जेथें तेथें नित्य नवा । जनासी वाटे हा असावा ।
परंतु लालचीचा गोवा । पडोंचि नेदी ॥ २१ ॥
२१) तो जेथे जातो तेथें नवाच वाटतो. तो असावा असे लोकांना वाटते. पण कोणाकडून कांहीं मिळावे अशा लोभाच्या जाळ्यांत तो चुकून सुद्धां अडकत नाहीं. 
उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट च्यातुर्य उत्कट भजन ।
उत्कट योग अनुष्ठान । ठाईं ठाईं ॥ २२ ॥
२२) त्याची भक्ति, ज्ञान, चातुर्य, भजन आणि योग हे सर्व उत्कट असतात. ठिकठिकाणचे त्याचे अनुष्ठानही उत्कट असतें. 
उत्कट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगांतीं फांकली ।
उत्कट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥
२३) त्याच्या अंगी उत्कट निस्पृहता असते. त्यामुळें त्याची कीर्ति दिगंत पसरते. त्याच्या उत्कट भक्तीनें लोकांच्या मनाला शांति मिळते. 
कांही येक उत्कटेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण ।
उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ २४ ॥
२४) आपल्या जीवनांत कशामध्यें तरी उत्कटता असल्याखेरीज कीर्ति मिळणार नाहीं. उगाच वणवण हिंडून कांहीं साधणार नाहीं.  
नाहीं देह्याचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा ।
प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥
२५) देहाचा भरंवसा नसतो. आयुष्य केव्हां संपेल हें कांहीं सांगता येत नाहीं. पुढें कोणता प्रसंग येईल हें कोणी सांगू शकत नाहीं.  
याकारणें सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें ।
भगवत्कीर्तिनें भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥
२६) म्हणून मोठे सावधपणानें असावें. आज जेवढें लोकांसाठीं करतां येईल तेवढें करावें. भगवंताच्या कीर्तिनें सारे जग भरुन टाकावें.
आपणास जें जें अनकूळ । तें तें करावें तात्काळ ।
होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ २७ ॥
२७) आज आपल्याला जें जें करणें अनुकुल असेल तें तें तत्काळ करुन टाकावें. जें आपल्याकडून होण्यासारखें नाहीं त्यावर नीट विवेक करावा.
विवेकामधें सांपडेना । ऐसें तो कांहींच असेना ।
येकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥
२८) विेवेकाच्या मर्यादेंत येत नाहीं अशी गोष्टच जगांत नाहीं. म्हणून एकांतांत विवेक करावा. म्हणजें आपल्या हातून जें होत नाहीं, तें अनुमानाच्या दृष्टीनें येते व समजते. 
अखंड तजवीजा चाळणा जेथें । पाहातां काय उणें तेथें ।
येकांतेंविण प्राणीयांतें । बुद्धि कैसी ॥ २९ ॥   
२९) जो माणुस सतत विचार करुन उपाययोजना करतो त्याच्यापाशीं कांहीहि उणे पडत नाहीं. एकांत सेवन केल्याखेरीज माणसाला खोल बुद्धि प्राप्त होत नाहीं.   
येकांतीं विवेक करावा । आत्माराम वोळखावा ।
येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥
३०) म्हणून महंतानें एकांतांत जाऊन विवेक करावा. आत्मारामाचा साक्षात्कार करुन घ्यावा. म्हणजे मग कोणत्याहि गोष्टींत कांहींच घोटाळा उरत नाहीं. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बुद्धिवादनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava BhddhiVad Nirupan 
समास सहावा बुद्धिवाद निरुपण 


Custom Search

No comments:

Post a Comment