Thursday, June 21, 2018

Samas Satava Yetna Nirupan समास सातवा यत्ननिरुपण


Dashak Aekonvisava Samas Satava Yetna Nirupan 
Samas Satava Yetna Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Leader and his behavior with people. Name of this Samas is Yetna Nirupan.
समास सातवा यत्ननिरुपण
श्रीराम ॥
कथेचें घमंड भरुन द्यावें । आणी निरुपणीं विवरावें ।
उणें पडोंचि नेदावें । कोणीयेकचविषीं ॥ १ ॥
१) भगवंताच्या कथेनें सारे वातावरण भरुन टाकावें. निरुपणामधें अध्यात्माचे विवरण करावें. यापैकीं कशांतही उणीव पडूं देऊ नये.   
भेजणार खालें पडिला । तो भेजणारीं जाणितला ।
नेणता लोक उगाच राहिला । टकमकां पाहात ॥ २ ॥
२) एखादा कसरतीचे खेळ करणारा पडला तर काय चूक झाली म्हणून तो पडला हें असें कसरतीचें खेळ करणार्‍या माणसाच्याच लक्षांत येते. इतर अज्ञानी लोक मात्र इकडे तिकडे टकाटका बघत बसतात.
उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें ।
म्हणिजे महत्व उडालें । वक्तयाचें ॥ ३ ॥
३) त्याचप्रमाणें श्रोत्यानीं वक्त्याला प्रश्र्ण विचारला, आणि वक्त्याला उत्तर देण्यास वेळ लागला, तर त्याला उत्तर सुचत नाहीं ही गोष्ट श्रोत्याच्या धा्यानांत येते. मग श्रोते वक्त्याची किंमत ओळखतात. आणि मग वक्त्याचे महत्व उडून जाते.   
थोडें बोलोनि समाधान करणें । रागेजोन तरी मन धरणें ।
मनुष्य वेधींच लावणें । कोणीयेक ॥ ४ ॥
४) महंतानें थोडे बोलून समाधान करावें. राग आला तरी तो दाबून टाकावा, पण श्रोत्यामचें मन दुखवूं नये. प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करुन घ्यावे.  सोसवेना चिणचिण केली । तेथें तामसवृत्ती दिसोन आली ।
आवघी आवडी उडाली । श्रोतयाची ॥ ५ ॥
५) श्रोत्यांचें वागणेम सहन न होऊन महंतानें जर चिडचिड केली तर त्याची तामसी वृत्ती दिसून येते. मगत्याच्यावर असलेले श्रोत्यांचे प्रेम उडून जातें. 
कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनी भंगिले । 
क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजे लोक ॥ ६ ॥
६) आपल्यावर कोण प्रसन्न आहेत. आपण कोणाचा मनोभंग केला आहे. आपण कोणाचे मन दुखावलें आहे. हें वारंवार लोकांची परीक्षा घेऊन बघावें.  
शिष्य विकल्पें रान घेतो । गुरु मागें मागें धंवतो ।
विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥
७) एखादा शिष्य भलताच शंका काढणारा आहे. तसें करतांना तो विकल्पाच्या फसतो व गुरुही त्याच्यामागें समजूत काढण्यासाठीं त्याच्या मागें धावतो. तर ते दोघेही संदेहाच्या चक्रांत अडकलें आहेत असें समजावें. 
आशाबद्धी क्रियाहीन । नाहीं च्यातुर्याचें लक्षण ।
ते महंतीची भणभण । बंद नाहीं ॥ ८ ॥
८) जो महंत आशाळभूत आहे, आचारभ्रष्ट आहे व चातुर्यनहीन आहे, अशा महंताची महंती उगीच कटकटी निर्माण करते. तिला कांहीं घरबंद उरत नाहीं.
ऐसे गोसावी हळु पडती । ठाईं ठाईं कष्टी होती ।
तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैचें ॥ ९ ॥
९) असले महंत नालायक ठरतात. ठिकठिकाणीं त्यांना दुःखी  होण्याचे प्रसंग येतात त्यांच्या संगतींत राहणार्‍या लोकांना सुखसमाधान मिळणें अशक्य होते. 
जिकडे तिकडे कीर्ति माजे । सगट लोकांस हव्या उपजे ।
लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥
१०) महंतानें असें वागावें कीं, चहूंकडे त्याची कीर्ति पसरावी. सगळ्या लोकांना त्यांच्याविषयीं आवड उत्पन्न व्हावी. लोकांना संतुष्ट राखून त्यानें सगळें कांहीं करावें. 
परलोकीं वास करावा । समुदाव उगाच पाहावा ।
मागण्याचा तगादा न लवावा । कांहीं येक ॥ ११ ॥
११) आपण आत्मानुसंधानाच्या उच्च पातळीवर मनानें राहावें. त्याभूमिकेवरुन लोकसमुदायाचे निरीक्षण करवें. कोणाकडेहीं कांहींही मागण्याचा तगादा लावूं नये.   
जिकडे जग तिकडे जगन्नायेक । कळला पाहिजे विवेक ।
रात्रीदिवस विवेकी लोक । सांभाळीत जाती ॥ १२ ॥
१२) ज्या बाजूला बहुजन समाज असतो त्याच बाजूला जगाचा स्वामी जगन्नाथ असतो. हा विचार नीट कळला पाहिजे. विवेकीं महंत हा विचार रात्रंदिवसडोळ्यांपुढें ठेवून वागतात. 
जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला ।
अवघेच नष्ट येकला भला । काशावरुनी ॥ १३ ॥   
१३) जो माणूस दृष्टीस पडतो तो वाईट, बेकार आहे असें समजणे बरोबर नाहीं. जगामधील सर्व माणसें वाईट व आपण तेवढें चांगलें हें कशावरुन खरें मानायचे?     
वोस मुलकीं काये पाहावें । लोकांवेगळें कोठें राहावें ।
तर्‍हे खोटी सांडतें घ्यावें । कांहीं येक ॥ १४ ॥ 
१४) ज्याप्रमाणें ओसाड प्रातांत पाहाण्यासारखें कांहीं नसते त्याप्रमाणें जनतेला सोडून महंताला राहाता येणार नाहीं.महंतानें तर्‍हेवाईकपणा करणें वाईट असतें. प्रसंगीं त्यानें पडतें घ्यावें पण लोकांना राजी राखावें. 
तस्मात लोकिकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये ।
परत्र साधनाचा उपाये । श्रवण करुन असावें ॥ १५ ॥
१५) सांगण्याचे कारण असें कीं, महंताला जनतेशी वागता येत नसेल तर त्यानें लोकसंग्रह करुं नये. परमार्थसाधनामधें श्रवण मनन करीत आपला काळ घालवावा. 
आपणासी बरें पोहतां नये । लोक बुडवावयाचें कोण कार्य ।
गोडी आवडी वायां जाये । विकल्पचि अवघा ॥ १६ ॥
१६) ज्या माणसाला नीट पोहता येत नाहींत्यानें लोकांना बुडवू नये. अशा अपात्र महंताच्या नादी लागल्यानें माणसाची परमार्थाची आवड व गोडी वाया जाते व गैरसमज पसरतो. 
अभ्यासें प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें ।
प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ॥ १७ ॥
१७) साधनाचा उत्तम अभ्यास करुन मग जनतेंत महंतपण प्रगट करावें. नाहींतर साधकानें जनतेपासून स्वतःस झाकून दूर राहावें. जनतेंमधें प्रगट झाल्यावर साधनांतून खाली घसरणें चांगलें नाहीं. 
मंद हळु हळु चालतो ।  चपळ कैसा अटोपतो ।
अरबी फिरवणार तो । कैसा असावा ॥ १८ ॥
१८) ज्या माणसाला हळु घोडें चालवण्याची सवय आहे त्याला चपळ घोडा चालविता येत नाहीं. अरबी घोडा मोठा चपळ व हुशार असतो. त्यावर स्वार होणारा माणूससुद्धां तसाच चपळ व हुशार लागतो. 
हे धकाधकीचीं कामें । तिक्षण बुद्धीचीं वर्में ।
भोळ्या भावार्थें संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥
१९) हीं सगळीं धक्काबुक्कीची कामें आहेत. ती करण्यासाठीं मोठी तीक्ष्ण बुद्धी लागते. मगवर्म ओळखून ती करावीं लागतात. नुसती श्रद्धा ठेवून ती सुखासुखी करतां येत नाहींत. 
सेत केलें परी वाहेना । जवार केलें परी फिरेना ।
जन मेळविलें परी धरेना । अंतर्यामीं ॥ २० ॥
२०) जसें शेतांत पीक घेतलें पण तें विकाला बाजारांत नेलें नाही. जवाहीर विकण्याचा व्यापार आहे, पण ते विकण्यासाठीं हिंडलें नाहीं तर नुकसान होते. तसेंच महंतानें चार लोक गोळा केले पण त्यांचे अंतःरंग सांभाळले नाहीं तर त्याची महंती वाया जाते व फजिती होते.
जरी चढती वाढती आवडी उठे । तरी परमार्थ प्रगटे ।
घसघस करितां विटे । सगट लोकु ॥ २१ ॥
२१) जनतेमध्यें आपल्याबद्दल असणारे प्रेम वाढत गेले तरच परमार्थ प्रगट होतो. अशा महंताच्या प्रयत्नांना यश येते व लोक परमार्थ आचरु लागतात. पण जर आपण व जनता यांच्यामधें संघर्ष निर्माण केला, तर लोक अशा महंताला विटतात. तो त्यांना नकोसा होतो.  
आपलें लोकांस मानेना । लोकांचें आपणांस मानेना ।   
आवघा विकल्पचि मना । समाधान कैचें ॥ २२ ॥
२२) ज्या महंताचे लोकांना पटत नाहीं, पसंत पडत नाहीं आणि लोकांचें महंताला पटत नाहीं, पसंत पडत नाहीं, अशा ठिकाणीं दोघांच्या मनांत संशय व गैरसमज असतात. समाधान कोठेंच नसतें. 
नासक दीक्षा सिंतरु लोक । तेथें कैचा असेल विवेक ।
जेथें बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥
२३) ज्या ठिकाणीं गुरुचा आचारविचार व साधना बिघडलेली असते, त्याचप्रमाणें त्याच्याभोवती जमलेले अनुयायी लबाड, फसवे असतात. तेथें विवेक आढळणें शक्य नसतें. असा अविवेक जेथें असतो तेथें राहाणें चुकीचे असते.  
बहुत दिवस श्रम केला । सेवटीं अवघाचि वेर्थ गेला ।
आपणास ठाकेना गल्बला । कोणें करावा ॥ २४ ॥
२४) एखाद्या महंतानें पुष्कळ दिवस कष्ट सोसले आणि चांगलें अनुयायी मिळविलें, तरी त्या समुहांतील सर्वांना संतुष्ट राखणें, त्यांचे अंतःकरण राखणे शक्य नसतें. हे जर नाहीं केले तर समुह विस्कटतो आणि सर्व श्रम वाया जातात. जनतेची उपाधी व गडबड जर आपल्याला झेपत नसेल तर त्याची जबाबदारी सुरवातीपासूनच आपण घेऊं नये.     
संगित चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप ।
क्षणक्षणा विक्षेप । किती म्हणौनि सांगावा ॥ २५ ॥
२५) लोकसंग्रहाचे रहस्य हें असें आहे कीं, समूह सरळीत चालला तर तो व्यापक होतो. व त्याचा मनाला त्रास होत नाहीं. पण जर समुह बिघडला तर संघर्ष निर्माण होतो व मनाचा संताप होतो. समुह जीवनांत पदोपदी पुष्कळ अडचणी व गैरसमज निर्माण होतात. त्या सर्वांचे वर्णन करणें शक्य नाहीं.  
मूर्ख मूर्खपणें भरंगळती । ज्ञाते ज्ञातेपणें कळ्हो करिती ।
होते दोहीकडे फजीती । लोकांमधें ॥ २६ ॥
२६) समूहांतील मूर्खमाणसें मूर्खपणानें भलतेंच वागतात. तर शहाणी माणसें शहाणपणाच्या अभिमानानें आपसांत भांडतात. मग महंत दोन्ही बाजूंनी कात्रींत सापडतो. मग त्याची फजिती होते.   
कारबार आटोपेना करवेना । आणि उगेंचि राहेना ।
याकारणें सकळ जना । काये म्हणावें ॥ २७ ॥
२७) कारभार झेपत नाहीं, आवरत नाहीं, व करवत नाहीं. असे असून स्वस्थही बसवत नाहीं. अशा माणसांना म्हणायचे तरी काय?
नासक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें ।
परिभ्रमणें कंठावें । कोठे तरी ॥ २८ ॥
२८) नाश पावणारी उपाधी बाजूस सारावी. परमार्थ साधनाकरुन आपलें वय सार्थकीं लावावे. आणि देशामधें भ्रमण करीत आपलें जीवन कोठेंतरी घालवावें.   
परिभ्रमण करीना । दुसर्‍याचें कांहींच सोसीना ।
तरी मग उदंड यातना । विकल्पाची ॥ २९ ॥
२९) जो महंत परिभ्रमण करीत नाहीं, दुसर्‍यासाठीं कांहीं झीज सोसत नाही, त्याला संशयाच्या, देहबुद्धीच्या फार यातना सोसाव्या लागतात. 
आतां हें आपणाचिपासीं । बरें विचारावें आपणासी ।
अनकूळ पडेल तैसी । वर्तणूल करावी ॥ ३० ॥
३०) आतां हें सगळें आपल्यावरच अवलंबून आहे, आपणच आपल्याशी याचा विचार करावा. आणि जे योग्य व अनुकूल वाटेल त्याप्रमाणें वर्तन करावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे येत्ननिरुपणनाम समास सातवा ॥  
Samas Satava Yetna Nirupan
समास सातवा यत्ननिरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment