Wednesday, November 13, 2019

Kahani ShilaSaptamichi कहाणी शिळासप्तमीची

Kahami ShilaSaptamichi 
कहाणी शिळासप्तमीची

कहाणी शिळासप्तमीची
आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याने एक नविन गाव वसवले. 
त्या गांवांतील लोकांसाठी एक तळे बांधले. पण त्या तळ्याला पाणी कांही लागेना. 
राजाने जलदेवतेंची प्रार्थना केली. जलदेवता राजाला प्रसन्न झाल्या. राजाने आपल्या गावांतील तळ्याला पाणी लागत नाही, असे त्यांना सांगितले. जलदेवता म्हणाल्या, राजा, राजा, तुझ्या सुनेच्या वडिल मुलाचा बळी दिलास तर तळ्यास पाणी लागेल. हे ऐकून राजा आणखीनच दुःखी झाला. त्याचा नातू त्याचा फार लाडका होता. काय करावे त्याला सुचेना. जेचण-खाण जाईना. तळ्याला पाणी तर लागले पाहीजे. कारण तेथील प्रजेला ते हवेच आहे. पण ही गोष्ट घडणार कशी ? सून कबूल कशी होणार ? अखेरीस राजाने सुनेला माहेरी पाठविले. नातवाला आपल्याजवळ ठेवून घेतला. चांगला दिवस पाहून त्याला न्हावू-माखू घातले. जेवू-खावू घातले. अंगावर दागदागीने घालून एका पलंगावर झोपवून तो पलंग तळ्याच्या मध्यभागी नेऊन ठेविला. जलदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला भरपूर पाणी आले.
पुढे कांही दिवसांनी राजाची सून माहेराहून सासरी येऊ लागली. भावाला बरोबर घेतले. सासर्‍याने बांधलेले तळे आले. तळ्याला लागलेले महापूर पाणी पाहीले. तीला आनंद झाला. तीला श्रावणशुद्ध सप्तमीच्या वशाची आठवण झाली. तो वसा काय ते आठवले. तळ्याच्या पाळी जावे. त्याची पूजा करावी. काकडीच्या पानावर दहीभात वर लोणचे घालून त्यावर एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्याव. एक मुटकुळे (काकडीच्या पानावर दहीभात लोणचे घालून पैसा सुपारी ठेवून) तळ्यातील देवतांना टाकावे. जलदेवतांची प्रार्थना करावी. याप्रमाणे सर्व करुन तळ्यांत उभे राहून तीने जलदेवतेंची प्रार्थना केली. " जय देवी ! आई माते ! आमचे वंशी कोणी पाण्यांत बुडाले असेल तर ते आम्हाला परत मिळावे. याप्रमाणे तीने प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा तीचे पाय ओढू लागला. कोण पाय ओढत आहे म्हणून तीने बघितल्यावर तीला आपलाच मुलगा दिसला. मग त्याला कडेवर घेऊन आश्र्चर्य करीत सासरी येऊ लागली. इकडे राजाच्या दूतांनी बातमी दिली की सुनबाई मुलाला घेऊन येते आहे. राजालाही नवल वाटले. सामोरे येऊन त्याने सुनेचे पाय धरले व केलेया अपराधाची क्षमा मागीतली. सुनेनेही सांगीतले की तीने केलेल्या शिळासप्तमीच्या व्रताने जलदेवतांनी तिचा मुलगा तीला परत दिला. राजाला व सर्व जनतेला आनंद झाला. जशा राजाच्या सुनेला शिळासप्तमीच्या (श्रावण शुद्ध सप्तमी) व्रताने जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हाआम्हा जलदेवता प्रसन्न होवोत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.  


Custom Search

No comments:

Post a Comment