Wednesday, November 13, 2019

Kahani VasuBaraschi कहाणी वसुबारसेची



कहाणी वसुबारसेची
आटपाट नगर होते. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक मुलगा व सून होती. गाई-गुरे होती. ढोरे-म्हशी होत्या. गव्हाळी, मुगाळी वासरे होती. एके दिवशी काय झाले ? आश्विन महिना आला. पहिल्या द्वादशीच्या सकाळी म्हातारी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली इकडे ये, सून आली. काय म्हणून म्हणाली.  तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ. गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव. असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली. 
सून माडीवर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यांत गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारत होती. त्यांना मारले. चिरुन शिजवून ठेचून सासूची वाट पहात बसली. दुपार झाली. तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहील, तांबड मांस दिसले. तिने हे काय म्हणून सुनेस विचारले. सुनेने सर्व हकीगत सांगितली. सासू घाबरली. सुनेला सासूने सांगितलेले समजले नाही म्हणून चूक झाली. म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. देवाची प्रार्थना केली. देवा, देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला त्याची तिला क्षमा कर. गाईंची वासरे जिवंत कर. असे न होईल तर मी संध्याकाळी प्राण देईन. असा निश्र्चय केला. देवापाशी बसून राहीली. देवाने तिचा एकनिष्ठ निश्र्चय पाहीला. तिचे निष्कपट अंतःकरण पाहीले. पुढे संध्याकाळी गाई चरुन आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. म्हातरीचा निश्र्चय ढळणार नाही. असे देवाला वाटले. मग देवाने काय केले ? गाईंची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गाईंकडे प्यायला गेली. गाईंचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्र्चर्य वाटले. सर्वांनाच आनंद झाला. म्हातरीने व सर्वानी देवाला नमस्कार केला. गाई-गोर्‍हांची पूजा केली. स्वयमपाक करुन नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले व नंतरच सर्व जेवली. आनंदी झाली. हा दिवस आश्र्विन वद्य द्वितीयेचा होता. या दिवशी सवत्स गाईची पूजा करतात. जशी म्हातारी व सून आनंदी झाली तसेच तुम्ही आम्हीही वसुबारसेच्या दिवशी सवत्स धेनूची पूजा करुन आनंदी होवूया. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.    


Custom Search

No comments:

Post a Comment