Wednesday, April 29, 2020

ShriRamCharitManas Part 10 श्रीरामचरितमानस भाग १०


ShriRamCharitManas Part 10 श्रीरामचरितमानस भाग १०

ShriRamCharitManas Part 10
श्रीरामचरितमानस भाग १०
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—प्रभु सोइ राम कि अपर कोउ जाहि जपत त्रिपुरारि ।
सत्यधाम सर्बग्य तुम्ह कहहु बिबेकु बिचारि ॥ ४६
शंकर ज्यांचा निरंतर जप करतात, तेच हे राम की, अन्य कोणी आहेत ? आपण सत्याचे निवासस्थान आहात आणि सर्वज्ञ आहात. तेव्हा याविषयी मला सांगा. ॥ ४६ ॥
जैसे मिटै मोर भ्रम भारी । कहहु सो कथा नाथ बिस्तारी ॥
जागबलिक बोले मुसुकाई । तुम्हहि बिदित रघुपति प्रभुताई ॥
माझ्या मनातील भ्रम नष्ट होईल अशारीतीने पूर्ण कथा, हे महाराज, मला विस्ताराने सांगा. त्यावर याज्ञवल्क्य हसून म्हणाले, तुम्ही श्रीरघुनाथांचा प्रभाव जाणता. ॥ १ ॥
 रामभगत तुम्ह मन क्रम बानी । चतुराई तुम्हारि मैं जानी ॥
चाहहु सुनै राम गुन गूढा । कीन्हिहु प्रस्न मनहुँ अति मूढा ॥
काया-वाचा-मने करुन तुम्ही रामभक्तच आहात. तुमचे हे चातुर्य  माझ्या लक्षात आले आहे. श्रीरामांचे गूढ गुण तुम्हांला जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणून अजाणतेपण स्वतःकडे घेऊन तुम्ही असे विचारले आहे. ॥ २ ॥
तात सुनहु सादर मनु लाई । कहउँ राम कै कथा सुहाई ॥
महामोहु महिषेसु बिसाला । रामकथा कालिका कराला ॥
ठीक आहे. आता मी श्रीरामांची सुंदर कथा सांगतो, ती तुम्ही आदरपूर्वक मन लावून ऐका. महामोह हा एक महिषासुरच होय आणि रामकथा ही ( त्याला नष्ट करणारी ) भयंकर कालीमाता आहे. ॥ ३ ॥
रामकथा ससि किरन समाना । संत चकोर करहिं जेहि पाना ॥
ऐसेइ संसय कीन्ह भवानी । महादेव तब कहा बखानी ॥
रामकथा ही चंद्रकिरणांसारखी आहे आणि संतजन हे चकोर होत. ते तिचे अखंड पान करतात. अशीच शंका पार्वतीला आली होती, तेव्हा भगवान शंकरांनी तिचे निरसन केले. ॥ ४ ॥
दोहा—कहउँ सो मति अनुहारि अब उमा संभु संबाद ॥
भयउ समय जेहि हेतु जेहि सुनु मुनि मिटिहि बिषाद ॥ ४७ ॥
आता मी माझ्या बुद्धीप्रमाणे शिवपार्वतींचा संवाद सांगतो. हे मुने ! तो जेव्हा व ज्या कारणाने झाला, तो तुम्ही ऐका. त्यामुळे तुमचे दुःख दूर होईल. ॥ ४७ ॥
एक बार त्रेता जुग माहीं । संभु गए कुंभज रिषि पाहीं ॥
संग सती जगजननि भवानी । पूजे रिषि अखिलेस्वर जानी ॥
त्रेता युगात भगवान शंकर हे अगस्त्य ऋषींना भेटण्यास गेले. त्यांच्याबरोबर जगज्जननी भवानी सतीसुद्धा होती. ऋषींनी शंकरांची संपूर्ण जगाचे ईश्र्वर समजून पूजा केली. ॥ १ ॥
रामकथा मुनिबर्ज बखानी । सुनी महेस परम सुखु मानी ॥
रिषि पूछी हरिभगति सुहाई । कही संभु अधिकारी पाई ॥
ऋषींनी त्यांना रामकथा विस्ताराने सांगितली. ती ऐकून शंकर संतुष्ट झाले. त्यानंतर ऋषींनी त्यांना हरिभक्तीविषयी सुंदर प्रश्र्न विचारला. त्यावेळी शंकरांनी अगस्त्य ऋषी हे अधिकारी आहेत असे समजून त्यांना भक्तीचे रहस्य समजावून सांगितले. ॥ २ ॥
कहत सुनत रघुपति गुन गाथा । कछु दिन तहॉ रहे गिरिनाथा ॥
मुनि सन बिदा मागि त्रिपुरारी । चले भवन सँग दच्छकुमारी ॥
त्या प्रसंगी शंकर हे श्रीरामांच्या गुणांच्या कथा सांगत-ऐकत काही दिवस तेथे राहिले. मग ऋषींचा निरोप घेऊन शंकर सतीबरोबर आपल्या निवासस्थानी ( कैलास पर्वताकडे ) दक्षकन्येसह  निघाले. ॥ ३ ॥  
तेहि अवसर भंजन महिभारा । हरि रघुबंस लीन्ह अवतारा ॥
पिता बचन तजि राजु उदासी । दंडक बन बिचरत अबिनासी ॥
त्याकाळी पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी श्रीहरींनी रघुवंशामध्ये अवतार घेतला होता. ते अविनाशी भगवान राम हे पित्याच्या आज्ञेनुसार राज्य-त्याग करुन तपस्वी साधूच्या वेषात दंडकारण्यातून चालले होते. ॥ ४ ॥
दोहा—हृदयँ बिचारत जात हर केहि बिधि दरसनु होइ ।
गुप्त रुप अवतरेउ प्रभु गएँ जान सबु कोइ ॥ ४८ (क) ॥
श्रीशिव हे मनात विचार करीत होते की, भगवंतांचे दर्शन मला कसे लाभेल ? प्रभु श्रीरामांनी गुप्तपणे अवतार घेतलेला आहे. मी गेलो तर सर्व लोकांना ते कळेल. ॥ ४८ (क) ॥
सो—संकट उर अति छोभु सती न जानहिं मरमु सोइ ।
तुलसी दरसन लोभु मन डरु लोचन लालची ॥ ४८ (ख) ॥
श्रीशंकरांच्या मनात या विचाराने अस्वस्थता उत्पन्न झाली, परंतु सतीला हे रहस्य माहीत नव्हते. तुलसीदास म्हणतात की, शंकरांना मनात ( रहस्य उघड होण्याचे ) भय वाटत होते, परंतु दर्शनासाठी त्यांचे नेत्र आसुसले होते. ॥ ४८ (ख) ॥
रावन मरन मनुज कर जाचा । प्रभु बिधि बचनु कीन्ह चह साचा ॥
जौं नहिं जाउँ रहइ पछितावा । करत बिचारु न बनत बनावा ॥
रावणाने ( ब्रह्मदेवांना ) आपले मरण मनुष्याच्या हातून मिळावे, असे मागितले होते. प्रभु श्रीराम हे ब्रह्मदेवांचे वचन खरे करु इच्छित होते. मी जर आता त्यांच्याजवळ गेलो नाही, तर नंतर मला पश्चात्ताप करावा लागेल, असा विचार श्रीशंकरांच्या मनात येत होता, परंतु कोणतीही नेमकी युक्ती सुचत नव्हती. ॥ १ ॥
एहि बिधि भए सोचबस ईसा । तेही समय जाइ दससीसा ॥
लीन्ह नीच मारीचहि संगा । भयउ तुरत सोइ कपट कुरंगा ॥
अशाप्रकारे श्रीशंकर काळजीत पडले. त्याचवेळी नीच रावणाने जाऊन मारीचाला आपल्या सोबत घेतले आणि तो ( मारीच ) लगेच खोटा हरीण झाला. ॥ २ ॥
करि छलु मूढ हरी बैदेही । प्रभु प्रभाउ तस बिदित न तेही ॥
मृग बधि बंधु सहित हरि आए । आश्रमु देखि नयन जल छाए ॥
मूर्ख ( रावणाने ) कपट करुन सीतेचे हरण केले. त्याला श्रीरामांचा खरा प्रभाव ठाऊक नव्हता. श्रीहरी हरिणाला मारुन लक्ष्मणासह आश्रमात आले आणि तेथे सीता न दिसल्याने त्यांचे डोळे पाण्याने भरले. ॥ ३ ॥
बिरह बिकल नर इव रघुराई । खोजत बिपिन फिरत दोउ भाई ॥
कबहूँ जोग बियोग न जाकें । देखा प्रगट बिरहु दुखु ताकें ॥
श्रीराम हे माणसाप्रमाणे विरहाने व्याकूळ झाले आणि दोघे भाऊ सीतेला शोधत वनात फिरु लागले. ज्यांना कधी संयोग-वियोग होत नाही, त्यांच्यामध्येप्रत्यक्ष विरहाचे दुःख दिसत होते. ॥ ४ ॥
दोहा—अति बिचित्र रघुपति चरित जानहिं परम सुजान ।
जे मतिमंद बिमोह बस हृदयँ धरहिं कछु आन ॥ ४९ ॥
श्रीरघुनाथांचे चरित मोठे विचित्र आहे. ते सिद्ध ज्ञानीजनच जाणतात. जे मंदबुद्धीचे आहेत, ते मोहाला बळी पडून मनात काही विपरीतच समजतात. ॥ ४९ ॥
संभु समय तेहि रामहि देखा । उपजा हियँ अति हरषु बिसेषा ॥
भरि लोचन छबिसिंधु निहारी । कुसमय जानि न कीन्हि चिन्हारी ॥
त्यावेळी श्रीशंकरांनी श्रीरामांना पाहिले. त्यांना पाहून त्यांच्या मनास फार आनंद झाला. अतिशय सुंदर श्रीरामांना श्रीशंकरांनी डोळे भरुन पाहिले, परंतु अप्रासंगिक होईल, म्हणून त्यांना ओळख दिली नाही. ॥ १ ॥
जय सच्चिदानंद जग पावन । अस कहि चलेउ मनोज नसावन ॥
चले जात सिव सती समेता । पुनि पुनि पुलकत कृपानिकेता ॥
‘ जगाला पवित्र करणार्‍या सच्चिदानंदांचा विजय असो ‘ असे म्हणत कामदेवाचा नाश करणारे श्रीशंकर पुढे चालू लागले. कृपानिधान श्रीशंकर आनंदाने रोमांचित होऊन सतीबरोबर जात होते. ॥ २ ॥
सतीं सो दसा संभु कै देखी । उर उपजा संदेहु बिसेषी ॥
संकरु जगतबंद्य जगदीसा । सुर नर मुनि सब नावत सीसा ॥
सतीने श्रीशंकरांची ती अवस्था पाहिली. तिच्या मनाला मोठा संदेह उत्पन्न झाला. ( ती मनात म्हणू लागली, ) शंकरांना सर्व जग वंदन करते, ते जगदीश्वर आहेत. देव, मनुष्य, मुनी, हे सर्वजण त्यांच्यापुढे मस्तक नम्र करतात. ॥ ३ ॥
तिन्ह नृपसुतहि कीन्ह परनामा । कहि सच्चिदानंद परधामा ॥
भए मगन छबि तासु बिलोकी । अजहुँ प्रीति उर रहति न रोकी ॥
त्यांनी एका राजपुत्राला सच्चिदानंद परमधाम म्हणून प्रणाम केला आणि त्याचे सौंदर्य पाहून ते त्यांच्या प्रेमात इतके बुडून गेले की, अजूनही त्यांच्या मनातील प्रेम त्यांना आवरत नाही. ॥ ४ ॥
दोहा—ब्रह्म जो ब्यापक बिरज अज अकल अनीह अभेद ।
सो कि देह धरि होइ नर जाहि न जानत बेद ॥ ५० ॥
जे ब्रह्म सर्वव्यापक, मायारहित, जन्मरहित , अगोचर, इच्छारहित व भेदरहित आहे, ज्याला वेदही जाणत नाहीत, ते देह धारण करुन मनुष्य कसे होऊ शकेल ? ॥ ५० ॥
बिष्नु जो सुर हित नरतनु धारी । सोउ सर्बग्य जथा त्रिपुरारी ॥
खोजइ सो कि अग्य इव नारी । ग्यानधाम श्रीपति असुरारी ॥
देवांच्या हितासाठी मनुष्यशरीर धारण करणारे जे भगवान विष्णू आहेत, तेसुद्धा शंकरांच्यासारखे सर्वज्ञ आहेत. ज्ञानभांडार, लक्ष्मीपती, असुरांचे शत्रू असलेले भगवान विष्णू काय अज्ञान्याप्रमाणे स्रीचा शोध घेत फिरतील ? ॥ १ ॥
संभुगिरा पुनि मृषा न होई । सिव सर्बग्य जान सबु कोई ॥
अस संसय मन भयउ अपारा । होइ न हृदयँ प्रबोध प्रचारा ॥
परंतु शंकरांचे वचनही खोटे असू शकणार नाही. शंकर हे सर्वज्ञ आहेत. हे सर्वांना माहीत आहे. सतीच्या मनात अशा प्रकारे संदेहाचे काहूर उठले. कशाही प्रकारे तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडत नव्हता. ॥ २ ॥
जद्यपि प्रगट न कहेउ भवानी । हर अंतरजामी सब जानी ॥
सुनहि सती तव नारि सुभाऊ । संसय अस न धरिअ उर काऊ ॥
भवानी जरी काही बोलली नाही, तरी अंतर्यामी शंकरांनी सर्व जाणले. ते म्हणाले, “ हे सती ! माझे ऐक. तुझा स्रीस्वभाव आहे. असा संशय मनात आणू नकोस. ॥ ३ ॥
जासु कथा कुंभज रिषि गाई । भगति जासु मैं मुनिहि सुनाई ॥
सोइ मम इष्टदेव रघुबीरा । सेवत जाहि सदा मुनि धीरा ॥
जी कथा अगस्त्य ऋषींनी गाइली आणि ज्यांची भक्ती मुनींना मी सांगितली, ते हेच माझे इष्टदेव श्रीराम आहेत. त्यांची सेवा ज्ञानी, मुनी नित्य करीत असतात. ॥ ४ ॥
छं—मुनि धीर जोगी सिद्ध संतत बिमल मन जेहि ध्यावहीं ।
कहि नेति निगम पुरान आगम जासु कीरति गावहीं ॥
सोइ रामु ब्यापक ब्रह्म भुवन निकाय पति माया धनी ।
अवतरेउ अपने भगत हित निजतंत्र नित रघुकुलमनी ॥
ज्ञानी, मुनी, योगी आणि सिद्ध पुरुष हे निर्मळ मनाने निरंतर ज्यांचे ध्यान करतात आणि वेद, पुराणे व शास्त्रे ‘नेति नेति ‘असे म्हणत ज्यांचे यशोगान करतात, ते सर्वव्यापक, संपूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी, मायापती, नित्य परम स्वतंत्र परब्रह्म असलेल्या भगचान श्रीरामांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी रघुकुल भूषण म्हणून अवतार घेतला आहे. ‘
सो—लाग न उर उपदेसु जदपि कहेउ सिवँ बार बहु ।
बोले बिहसि महेसु हरिमाया बलु जानि जियँ ॥ ५१ ॥
अशाप्रकारे श्रीशिवांनी अनेकवार सांगितले. परंतु सतीच्या मनाला तो उपदेश मानवला नाही. तेव्हा श्रीशिव मनात भगवंतांच्या मायेचा हा प्रभाव समजून हसत म्हणले, ॥ ५१ ॥
जौं तुम्हरें मन अति संदेहू । तौ किन जाइ परीछा लेहू ॥
तब लगि बैठ अहउँ बटछाहीं । जब लगि तुम्ह ऐहहु मोहि पाहीं ॥
‘ जर तुझ्या मनात फार मोठा संदेह आहे, तर तूं जाऊन परीक्षा कां घेत नाहीस ? तू परत येईपर्यंत मी या वटवृक्षाच्या सावलीत बसतो. ॥ १ ॥
जैसें जाइ मोह भ्रम भारी । करेहु सो जतनु बिबेक बिचारी ॥
चलीं सती सिव आयसु पाई । करहिं बिचारु करौं का भाई ॥
ज्यामुळे तुझा अज्ञानजनित भ्रम दूर होईल, ते तू योग्य प्रकारे विवेकपूर्वक पूर्ण विचारांती कर. ‘ शिवांची आज्ञा मिळताच सती निघाली आणि मनात विचार करु लागली की, ‘ आता काय करु ? ‘ ( कशी परीक्षा घेऊ ? ॥ २ ॥
इहॉ संभु अस मन अनुमाना । दच्छसुता कहुँ नहिं कल्याना ॥
मोरेहु कहें न संसय जाहीं । बिधि बिपरीत भलाई नाहीं ॥
इकडे श्रीशिवांनी मनोमन ताडले की, ‘ दक्षकन्या सतीचे काही खरे नाही. जर मी समजावून सांगूनही तिचा संदेह दूर होत नाही, तर तिचे दैवच फिरले आहे. आता सतीची धडगत नाही. ॥ ३ ॥
होइहि सोइ जो राम रचि राखा । को करि तर्क बढावै साखा ॥
अस कहि लगे जपन हरिनामा । गईं सती जहँ प्रभु सुखधामा ॥
श्रीरामांनी जे योजले आहे, तेच होणार. तर्काचे फाटे फोडून काय उपयोग ? ‘ असे म्हणत भगवान श्रीशिव भगवान श्रीहरीच्या नामाचा जप करु लागले आणि जेथे सुख-धाम प्रभू श्रीराम होते, तेथे सती गेली. ॥ ४ ॥
दोहा—पुनि पुनि हृदयँ बिचारु करि धरि सीता कर रुप ।
आगें होइ चलि पंथ तेहिं जेहिं आवत नरभूप ॥ ५२ ॥
सतीने पुष्कळ विचारांती सीतेचे रुप धारण केले आणि नराधिप श्रीराम ज्या वाटेने येत होते, त्या वाटेने ती निघाली. ॥ ५२ ॥
लछिमन दीख उमाकृत बेषा । चकित भए भ्रम हृदयँ बिसेषा ॥
कहि न सकत कछु अति गंभीरा । प्रभु प्रभाउ जानत मतिधीरा ॥
सतीचे हे वेषांतर पाहून लक्ष्मण चकित झाला. त्याचे मन चक्रावून गेले. तो फार गंभीर झाला, त्याला बोलणे सुधरेना. धीरबुद्धीचा लक्ष्मण प्रभू रामांचा प्रभाव जाणत होता. ॥ १ ॥
सती कपटु जानेउ सुरस्वामी । सबदरसी सब अमतरजामी ॥
सुमिरत जाहि मिटइ अग्याना । सोइ सरबग्य रामु भगवाना ॥
सर्व काही पाहणारे आणि सर्वांचे हृदय जाणणारे असे देवांचे स्वामी श्रीरामांनी सतीचे कपट ओलखले. ज्यांचे स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो, तेच ते सर्वज्ञ भगवान श्रीराम होते. ॥ २ ॥
सती कीन्ह चह तहँहुँ दुराऊ । देखहु नारि सुभाव प्रभाऊ ॥
निज माया बलु हृदयँ बखानी । बोले बिहसि रामु मृदु बानी ॥
स्रीस्वभावाचा नमुना पाहा. सतीला तेथे ( सर्वज्ञ श्रीरामांच्यासमोरही ) कपट करण्याची इच्छा झाली. आपल्या माया-बलाचे मनात स्मरण करुन श्रीरामचंद्र हसून कोमल वाणीने म्हणाले, ॥ ३ ॥
जोरि पानि प्रभु कीन्ह प्रनामू । पिता समेत लीन्ह निज नामू ॥
कहेउ बहोरि कहॉ बृषकेतू । बिपिन अकेलि फिरहु केहि हेतू ॥
प्रभूंनी दोन्ही हात जोडून सतीला म्हटले, ‘ मी दशरथपुत्र राम तुम्हांला प्रणाम करत आहे. नंतर विचारले की, भगवान शिव कोठे आहेत ? तुम्ही येथे वनात एकट्याच का फिरत आहात ? ’ ॥ ४ ॥
राम बचन मृदु गूढ सुनि उपजा अति संकोचु ।
सती सभीत महेस पहिं चलीं हृदयँ बड सोचु ॥ ५३ ॥
श्रीरामांचे कोमल व गूढ बोलणे ऐकून सती ओशाळून गेली. ती घाबरुन गप्पपणे शिवांच्या जवळ परतु लागली. तिला आता काळजी लागून राहिली. ॥ ५३ ॥
मैं संकर कर कहा न माना । निज अग्यानु राम पर आना ॥
जाइ उतरु अब देहउँ काहा । उर उपजा अति दारुन दाहा ॥
‘ आपण शंकरांचे म्हणणे मानले नाही आणि आपल्या अज्ञानाचा आरोप श्रीरामांच्यावर केला. आता मी परत जाऊन शंकरांना काय उत्तर देऊ ?’
( असा विचार करता करता ) सतीचे मन फारच उद्विग्न झाले. ॥ १ ॥
जाना राम सतीं दुखु पावा । निज प्रभाउ कछु प्रगटि जनावा ॥
सतीं दीख कौतुकु मग जाता । आगें रामु सहित श्री भ्राता ॥
सतीला दुःख झाले आहे, हे श्रीरामांनी ओळखले. तेव्हा त्यांनी आपला प्रभाव दाखविला. सती वाटेने जात असता, तिला चमत्कार दिसला की श्रीरामचंद्र हे सीता व लक्ष्मण यांचेसह समोरुन जात आहेत. ( याप्रसंगी श्रीरामांनी सतीला सीता दाखविली. कारण, तिने श्रीरामांचे सच्चिदानंद रुप पाहावे, वियोग व दुःखाची जी कल्पना तिच्या मनात आली होती, ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखे व्हावे. ) ॥ २ ॥
फिरि चितवा पाछें प्रभु देखा । सहित बंधु सिय सुंदर बेषा ॥
जहँ चितवहिं तहँ प्रभु आसीना । सेवहिं सिद्ध मुनीस प्रबीना ॥
मग सतीने मागे वळून पाहिले, तेव्हा तेथेही बंधू लक्ष्मण आणि सीतेसह श्रीराम सुंदर वेषात दिसून आले. जिकडे पाहावे तिकडे प्रभू श्रीराम विराजमान आहेत आणि चतुर सिद्ध मुनीश्र्वर त्यांची सेवा करीत आहेत. ॥ ३ ॥
देखे सिव बिधि बिष्नु अनेका । अमित प्रभाउ एक तें एका ॥
बंदत चरन करत प्रभु सेवा । बिबिध बेष देखे सब देवा ॥
सतीने तेथे अनेक शिव, विष्णू, ब्रह्मदेव पाहिले. ते एकापेक्षा एक प्रभावी होते. तर्‍हेतर्‍हेची वेशभूषा करुन सर्व देव श्रीरामांची चरण-वंदना करीत सेवा करीत होते. ॥ ४ ॥
दोहा—सती बिधात्री इंदिरा देखीं अमित अनूप ।
जेहिं जेहिं बेष अजादि सुर तेहि तेहि तन अनुरुप ॥ ५४ ॥
तिला अनेक अनुपम सती, सावित्री, लक्ष्मी दिसत होत्या, ज्या रुपांमध्ये ब्रह्मदेव इत्यादी देव होते, त्यांना शोभतील अशा रुपात ( त्यांच्या ) या सर्व शक्तीसुद्धा होत्या. ॥ ५४ ॥
देखे जहँ तहँ रघुपति जेते । सक्तिन्ह सहित सकल सुर तेते ॥
जीव चराचर जो संसारा । देखे सकल अनेक प्रकारा ॥
सतीने जिकडे-तिकडे जितके श्रीराम पाहिले, तितकेच देवही आपल्या शक्तींसह तिला दिसले. जगात जितके चराचर जीव आहेत, तेसुद्धा अनेक प्रकारचे दिसून आले. ॥ १ ॥
पूजहिं प्रभुहि देव बहु बेषा । राम रुप दूसर नहिं देखा ॥
अवलोके रघुपति बहुतेरे । सीता सहित न बेष घनेरे ॥
( तिला दिसले की, ) अनेक वेष धारण केलेले देव हे प्रभू श्रीरामांची पूजा करीत आहेत. परंतु श्रीरामांचे दुसरे रुप कुठे दिसले नाही. सीतेसह अनेक श्रीराम दिसले, परंतु त्यांचे अनेक वेष नव्हते. ॥ २ ॥
सोइ रघुबर सोइ लछिमनु सीता । देखि सती अति भईं सभीता ॥
हृदय कंप तन सुधि कछु नाहीं । नयन मूदि बैठीं मग माहीं ॥
( सर्व ठिकाणी ) तेच रघुनाथ, तेच लक्ष्मण आणि तीच सीता—हे पाहून सती घाबरुन गेली. तिच्या मनाचा थरकाप उडाला आणि देहाची शुद्ध हरपली. तेव्हा ती डोळे मिटून वाटेतच बसली. ॥ ३ ॥
बहुरि बिलोके नयन उधारी । कछु न दीख तहँ दच्छकुमारी ।
पुनि पुनि नाइ राम पद सीसा । चलीं तहॉ जहँ रहे गिरीसा ॥
तिने डोळे उघडून बघितले, तर सतीला तेथे काहीच दिसले नाही. तेव्हा तिने श्रीरामांच्या चरणी वारंवार मस्तक नम्र केले आणि जेथे शिव बसले होते, तेथे ती परत गेली. ॥ ४ ॥
दोहा—गईं समीप महेस तब हँसि पूछी कुसलात ।
लीन्हि परीछा कवन बिधि कहहु सत्य सब बात ॥ ५५ ॥
जेव्हा ती शिवांच्याजवळ गेली, तेव्हा त्यांनी हसून विचारले की, ‘ तू श्रीरामांची परीक्षा कशी घेतलीस, ते खरे खरे सांग. ‘ ॥ ५५ ॥
मासपारायण दुसरा विश्राम
सतीं समुझि रघुबीर प्रभाऊ । भय बस सिव सन कीन्ह दुराऊ ॥
कछु न परीछा लीन्हि गोसाईं । कीन्ह प्रनामु तुम्हारिहि नाईं ॥
सतीने श्रीरामांचा प्रभाव पाहिला होता, म्हणून भीतीमुळे तिने लपवाछपवी केली आणि ती म्हणाली, ‘ हे स्वामी, मी कोणतीच परीक्षा घेतली नाही. ( तेथे जाऊन ) तुमच्याप्रमाणे प्रणाम केला. ॥ १ ॥
जो तुम्ह कहा सो मृषा न होई । मोरें मन प्रतीति अति सोई ॥
तब संकर देखेउ धरि ध्याना । सतीं जो कीन्ह चरित सबु जाना ॥
तुम्ही जे सांगितले ते काही खोटे ठरणार नाही, याची मला खात्री होती. ‘ तेव्हा श्रीशिवांनी ध्यानामध्ये पाहिले आणि सतीने जे केले होते, ते सर्व जाणले. ॥ २ ॥
बहुरि राममायहि सिरु नावा । प्रेरि सतिहि जेहिं झूँठ कहावा ॥
हरि इच्छा भावी बलवाना । हृदयँ बिचारत संभु सुजाना ॥
नंतर त्यांनी श्रीरामांच्या मायेला मस्तक नमवपले, जिच्या प्रेरणेमुळे सतीच्या तोंडूनही असत्य बाहेर पडले. ज्ञानी शिवांनी मनात विचार केला की, हरीच्या इच्छेमुळे पुढे होणारे अटळ आहे. ॥ ३ ॥
सतीं कीन्ह सीता कर बेषा । सिव उर भयउ बिषाद बिसेषा ॥
जौं अब करउँ सती सन प्रीती । मिटइ भगति पथु होइ अनीती ॥
सतीने सीतेचा वेष धारण केला, हे समजल्यामुळे श्रीशिवांच्या मनास मोठा विषाद वाटला. त्यांनी विचार केला की, ‘ आता जर मी सतीवर प्रेम केले , तर भक्तिमार्ग उध्वस्त होईल आणि मोठा अन्याय घडेल. ॥ ४ ॥
दोहा—परम पुनीत न जाइ तजि किएँ प्रेम बड पापु ।
प्रगटि न कहत महेसु कछु हृदयँ अधिक संतापु ॥ ५६ ॥
सती ही परम पवित्र आहे. या महासाध्वीचा त्यागही करता येत नाही आणि तिच्यावर प्रेम करण्यामध्ये मोठे पाप आहे. ‘ श्रीशिवांनी उघडपणें काही सांगितले नाही, परंतु त्यांच्या मनाचा भडका उडाला होता. ॥ ५६ ॥
तब संकर प्रभु पद सिरु नावा । सुमिरत रामु हृदयँ अस आवा ॥
एहिं तन सतिहि भेट मोहि नाहीं । सिव संकल्पु कीन्ह मन माहीं ॥
तेव्हा शिवांनी श्रीरामांच्या चरणी मस्तक नम्र केले आणि श्रीरामांचे स्मरण करताच त्यांच्या मनात आले की, सती या देहामध्ये असताना तिची माझी ( पती-पत्नी या नात्याने ) भेट होणे योग्य नाही, मग त्यांनी आपल्या मनात संकल्प केला, ॥ १ ॥
अस बिचारि संकरु मतिधीरा । चले भवन सुमिरत रघुबीरा ॥
चलत गगन भै गिरा सुहाई । जय महेस भलि भगति दृढाई ॥
दृढनिश्र्चयी श्रीशंकर असा विचार करुन श्रीरामांचे स्मरण करीत आपल्या स्थानी ( कैलासाला ) निघाले. जाताना सुंदर आकाशवाणी झाली की, ‘ हे महेशा, तुमचा विजय असो. तुम्ही भक्तीचा चांगल्याप्रकारे दृढनिश्र्चय दाखविला. ॥ २ ॥
अस पन तुम्ह बिनु करइ को आना । रामभगत समरथ भगवाना ॥
सुनि नभगिरा सती उर सोचा । पूछा सिवहि समेत सकोचा ॥
तुमच्याशिवाय दुसरा कोण अशी प्रतिज्ञकरणार ? तुम्ही श्रीरामांचे भक्त आहात, सर्व प्रकारे समर्थ आहात आणि भगवान आहात. ‘ ही आकाशवाणी ऐकून सतीच्या मनात चिंता उत्पन्न झाली. तिने संकोचाने शिवांना विचारले की, ॥ ३ ॥
कीन्ह कवन पन कहहु कृपाला । सत्यधाम प्रभु दीनदयाला ॥
जदपि सतीं पूछा बहु भाँती । तदपि न कहेउ त्रिपुर आराती ॥
‘ हे कृपाळू तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली आहे, ते सांगा. हे प्रभो, तुम्ही सत्य-धाम आहात आणि दीनदयाळू आहात .’ जरी सतीने पुष्कळ तर्‍हेने विचारले, तरी श्रीशिव काही बोलले नाहीत. ॥ ४ ॥
दोहा—सतीं हृदयँ अनुमान किया सबु जानेउ सर्बग्य ।
कीन्ह कपटु मैं संभु सन नारि सहज जड अग्य ॥ ५७ ( क ) ॥
सतीला मनात अंदाज आला की, सर्वज्ञ शिवांनी सर्व जाणले आहे. मी एका अर्थी शिवांशी कपट केले. स्री ही स्वभावतः मूर्ख आणि अज्ञानी असते. ॥ ५७ ( क ) ॥
सो—जलु पय सरिस बिकाइ देखहु प्रीति कि रीति भलि ॥
बिलग होइ रसु जाइ कपट खटाई परत पुनि ॥ ५७ ( ख ) ॥   
प्रेमाची रीत कशी आहे पाहा ! पाणीसुद्धा ( दुधात मिसळल्यावर ) दुधाच्या भावानेच विकले जाते. दुधात कपटाचा आंबटपणा पडला की, पाणी वेगळे होते. ( दूध नासते ) आणि त्याची गोडी नाहीशी होते. ॥ ( ५७ ख ) ॥
हृदयँ सोचु समुझत निज करनी । चिंता अमित जाइ नहिं बरनी ॥
कृपासिंधु सिव परम अगाधा । प्रगट न कहेउ मोर अपराधा ॥
आपल्या कृत्यामुळे सतीला घोर लागला. तिला इतकी चिंता लागून राहिली की सांगता येत नाही. ( तिला उमजले की ) शिव हे कृपेचे अथांग सागर आहेत. म्हणून त्यांनी उघडपणे अपराध बोलून दाखविला नाही. ॥ १ ॥
संकर रुख अवलोकि भवानी । प्रभु मोहि तजेउ हृदयँ अकुलानी ॥
निज अघ समुझि न कछु कहि जाई । तपइ अवॉ इव उर अधिकाई ॥
शिवांचा कल पाहून सतीला उमजले की, स्वामींनी माझा त्याग केलेला आहे. ती मनात फार व्याकूळ झाली. आपले पाप समजून आल्यामुळे काही बोलता येत नव्हते, परंतु हृदय कुंभाराच्या आव्यासारखे पोळून निघत होते. ॥ २ ॥
सतिहि ससोच जानि बृषकेतू । कहीं कथा सुंदर सुखहेतु ॥
बरनत पंथ बिबिध इतिहासा । बिस्वनाथ पहुँचे कैलासा ॥
श्रीशिवांनीं पाहिले की, सती चिंतित झाली आहे. तेव्हा तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी वाटेने जाताना सुंदर कथा सांगितल्या. वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या आणि ते कैलासावर पोहोचले. ॥ ३ ॥
तहँ पुनि संभु समुझि पन आपन । बैठे बट तर करि कमलासन ॥
संकर सहज सरुप सम्हारा । लागि समाधि अखंड अपारा ॥
नंतर शिवांना आपली प्रतिज्ञा आठवली. ते वटवृक्षाखाली पद्मासन घालून बसले. ते स्वस्वरुपात मग्न होऊन गेले. त्यांना अखंड व अपार अशी समाधी लागली. ॥ ४ ॥
 दोहा—सती बसहिं कैलास तब अधिक सोचु मन माहिं ।
मरमु न कोऊ जान जुग सम दिवस सिराहिं ॥ ५८ ॥
तेव्हा सती कैलासावर राहू लागली. तिच्या मनात फार मोठे दुःख भरलेले होते. हे रहस्य कोणीही जाणत नव्हते. तिचा एक एक दिवस एक एक युगाप्रमाणे जात होता. ॥ ५८ ॥
नित नव सोचु सती उर भारा । कब जैहउँ दुख सागर पारा ॥
मैं जो कीन्ह रघुपति अपमाना । पुनि पतिबचनु मृषा करि जाना ॥
सतीच्या मनावर नित्य चिंतेचे ओझे वाढत होते. या दुःख सागरातून मी केव्हा एकदा पार पडेन, ( असे तिला झाले होते. ) मी श्रीरामांचा अपमान केला आणि पतीचे म्हणणे खोटे मानले, ॥ १ ॥
सो फलु मोहि बिधातॉं दीन्हा । जो कछु उचित रहा सोइ कीन्हा ॥
अब बिधि अस बूझिअ नहिं तोही । संकर बिमुख जिआवसि मोही ॥
त्याचे फळ मला दैवाने दिले. दैवाने जे योग्य होते, तेच केले, परंतु हे दैवा, श्रीशंकर विन्मुख झाल्यावर मला जिवंत तरी का ठेवतोस ? ॥ २ ॥
कहि न जाइ कछु हृदय गलानी । मन महुँ रामहि सुमिर सयानी ॥
जौं प्रभु दीनदयालु कहावा । आरति हरन बेद जसु गावा ॥
सतीच्या मनातील ही वेदना काही सांगता येणे शक्य नव्हती. शहाण्या सतीने मनात श्रीरामांचे स्मरण करुन म्हटले, ‘ हे प्रभू, तुम्हांला दीनदयाळू असे म्हणतात आणि तुम्ही दुःख हरण करणारे आहात, अशी तुमची कीर्ती वेदांनी गाइली आहे. ॥ ३ ॥
तौं मैं बिनय करउँ कर जोरी । छूटउ बेगि देह यह मोरी ॥
जौं मोरें सिव चरन सनेहू । मन क्रम बचन सत्य ब्रतु एहू ॥
तेव्हा मी हात जोडून विनंती करते की, माझे हे शरीर लवकर पडावे. जर माझे शिवांचे चरणी प्रेम असेल आणि माझे हे ( प्रेमाचे ) व्रत कायावाचामनाने सत्य असेल, ॥ ४ ॥

Custom Search

No comments:

Post a Comment