Friday, May 1, 2020

Dnyeneshwari Adhyay 1 Part 4 ज्ञानेश्र्वरी अध्याय १ भाग ४


Dnyeneshwari Adhyay 1 Part 4 
ज्ञानेश्र्वरी अध्याय १ भाग ४ 
ओव्या १५१ ते २००

तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक ।
हा काशीपती देख । महाबाहु ॥ १५१ ॥
१५१) त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादि अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पाहा.
तेथ र्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।
धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ १५२ ॥
१५२) तेथे अर्जुनचा मुलगा ( अभिमन्यु ), अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी,
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।
तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले ॥ १५३ ॥
१५३) विराटादिक मोठे राजे, जे मुख्य शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजविण्यास आरंभ केला.
तेणें महाघोषनिर्घातें । शेषकूर्म अवचितें ।
गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥ १५४ ॥
१५४) त्या मोठ्या घोषाच्या दणक्यानें शेष, कूर्म हे एकदम गोंधळून जाऊन आपण धरलेलें पृथ्वीचें ओझे टाकून द्यावयाच्या बेतात आले. 
तेथ तिन्ही लोक डंडाळित । मेरु मांदार आदोळित ।
समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥ १५५ ॥ 
१५५) त्यामुळें तिन्ही लोक डळमळूं लागले. मेरु व मांदार हे पर्वत मागेपुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या.
पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत ।
तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥ १५६ ॥
१५६) पृथ्वीतळ उलथतों कीं काय व आकाशाला हिसके बसूं लागल्यामुळें नक्षत्रांचा सडाच होतो कीं काय ( असें वाटूं लागलें )
सृष्टी गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली ।
ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं ॥ १५७ ॥
१५७) सृष्टी गेली रे गेली, देवांना निराधार स्थिति आली, अशी ब्रह्मलोकांत एकच ओरड झाली.
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला ।
तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं ॥ १५८ ॥
१५८) दिवसाच सूर्य थांबला व ज्याप्रमाणें प्रलयकाल सुरु व्हावा. त्याप्रमाणें तिन्ही लोकांत हाहाकार उडाला.
तंव आदिपुरुष विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु ।
मग लोपला अद्भुतु । संभ्रमु तो ॥ १५९ ॥
१५९) तें पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनांत म्हणाला ‘ न जाणों कदाचित् सृष्टीचा अंत होईल. ’ ( तो चुकवावा म्हणून ) मग त्यानें तो विलक्षण गोंधळ ( एकदम ) शांत केला. 
म्हणोनि विश्र्व सांवरलें । एर्‍हवीं युगान्त होतें वोडवलें ।
जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥ १६० ॥
 १६०) त्यामुळें जग सांवरलें. नाहीतर ज्या वेळेला कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजविले, त्यावेळी प्रलयकाळ होण्याची वेळ आली होती.
तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला ।
तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥ १६१ ॥
१६१) तो घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो होता, त्यानेंच कौरवांच्या सर्व सैन्याची दाणादाण उडाली.
तो जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु ।
तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥ १६२ ॥
१६२) हत्तींच्या कळपाची सिंह लीलेनेंच जशी पांगापांग करतो तशी कौरवांची अंतःकरणें त्या प्रतिध्वनीनें भेदून टाकली.
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हियें घालिती ।
एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ॥ १६३ ॥
१६३) तो प्रतिध्वनी दुमदुमत असतांना जेव्हां त्यांच्या कानांवर आला, तेव्हां उभेपणींच त्यांच्या काळजानें ठाव सोडला, ( त्यांतल्या त्यांत ) ते एकमेकांना ‘ अरे सावध राहा, सावध राहा असे म्हणूं लागले. 
तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते ।
तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥ १६४ ॥
१६४) त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते, त्यांनी पुन्हां सैन्याला आवरिलें
मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले ।
तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥ १६५ ॥
१६५) मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्यानें तिन्ही लोक त्रस्त झाले.
तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।
जैसे प्रलयांत जलधर । अनिवार कां ॥ १६६ ॥
१६६) त्या वेळीं प्रलयकाळीं मेघ ज्याप्रमाणें अनिवार वर्षाव करतात त्याप्रमाणें धनुर्धारी योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करुं लागले. 
तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें ।
मग संभ्रमें दिठी सेने । घालितसे ॥ १६७ ॥
१६७) अर्जुनानें तें पाहून मनांत संतोष मानला आणि मग उत्सुकतेनें सैन्याकडे नजर फेकली.
तंव संग्रामीं सज्ज जाइले । सकळ कौरव देखिले ।
मग लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ॥ १६८ ॥
१६८) तेव्हां युद्धाला तयार झालेले सर्व कौरव ( अर्जुनाला ) दिसले. मग पांडुपुत्र अर्जुनानें लीलेनेच धनुष्य उचलून घेतले.
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा ।
नेऊनि मध्यें घालावा । दोही दळां ॥ १६९ ॥
१६९) त्या वेळीं अर्जुन म्हणाला, देवा, आतां चटकन रथ हांकावा व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा.
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।
न्याहाळीन अशेख । झुंजते जे ॥ १७० ॥
१७०) जोंपर्यंत हे सर्व झुंजण्याकरितां आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन ( तोंपर्यंत उभा कर ).
एथ आले असती आघवे । परी कवणेंसीं म्यां झुंजावें ।
हें रणीं लागे पहावें । म्हणऊनियां ॥ १७१ ॥
१७१) येथें सर्व आले आहेत; पण मी रणांत कोणाबरोबर लढावें, याचा विचार करणें जरुर आहे. म्हणून ( मी पाहतो. )
बहुतकरुनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव ।
वांटिवावीण हांव । बांधिती झुंजीं ॥ १७२ ॥   
१७२) फार करुन, कौरव हे उतावळे व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थावाचून युद्धाची हांव धरतात.
झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती ।
हे सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥ १७३ ॥
१७३) हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धांत टिकाव धरीत नाहीत. इतकें सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला,
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला ।
दोहीं सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥ १७४ ॥
१७४) ऐका, अर्जुन एवढें बोलला. इतक्यांत श्रीकृष्णाने रथ हांकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला.
 भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख ।
पृथिवीपति आणिक । बहुत आहाति ॥ १७५ ॥
१७५) ज्या ठिकाणीं भीष्म, द्रोण आदिकरुन आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढें उभे होते.
१५-४-२०२०
तेथ स्थिर करुनि रथु । अर्जुन असे पाहातु ।
तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥ १७६ ॥
१७६) त्या ठिकाणी रथ थांबवून, अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेने पाहूं लागला,
मग देवा म्हणे देख देख । हे गोत्रगुरु अशेख ।
तंव कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला ॥ १७७ ॥
१७७) मग म्हणाला, देवा, पाहा पाहा, हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला.
तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे ।
हें मनीं धरिलें येणें । परि कांहीं आश्र्चर्य असे ॥ १७८ ॥
१७८) तो आपल्या मनाशी आपण म्हणाला, ह्याने ह्या वेळीं हें काय मनांत आणिले आहे कोणास ठाऊक ! पण कांहीं तरी विलक्षणच असावें.
ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थु ।
परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ १७९ ॥
१७९) असें पुढचे त्यानें अनुमान बांधलें. तो ( सर्वांच्या ) हृदयामध्ये राहाणारा असल्यामुळे त्यानें ते सहज जाणलें; परंतु त्या वेळीं तो कांहीं न बोलता स्तब्ध राहिला.
तंव तेथ पार्थु सकळ । पितृपितामह केवळ ।
गुरु बंधु मातुळ । देखता झाला ॥ १८० ॥    
१८०) तों तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा या सर्वांसच अर्जुनानें पाहिलें.
इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले ।
हे सकळ असती आले । तयांमाजी ॥ १८१ ॥
१८१) आपलें इष्टमित्र, मुलेंबाळें हे सर्व त्या सैन्यांत आले आहेत, असें त्याने पाहिलें.
सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे ।
कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ॥ १८२ ॥
१८२) जिवलग मित्र, सासरे, आणखी सगेसोयरे, पुत्र, नातु ( असे ) अर्जुनानें तेथें पाहिले.
जयां उपकार होते केले । कां आपदी जे राखिले ।
हे असो वडील धाकुले-। आदिकरुनि ॥ १८३ ॥
१८३) ज्यांच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळीं ज्यांचें रक्षण केलेलें होतें; फार काय ? लहान-मोठे आदिकरुन-
ऐसे गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।
हे अर्जुने तिये वेळीं । अवलोकिलें ॥ १८४ ॥
१८४) असें हें सर्व कुळच दोन्ही सैन्यांत लढाईस तयार झलेले आहे , हे त्यावेळी अर्जुनानें पाहिले.
तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली ।
तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ १८५ ॥
१८५) त्या प्रसंगी ( अर्जुनाच्या ) मनात गडबड उडाली आणि ( त्यामुळे त्याच्या मनांत ) सहज करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगांतील वीरवृत्ति निघून गेली.
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी ।
तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥ १८६ ॥
१८६) ज्या ( स्रिया ) उच्च कुळांतल्या असून गुण व रुप यांनीसंपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळें दुसर्‍या स्रीचें ( सवतीचे ) वर्चस्व सहन होत नाही.
नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे ।
मग पाडेंविण अनुसरे । भ्रमला जैसा ॥ १८७ ॥
१८७) नवीन स्रीच्या आवडीच्या भरांत कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन ( तिची ) योग्यता न पाहतां तिच्या नादीं लागतो.
कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।
मग तया विरक्ततासिद्धी । आठवेना ॥ १८८ ॥
१८८) किंवा तपोबलानें ऋद्धि ( ऐश्वर्य ) प्राप्त झाली असतां ( वैराग्यशाली पुरुषाची ) बुद्धि भ्रम पावते; आणि मग त्याना वैराग्यसिद्धीची आठवणहि राहात नाही. 
तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें ।
जें अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥ १८९ ॥
१८९) त्याप्रमाणें अर्जुनाची त्या वेळीं स्थिति झाली. त्याची असलेली वीरवृत्ति गेली. कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला वाहिलें. 
देखा मंत्रज्ञु बरळु जाये । मग तेथ कां जैसा संचारु होये ।
तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ १९० ॥
 १९०) पाहा, मांत्रिक चांचरला ( मंत्रोच्चारांत चुकला ) असतां, जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहानें व्यापला गेला.
म्हणऊनी असता धीरु गेला । हृदया द्रावो आला ।
जैसा चंद्रकळीं सिंपिला । सोमकांतु ॥ १९१ ॥
१९१) म्हणून त्याच्या अंगीं असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरलें, ज्याप्रमाणें चंद्रकिरणांचें शिंपण झाल्यानें चंद्रकांत मणि पाझरुं लागतो, 
तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु ।
मग सखेद असे बोलतु । अच्युतेसी ॥ १९२ ॥
१९२) त्याप्रमाणें पार्थ महाकरुणेनें मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलूं लागला.
तो म्हणे अवधारीं देवा । म्यां पाहिला हा मेळावा ।
तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ॥ १९३ ॥
१९३) तो म्हणाला, देवा, ऐका. मी हा सर्व जमाव पाहिला. तो येथे सर्व आप्तसंबंधीच दिसतात.
हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त ।
पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ १९४ ॥
१९४) हे सर्व लढाईला अतिशय उत्सुक झाले आहेत, हे खरें; पण तें ( यांच्याशी लढणें ) आपल्याला कसें योग्य होईल ?
येणें नांवेंचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं ।
मन बुद्धी ठायीं । स्थिर नोहे ॥ १९५ ॥
१९५) या नातलगांशी युद्ध ( करावयाच्या विचारानेंच ) मला कसेसेंच होतें. माझे मलाच मुळी भान नाहींसे झालें आहे. माझे मन व बुद्धि ही ठिकाणावर नाहींत.
देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत ।
विकळता उपजत । गात्रांसी ॥ १९६ ॥
१९६) पाहा, माझा देह कांपत आहे. तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे.
सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥ १९७ ॥
१९७) सर्वांगावर कांटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडिव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे.
तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें ।
ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥ १९८ ॥
१९८) तें धरलें न जातांच निसटलें; परंतु हातांतून केव्हा पडून गेलें, याची मला दादच नाहीं. या मोहाने माझें हृदय असें घेरले आहे. 
जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण ।
तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
१९९) हें ( अर्जुनाचे अंतःकरण ) वज्राहून कठीण, दुसर्‍यास दाद न देणारें, अति खंबीर आहे; पण या करुणेची कडी त्याच्याहि वर पण आहे. मोठ्या आश्र्चर्याची गोष्ट अशी कीं,   
जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।
तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥ २०० ॥
२००) ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास लाविलें व निवातकवच नांवाच्या राक्षसाचा ठावठिकाणा नाहींसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणांत मोहाने घेरले.

Custom Search

No comments:

Post a Comment