Wednesday, May 6, 2020

Dnyaneshwari Adhyay 1 Part 5 ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग ५


Dnyaneshwari Adhyay 1 Part 5 
ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग ५

जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ट कोरडें ।
परि कळिकेमाजीं सांपडे । कोंवळिये ॥ २०१ ॥
२०१) भुंगा हा ज्याप्रमाणें वाटेल त्या प्रकारचें कोरडें लाकूड सहज लीलेनें पोखरुन टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येंच अडकून पडतो.
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परी तें कमळदळ चिरुं नेणे ।
तैसें कठीण कोवळेपणें । स्नेह देखा ॥ २०२ ॥
२०२) तेथें तो प्राणासहि मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचार त्याच्या मनास शिवतहि नाही; त्याप्रमाणें पाहा, हा स्नेह जात्या कोंवळा खरा, पण महा कठीण !
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया ।
म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ २०३ ॥
२०३) संजय म्हणाला, राजा, ऐक. हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही; म्हणून ( त्यानें ) अर्जुनाला भुरळ पाडली.
अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु ।
विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ २०४ ॥
२०४) राजा, ऐक. मग तो अर्जुन ( युद्धाला आलेले ) सर्व आपलेच लोक आहेत असें पाहून, लढाईचा अभिमान ( ईर्षा ) विसरुन गेला. 
कैंसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता ।
मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥ २०५ ॥
२०५) तेथें त्याच्या चित्तांत सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे ! मग म्हणाला, कृष्णा, आपण आतां येथें राहूं नये, हे बरें.
२१-४-२०२०
माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।
जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥ २०६ ॥
२०६) ह्या सर्वांस मारावयाचें हें मनांत येतांच त्यानें माझें मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळूं लागतें.
या कौरवा जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे ।
हे येरयेर आघवे । गोत्रज आमुच ॥ २०७ ॥
२०७) या कौरवांचा वध करणें जर योग्य आहे, तर धर्मराजादिकांचा वध करण्याला काय हरकत आहे ? कारण कीं, हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत.
म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज ।
एणें काय काज । महापापें ॥ २०८ ॥
२०८) या करितां आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हांस काय गरज आहे ?
देवा बहुतीं परी पाहतां । एथ वोखटें होईल झुंजतां ।
वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥ २०९ ॥
२०९) देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असतां ( असें वाटतें कीं ), यावेळी युद्ध केले, तर ( त्याचा परिणाम ) वाईट होईल; पण तें जर टाळलें तर कांहीं लाभ होईल.
तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं ।
एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां ॥ २१० ॥ 
२१०) त्या विजयाच्या इच्छेशी मला कांहींच कर्तव्य नाही; अशा रितीनें मिळविलेलें राज्य तरी आपल्याला काय करावयाचें ?
यां सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे ।
ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥ २११ ॥
२११) अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारुन जे भोग भोगावयाचे, त्या सगळ्यांना आग लागो !
तेणें सुखेंविण होइल । तें भलतेही साहिजेल ।
वरि जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ २१२ ॥
२१२) त्या भोगांपासून मिळणार्‍या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल, तो वाटेल तसा बिकट असला तरीहि सहन करता येईल. इतकेंच काय यांच्याकरितां आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल;
परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे ।
हे स्वप्नींही मन माझें । करुं न शके ॥ २१३ ॥
२१३) पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावें, ही गोष्ट माझें मन स्वप्नांत देखील करुं शकणार नाही.
तरी आम्हीं कां जन्मावें । कवणालागीं जियावें ।
जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
२१४) जर या वडील माणसांचे अहित मनानें चिंतावयाचें, तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय व आम्ही जगावें तरी कोणासाठीं ?
पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ ।
जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥ २१५ ॥
२१५) कुळांतील लोक पुत्राची इच्छा करितात, त्याचें काय हेंच फल की, त्यानें आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा.
हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे ।
वरी घडे तरी कीजे । भलें एयां ॥ २१६ ॥
२१६) असें आपण मनांत तरी कसें आणावें ? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे ? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावें.
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें ।
हें जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥ २१७ ॥
२१७) आम्ही जें जें मिळवावें, तें तें सर्वांनी ( वास्तविक )भोगण्यासाठी आहे. यांच्या कामाकरितां आम्ही आपले प्राणहि खर्चावयाचें आहेत.
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ ।
मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८ ॥
२१८) आम्ही देशोदेशींचे सर्व राजे युद्धांत जिंकून जें आपलें कुळ संतोषवावे,
तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत ।
जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९ ॥
२१९) तेंच हें आमचें सर्व कुळ; पण कर्म कसें विपरीत आहे पाहा ! हें सर्व आपसांत लढावयास तयार झाले आहेत !
अंतौरियां कुमरें । सांडोनियां भांडारें ।
शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥ २२० ॥
२२०) बायका, मुलें, आपले खजिने, हीं सर्व सोडून व तरवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहेत,
२४-४-२०२०
ऐसीयांतें कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरुं ।
निज हृदया करुं । घातु केवीं ॥ २२१ ॥
२२१) अशांना मी मारुं तरी कसा ? मी कोणावर शस्त्र धरुं ? ( हे कौरव म्हणजे आम्हीच तेव्हां यांना मारणें म्हणजे आपलाच घात करणें होय. या दृष्टीनें अर्जुन म्हणतो ) मी आपल्या काळजाचा घात कसा करुं ?
हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण ।
जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥
२२२) हे कोण आहेत, तूं जाणत नाहींस काय ? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत, असे भीष्म व द्रोण, ते पलीकडे आहेत, पाहा.
एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ ।
पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥
२२३) येथे मेहुणे, सासरे, मामे आणि इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत.
अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे ।
म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि ॥ २२४ ॥
२२४) एक अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत; आणि म्हणूनच ( यांना मारावें असे ) वाणीनें नुसतें बोलणें, हे सुद्धा पाप आहे.
हे वरी भलतें करितु । आतांचि एथें मारितु ।
परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥ २२५ ॥
२२५) उलटपक्षीं, हे वाटेल तें करोत आत्तांच पाहिजे तर आम्हांस येथें मारोत; पण आम्हीं यांच्या घाताची गोष्ट मनांत आणणें बरें नाहीं.
त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ ।
तरी हें अनुचित । नाचरें मी ॥ २२६ ॥
२२६) त्रैलोक्याचें समग्र राज्य जरी येथें मिळणार असलें तरी हें अयोग्य काम मी करणार नाही.
जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाचां मनीं उरिजे ।
सांगें मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ॥ २२७ ॥
२२७) जर आज आम्हीं येथें असें केलें, तर मग आमच्याविषयीं कोणाच्या मनात आदर राहील ? आणि मग कृष्णा, सांग तुझें मुख कसचें दिसणार ?
जरी वधु करुनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा ।
मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ॥ २२८ ॥
२२८) जर मी गोत्रांचा वध केला, तर सर्व दोषांचें मी वसतिस्थान होईन आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे, तो तूं हातचा जाशील.
कुळहरणीं पातकें । तियें आंगीं जडती अशेखें ।
तयें वेळी तूं कवणें कें । देखावासी ॥ २२९ ॥
२२९) कुळाच्या घातानें घडणारी सर्व पातकें, जेव्हां अंगीं जडतील तेव्हां तुला कोणीं कोठें पाहावें ?
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु ।
मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥ २३० ॥
२३०) ज्याप्रमाणें बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथें क्षणभरहि थांबत नाही;
सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु ।
न सेवितु अव्हेरु । करुनि निघे ॥ २३१ ॥
२३१) चिखलानें भरलेलें सरोवर पाहून चकोर त्यांत न राहतां त्याचा त्याग करुन तेथून निघून जातो;
तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा ।
जरी पुण्याचा बोलावा । नाशिजैल ॥ २३२ ॥
२३२) त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहींसा झाला तर तूं आपल्या मायेनें मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस.
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामी शस्त्र न धरीं ।
हें किडाळ बहुतीं परीं । दिसतसे ॥ २३३ ॥
२३३) म्हणून मी हें करणार नाही; या लढाईमध्यें हत्यार धरणार नाही. कारण हे युद्ध अनेक प्रकारांनीं निंद्य दिसत आहे.
तुजसी अंतराय होईल । मग सांगेआमचें काय उरेल ।
तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
२३४) तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग सांग; आमचे काय राहिलें ? हे कृष्णा, तुझ्यावांचून त्या दुःखानें आमचें हृदय दुभंग होईल.
म्हणवूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती ।
हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥
२३५) एवढ्याकरितां कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत, हे राहू दे; ही गोष्ट घडणें अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला.   
हे अभिमानमदें भुलले । जरी पा संग्रामा आले ।
तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥ २३६ ॥
२३६) हे कौरव अभिमानाच्या मदानें बहकून जाऊन जरी लढण्याकरितां आले आहेत, तरी पण आम्हीं आपलें हित ( कशांत ) आहे हे पाहिलें पाहिजे. 
हें ऐसें कैसे  करावें । जे आपुले आपण मारावे ।
जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ॥ २३७ ॥
२३७) आपलेंच आप्तसंबंधी आपण मारावे, हें असें ( भलतेंच ) कसें करावें ? जाणूनबुजून  कालकूट कसें घ्यावें ?
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंह जाहला अवचितां ।
तो तंव चुकविता । लाभु आथी ॥ २३८ ॥  
२३८) महाराज रस्त्यानें चालले असतां अकस्मात सिंह आडवा आला, तर त्याला चुकवून जाण्यांतच हित आहे.
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा ।
तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगें ॥ २३९ ॥
२३९) असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर, देवा, यात काय लाभ आहे ? सांग बरें
का समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी ।
तरी क्षणभर एका कवळूनि । जाळूं सके ॥ २४० ॥
२४०) किंवा समोर अग्नि पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलों नाही, तर तो एका क्षणांत आपणांस घेरुन जाळून टाकील.
तैसे दोष हे मूर्त । अंगीं वाजों असती पहात ।
हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ॥ २४१ ॥
२४१) त्याचप्रमाणें हे मूर्तिमंत दोष ( आमच्या ) अंगावर आदळूं पाहात आहेत.; हे समजत असतांहि, या कामीं कसें प्रवृत्त व्हावें ?  
ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं ।
या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥ २४२ ॥  
२४२) त्या वेळी असें बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐक. मी तुला या पापांचा भयंकरपणा सांगतो.  
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि उपजे ।
तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
२४३) ज्याप्रमाणें लाकडानें लाकूड घासलें असतां तेथें एक अग्नि उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो;
तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें ।
तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥ २४४ ॥
२४४) त्याप्रमाणें कुळामध्यें मत्सरानें एकमेकांनी जर एकमेकांचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावतें.
म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे ।
मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥ २४५ ॥
 २४५) म्हणून या पापानें वंश परंपरागत आलेल्या ( कुळ-)धर्माचा लोप होतो आणि मग कुळामध्यें अधर्मच माजतो.
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें ।
आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥ २४६ ॥
२४६) तेथें सारासार विचार, कोणी कशाचें आचरण करावें व कर्तव्य काय, अकर्तव्य काय, या सगळ्या गोष्टी लोप पावतात.
असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे ।
तरी उजूचि का आडळिजे । जयापरी ॥ २४७ ॥
२४७) जवळ असलेला दिवा मालवून मग अंधरांत वावरुं लागलें, तर चांगल्या जागीहिं ज्याप्रमाणें अडखळण्याचा प्रसंग येतो;
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्य धर्मु जाय ।
मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ॥ २४८ ॥
२४८) त्याप्रमाणें ज्या वेळीं कुलक्षय होतो त्या वेळीं कुळांत पहिल्यापासून चालत असलेल्या धर्माचा लोप होतो. मगतेथें पापावांचून दुसरें काय असणार ?
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती ।
म्हणवूनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
२४९) ज्या वेळीं इंद्रियें व मन यांचा निग्रह थांबतो, त्या वेळीं इंद्रियें स्वैर सुटतात. म्हणून कुलीन स्त्रियांकडून व्यभिचार घडतो.
उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती ।
तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥
२५०) उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकांत संचार होतो. अशा रीतीने वर्णसंकर होतो व त्यामुळे जातिधर्म मुळापासून उखडले जातात.


Custom Search

No comments:

Post a Comment