Monday, May 18, 2020

ShriRamCharitManas Part 16 श्रीरामचरितमानस भाग १६


ShriRamCharitManas Part 16 श्रीरामचरितमानस भाग १६
ShriRamCharitManas Part 16
श्रीरामचरितमानस भाग १६  
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—जटा मुकुट सुरसरित सिर लोचन नलिन बिसाल ।
नीलकंठ लावन्यनिधि सोह बालबिधु भाल ॥ १०६ ॥
त्यांच्या मस्तकावर जटांचा मुकुट आणि गंगा शोभत होती. कमळसारखे विशाल नेत्र होते. त्यांचा कंठ निळा होता आणि ते सौंदर्याचे भांडार होते. त्यांच्या मस्तकावर द्वितीयेचा चंद्र शोभून दिसत होता. ॥ १०६ ॥
बैठे सोह कामरिपु कैसें । धरें सरीरु सांतरसु जैसें ॥
पारबती भल अवसरु जानी । गईं संभु पहिं मातु भवानी ॥
कामदेवाचे शत्रू शिव तेथे बसल्यावर असे शोभत होते की, जणू शांतरसच साकार होऊन बसला आहे. योग्य संधी पाहून पार्वतीमाता त्यांच्याजवळ गेली. ॥ १ ॥
जानी प्रिया आदरु अति कीन्हा । बाम भाग आसनु हर दीन्हा ॥
बैठीं सिव समीप हरषाई । पूरुब जन्म कथा चित आई ॥
आपल्या प्रिय पत्नीला पाहून शिवांनी तिचा खूप आदर-सत्कार केला आणि आपल्या डाव्या बाजूस तिला आसन दिले. पार्वती प्रसन्न होऊन शिवांच्या शेजारी बसली. तिला पूर्वजन्माची कथा आठवली. ॥ २ ॥
पति हियँ हेतु अधिक अनुमानी । बिहसि उमा बोलीं प्रिय बानी ॥
कथा जो सकल लोक हितकारी । सोइ पूछन चह सैलकुमारी ॥
आपल्या स्वामींच्या मनात ( आपल्यावर पूर्वीपेक्षा ) अधिक प्रेम असल्याचे पाहून पार्वती हसून गोड शब्दांत म्हणाली, ( याज्ञवल्क्य सांगतात, ) जी कथा सर्व लोकांसाठी हितकारकआहे, तीच पार्वती विचारु इच्छिते. ॥ ३ ॥
 बिस्वनाथ मम नाथ पुरारी । त्रिभुवन महिमा बिदित तुम्हारी ॥
चर अरु अचर नाग नर देवा । सकल करहिं पद पंकज सेवा ॥
( पार्वती म्हणाली, ) ‘ हे विश्र्वनाथा, हे माझे नाथ, हे त्रिपुरारी, तुमचा महिमा त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. चर, अचर, नाग, मनुष्य आणि देव, सर्वजण तुमच्या चरणांची सेवा करतात. ॥ ४ ॥
प्रभु समरथ सर्बग्य सिव सकल कला गुन धाम ।
जोग ग्यान बैराग्य निधि प्रनत कलपतरु नाम ॥ १०७ ॥
हे प्रभो ! तुम्ही समर्थ, सर्वज्ञ आणि कल्याणस्वरुप आहात. सर्व कला आणि गुणांचे निधान आहात. तसेच योग, ज्ञान आणि वैराग्याचे भांडार आहात. तुमचे नाव हे शरणागतांसाठी कल्पवृक्ष आहे. ॥ १०७ ॥
जौं मो पर प्रसन्न सुखरासी । जानिअ सत्य मोहि निज दासी ॥
तौ प्रभु हरहु मोर अग्याना । कहि रघुनाथ कथा बिधि नाना ॥
हे सुखराशी, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला आपली दासी मानीत असाल, तर हे प्रभो, तुम्ही श्रीरामांच्या नाना प्रकारच्या कथा सांगून माझे अज्ञान दूर करा. ॥ १ ॥
जासु भवनु सुरतरु तर होई । सहि कि दरिद्र जनित दुखु सोई ॥
ससिभूषन अस हृदयँ बिचारी । हरहु नाथ मम मति भ्रम भारी ॥
ज्याचे घर कल्पवृक्षाखाली असेल, त्याने दारिद्र्याचे दुःख का बरे सोसावे ? हे शशिभूषण, हे नाथ असा विचार करुन माझ्या बुद्धीचा मोठा भ्रम दूर करा. ॥ २ ॥
प्रभु जे मुनि परमारथबादी । कहहिं राम कहुँ ब्रह्म अनादी ॥
सेस सारदा बेद पुराना । सकल करहिं रघुपति गुन गाना ॥
हे प्रभो ! जे ब्रह्माचे ज्ञाते आणि वक्ते असलेले मुनी आहेत, ते श्रीरघुनाथांना अनादी ब्रह्म म्हणतात आणि शेष, सरस्वती, वेद आणि पुराणे, हे सर्व श्रीरघुनाथांचे गुणगान करतात. ॥ ३ ॥
तुम्ह पुनि राम राम दिन राती । सादर जपहु अनँग आराती ॥
रामु सो अवध नृपति सुत सोई । की अज अगुन अलखगति कोई ॥
आणि हे कामदेवाचे शत्रु, तुम्हीसुद्धा रात्रंदिवस आदराने राम-राम असे जपत असता. हे राम म्हणजेच तेच अयोध्येच्या राजाचे पुत्र आहेत काय ? किंवा अजन्मा, निर्गुण आणि अगोचर कोणी दुसरेच राम आहेत ? ॥ ४ ॥
दोहा—जौं नृप तनय त ब्रह्म किमि नारि बिरहँ मति भोरि ।
देखि चरित महिमा सुनत भ्रमति बुद्धि अति मोरि ॥ १०८ ॥
जर ते राजपुत्र असतील तर मग ब्रह्म कसे ? ( जर ते ब्रह्म असतील तर ) स्त्रीच्या विरहामुळे त्यांची बुद्धी भ्रमित कशी झाली ? एकीकडे त्यांचे असे चरित्र पाहून आणि दुसरीकडे त्यांचा महिमा ऐकून माझी बुद्धी पार बावचळून गेली आहे. ॥ १०८ ॥
जौं अनीह ब्यापक बिभु कोऊ । कहहु बुझाइ नाथ मोहि सोऊ ॥
अग्य जानि रिस उर जनि धरहू । जेहि बिधि मोह मिटै सोइ करहू ॥
जर इच्छारहित, व्यापक, समर्थ ब्रह्म दुसरे कोणी असेल, तर हे नाथ, मला समजावून सांगा. मला अज्ञानी समजून राग धरु नका. माझा मोह दूर होईल असें करा. ॥ १ ॥
मैं बन दीखि राम प्रभुताई । अति भय बिकल न तुम्हहि सुनाई ॥
तदपि मलिन मन बोधु न आवा । सो फलु भली भॉंति हम पावा ॥
मी ( मागील जन्मात ) वनामध्ये श्रीरामांची महती पाहिली होती, परंतु फार घाबरुन गेल्यामुळे मी ती गोष्ट तुम्हांला सांगितली नव्हती. तरीही माझ्या अज्ञानी मनास काही बोध झाला नाही. त्याचे पुरते फळही मला मिळाले. ॥ २ ॥
अजहूँ कछु संसउ मन मोरें । करहु कृपा बिनवउँ कर जोरें ॥
प्रभु तब मोहि बहु भॉंति प्रबोधा । नाथ सो समुझि करहु जनि क्रोधा ॥
अजूनही माझ्या मनात काही संशय उरला आहे, तुम्ही कृपा करा. मी हात जोडून विनंती करते. हे प्रभो, त्यावेळी तुम्ही मला पुष्कळ तर्‍हेने समजावले होते. ( तरीही माझा संशय दूर झाला नाही. ) हे नाथ, असे समजून माझ्यावर राग धरु नका. ॥ ३ ॥
तब कर अस बिमोह अब नाहीं । रामकथा पर रुचि मन माहीं ॥
कहहु पुनीत राम गुन गाथा । भुजगराज भूषन सुरनाथा ॥
आता मला पूर्वीसारखा मोह राहिलेला नाही. आता माझ्या मनात रामकथा ऐकण्याची आवड उत्पन्न झाली आहे. शेषनागाचे भूषण धारण करणार्‍या हे देवांच्या नाथा, तुम्ही श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा मला सांगा ॥ ४ ॥
दोहा—बंदउँ पद धरि धरनि सिरु बिनय करउँ कर जोरि ।
बरनहु रघुबर बिसद जसु श्रुति सिद्धांत निचोरि ॥ १०९ ॥
मी भूमीवर डोके ठेवून तुमच्या चरणांना वंदन करते आणि हात जोडून विनंती करते. तुम्ही वेद-सिद्धांताचे सार काढून श्रीरघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करा. ॥ १०९ ॥
जदपि जोषित नहिं अधिकारी । दासी मन क्रम बचन तुम्हारी ॥
गूढउ तत्त्व न साधु दुरावहिं । आरत अधिकारी जहँ पावहिं ॥
जरी मी स्त्री असल्यामुळे ते ऐकण्याची अधिकारी नाही, तरी मी काया-वाचामनाने तुमचीच दासी आहे. संतजनांना जेव्हा तळमळ असलेला अधिकारी दिसतो, तेव्हा ते गूढ तत्त्वसुद्धा त्याच्यापासून लपवून ठेवीत नाहीत. ॥ १ ॥
अति आरति पूछउँ सुरराया । रघुपति कथा कहहु करि दाया ॥
प्रथम सो कारन कहहु बिचारी । निर्गुन ब्रह्म सगुन बपु धारी ॥
हे देवांच्या स्वामी, मी मोठ्या काकुळतीने विचारते. तेव्हा तुम्ही माझ्यावर दया करुन श्रीरघुनाथांची कथा सांगा. निर्गुण ब्रह्म हे सगुण रुप का धारण करते ? ते कारण प्रथम सांगा. ॥ २ ॥
पुनि प्रभु कहहु राम अवतारा । बालचरित पुनि कहहु उदारा ॥
कहहु जथा जानकी बिबाहीं । राज तजा सो दूषन काहीं ॥
हे प्रभु, नंतर श्रीरामचंद्रांच्या अवताराची कथा सांगा. तसेच त्यांचे उदार बालचरित्र सांगा. त्यानंतर त्यांनी जानकीशी कशाप्रकारे विवाह केला, ती कथा सांगा आणि त्यांना कोणत्या दोषामुळे राज्य सोडावे लागले, ते सांगा. ॥ ३ ॥
बन बसि कीन्हे चरित अपारा । कहहु नाथ जिमि रावन मारा ॥
राज बैठि कीन्हीं बहु लीला । सकल कहहु संकर सुखसीला ॥
हे नाथ, त्यानंतर त्यांनी वनवासात राहून कोणते अपार चरित्र केले आणि रावणाला कशाप्रकारे मारले, ते सांगा. हे सुखस्वरुप शंकर, नंतर त्यांनी राज्यावर बसल्यावर ज्या लीला केल्या, त्या सर्व सांगा. ॥ ४ ॥
दोहा—बहुरि कहहु करुनायतन कीन्ह जो अचरज राम ।
प्रजा सहित रघुबंसमनि किमि गवने निज धाम ॥ ११० ॥
हे कृपाधाम, श्रीरामचंद्रांनी जे अद्भुत चरित्र केले ते सांगा. ते रघुकुलशिरोमणी प्रजेसह कशाप्रकारे आपल्या परमधामास गेले ? ॥ ११० ॥
पुनि प्रभु कहहु सो तत्त्व बखानी । जेहिं बिग्यान मगन मुनि ग्यानी ॥
भगति ग्यान बिग्यान बिरागा । पुनि सब बरनहु सहित बिभागा ॥
हे प्रभो, ज्या अनुभुतीमध्ये ज्ञानी मुनिगण नित्य मग्न राहातात, ते तत्त्व तुम्ही समजावून सांगा. त्यानंतर भक्ती, ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांचे विभागांसह वर्णन करुन सांगा. ॥ १ ॥
औरउ राम रहस्य अनेका । कहहु नाथ अति बिमल बिबेका ॥
जो प्रभु मैं पूछा नहिं होई । सोउ दयाल राखहु जनि गोई ॥
( याशिवाय ) श्रीरामचंद्रांच्या ज्या इतर अनेक रहस्यमय गोष्टी असतील, त्या सांगा. हे नाथ, तुमचे ज्ञान अत्यंत निर्मल आहे. हे प्रभो, हे दयाळू, जी गोष्ट मी विचारली नसेल, तीसुद्धा लपवून न ठेवता सांगा. ॥ २ ॥
तुम्ह त्रिभुवन गुर बेद बखाना । आन जीव पॉंवर का जाना ॥
प्रस्न उमा कै सहज सुहाई । छल बिहीन सुनि सिव मन भाई ॥
वेदांनी तुम्हांला तिन्ही लोकांचा गुरु म्हटले आहे. इतर पामर जीव हे रहस्य कसे जाणणार ! ‘ पार्वतीचे हे सहज-सुंदर, निष्कपट प्रश्र्न ऐकून शिवांच्या मनास फार बरे वाटले. ॥ ३ ॥
हर हियँ रामचरित सब आए । प्रेम पुलक लोचन जल छाए ॥
श्रीरघुनाथ रुप उर आवा । परमानंद अमित सुख पावा ॥

श्रीमहादेवांच्या मनात सर्व रामचरित्र आले. प्रेमाने त्यांचे 
शरीर पुलकित झाले आणि नेत्रांमध्ये पाणी आले. श्रीरघुनाथांचे रुप त्यांच्या मनात प्रकट झाले. त्यामुळे प्रत्यक्ष परमानंदस्वरुप शिवांनाहीअपार सुख झाले. ॥ ४ ॥


Custom Search

No comments:

Post a Comment