Thursday, May 21, 2020

ShriRamCharitManas Part 17 श्रीरामचरितमानस भाग १७


ShriRamCharitManas Part 17 
श्रीरामचरितमानस भाग १७ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
ShriRamCharitManas Part 17
श्रीरामचरितमानस भाग १७ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—मगन ध्यान रस दंड जुग पुनि मन बाहेर कीन्ह ।
 रघुपति चरित महेस तब हरषित बरनै लीन्ह ॥ १११ ॥
शिव दोन घटका ध्यानाच्या आनंद-रसात मग्न झाले, नंतर त्यांनी बळेच मन आवरले आणि ते प्रसन्न चित्ताने श्रीरघुनाथांचे चरित्र वर्णन करु लागले. ॥ १११ ॥
झूठेउ सत्य जाहि बिनु जानें । जिमि भुजंग बिनु रजु पहिचानें ॥
जेहि जानें जग जाइ हेराई । जागें जथा सपन भ्रम जाई ॥
‘ जे जाणल्याविना खोटेसुद्धा खरे वाटते, जसा दोरीवर सापाचा भ्रम होतो आणि जे जाणल्यावर जगताचा लोप होतो, जसे जागे झाल्यावर स्वप्नाचा भ्रम नाहीसा होतो. ॥ १ ॥
बंदउँ बालरुप सोइ रामू । सब सिधि सुलभ जपत जिसु नामू ॥
मंगल भवन अमंगल हारी । द्रवउ सो दसरथ अजिर बिहारी ॥
( हा श्र्लोक म्हणजे श्रीरामचरितमानसमध्ये जे अनेक मंत्र आहेत त्यापैकी एक महत्वाचा मंत्र आहे. पुढे येतील तसे आपल्याला समजतीलच. )   
त्या श्रीरामचंद्रांच्या बालरुपाला मी वंदन करतो. त्यांचे नाव जपल्यामुळे सर्व सिद्धी सहजपणे प्राप्त होतात. मंगलाचे धाम असणारे, अमंगलाचे हरण करणारे आणि दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारे ते बालरुप असलेले श्रीराम माझ्यावर कृपा करोत. ‘ ॥ २ ॥
करि प्रनाम रामहि त्रिपुरारी । हरषि सुधा सम गिरा उचारी ॥
धन्य धन्य गिरिराजकुमारी । तुम्ह समान नहिं कोउ उपकारी ॥
त्रिपुरासुराचा वध करणारे शिव श्रीरामांना प्रणाम करुन आनंदाने अमृतमय वाणीने म्हणाले, ‘ हे गिरिराजकुमारी ! तू धन्य आहेस. खरेच धन्य आहेस. तुझ्यासारखा उपकार करणारा कोणीही नाही. ॥ ३ ॥
पूँछेहु रघुपति कथा प्रसंगा । सकल लोक जग पावनि गंगा ॥
तुम्ह रघुबीर चरन अनुरागी । कीन्हिहु प्रस्न जगत हित लागी ३
तू श्रीरामांची कथा विचारलीस. ती कथा जगाला पावन करणार्‍या गंगेसमान सर्व लोकांना पावन करणारी आहे. श्रीरामांच्या चरणी तुझे प्रेम आहे. त्यामुळे तू जगाच्या कल्याणासाठीच प्रश्र्न विचारले आहेस. ॥ ४ ॥
दोहा—राम कृपा तें पारबति सपनेहुँ तव मन माहिं ।
सोक मोह संदेह भ्रम मम बिचार कछु नाहिं ॥ ११२ ॥
हे पार्वती, श्रीरामांच्या कृपेमुळे तुझ्या मनात स्वप्नातही शोक, मोह, संदेह आणि भ्रम काहीही नाही, असे मला वाटते. ॥ ११२ ॥
तदपि असंका कीन्हिहु सोई । कहत सुनत सब कर हित होई ॥
जिन्ह हरिकथा सुनी नहिं काना । श्रवन रंध्र अहिभवन समाना ॥
तरीही तू तीच पूर्वीची शंका उपस्थित केलीस, हा प्रसंग सांगण्याने-ऐकण्याने सर्वांचे कल्याण होईल. ज्यांनी आपल्या कानांनी भगवंताची कथा ऐकली नाही, त्यांची कानांची भोके सापाच्या बिळाप्रमाणे आहेत. ॥ १ ॥
 नयनन्हि संत दरस नहिं देखा । लोचन मोरपंख कर लेखा ॥
ते सिर कटु तुंबरि समतूला । जे न नमत हरि गुर पद मूला ॥
ज्यांनी आपल्या डोळयांनी संतांचे दर्शन घेतले नाही, त्यांचे डोळे मोराच्या पंखावर दिसणार्‍या नकली डोळ्यांच्या श्रेणीत येतात. जे मस्तक श्रीहरींच्या आणि श्रीगुरुंच्या चरणी झुकत नाही, ते कडू भोपळ्यासमान होय. ॥ २ ॥   
जिन्ह हरिभगति हृदयँ नहिं आनी । जीवत सव समान तेइ प्रानी ॥
जो नहिं करइ राम गुन गाना । जीह सो दादुर जीह समाना ॥
ज्यांच्या हृदयांत भगवंताच्या भक्तीला स्थान नाही, ते प्राणी जिवंत मुडद्याप्रमाणे होत. जी जीभ श्रीरामांच्या गुणांचे गायन करीत नाही, ती बेडकाच्या जीभेप्रमाणे होय. ॥ ३ ॥
कुलिस कठोर निठुर सोइ छाती । सुनि हरिचरित न जो हरषाती ॥
गिरिजा सुनहु राम कै लीला । सुर हित दनुज बिमोहनसीला ॥
भगवंतांचे चरित्र ऐकून आनंदित होत नाही, ते हृदय वज्रासारखे कठोर व निष्ठुर होय, हे पार्वती, श्रीरामचंद्रांची लीला ऐक. ती देवांचे कल्याण करणारी आणि विशेषतः दैत्यांना मोहित करणारी आहे. ॥ ४ ॥
दोहा—रामकथा सुरधेनु सम सेवत सब सुख दानि ।
सतसमाज सुरलोक सब को सुनै अस जानि ॥ ११३ ॥
कामधेनू ही सेवा केल्यावर सर्व सुखे प्राप्त करुन देते, तशी ही रामकथा आहे आणि सत्पुरुषांचा समुदाय हाच सर्व देवांचा लोक होय. असे पाहिल्यावर कोण बरे ही कथा ऐकणार नाही ? ॥ ११३ ॥
रामकथा सुंदर कर तारी । संसय बिहग उडावनिहारी ॥
रामकथा कलि बिटप कुठारी । सादर सुनु गिरिराजकुमारी ॥
संदेहरुपी पक्ष्यांना हुसकून लावणार्‍या टाळीप्रमाणे श्रीरामांची कथा हातांची सुंदर टाळी आहे. रामकथा ही कलियुगरुपी वृक्षाला तोडणारी कुर्‍हाड आहे. हे गिरिराजकुमारी ! तू ही कथा आदराने ऐक. ॥ १ ॥
राम नाम गुन चरित सुहाए । जनम करम अगनित श्रुति गाए ॥
जथा अनंत राम भगवाना । तथा कथा कीरति गुन नाना ॥
श्रीरामचंद्रांची सुंदर नामे, गुण, चरित्र, जन्म आणि कर्म हे सर्व अगणित असल्याचे वेदांनी प्रतिपादित केले आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम हे अनंत आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या कथा, कीर्ती आणि गुण हे सुद्धा अनंत आहेत. ॥ २ ॥
तदपि जथा श्रुत जसि मति मोरी । कहिहउँ देखि प्रीति अति तोरी ॥
उमा प्रस्न तव सहज सुहाई । सुखद संतसंमत मोहि भाई ॥
तरीही तुझे ( त्याविषयी ) अत्यंत प्रेम पाहून जे काही मी ऐकले आहे आणि जशी माझी बुद्धी आहे, त्यानुसार मी तुला सांगतो. हे पार्वती, तुझा प्रश्र्न स्वभावतः सुंदर, सुखदायक आणि संतसंमत आहे व मलाही तो फार आवडला. ॥ ३ ॥
एक बात नहिं मोहि सोहानी । जदपि मोह बस कहेहु भवानी ॥
तुम्ह जो कहा राम कोउ आना । जेहि श्रुति गाव धरहिं मुनि ध्याना ॥
परंतु हे पार्वती, एक गोष्ट मात्र मला आवडली नाही, जरी ती तू मोहामुळे म्हणालीस. तू असे म्हणालीस की, वेद ज्यांचे गुणगान करतात आणि मुनिजन ज्यांचे ध्यान करतात, ते राम कुणी दुसरे आहेत काय ? ॥ ४ ॥
दोहा—कहहिं सुनहिं अस अधम नर ग्रसे जे मोह पिसाच ।
पाषंडी हरि पद बिमुख जानहिं झूठ न साच ॥ ११४ ॥
जे मोहरुपी पिशाचाने झपाटले आहेत, नास्तिक आहेत, भगवंतांच्या चरणांशी विन्मुख आहेत आणि खरे-खोटे ज्यांना मुळीच माहीत नाही, असे अधम मनुष्यच अशाप्रकारे सांगत-ऐकत असतात. ॥ ११४ ॥
अग्य अकोबिद अंध अभागी । काई बिषय मुकुर मन लागी ॥
लंपट कपटी कुटिल बिसेषी । सपनेहुँ संतसभा नहिं देखी ॥
जे अज्ञानी, मूर्ख, आंधळे आणि भाग्यहीन आहेत, ज्यांच्या मनोरुपी आरशावर विषयरुपी मळ साचला आहे, जे व्यभिचारी, कपटी व मोठे दुष्ट आहेत आणि ज्यांनी कधी स्वप्नातही संतांचे दर्शन घेतले नाही; ॥ १ ॥
कहहिं ते बेद असंमत बानी । जिन्ह कें सूझ लाभु नहिं हानी ॥
मुकुर मलिन अरु नयन बिहीना । राम रुप देखहिं किमि दीना ॥
ज्यांना आपली लाभ-हानी कळत नाही, तेच लोक असे वेदविरोधी बोलत असतात. ज्यांचा हृदयरुपी आरसा मलिन आहे आणि जे नेत्रहीन आहेत, ते बिचारे श्रीरामांचे रुप कसे पाहणार ? ॥ २ ॥
जिन्ह कें अगुन न सगुन बिबेका । जल्पहिं कल्पित बचन अनेका ॥
हरिमाय बस जगत भ्रमाहीं । तिन्हहि कहत कछु अघटित नाहीं ॥
ज्यांना निर्गुण-सगुण याचा काहीही विवेक नाही. जे अनेक कपोलकल्पित गोष्टी बडबडत असतात, जे श्रीहरींच्या मायेला वश होऊन जन्म-मृत्युच्या फेर्‍यांत भटकत असतात, त्यांना काहीही बरळणे अशक्य नाही. ॥ ३ ॥
बातुल भूत बिबस मतवारे । ते नहिं बोलहिं बचन बिचारे ॥
जिन्ह कृत महामोह मद पाना । तिन्ह कर कहा करिअ नहिं काना ॥
ज्यांना ( सन्निपात, उन्माद इत्यादी ) वायुरोगाने झपाटले आहे, ज्यांना भूताने पछाडले आहे आणि ज्यांनी नशापाणी केले आहे, असे लोक काही विचार करुन बोलत नाहीत. ज्यांनी महामोहरुपी मदिरा ढोसली आहे, त्यांचे काहीही ऐकू नये. ॥ ४ ॥
सो—अस निज हृदयँ बिचारि तजु संसय भजु राम पद ।
सुनु गिरिराज कुमारि भ्रम तम रबि कर बचन मम ॥ ११५ ॥
मनांत असा विचार करुन संशय सोडून दे आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांची सेवा कर. हे पार्वती, भ्रमरुपी अंधकाराचा नाश करण्यासाठी सूर्याच्या किरणांप्रमाणे असणारे माझे हे बोल ऐक. ॥ ११५ ॥
सगुनहि अगुनहि नहिं कछु भेदा । गावहिं मुनि पुरान बुध बेदा ॥
अगुन अरुप अलख अज जोई । भगत प्रेम बस सगुन सो होई ॥
मुनी, पुराणे, पंडित आणि वेद हे सर्व सांगतात की, सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. जो निर्गुण, निराकार, अव्यक्त आणि अजन्मा आहे, तोच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण बनतो. ॥ १ ॥
जो गुन रहित सगुन सोइ कैसें । जल हिम उपल बिलग नहिं जैसें ॥
जासु नाम भ्रम तिमिर पतंगा । तेहि किमि कहिअ बिमोह प्रसंगा ॥
जो निर्गुण तोच सगुण कसा, हे समजून घे. ज्याप्रमाणे पाणी व पाण्याची गार यात भेद नाही. भ्रमरुपी अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांचे नांव सूर्य आहे, त्यांच्याबाबतीत मोह कसा उद्भवू शकेल ? ॥ २ ॥
राम सच्चिदानंद दिनेसा । नहिं तहँ मोह निसा लवलेसा ॥
सहज प्रकासरुप भगवाना । नहिं तहँ पुनि बिग्यान बिहाना ॥
श्रीरामचंद्र हे सच्चिदानंदस्वरुप सूर्य आहेत. तेथे मोहरुपी रात्रीचा लवलेशही नाही. ते स्वभावतःच प्रकाशरुप आणि षड्गुणैश्वर्ययुक्त भगवान आहेत, तेथे तर विज्ञानरुपी प्रातःकालही होत नाही. ( अज्ञानरुपी रात्र असेल तरच विज्ञानरुपी प्रातःकाल होणार. भगवान तर नित्य ज्ञानस्वरुप आहेत. ) ॥ ३ ॥
हरष बिषाद ग्यान अग्याना । जीव धर्म अहमिति अभिमाना ॥
राम ब्रह्म ब्यापक जग जाना । परमानंद परेस पुराना ॥
हर्ष, शोक, ज्ञान, अज्ञान, अहंता आणि अभिमान या सर्व 

बाबी जीवाचे स्वभाव आहेत. श्रीरामचंद्र हे तर व्यापक 

ब्रह्म, परमानंदस्वरुप, परात्पर प्रभू आणि पुराणपुरुष 

आहेत, ही गोष्ट सार्‍या जगाला ठाऊक आहे. ॥ ४ ॥


Custom Search

No comments:

Post a Comment