Tuesday, June 30, 2020

>Dnyaneshwari Adhyay 2 Part 11 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ११


Dnyaneshwari Adhyay 2 Part 11 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ११ 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २५१ ते २७५

Dnyaneshwari Adhyay 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २५१ ते २७५
जैसा कर्पूराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे ।
कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥
२५१) ज्याप्रमाणें कापसाची रास करावी आणि मग तिला अग्नि लावून द्यावा, किंवा मिष्टान्नांत जालीम विष घालावें; 
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।
तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥
२५२) किंवा दैवयोगानें मिळालेला अमृताचा घडा लाथ मारुन पालथा करावा, त्याप्रमाणें फलाचा अभिलाष धरुन ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवितात.
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे ।
परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ॥ २५३ ॥
२५३) मोठ्या आयासांनीं पुण्य जोडावें, आणि मग संसाराची अपेक्षा कां ठेवावी ? पण पाहा, सद्बुद्धि ज्यांस प्राप्त नाहीं, अशा त्या अज्ञानी लोकांस हें समजत नाहीं. काय करावें ?
जैसी रांधवणी रससोय निकी । करुनियां मोलें विकी ।
तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
२५४) ज्याप्रमाणें एखाद्या सुगरण स्त्रीनें उत्तम पक्वान्नें करुन तीं केवळ द्रव्याच्या आशेनें विकून टाकावीं, त्याप्रमाणें हे अविचारी लोक सुखोपभोगांच्या आशेनें हातचा धर्म दवडतात.
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।
तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥
२५५) म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्यें मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनांत पूर्णपणें ही दुर्बुद्धि वास करीत असते, हें लक्षांत ठेव.
तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणें विभ्रांत ।
म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥ २५६ ॥
तूं असें निःसंशय समज कीं, वेद हे ( सत्त्व, रज व तम या ) तीन गुणांनी व्याप्त आहेत; म्हणून ( त्यांपैकीं ) उपनिषदादि जे भाग आहेत, ते सगळे सात्त्विक आहेत.
येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक ।
जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥
२५७) आणि अर्जुना, केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचें ज्यांत निरुपण केलेलें आहे, ते बाकीचे ( वेदांचे भाग ) रज व तम या गुणांनी युक्त आहेत.
म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण ।
एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥
२५८) म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहेत, असें तूं लक्षांत ठेव व त्यांच्या ठिकाणी कदाचित् तुझें मन जाईल तर जाऊं देऊं नकोस.
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।
एक आत्मसुखअंतरीं । विसंब झणीं ॥ २५९ ॥
२५९) तूं तिन्ही गुण टाकून दे; मी व माझेंपण धरुं नकोस; ( पण ) अंतःकरणांत फक्त एक आत्मसुखाचा विसर पडूं देऊं नकोस.
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले ।
तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ॥ २६० ॥
 २६०) जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत; अनेक ( विधिनिषेधांचे ) प्रकार सुचविलें आहेत, तरी त्यापैकीं जेवढें कांहीं आपल्या हिताचे असेल, तेवढेंच घ्यावें,
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।
तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥ २६१ ॥
२६१) ज्याप्रमाणें सूर्योदय होतांच सगळे रस्ते दिसूं लागतात. म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनीं कां जावयाचें ? सांग बरें मला.
कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ ।
तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ॥ २६२ ॥
२६२) किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढें जरी पाणी असलें , तरी त्यांतून आपण आपल्या गरजेपुरतें घेतों.
तैसे ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती ।
मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्र्वत जें ॥ २६३ ॥
२६३) त्याप्रमाणें जे ज्ञानी आहेत, ते वेदार्थाचा विचार करतात; मग ज्यांत शाश्वत व जें इष्ट आहे त्याचेंच ग्रहण करतात.
म्हणौनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥
२६४) म्हणून अर्जुना, ऐक. याच दृष्टीनें पाहिलें, तर हें स्वकर्मच याच वेळीं तुला उचित आहे.
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें ।
जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥
२६५) आम्हीं सर्व गोष्टींचा विचार करुन पाहिला; तेव्हां हें असेंच आमच्या मनाला पटलें कीं, तूं आपलें विहित कर्म सोडूं नयेस.
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं  संगति न व्हावी ।
हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥
२६६) परंतु कर्मफलाच्या ठिकाणीं आशा ठेवूं नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयींहि प्रवृत्ति होऊं देउं नकोस; हा सदाचारच निष्काम बुद्धीनें आचरावा.
तूं योगयुक्त होउनी । फळाचा संग सांडुनी ।
मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥
२६७) अर्जुना, तूं निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्में करावींस.
परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥ २६८ ॥
२६८) परंतु दैवाच्या अनुकुलतेनें हातांत घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडलें, तरी त्यांत विशेष संतोष मानावा, हेंहि नको.  
कां निमित्तें कोणें ऐकें । तें सिद्धी न वचतां ठाके ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥
२६९) किंवा, कांहीं कारनामुळें तें ( आरंभिलेंलें कर्म ) जरी सिद्धीस न जातां ( अर्धवट ) राहिलें, तरीहि त्यासंबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊं देऊं नये.   
आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें ।
परी  ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
२७०) हातीं घेतलेलें कर्म सिद्धीस गेलें तर खरोखरच आपलें काम झालें असेंच समज.
देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे ।
तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणें ॥ २७१ ॥
२७१) ( कारण असें पाहा ) जेवढें म्हणून हातून कर्म होईल, तेवढें सगळें जर परमात्म्याला समर्पण केलें; तर तें सहजच परिपूर्ण झालें, असेंच समज.
देखें संरासंतीं कर्मीं । हें जें सरिसेपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥
२७२) हें पाहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयीं हा जो मनाचा समतोलपणा आहे, तीच ( खरी ) योगस्थिति ( निष्काम कर्मयोग ). तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात.
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचें ।
जेथ मना आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥
२७३) अर्जुना, ( यशपयशीं ) चित्ताची समता हेंच योगाचें वर्म आहे असें समज. या योगांत मन व बुद्धि यांचें ऐक्य असतें. ( मनाचा संकल्प व बुद्धिचा निश्चय यांत विरोध नसतो. )
तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था ।
दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥
२७४) पार्था, बुद्धियोगाचा ( निष्काम कर्माचरणाचा ) विचार करुन ( तुलनेनें ) पाहतां सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो.
परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।
जें कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥ २७५ ॥ 

२७५) परंतु ( आरंभीं ) तेंच सकाम कर्म जेव्हां करावें 

तेव्हांच ( पुढें ) ह्या निष्काम कर्मयोगाची प्राप्ति 

होते. कारण असें करतां करतां सकाम कर्मांतून कर्तृत्वमद आणि फलास्वाद टाकून राहिलेलें जें शेष कर्म ती सहजच योगस्थिति होय.


Custom Search

No comments:

Post a Comment