Friday, September 4, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 5, ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ५

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 5
Oya 101 to 125 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ५
ओव्या १०१ ते १२५
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत ।
येईल देखा काढत । तुम्हांपाठीं ॥ १०१ ॥
१०१) पाहा, त्याप्रमाणें सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागें शोध काढीत येईल.  
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त ।
जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥ १०२ ॥
१०२) अशा रीतीनें बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणानें स्वधर्मांचें आचरण कराल, तर सर्व भोगांनीं संपन्न होऊन तुम्ही निरिच्छ व्हाल.
कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा ।
लुब्ध होऊनियां स्वादा । विषयांचिया ॥ १०३ ॥
१०३) उलटपक्षीं सर्व संपदा प्राप्त झाली असतां जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रियें जसें सांगतील तसें वागतो; 
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।
तयां स्वमार्गीं सर्वेश्र्वरीं । न भजेल जो ॥ १०४ ॥
१०४) यज्ञानें संतुष्ट होणार्‍या त्या देवांनीं जी ही पूर्ण संपत्ति दिली आहे, त्या संपत्तीच्या योगानें ( स्वधर्मरुप ) मार्गानें जो परमेश्र्वरास भजणार नाही;  
अग्निमुखीं हवन । न करी देवतापूजन । 
प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचें ॥ १०५ ॥      
१०५) जो अग्नीच्या मुखांत हवन करणार नाहीं; अथवा देवतांचे आराधन करणार नाहीं किंवा योग्य वेळीं ब्राह्मणांना भोजन देणार नाहीं; 
विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी ।
संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥ १०६ ॥
१०६) जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथीचा मान करणार नाहीं व आपल्या जातीला संतोष देणार नाहीं;
ऐसा स्वधर्मुक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु ।
केवळ भोगासक्तु । होईल जो ॥ १०७ ॥
१०७) अशा रीतीनें जो आपल्या धर्माचें आचरण टाकून आणि संपन्नतेनें उन्मत्त होऊन केवळ भोगांमध्यें गढून जाईल,
तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचें सकळ जाये ।
देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥ १०८ ॥
१०८) मग त्याला धोका आहे. तो असा कीं, त्याच्याजवळ असलेलें सर्व ऐश्र्वर्य नाहींसें होईल; हें पाहा, मिळविलेले भोगसुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहींत, 
जैसें गतायुषी शरीरीं । चैतन्य वासु न करी । 
कां निदैवाचां घरीं । न राहे लक्ष्मी ॥ १०९ ॥
१०९) जसें आयुष्य संपलेल्या शरीरांत प्राण राहात नाहींत किंवा दैवहीनाच्या घरांत लक्ष्मी राहात नाहीं; 
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला ।
जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ॥ ११० ॥   
११०) जसा दिवा मालविल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहींसा होतो, तसा धर्म जर लुप्त झाला, तर सर्व सुखाचें आश्रयस्थान नाहींसें होतें.
 तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ।
आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥ १११ ॥
१११) याप्रमाणें आपला आचार जेथें सुटतो, त्या ठिकाणीं आत्मस्वातंत्र्य राहात नाहीं. प्रजाहो, हें नीट ऐका, असें ब्रह्मदेव म्हणाला.  
म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयाचें ॥ ११२ ॥
११२) म्हणून आपला धर्म जो टाकील, त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे, असें समजून त्याचें सर्वस्व हिरावून घेईल. 
मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें ।
रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशीं ॥ ११३ ॥
११३) रात्रीच्या वेळीं ज्याप्रमाणें पिशाच्चें स्मशान व्यापून टाकितात, त्याप्रमाणें मग सर्व पापें त्याला घेरतात;     
तैशीं त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें ।
दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥ ११४ ॥
११४) त्याप्रमाणें त्रैलोक्यांत असणारीं सर्व दुःखें आणि अनेक प्रकारचीं पापें व सर्व दैन्यें त्याच्याजवळ राहतात.
ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापा रुदतां ।
परी कल्पांतींहीं सर्वथा। प्राणिगण हो ॥ ११५ ॥    
११५) त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिति होते आणि मग प्रजाहो, ( कितीहि ) आक्रोश केला तरी कल्पाच्या अंतापर्यंतदेखील त्याची त्यांतून मुळींच सुटका होत नाहीं.
म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं ।
ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥ ११६ ॥
११६) म्हणून स्वधर्माचरण सोडूं नये; इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊं देऊं नये; असा ब्रह्मदेवानें प्रजांना उपदेश केला.
जैसें जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे ।
हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥ ११७ ॥
११७) ज्याप्रमाणें माशांना पाण्याचा वियोग झाला कीं त्याच क्षणीं मरण येतें, त्याप्रमाणें स्वधर्माचरणाच्या त्यागानें मनुष्याचा नाश होतो, म्हणून त्यानें ह्या स्वधर्माला सोडूं नये.  
म्हणोनि तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं ।
निरत व्हावें पुढपुढती । म्हणिपत ॥ ११८ ॥
११८) म्हणून तुम्हीं सर्वांनीं आपापल्या विहित कर्माचरणामध्यें तत्पर असावें, हेंच वारंवार सांगणें आहे.
देखा विहित क्रियाविधी । निर्हेतुका बुद्धी ।
जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥ ११९ ॥
११९) पाहा., निर्हेतुक बुद्धीनें स्वधर्माचरण करण्यांत जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो;
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं ।
निमित्तादिकीं यजी । पितरोद्देश ॥ १२० ॥  
१२०) गुरु, गोत्र व अग्नि यांचें पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरिता श्राद्धादि नैमित्तिक कर्में करतो;
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेंशीं हवन करितां ।
हुतशेष स्चभावतः । उरें जें जें ॥ १२१ ॥
१२१) या विहित कर्माचरणरुप यज्ञानें यज्ञपुरुषाच्या ठिकाणीं यजन करुन जें जें यज्ञशेष सहजच राहील; 
तें सुखें आपुलां घरीं । कुटुंबेसीं भोजन करी ।
कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥ १२२ ॥ 
१२२) त्याचें त्याचें आपल्या घरीं आपल्या कुटुंबासह सुखानें सेवन करतो; तें सेव्यच त्याच्या पापाचा नाश करतें.
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं ।
जयापरी महारोगीं । अमृतसिद्धी ॥ १२३ ॥
१२३) तें यज्ञांतील अवशेष तो भोगतो, म्हणून ज्याप्रमाणें अमृत मिळालें असतां महारोग ( रोग्याला ) सोडून जातात, त्याप्रमाणें पातकें त्यास सोडून जातात,  
कां तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । 
तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥
१२४) अथवा ज्याप्रमाणें ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मभ्रांतीला यत्किंचितहि वश होत नाहीं, त्याप्रमाणें यज्ञांतील तो शेष भोगणारा पापाच्या तडाक्यांत सांपडत नाहीं. 
म्हणोनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेचि विनियोगिजे ।
मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥
१२५) म्हणून स्वधर्मचरणानें जें मिळेल तें स्वधर्म करण्यांतच खर्च करावें व मग जें शिल्लक राहील, त्याचा संतोषानें उपभोग घ्यावा.



Custom Search

No comments:

Post a Comment