Wednesday, September 2, 2020

ShriRamcharitmans Part 42 श्रीरामचरितमानस भाग ४२

 

ShriRamcharitmans Part 42  
Doha 213 to 215 
श्रीरामचरितमानस भाग ४२ 
दोहा २१३ ते २१५ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--धवल धाम मनि पुरट पट सुघटित नाना भॉंति ।
सिय निवास सुंदर सदन सोभा किमि कहि जाति ॥ २१३ ॥
देदीप्यमान महालांमध्ये अनेक प्रकारच्या सुंदर पद्धतीने बनविलेल्या रत्नजडित सोन्याच्या जरीचे पडदे लावलेले होते. सीतेच्या राहाण्याच्या सुंदर महालाच्या शोभेचे वर्णन तर काय करावे ? ॥ २१३ ॥
सुभग द्वार सब कुलिस कपाटा । भूप भीर नट मागध भाटा ॥
बनी बिसाल बाजि गज साला । हय गय रथ संकुल सब काला ॥
राजमहालाचे सर्व दरवाजे सुंदर होते. त्यांना चमकणार्‍या हिर्‍यांची दारे बसवलेली होती. तेथे मांडलिक राजे, नट, मागध आणि भाट यांची गर्दी झालेली असे. घोडे आणि हत्ती यांच्यांसाठी मोठमोठ्या पागा व हत्तीखानेबनविलेले होते. ते नेहमी घोडे, हत्ती व रथांनी भरलेले असत. ॥ १ ॥
सूर सचिव सेनप बहुतेरे । नृपगृह सरिस सदन सब केरे ॥
पुर बाहेर सर सरित समीपा । उतरे जहँ तहँ बिपुल महीपा ॥
पुष्कळ वीर, मंत्री आणि सेनापती होते, त्या सर्वांची घरेसुद्धा राजमहालासारखीच होती. नगराबाहेर असलेल्या तलाव आणि नदीजवळ जिकडे-तिकडे पुष्कळसे राजे लोक उतरले होते. ॥ २ ॥
देखि अनूप एक अँवराई । सब सुपास सब भॉंति सुहाई ॥
कौसिक कहेउ मोर मनु माना । इहॉं रहिअ रघुबीर सुजाता ॥
तेथील अनुपम सर्व प्रकारे शोभिवंत आमराई पाहून आणि तेथील सर्व सुखसोयी पाहून विश्र्वामित्र म्हणाले, ' हे प्रिय रघुवीरा, इथेच राहावे, असे मला वाटते. ॥ ३ ॥
भलेहिं नाथ कहि कृपानिकेता । उतरे तहँ मुनिबृदं समेता ॥
बिस्वामित्र महामुनि आए । समाचार मिथिलापति पाए ॥
कृपानिधान श्रीरामचंद्र म्हणाले की, ' मुनिवर्य ! फारच छान. ' असे म्हणून ते मुनींसह तेथेच राहिले. मिथिलापती जनकांना जेव्हा हे वर्तमान समजले की, महामुनी विश्वामित्र आले आहेत, ॥ ४ ॥
दोहा--संग सचिव सुचि भूरि भट भूसुर बर गुर ग्याति ।
चले मिलन मुनिनायकहि मुदित राउ एहि भॉंति ॥ २१४ ॥
तेव्हा पवित्र विचारांचे मंत्री, पुष्कळसे योद्धे, श्रेष्ठ ब्राह्मण, गुरु शतानंद आणि आपल्या जातीचे श्रेष्ठ लोक यांना बरोबर घेतले आणि मोठ्या आनंदाने राजा जनक हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना भेटण्यास निघाले. ॥ २१४ ॥
कीन्ह प्रनामु चरन धरि माथा । दीन्हि असीस मुदित मुनिनाथा ॥
बिप्रबृंद सब सादर बंदे । जानि भाग्य बड़ राउ अनंदे ॥
राजांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम केला. मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. नंतर राजाने सर्व ब्राह्मण मंडळींना आदराने प्रणाम केला. हे आपले सद्भाग्य मानून राजा जनकांना आनंद वाटला. ॥ १ ॥
कुसल प्रस्न कहि बारहिं बारा । बिस्वामित्र नृपहि बैठारा ॥
तेहि अवसर आए दोउ भाई । गए रहे देखन फुलवाई ॥
वारंवार खुशाली विचारुन विश्वामित्रांनी राजांना बसवून घेतले. त्याचवेळी राम-लक्ष्मण हे दोघे फुलबाग पाहून तेथे आले. ॥ २ ॥
स्याम गौर मृदु बयस किसोरा । लोचन सुखद बिस्व चित चोरा ॥
उठे सकल जब रघुपति आए । बिस्वामित्र निकट बैठाए ॥
सुकुमार किशोर वयाचे, श्याम व गौर वर्णाचे ते दोघे कुमार नेत्रांना सुख देणारे आणि संपूर्ण विश्वाचे चित्त आकर्षून घेणारे होते. जेव्हा श्रीरघुनाथ आले, तेव्हा सर्वजण त्यांचे रुप व तेज यांनी प्रभावित होऊन उठून उभे राहिले. विश्वामित्रांनी त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. ॥ ३ ॥                  
भए सब सुखी देखि दोउ भ्राता । बारि बिलोचन पुलकित गाता ॥
मूरति मधुर मनोहर देखी । भयउ बिदेहु बिदेहु बिसेषी ॥
दोघा भावांना पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू, आनंदाश्रू वाहू लागले. शरीरे रोमांचित झाली. श्रीरामांची मधुर मनोहर मूर्ती पाहून विदेही राजा जनक हेसुद्धा ( वेगळ्या अर्थाने ) विदेही ( =देहभानरहित ) झाले. ॥ ४ ॥
दोहा--प्रेम मगन मनु जानि नृपु करि बिबेकु धरि धीर ।
बोलेउ मुनि पद नाइ सिरु गदगद गिरा गभीरा ॥ २१५ ॥
मन प्रेमामध्ये मग्न झाल्याचे पाहून राजा जनकांनी विवेकाने स्वतःला सावरले आणि मुनींच्या चरणी मस्तक ठेवून ते सद्गदित गंभीर वाणीने म्हणाले, ॥ २१५ ॥
कहहु नाथ सुंदर दोउ बालक । मुनिकुल तिलक कि नृपकुलपालक ॥
ब्रह्म जो निगम नेति कहि गावा । उभय बेष धरि की सोइ आवा ॥
' हे नाथा, सांगा बरे, हे दोघे सुंदर बालक मुनिकुलाचे भूषण आहेत की कुणा राजवंशाचे पालक आहेत ? किंवा वेदांनी ' नेति ' म्हणून ज्यांचे गुणगान केले आहे, ते ब्रह्मच या युगलरुपामध्ये आले आहे ? ॥ १ ॥
सहज बिरागरुप मनु मोरा । थकित होत जिमि चंद चकोरा ॥
ताते प्रभु पूछउॅं सतिभाऊ । कहहु नाथ जनि करहु दुराऊ ॥ 
माझे मन स्वभावतःच वैराग्यशील आहे. तरीही यांना पाहून ते असे मुग्ध होत आहे की, ज्याप्रमाणे चंद्राला पाहून चकोर होतो. हे प्रभो, म्हणून मी तुम्हांला मनापासून विचारतो, हे नाथ, काहीही न लपविता सांगा. ॥ २ ॥   
इन्हहि बिलोकत अति अनुरागा । बरबस ब्रह्मसुखहि मन त्यागा ॥
कह मुनि बिहसि कहेहु नृप नीका । बचन तुम्हार न होइ अलीका ॥
यांना पाहाताच अत्यंत प्रेमवश होऊन माझ्या मनाने बळेच ब्रह्मसुखाचा त्याग केला आहे. ' तेव्हा मुनी हसून म्हणाले, ' हे राजा, तुम्ही योग्यच बोललात. तुमचे वचन खोटे असू शकणार नाही. ॥ ३ ॥
ए प्रिय सबहि जहॉं लगि प्रानी । मन मुसुकाहिं रामु सुनि बानी ॥
रघुकुल मनि दसरथ के जाए । मम हित लागि नरेस पठाए ॥
जगात जितके प्राणी आहेत, त्या सर्वांना हे प्रिय आहेत. ' मुनींची ही रहस्यमय वाणी ऐकून श्रीरामांनी मनातल्या मनात स्मित केले. ( जणू त्यांनी संकेत दिला की, हे रहस्य उघड करु नका. ) ( तेव्हा मुनी म्हणाले, ) ' हे रघुकुलशिरोमणी महाराज दशरथांचे पुत्र आहेत. माझ्या कामासाठी राजाने यांना माझ्याबरोबर पाठविले आहे. ॥ ४ ॥


Custom Search

No comments:

Post a Comment