Monday, September 7, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 8 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग 8

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 8  
Ovya 176 t0 200
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ८ 
ओव्या १७६ ते २००
जैसी बहुरुपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं ।
परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥
१७६) बहुरुपी जेव्हां राजाराणीचें सोंग आणतात, त्या वेळीं त्यांच्या मनांत आपण स्त्रीपुरुष आहोंत, अशी कल्पनाहि नसते; तथापि तें जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणें लोकांत करतात; ( त्याप्रमाणें लोकसंग्रहाकरितां निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले, तरी त्यांस कर्माचें बंधन प्राप्त होत नाहीं. ) 
देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुलां माथां घेईजे ।
तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ॥ १७७ ॥
१७७) अर्जुना, पाहा. दुसर्‍याचें ओझें आपण आपल्या शिरावर घेतलें, तर आपण त्या भारानें दडपले जाणार नाहीं का ? सांग. 
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निफजती प्रकृतिधर्में ।
तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
१७८) तसें प्रकृतीच्या गुणानें जीं बरींवाईट कर्में होतात, तीं अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळें, ' मी करतों ' असें म्हणतो.
ऐसा अहंकाराधिरुढ । एकदेशी मूढ ।
तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥
१७९) अशा रीतीनें देहाहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्यास हें गूढ तत्त्वज्ञान उघड करुं नये.  
हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित ।
तें अर्जुना देऊन चित्त । अवधारीं पां ॥ १८० ॥
१८०) हें राहूं दे. अर्जुना, आतां तुला हिताची गोष्ट सांगतों, ती तूं चित्त देऊन ऐक.  
जे तत्त्वज्ञानियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं ।
जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥
१८१) ती अशी कीं, ज्या प्रकृतिच्या गुणांपासून हीं सर्व कर्में उत्पन्न होतात, तिच्याशीं ब्रह्मनिष्ठांचें तादात्म्य नसतें. 
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी ।
साक्षीभूत होउनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥
१८२) ते देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारीं जीं कर्में, त्यांचें उल्लंघन करुन, देहामध्यें उदासीनतेनें राहातात.  
म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती ।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥
१८३) म्हणून सूर्याच्या प्रकाशांत जरी प्राणिमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्यांच्या कर्मानें जसा लिप्त होत नाहीं, तसें हे शरीरधारी जरी असले, तरी ते कर्मबंधाच्या ताब्यांत जात नाहींत.
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे ।
प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥ १८४ ॥
१८४) या जगांत, जो प्रकृतीच्या तावडींत सांपडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मांत बद्ध होतो.
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें ।
तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥
१८५) गुणांच्या योगानें इंद्रियें आपापलें व्यापार करतात. त्या दुसर्‍यांनीं ( गुणांनीं ) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळें आपणाकडे घेतो, ( तो कर्मांत बद्ध होतो. )
 तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं ।
परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरुपीं ॥ १८६ ॥
१८६) तरी सर्व विहित कर्में करुन, तीं मला तूं अर्पण कर; परंतु चित्तवृत्ति मात्र आत्मस्वरुपीं ठेव.
हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था ।
ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसी ॥ १८७ ॥
१८७) हें विहित कर्म, मी त्याचा कर्ता अथवा अमुक कारणाकरितां मी त्या कर्माचें आचरण करीन, असा अभिमान तुझ्या चित्तांत कदाचित येईल, तर तो येऊं देऊं नकोस.
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।
मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥
१८८) तूं केवळ देहासक्त होऊन राहूं नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकालीं उपभोग घे. 
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरुढ पां इये रथीं । 
देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥
१८९) आतां तूं आपल्या हातांत धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदानें वीरवृत्तीचा अंगीकार कर.
जगीं कीर्ति रुढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं ।
यया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ १९० ॥
१९०) या जगांत तूं आपली कीर्ति रुढ कर व आपल्या धर्माचा मान वाढव; आणि पृथ्वीला या दृष्टांच्या ओझ्यापासून सोडव.
आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं ।
एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥ १९१ ॥
१९१) आतां अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगीं युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलूं नकोस. 
हें अनुपरोघ मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे ।
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ १९२ ॥
१९२) अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीनें मान्य करतात आणि विश्र्वासपूर्वक त्याप्रमाणें वागतात, 
तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु ।
म्हनोनि हें निश्र्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥
१९३) ते सर्व कर्में करीत असले तरी, ते कर्मरहित आहेत, असें अर्जुना, तूं समज. म्हणून हें कर्म अवश्य करणीय आहे. 
नातरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी ।
जे हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥
१९४) नाहींतर प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड करुन, जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करुन तें टाकून देतात;
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करुनि देखिती ।
कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥
१९५) जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादरानें पाहातात, किंवा जे वाचाळपणानें ह्यास पुष्पित वाणी म्हणतात;
ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले ।
अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
१९६) ते लोक अविवेकरुपी दारुनें मत्त झाले आहेत व विषयरुपी विषानें व्यापलेले आहेत व अज्ञानरुपी चिखलामध्यें फसलेले आहेत, असें निःसंशय समज. 
देखें शवाचां हातीं दिघलें । जैसें कां रत्न वायां गेलें ।
नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
१९७) पाहा, प्रेताच्या हातांत दिलेलें रत्न ज्याप्रमाणें व्यर्थ जातें अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाहीं; 
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।
मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥
१९८) किंवा, ज्याप्रमाणें चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाहीं; त्याप्रमाणें हा विचार मूर्खांना रुचणार नाहीं. 
तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था ।
तयांसी संभाषण सर्वथा । करावें ना ॥ १९९ ॥
१९९) अर्जुना, याप्रमाणें जे या परमार्थाकडे तोंड फिरविणारे असतील त्यांच्यापाशीं मुळींच भाषाण करुं नये. 
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करुं लागती ।
सांगें पतंग काय साहती । प्रकाशातें ॥ २०० ॥
२००) ते या उपदेशाला तर मानीत नाहींतच आणि उलट त्याची निंदादेखील करुं लागतात; म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करुं शकतील ? 


Custom Search

No comments:

Post a Comment