Monday, September 14, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 9 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ९

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 9 
Ovya 201 to 225 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ९ 
ओव्या २०१ ते २२५
पतंगा दीपीं अलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण ।
तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ २०१ ॥
२०१) ज्याप्रमाणें दिव्याला आलिंगन देण्यांत पतंगाला अचूक मरण ठेवलें आहे. त्याप्रमाणें विषयाचरणांत अचूक आत्मानाश होतो.
म्हणोनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । 
लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥ २०२ ॥
२०२) म्हणून कोणाहि शहाण्या मनुष्यानें ह्या इंद्रियांचे मौजेनेंदेखील लाड करुं नयेत.
हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याध्रसंसर्ग सिद्धी जाईल ।
सांगें हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ॥ २०३ ॥
२०३) अरे, सापाबरोबर खेळतां येईल काय ? किंवा, वाघाची संगत नीटपणें शेवटास जाईल ? सांग बरें. हालाहल विष प्यालें तर पचेल काय ?   
देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ।
तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥
२०४) पाहा, सहज खेळतां खेळतां जर आग लागली आणि मग जर ती बळावली, जर ती जशी आटोपत नाहीं, त्याप्रमाणें इंद्रियांचे लाड केले, तर तें चांगलें नाहीं. 
एर्‍हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।
कां नाना भोगरचना । मेळवावी ॥ २०५ ॥    
२०५) अर्जुना, सहज विचार करुन पाहिलें तर, या परतंत्र शरीराकरितां नाना प्रकारचे व्यवस्थित भोग कां मिळवावेत ?
 आपण सायासेंकरुनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें ।
उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें का ॥ २०६ ॥
२०६) आपण अतिशय कष्ट करुन, जेवढी म्हणून संपत्ति आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून, रात्रंदिवस या देहाची जोपासना कां करावी ?  
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें ।
तेणें स्वधर्मु सांडूनि देहातें । पोखावें काई ॥ २०७ ॥
२०७) या लोकांत सर्व प्रकारें कष्ट करुन सर्व प्रकारची संपत्ति संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन, या संपत्तीनें या देहाला पुष्ट करावें, हें योग्य आहे काय ?   
मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा ।
ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥
२०८) बरें, हें ( शरीर पाहिलें ) तर पांच भूतांच्या मिलाफानें झालेलें आहे व तें शेवटीं पांच भूतांतच मिळून जाणार; त्या वेळीं आपण केलेले श्रम कोठें शोधून काढावेत ? ( म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा ? )  
म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण ।
यालागीं एथ अंतःकरण । देयावेंना ॥ २०९ ॥
२०९) म्हणून केवळ देहाचें पोषण करणें, हा उघड उघड घात आहे, याकरितां तूं ( असल्या ) देहपोषणाकडे लक्ष देऊं नकोस.
एर्‍हवीं इंद्रियांचियां अर्था- । सारिखा विषयो पोखितां ।
संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥ २१० ॥
२१०) एरवीं इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणें विषय देत गेले, तर मनाला संतोष प्राप्त होईल हें खरें; 
परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु ।
जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ २११ ॥
२११) परंतु तो संतोष म्हणजे बाहेरुन सभ्य दिसणार्‍या चोराच्या संगतीप्रमाणें आहे; तो चोर गांवाची शीव ओलांडली नाहीं तेथपर्यंत क्षणभर गप्प असतो. ( मग पुढें वनांत गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो. )  
बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता ।
परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी ॥ २१२ ॥
२१२) बाबा, वचनागादि विषें गोड आहेत खरीं; पण त्यांच्याविषयीं अंतःकरणांत इच्छा कदाचित् उत्पन्न होईल, ( पण ती उत्पन्न होऊं देऊं नकोस; ) परंतु त्यांच्या परिणामांचा विचार केला तर तीं प्राणघातक आहेत.  
देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे ।
जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥ २१३ ॥
२१३) पाहा, ज्याप्रमाणें गळाला लावलेलें आमिष माशाला भुलवितें, त्याप्रमाणें इंद्रियांच्या ठिकाणीं असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते.    
परी तया,माजी गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये ।
तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ २१४ ॥
२१४) परंतु त्या अभिलाषाखालीं प्राण घेणारा गळ आहे, हें तो आमिषानें झांकला गेला असल्यामुळें ज्याप्रमाणें त्या माशाला कळत नाहीं;  
तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा धरिजेल ।
तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥ २१५ ॥
२१५) तशीच स्थिति या विषयांच्या लालसेनें होईल. जर विषयाांचा अभिलाष धरला, तर क्रोधरुपीं अग्नींत पडावें लागेल.
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी ।
आणी मृगातें बुद्धी । साधावया ॥ २१६ ॥
२१६) जसा पारधी मातण्याच्या हेतुनें हरिणाला चहूंकडून घेरुन माराच्या कचाटींत आणतो;  
एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे ।
पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥ २१७ ॥
२१७) येथें तसाच प्रकार आहे. म्हणून तूं विषयांचा संग धरुं नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत, असे समज.  
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा ।
एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ॥ २१८ ॥
२१८) म्हणून विषयेच्छेला थाराच देऊं नये. या विषयाची मनांतहि आठवण आणूं नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊं देऊं नकोस.
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । 
तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥ २१९ ॥
२१९) पाहा, अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण जरी असला तरी त्याचेंच आचरण केलेलें चांगलें,
येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा ।
परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥
२२०) याहून दुसरा जो परकीयाचा आचार, तो खरोखर दिसावयास चांगला जरी दिसला तरी आचरण करणारानें आपणांस विहित असलेल्या कर्माचेंच आचरण करावें. 
सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वान्नें आहाति बरवीं । 
तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥
२२१) शूद्राच्या घरीं सर्व चांगलीं पक्वानें आहेत, तों ब्राह्मण दरिद्री जरी असला, तरी त्याने कशी सेवन करावींत ? सांग. 
हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे ।
अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥
२२२) अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी ? जें प्राप्त करुन घेणें योग्य नाहीं, त्याची इच्छा कशी करावी ? अथवा विचार कर; इच्छा जरी झाली, तरी त्याचें सेवन करावें काय ?  
तरी लोकांचीं धवराळें । देखोनियां मनोहरें ।
असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवी ॥ २२३ ॥
२२३) दुसर्‍यांचीं सुंदर चुनेगच्ची घरें पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकव्यात ?  
हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली ।
तरी भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २२४ ॥
२२४) हें असूं दे. आपली बायको जरी रुपानें वाईट असली तरी ज्याप्रमाणें तिच्याच बरोबर संसार करावा हे चांगलें; 
तेवीं आवडे सांकडु । आचरतां जरी दुवाडु ।
तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥ २२५ ॥
२२५) त्याप्रमाणें कितीही अडचणींचा प्रसंग आला अथवा आचरावयास त्रास पडला, तरी आपला धर्मच परलोकीं सुख देणार आहे.   



Custom Search

No comments:

Post a Comment