Monday, September 14, 2020

ShriRamcharitmans Part 43 श्रीरामचरितमानस भाग ४३

 

ShriRamcharitmans Part 43  
Doha 216 to 218 
श्रीरामचरितमानस भाग ४३ 
दोहा २१६ ते २१८ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--रामु लखनु दोउ बंधुबर रुप सील बल धाम ।
मख राखेउ सबु साखि जगु जिते असुर समग्राम ॥ २१६ ॥
राम व लक्ष्मण नावाचे हे दोघे भाऊ रुप, शील आणि बल यांचे आगर आहेत. सर्व जगाला हे कळले आहे की, यांनीच युद्धामध्ये असुरांना जिंकुन माझ्या यज्ञाचे रक्षण केले.' ॥ २१६ ॥   
मुनि तव चरन देखि कह राऊ । कहि न सकउँ निज पुन्य प्रभाऊ ॥
सुंदर स्याम गौर दोउ भ्राता । आनँदहू के आनँद दाता ॥ 
राजे म्हणाले, ' हे मुनिवर ! तुमच्या चरणांचे दर्शन घडले, हा माझा केवढा पुण्य-प्रताप आहे. हे मी सांगू शकत नाही. हे सुंदर श्याम व गौर वर्णाचे दोघे बंधू आनंदालाही आनंद देणारे आहेत. ॥ १ ॥
इन्ह कै प्रीति परसपर पावनि । कहि न जाइ मन भाव सुहावनि ॥
सुनहु नाथ कह मुदित बिदेहू । ब्रह्म जीव इव सहज सनेहू ॥ 
यांचे परस्पर-प्रेम अतिशय पवित्र व सुंदर आहे. मनाला ते खूप आवडते, परंतु बोलून दाखविता येत नाही.' विदेह जनक आनंदाने म्हणाले, ' हे मुनिवर ऐका. ब्रह्म व जीव यांच्यासारखे यांचे स्वाभाविक प्रेम आहे. ' ॥ २ ॥
पुनि पुनि प्रभुहि चितव नरनाहू । पुलक गाता उर अधिक उछाहू ॥
मुनिहि प्रसंसि नाइ पद सीसू । चलेउ लवाइ नगर अवनीसू ॥
राजे वारंवार प्रभूंकडे पाहात होते. प्रेमामुळे त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि मनात उत्साह दाटला होता. मग मुनींची प्रशंसा करीत आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून राजे त्यांना नगरामध्ये घेऊन गेले. ॥ ३ ॥
सुंदर सदनु सुखद सब काला । तहॉं बासु लै दीन्ह भुआला ॥
करि पूजा सब बिधि सेवकाई । गयउ राउ गृह बिदा कराई ॥
सर्वकाळी ( सर्व ऋतूंमध्ये ) सुखदायक असणार्‍या एका सुंदर महालात राजांनी त्यांना उतरविले. नंतर सर्व प्रकारे पूजा-सेवा करुन राजांनी त्यांचा निरोप घेऊन ते आपल्या महालात गेले. ॥ ४ ॥
दोहा--रिषय संग रघुबंस मनि करि भोजनु बिश्रामु ।
बैठे प्रभु भ्राता सहित दिवसु रहा भरि जामु ॥ २१७ ॥
रघुकुल-शिरोमणी प्रभू श्रीरामचंद्रांनी ऋषींच्या बरोबर भोजन केले, विश्रांती घेतली आणि ते लक्ष्मणासोबत बसले. त्यावेळी दिवस एक प्रहर उरला होता. ॥ २१७ ॥
लखन हृदयँ लालसा बिसेषी । जाइ जनकपुर आइअ देखी ॥
प्रभु भय बहुरि मुनिहि सकुचाहीं । प्रगट न कहहिं मनहिं मुसुकाहीं ॥
जनकपूर पाहण्यास जावे, अशी लक्ष्मणाला प्रबळ इच्छा झाली. प्रभू श्रीरामांचे भय वाटत होते आणि मुनींच्यासमोर संकोच वाटत होता. म्हणून तो स्पष्टपणे बोलून न दाखविता तो मनातल्या मनात हसत होता. ॥ १ ॥
राम अनुज मन की गति जानी । भगत बछलता हियँ हुलसानी ॥
परम बिनीत सकुचि मुसुकाई । बोले गुर अनुसासन पाई ॥
( अंतर्यामी ) श्रीरामांनी धाकट्या भावाच्या मनातला विचार ओळखला. त्यांच्या मनात भक्तवत्सलता जागी झाली. त्यांनी गुरुंच्या आज्ञेने मोठ्या विनयपूर्वक पण काहीशा संकोचाने हसत म्हटले, ॥ २ ॥
नाथ लखनु पुरु देखन चहहीं । प्रभु सकोच डर प्रगट न कहहीं ॥
जौं राउर आयसु मैं पावौं । नगर देखाइ तुरत लै आवौं ॥
' हे नाथ, लक्ष्मणाला नगर पाहायचे आहे. परंतु तुमच्या भीतीने व संकोचामुळे तो स्पष्टपणे बोलत नाही, जर तुमची आज्ञा असेल, तर मी त्याला नगर दाखवून लगेच घेऊन येतो. ' ॥ ३ ॥
सुनि मुनीसु कह बचन सप्रीती । कस न राम तुम्ह राखहु नीती ॥
धरम सेतु पालक तुम्ह ताता । प्रेम बिबस सेवक सुखदाता ॥
हे ऐकून मुनीश्वर विश्वामित्र प्रेमाने म्हणाले, ' हे राम, तुम्ही नीति-नियमांचे पालन करणार नाही, असे कसे होईल ? तुम्ही धर्माचे पालन करणारे आणि प्रेमवश होऊन सेवकांना सुख देणारे आहात. ॥ ४ ॥
दोहा--जाइ देखि आवहु नगरु सुख निधान दोउ भाइ ।
करहु सुफल सब के नयन सुंदर बदन देखाइ ॥ २१८ ॥
सुखनिधान तुम्ही दोन्ही बंधू नगर पाहून या. आपले सुंदर मुख दर्शन देऊन सर्व नगरवासीयांचे नेत्र धन्य करा. ॥ २१८ ॥
मुनि पद कमल बंदि दोउ भ्राता । चले लोक लोचन सुख दाता ॥
बालक बृंद देखि अति सोभा । लगे संग लोचन मनु लोभा ॥
सर्व लोकांच्या नेत्रांना सुखावणारे दोन्ही भाऊ मुनींच्या चरण-कमलांना वंदन करुन निघाले. ( वाटेत ) लहान मुलांच्या झुंडी त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांच्या मागून निघाले. त्यांचे नेत्र आणि मन ( त्यांना पाहून ) मोहून गेले होते. ॥ १ ॥
पीत बसन परिकर कटि भाथा । चारु चाप सर सोहत हाथा ॥
तन अनुहरत सुचंदन खोरी । स्यामल गौर मनोहर जोरी ॥
( दोघा भावांनी ) पीतांबर परिधान केले होते. कमरेच्या दुपट्ट्याला भाते बांधले होते. हातांमध्ये सुंदर धनुष्य-बाण शोभत होते. ( श्याम व गौर वर्णांच्या ) शरीरांना शोभेल अशी सुंदर चंदनाची उटी लावली होती. सावळ्या व गोर्‍या रंगाची ती सुंदर जोडी होती. ॥ २ ॥
केहरि कंधर बाहु बिसाला । उर अति रुचिर नागमनि माला ॥
सुभग सोन सरसीरुह लोचन । बदन मयंक तापत्रय मोचन ॥
त्यांची सिंहासारखी पुष्ट मान व विशाल बाहू होते. विशाल छातीवर अत्यंत सुंदर मोत्यांच्या माळा होत्या. त्यांचे सुंदर लाल कमळांसारखे नेत्र होते. त्रिविध तापांपासून मुक्त करणारे चमद्रासारखे मुख होते. ॥ ३ ॥                  
कानन्हि कनक फूल छबि देहीं । चितवत चितहि चोरि जनु लेहीं ॥
चितवनि चारु भृकुटि बर बॉंकी । तिलक रेख सोभा जनु चॉंकी ॥
कानांमध्ये सोन्याची कर्णफुले फार शोभून दिसत होती आणि पाहता क्षणीच ( पाहणार्‍यांचे ) चित्त ते जणू चोरुन घेत होती. त्यांची नजर फार मनोहर आणि भुवया सुंदर कमानदार होत्या. त्यांच्या कपाळावरील तिलक इतका सुंदर होता की, जणू त्या शोभेवर उमटवलेली मोहर ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment