Monday, November 2, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 3, श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ३

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 3
Ovya 51 to 75 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ३ 
ओव्या ५१ ते ७५

ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें ।

मग अज्ञानाचें आधारें । गिळूनि घालीं ॥ ५१ ॥

५१) त्या वेळीं भक्तांच्या कैवारासाठीं देह धारण करुन मी अवतरतो; आणि मग अज्ञानरुपी अंधकार पार नाहींसा करुन टाकतों.

अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।

सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवी ॥ ५२ ॥

५२) अधर्माची हद्द तोडून टाकतों. दोघांच्या ( उत्कर्षासंबंधीं ) लिहून ठेवलेलें फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितों.

दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूचा मानु गिंवशीं ।

धर्मासीं नीतीशीं । शेंज भरीं ॥ ५३ ॥

५३) दैत्यांच्या कुळांचा नाश करतों. साधूंचा ( गेलेला ) मान ( पुनः ) प्रस्थापित करतों, आणि धर्म व नीति यांची सांगड घालतों.

मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं ।

तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥ ५४ ॥

५४) मी विवेकदीपाला आलेली अविचाराची काजळी झाडून तो प्रज्वलित करतों, त्या वेळीं योग्यांना निरंतर ( अस्त नाहीं अशा ) दिवाळीचा दिवस उगवतो. 

स्वमुखें विश्र्व कोंदे । धर्मचि जगीं नांदे ।

भक्तां निघती दोंदें । सात्त्विकाचीं ॥ ५५ ॥

५५) तेव्हां सर्व जग आत्मसुखानें भरुन जातें, फक्त धर्मच जगांत नांदू लागतो; आणि भक्तांना सात्त्विकतेचीं दोंदें येतात. 

तैं पापाचा आचळु फिटे । पुण्याची पहाट फिटे ।

जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥ ५६ ॥

५६) ज्या वेळेला अर्जुना, माझी मूर्ति प्रकट होते, त्या वेळेला पापांचा पर्वत नाहींसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो.

ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं ।

परि हेंचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया ॥ ५७ ॥

५७) अशा या कामाकरितां मी प्रत्येक युगांत अवतार घेतों, परंतु हेंच ( तत्त्व ) जो ओळखतो, तो या जगांत खरा विवेकी होय.  

माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें ।

हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥ ५८ ॥

५८) मी ( माझें ) अजत्व कायम ठेवून जन्मतों, अक्रिय असूनहि कर्में करतों, हें माझें अलिपत्व जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय.

तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे ।

मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रुपीं ॥ ५९ ॥

५९) तो व्यवहारांत वागला तरी आसक्तीनें ( अहंकारवृत्तीनें ) वागत नाहीं, देहधारी असूनही देहभावाला वश होत नाहीं आणि मरणोत्तर माझ्याच रुपांत येऊन मिळतो.  

एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती ।

वाटा केवेळीं न वचती । क्रोधाचिया ॥ ६० ॥ 

६०) एर्‍हवीं आपल्याबद्दल किंवा दुसर्‍याबद्दल जे शोक करीत नाहींत, ज्यांच्या कामना नाहींशा झालेल्या असतात, जे केव्हांहि क्रोधाच्या वाटेनें जात नाहींत.

जे सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले ।

कां आत्मबोधें तोषले । वीतराग जे ॥ ६१ ॥

६१) माझ्या भावनेनें जे नेहमीं संपन्न असतात, माझ्याच सेवेकरितां ज्यांचें जिणें असतें, आत्मज्ञानानें जें संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरील प्रीति नष्ट झालेली असते; 

जे तपोतेजाचिया राशी । कां एकायतन ज्ञानासी ।

जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरुप ॥ ६२ ॥

६२) जे तपाच्या तेजाचे पुंज असतात, किंवा जे ज्ञानाचें केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय, जे मूर्तिमंत तीर्थच असतात;

ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले ।

जे मज तयां उरले । पदर नाहीं ॥ ६३ ॥

६३) ते सहजच माझ्या स्वरुपाला मिळतात, ते मीच होऊन राहतात; कारण त्यांच्यांत व माझ्यांत मग पडदाच उरत नाही. 

सांगें पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय निःशेख ।

तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाईजे ॥ ६४ ॥

६४) सांग बरें, गंज व काळीमा हे पितळेचे दोन दोष जर पूर्णपणें नाहींसे झालें, तर मग सोनें प्राप्त करुन घेण्याची काय निराळी जरुरी आहे ?  

तैसे यमनियमीं कडसले । जे तपोज्ञानीं चोखाळले ।

मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ॥ ६५ ॥

६५) त्याप्रमाणें यमनियमांच्या कसास जें उतरले, तपानें व ज्ञानानें जे शुद्ध झाले, ते मद्रुप झाले, यांत संशय कसला ?

एर्‍हवीं तरी पाहीं । जे जैसे माझां ठाईं ।

भजती तया मीही । तैसाचि भजें ॥ ६६ ॥

६६) दुसरें असें पाहा; जे जशी माझी भक्ति करतात, त्यांच्यावर मी उलट त्याच प्रमाणांत प्रेम करतो

देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ ।

जाहलें असे केवळ । माझां ठायीं ॥ ६७ ॥

६७) हें पाहा, जेवढें म्हणून मनुष्यप्राणी आहेत; तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ति करण्याकडे असतो !

परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासी आले ।

तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ॥ ६८ ॥

६८) पण ज्ञान नसल्यामुळें त्यांचे सर्व बिघडतें. तें असें कीं, त्यांच्या ठिकाणीं भेदबुद्धि उत्पन्न होते. त्यामुळें, मी जो एक, त्या माझ्या ठिकाणीं तें अनेकत्वाची कल्पना करतात. 

म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती ।

देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥ ६९ ॥

६९) म्हणून जेथें वास्तविक अभेद आहे तेथें ते भेद पाहतात, जे नामरहित आहे, त्याला ते नांवें देतात. ( वास्तविक ) जो चर्चेचा विषयच होऊं शकत नाहीं, त्याला देव किंवा देवी म्हणतात.   

जें सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम ।

मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥ ७० ॥

७०) भेदबुद्धिला वश होऊन घोटाळ्यांत पडल्यामुळें, जो परमात्मा सर्व ठिकाणीं ( व ) नेहमीं ( वास्तविक ) सारखा आहे, त्याच्या ठिकाणीं ते ‘ चांगला, वाईट ‘ असे भेद करतात.

मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।

मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥ ७१ ॥

७१) मग नाना प्रकारचे हेतु मनांत धरुन, आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनीं विधिपूर्वक उपासना करतात.

तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त ।

परी तें कर्मफळ निश्र्चित । वोळख तूं ॥ ७२ ॥

७२) मग जें जें ( त्यांच्या ) मनांत असतें, तें तें सगळें त्यांना प्राप्त होतें; पण तें केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे, हें तूं निश्र्चयानें समज.

वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक ।

एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥ ७३ ॥

७३) ( कर्मा-) वांचून फल देणारें किंवा घेणारें दुसरें खात्रीनें कोणीहि नाही; या मनुष्यलोकांमध्यें फक्त कर्मच फल देणारें आहे.

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे ।

कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥ ७४ ॥

७४) ज्याप्रमाणें शेतांत जें पेरावें त्यावांचून ( तेथें ) दुसरें उत्पन्नच होत नाहीं, किंवा आरशांत जें पाहावें तेंच त्यांत दिसतें;

नातरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीटी ।

पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥ ७५ ॥

 ७५) किंवा अर्जुना, ज्याप्रमाणें डोंगराच्या पायथ्याशीं आपणच बोललेला शब्द कांहीं कारणानें प्रतिध्वनीचें रुप घेऊन तसाच उमटतो;



Custom Search

No comments:

Post a Comment