Wednesday, November 18, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 5
Ovya 101 to 125  
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ५ 
ओव्या १०१ ते १२५

तेणें न पाहतां विश्र्व देखिलें । न करितां सर्व केलें ।

न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ १०१ ॥

१०१) त्यानें विश्र्व पाहिलें नसतांनाहि तें पाहिल्याप्रमाणेंच आहे. कांहीं न करतांहि सर्व कांहीं केल्याप्रमाणेंच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेतांहि त्या भोगल्याप्रमाणेंच आहेत.  

एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।

हें असो विश्र्व जाहला । आंगेचि तो ॥ १०२ ॥

१०२) एकाच ठिकाणीं तो बसून असला, तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेंच आहे, फार कशाला ? तो स्वतः विश्र्वरुपच झालेला असतो.

जयां पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।

परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥ १०३ ॥

१०३) ज्या पुरुषाच्या ठिकाणीं कर्माविषयीं तर तिरस्कार नसतो; पण ज्याच्या चित्तांत फलाची इच्छा चुकून केव्हांहि प्रवेश करीत नाहीं;   

आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन ।

येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥ १०४ ॥

१०४) आणि हें कर्म मी करीन, अथवा आरंभिलेलें मी पुरें करीन, ह्या कल्पनेनेंहि ज्याचें मन विटाळत नाहीं; 

ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें ।

तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥ १०५ ॥

१०५) ज्ञानरुपी अग्नीच्या द्वारां ज्यानें सर्व कर्में जाळून टाकलीं आहेत तो मनुष्याचें रुप घेतलेलें प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असें तूं समज.

जो शरीरी उदासु । फळभोगीं निरासु ।

नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥ १०६ ॥

१०६) तो शरीरविषयीं उदास असतो, फलाच्या उपभोगाविषयीं निरिच्छ असतो व नेहमी आनंदरुप होऊन राहिलेला असतो.

जो संतोषांचा गाभारां । आत्मबोधाचिया वोगरा ।

पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥ १०७ ॥

१०७) अर्जुना, तो संतोषाच्या गाभार्‍यांत जेवत असतो. आत्मबोधाच्या पक्वानाला पुरें असें कधीं म्हणतच नाही.

कैसी आधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी ।

सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥ १०८ ॥

१०८) अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन नित्य वाढणार्‍या आवडीनें परमानंदाची रुची तो किती तरी घेत असतो.  

म्हणोनि अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे ।

जया आपुलें आणि परावें । दोन्हीं नाहीं ॥ १०९ ॥

१०९) म्हणून वेळेनुसार जें जें मिळेल, त्यांतच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परकें ही दोन्हीं नसतात.                                                 

तो दिठी जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये ।

आइके तें आहे । तोचि जाहला ॥ ११० ॥

११०) तो दृष्टीनें जें पाहातों, तें आपणच होऊन जातो आणि तो जें ऐकतो तेंच तो झालेला असतो.

चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले ।

ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥ १११ ॥

१११) पायानें जें चालतो, तोंडानें जें बोलतो, ( तात्पर्य ) याप्रमाणें जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात, तेवढें सर्व तोच अंगानें झालेला असतो.

हें असो विश्र्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं ।

आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥ ११२ ॥

११२) हें असो; पाहा, हें विश्व ज्याला आपल्याहून वेगळें ( दिसत ) नाहीं, आतां त्याला कर्म ते कसलें व तें त्याला बाधा काय करणार ?

हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें ।

तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥ ११३ ॥

११३) हा मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो, तें द्वैत ज्याच्या ठिकाणीं मुळींच उरलेलें नसतें, तो निर्मत्सर आहे, हें कां शब्दानें बोलून दाखविलें पाहिजे ?

म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु ।

सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥ ११४ ॥

११४) म्हणून तो सर्व प्रकारानें मुक्त आहे; कर्म करित असतांहि कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनहि गुणातीत आहे; ह्यांत संशय नाहीं.

तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे ।

पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ ११५ ॥

११५) तो देहधारी तर असतो, पण ( निर्गुण ) चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीनें त्यास पाहिलें असतां, तो अगदीं शुद्ध आहे असे  आढळून येतें.

ऐसाही परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें ।

तरी तियें लया जाती अशेखें । तयांचांचि ठायीं ॥ ११६ ॥

११६) असें असून देखील कौतुकानें त्यानें जरी यज्ञादिक कर्में केलीं तरी तीं सर्व त्याच्याच ठिकाणीं लय पावतात.   

अकाळींचीं अभ्रें जैशीं । उर्मीवीण आकाशीं ।

हारपती आपैशीं । उदयलीं सांतीं ॥ ११७ ॥

११७) आकाशांत अकालीं आलेले मेघ ज्याप्रमाणें कांहीं जोर न करतां, आले तसें आपोआप जागच्या जागी विरुन जातात;

तैशीं विधिविधान विहितें । जरी आचरे तो समस्तें ।

तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥ ११८ ॥   

११८) त्याप्रमाणें वेदांनीं सांगितलेल्या एकूण एक विधानांचें यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्यभावनेमुळें तीं शेवटीं ऐक्यालाच मिळतात. ( त्याच्या ठिकाणीं दुजाभाव नसल्यामुळें त्याच्याच ठिकाणीं लय पावतात.

जें हें हवन मी होता । कां इयें यज्ञीं हा भोक्ता ।

ऐसीया बुद्धीसि नाहीं भंगता । म्हणऊनियां ॥ ११९ ॥

११९) कारण, हें यज्ञरुपी कर्म व तें करणारा मी किंवा या यज्ञामध्यें ( अमुक ) भोक्ता, असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणीं भेद नाहीं.

जे इष्टयज्ञ यजावे । ते हविर्मंत्रादि आघवें ।

तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥ १२० ॥  

१२०) जे जे इष्ट यज्ञ तो करतो, त्यांतील होमद्रव्यें, मंत्र इत्यादि सर्व तो आत्म्याच्या ठिकाणीं स्थिरबुद्धी असलेला पुरुष, तीं ब्रह्मच आहेत, अशा बुद्धीने पाहातो.

म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।

तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥ १२१ ॥

१२१) म्हणून कर्म ब्रह्मच आहे, असें साम्य ज्याच्या प्रतीतीला आलें, त्यानें कर्तव्यकर्म जरी केलें तरी अर्जुना, तें नैष्कर्म्यच होय.  

आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें ।

मग उपासन जिहिं आणिलें । योगाग्नीचें ॥ १२२ ॥

१२२) आतां ज्यांचें अविवेकाचें बालपण गेलेलें आहे ( म्हणजे विवेकरुप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेलें आहे ), ज्यांनी विरक्तीशीं लग्न लाविलें आहे आणि मग ज्यांनीं योगरुप अग्नीची उपासना स्वीकारली आहे; 

जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं ।

गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ॥ १२३ ॥

१२३) जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनीं गुरुवाक्यरुपी अग्नीमध्यें मनासह अविद्येची आहुति देऊन हवन केलें आहे,

तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे ।

जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥ १२४ ॥

१२४) ते योगरुपी अग्नीचें ग्रहण केलेंले अग्नीहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असेम म्हणतात, अर्जुना, त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते.

दैवास्तव देहाचें पाळण । ऐसा निश्र्चयो परिपूर्ण ।

जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगें ॥ १२५ ॥

१२५) देहाचें पालन प्रारब्धवशात् होत असतें, असा 

ज्याचा पूर्ण निश्र्चय झालेला असतो, तो देहाच्या पोषणाविषयीं मनांत चिंता वाहात नाहीं. तो या दैवयज्ञरुप योगानें महायोगी झालेला आहे, असे समज.



Custom Search

No comments:

Post a Comment