Wednesday, November 18, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ६

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 6 
Ovya 126 to 150 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ६ 
ओव्या १२६ ते १५०

आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक ।

तयांतें यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे ॥ १२६ ॥

१२६) दुसरा प्रकार आतां तुला सांगतों, ऐक. जे ब्रह्मरुप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेंच उपासना करतात.

एक संयमाग्नीहोत्री । ते युक्तित्रयाचां मंत्रीं ।

यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥ १२७ ॥

१२७) धारणाध्यानसमाधिरुप संयम, हेंच कोणी अग्निहोत्र, त्याचें आचरण करणारे कित्येक मूलबंधादिक तीन बंधरुपी मंत्रद्वारां, इंद्रियरुपी पवित्र द्रव्यांनीं यज्ञ करतात.     

एकां वैराग्यरवि विवळे । तंव संयती विहार केले ।

तेथ अपावृत जाहले । इंद्रियानळ ॥ १२८ ॥

१२८) दुसरे कित्येक, वैराग्यरुपी सूर्य उगवल्याबरोबर संयमरुपी कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडांत इंद्रियरुप अग्नी प्रकट होतो.

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपलीं ।

तेथ आशाघूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥ १२९ ॥

१२९) त्या इंद्रियरुप अग्नींतून वैराग्याची ज्वाला निघते, तेव्हां कामक्रोधादि विकारांचीं लाकडें पेटूं लागतात. त्या वेळीं आहवनीयादिक अग्नि असलेला इंद्रियरुप पांच कुंडांतून आशारुप धूर निघून जातो.   

मग वाक्यविधीचिया निरवडी । विषयआहुति उदंडी ।

हवन केलें कुंडीं । इंद्रियाग्नीचां ॥ १३० ॥

१३०) मग वेदांत सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेनें इंद्रियरुप अग्नि असलेल्या कुंडात विषयरुप अनेक आहुति देऊन यज्ञ करतात.

एकीं यथापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा ।

आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥ १३१ ॥

१३१) अर्जुना, याप्रमाणें कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात; दुसरे कोणी हृदयाची अरणी करुन विवेकाचा मंथा करतात.

तो उपशमें निहटिला । धैर्यें वरी दाटिला ।

गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥ १३२ ॥

१३२) तो मंथा शांतीनें बळकट धरतात; व वरुन सात्त्विक धैर्यानें बळकट धरुन गुरुपदेशरुपी ( दोरीनें ) जोरानें घुसळतात.

ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें ।

जे उज्जीवन जहालें । ज्ञानाग्नीचें ॥ १३३ ॥

१३३) याप्रमाणें समरसतेनें मंथन केलें म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो; तो हाच कीं, ज्ञानाग्नि प्रकट होतो.

पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु ।

मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥ १३४ ॥

१३४) पहिल्यानें ऋद्धिसिद्धीचा मोह, हाच कोणी धूर, तो निघून जातो. मग ( ज्ञानाग्नीची ) बारीकशी ठिणगी उत्पन्न होते.

तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातलें ।

जें यमदमीं हळुवारलें । आइतें होतें ॥ १३५ ॥

१३५) यमदमांनीं आयतें वाळवून हलकें झालेलें मन, हेंच त्या ज्ञानरुपी ठिणगीला पेटवण घालतात.

तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा ।

स्नेहेंसि नानाविधा । जाळिलिया ॥ १३६ ॥

१३६) त्याच्या साहाय्यानें ज्वाला प्रदीप्त होतात; मग त्यांत नाना प्रकारच्या वासनारुप समिधा ममतारुपी तुपासह जाळतात.

तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांचिया आहुती ।

तिये ज्ञानानळीं प्रदीप्ती । दिधलिया ॥ १३७ ॥

१३७) तेथें दीक्षित ( यज्ञकर्ता पुरुष ) मी ब्रह्मच आहें, या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नींत इंद्रियकर्मांच्या आहुती देतो.

पाठीं प्राणक्रियेचेनि स्नुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं ।

तेथ अवभृत समरसीं । सहजें जाहलें ॥ १३८ ॥

१३८) नंतर प्राणक्रियेच्या स्नुवेनें ज्ञानाग्नीमध्यें पूर्ण आहुति दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवभृतस्नान ( त्याला ) सहजच होतें. 

मग आत्मबोधींचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष ।

तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥ १३९ ॥

१३९) संयमाग्नींत ( इंद्रियादिक ) होमद्रव्याचें हवन करुन, शिल्लक राहिलेलें जे आत्मज्ञानादें सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात.   

 एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं ।

या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य तें एक ॥ १४० ॥

१४०) अशा या यज्ञांनीं आजपर्यंत या त्रिभुवनांत कित्येक मुक्त होऊन गेलेलें आहेत; या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत, तरी त्या सर्वांची फलप्राप्ति एकच आहे.

एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती ।

एक योगयागुही आहाती । जे सांगितले ॥ १४१ ॥

१४१) त्यांपैकीं कांहींना ' द्रव्ययज्ञ ‘ अशी संज्ञा आहे. कांहीं यज्ञ तपरुप सामर्थ्यानें उत्पन्न होतात. कित्येक योगयज्ञ म्हणून सांगितले आहेत.

एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे ।

ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥ १४२ ॥

१४२) कित्येकांत शब्दांनी शब्दाचें हवन करतात. ( वेदांच्या शब्दांचा उच्चार करतात ) त्यांस ‘ वाग्यज्ञ ‘ म्हणतात. ( ज्यांत ) ज्ञानानें ज्ञेय ( जाणावयाची वस्तु, ब्रह्म ) जाणतां येतें, तो ‘ ज्ञानयज्ञ ‘ होय.

हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें ।

परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ॥ १४३ ॥

१४३) अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत, कारण त्यांचे अनुष्ठान करणें अतिशय त्रासाचें आहे; परंतु ज्यांनीं इंद्रियें जिंकली, त्यांसच ते करण्याची योग्यता येऊन त्याचें आचरण घडतें.

ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले ।

म्हणोनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ॥ १४४ ॥

१४४) ते त्या कामीं चांगलें प्रवीण असतात व योगसमृद्धीनें संपन्न असतात. म्हणून ते आपलें आत्मस्वरुपाच्या ठिकाणीं ( जीवबुद्धीचें ) हवन करतात.

मग अपानाग्नीचां मुखीं । प्राणद्रव्यें देखीं ।

हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥ १४५ ॥

१४५) मग कोणीं अभ्यासानें अपानरुप अग्नीच्या मुखांत प्राणरुप द्रव्यांचें हवन करतात, पाहा.

एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती ।

ते प्राणायामी म्हणिपती । पंदुकमरा ॥ १४६ ॥

१४६) कित्येक अपानवायु प्राणवायुच्या ठिकाणीं अर्पण करतात, दुसरे किती एक प्राण व अपान या दोहोंचा निरोध करतात, त्यांना अर्जुना, ‘ प्राणायामी ‘ म्हणतात.

एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें ।

प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥ १४७ ॥

१४७) किती एक ( वज्रासनाच्या ) मूळबंधाच्या पद्धतीनें सर्व आहारांचा संयम करुन, प्रयत्नानें प्राणांचें प्राणाच्या ठिकाणीं हवन करतात. ( प्राणांनींच प्राणाचा लय करतात. )

ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ ।

जिहीं यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले ॥ १४८ ॥

१४८) याप्रमाणें हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनीं यज्ञाच्या द्वारें मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुऊन टाकलेले असतात.

जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता ।

जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥ १४९ ॥

१४९) त्यांनीं सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळें जें ( स्वरुप ) सहजच बाकी शिल्लक राहतें, जेथें ( ज्या स्वरुपाज्ञानाच्या ठिकाणीं ) अग्नि व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाहीं; 

जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे ।

मागुतें जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥ १५० ॥

१५०) जेथें यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुर्‍या होतात व 

यज्ञक्रिया संपते व जेथून क्रिया मात्र मागें परतून नाहींशा 

होतात;



Custom Search

No comments:

Post a Comment