Wednesday, November 18, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 7श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ७

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 7
Ovya 151 to 175 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ७ 
ओव्या १५१ ते १७५

विचार जेथ न रिघे । हेतु जेथ न निगे ।

जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥ १५१ ॥

१५१) जेथें विचाराचा प्रवेश होत नाहीं, जेथें कोणताहि तर्क चालत नाहीं, जें द्वैतदोषाच्या संपर्कानें लिप्त होत नाहीं;

ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट ।

तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ॥ १५२ ॥

१५२) असें जें अनादिसिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरुपी यज्ञांत शिल्लक राहिलेलें ब्रह्म असतें, तें ज्ञानरुपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ ( पुरुष ) ‘ मी ब्रह्म आहे ‘ या मंत्राद्वारें सेवन करतात.

ऐसे शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले ।

म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ॥ १५३ ॥

१५३) याप्रमाणें यज्ञातील शेषरुपीं अमृतानें ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात.

येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि ।

जे योगुयागु न करितीचि । जन्मले सांते ॥ १५४ ॥

१५४) जन्माला येऊन ज्यांना संयमरुप अग्नीची सेवा घडत नाहीं, व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळींच होत नाहीं; त्या इतर लोकांना विरक्ति माळ घालीत नाहीं.

जयां ऐहिक धड नाहीं । तयांचे परत्र पुससी काई ।

म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥ १५५ ॥

१५५) ज्यांचे ऐहिक नीट नाहीं, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस ? म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू ?

ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग ।

ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥ १५६ ॥

१५६) असें पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, ते वेदानेंच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत.

परि तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें ।

येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥ १५७ ॥

१५७) परंतु त्या विस्ताराशीं आपल्याला काय करावयाचें आहे. ( तात्पर्य ) असें समज कीं, हे ( मागें सांगितलेले यज्ञादिक ) सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात. एवढें जाणलें कीं आपोआपच कर्मबंधाची बाधा होणार नाहीं.  

अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ ।

जयां नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥ १५८ ॥

१५८) अर्जुना, वेद, ज्यांचे मूळ आहे, ज्यांत क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यांपासून अपूर्व असें स्वर्गसुखाचें फल प्राप्त होतें;

ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती ।

जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥ १५९ ॥

१५९) ते द्रव्यादि यज्ञ खरे आहेत; पण तार्‍यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढें चालत नाहीं, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाहीं. 

देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन ।

जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ॥ १६० ॥

१६०) पाहा, परमात्मस्वरुप सुखाचा ठेवा हस्तगतकरण्याकरितां, योगी लोक जे ज्ञानरुपी अंजन बुद्धिरुप डोळ्यांमध्यें घालण्याला कधींहि विसंबत नाहींत;

जें धांवतया कर्माची लाणी । नैष्ककर्म्यबोधाची खाणी ।

जें भुकेलिया घणी । साधनाची ॥ १६१ ॥

१६१) जें चालू कर्माच्या समाप्तीचें ठिकाण आहे, जें कर्मातील ज्ञानाची खाण आहे, ( आत्मसुखार्थ ) जे भुकेले आहेत. त्यांच्या साधनांची जें तृप्ति आहे;

जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली ।

जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ॥ १६२ ॥

१६२) ज्याच्या ठिकाणीं प्रवृत्ति पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगानें इंद्रियांना विषयांचा विसर पडतो;

मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलपण ठेलें ।

जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसे ॥ १६३ ॥

१६३) मनाचें मनपण नाहीसें होतें, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्यें ज्ञेय ( जाणावयाची वस्तु-ब्रह्म ) प्रत्यक्ष सांपडतें;

जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे ।

जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥ १६४ ॥

१६४) ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होतें, विवेकाचा हांवरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहतां ( आपोआपच ) आत]मस्वरुप दिसतें; 

तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें ।

तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥ १६५ ॥

१६५) अरे, अर्जुना, तें उत्तम ज्ञान जर लाभावें असें मनांत असेल, तर या संतांस सर्वस्वेंकरुन तूं भजावेंस.

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।

तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥ १६६ ॥

१६६) कारण तें ज्ञानाचें घर आहेत. त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे; अर्जुना, तूं सेवा करुन तो स्वाधीन करुन घे.

तरी तनुमनुजीवें । चरणासीं लागावें ।

आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥ १६७ ॥ 

१६७) एवढ्याकरितां शरीरानें, मनानें व जीवानें त्यांच्या चरणी लागावें आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावी. 

मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें ।

जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये ॥ १६८ ॥

१६८) मग आपलें जें इच्छित असेल, तें त्यांस विचारलें असतां तें सांगतात. त्या त्यांच्या उपदेशानें अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन पुनः संकल्पाकडे वळणार नाहीं.

जयाचेनि वाक्यउजिवडें । जाहलें चित्त निधडें ।

ब्रह्माचेनि पाडें । निःशंकु होय ॥ १६९ ॥

१६९) त्यांच्या उपदेशरुप उजेडानें निर्धास्त झालेलें चित्त ब्रह्माप्रमाणें शंकारहित होतें, 

ते वेळीं आपणपेया सहितें । इयें अशेषेंही भूतें ।

माझां स्वरुपीं अखंडितें । देखसी तूं ॥ १७० ॥

१७०) त्या वेळी आपल्यासहित हीं सर्व भूतें माझ्या स्वरुपांत तूं निरंतर पाहशील.

ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल ।

जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥ १७१ ॥

१७१) अरे पार्था, ज्या वेळीं श्रीगुरंची कृपा होईल त्या वेळीं असा ज्ञानप्रकाशांचा उदय होईल; आणि मग त्या त्या वेळीं मोहरुप अंधकार नाहींसा होईल.  

जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु ।

व्यामोहाचा डोंगरु । होऊनी अससी ॥ १७२ ॥

१७२) तू पापांचें आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा ( मनाच्या घोटाळ्याचा ) डोंगर जरी असलास;

तर्‍ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें ।

ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥ १७३ ॥

१७३) तरी ज्ञानशक्तीच्या पुढें बाबा, हें सगळें किरकोळ आहे. असें या ज्ञानाच्या अंगीं निर्दोष सामर्थ्य आहे.

देखें विश्र्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा ।

तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥ १७४ ॥

१७४) पाहा, निराकार परमात्म्याची पडछाया, म्हणून असणारा हा जो जगाचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही. ( विश्वाचा निरास करणें ह्याचीहि ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाहीं ); 

तया कायसें हें मनोमळ । हें बोलतांचि अति किडाळ ।

नाहीं येणें पाडें ढिसाळ । दुजें जगीं ॥ १७५ ॥

१७५) त्या ज्ञानाला हें मनांतील मळ म्हणजे काय 

आहेत; पण अशी तुलना करणें, हेंच अनुचित आहे. ( 

वास्तविक पाहातां ) यांच्यासारखें समर्थ जगांत दुसरें 

कांहीं नाहीं.



Custom Search

No comments:

Post a Comment