Monday, November 2, 2020

ShriRamcharitmans Part 58 श्रीरामचरितमानस भाग ५८



ShriRamcharitmans Part 58 
Doha 264 to 267 
श्रीरामचरितमानस भाग ५८ 
दोहा २६४ ते २६७ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

सो०—रघुबर उर जयमाल देखि देव बरिसहिं सुमन ।

सकुचे सकल भुआल जनु बिलोकि रबि कुमुदगन ॥ २६४ ॥

श्रीरघुनाथांच्या छातीवर जयमाला रुळताना पाहून देव पुष्प-वर्षा करु लागले. इतर सर्व राजे असे निस्तेज झाले की, जणू सूर्य पाहाताच ( रात्रविकासी ) कुमुदांचा समूह सुकून जातो. ॥ २६४ ॥

पुर अरु ब्योम बाजने बाजे । खल भए मलिन साधु सब राजे ॥

सुर किंनर नर नाग मुनीसा । जय जय जय कहि देहिं असीसा ॥

नगरामदध्ये आणि आकाशामध्ये वाद्ये वाजू लागली. दुष्ट लोक उदास झाले आणि सर्व सज्जन लोक प्रसन्न झाले. देवता, किन्नर, मनुष्य, नाग आणि मुनीश्र्वर जयजयकार करीत आशीर्वाद देऊ लागले. ॥ १ ॥

नाचहिं गावहिं बिबुध बधूटीं । बार बार कुसुमांजलि छूटीं ॥

जहँ तहँ बिप्र बेदधुनि करहीं । बंदी बिरिदावलि उच्चरहीं ॥

देवांगना नाचू-गाऊ लागल्या. त्यांच्या हातून वारंवार फुले उधळली जात होती. जिकडे-तिकडे ब्राह्मण वेदघोष करीत होते आणि भाट लोक कुलकीर्ती वर्णन करीत होते. ॥ २ ॥

महि पाताल नाक जसु ब्यापा । राम बरी सिय भंजेउ चापा ॥

करहिं आरती पुर नर नारी । देहिं निछावरि बित्त बिसारी ॥

पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकांमध्ये कीर्ती पसरली की श्रीरामचंद्रांनी धनुष्य मोडले आणि सीतेला वरले. नगरातील स्त्री-पुरुष आरती ओवाळू लागले आणि आपली ऐपत विसरुन ओवाळणी देऊ लागले. ॥ ३ ॥

सोहति सीय राम कै जोरी । छबि सिंगारु मनहुँ एक ठोरी ।

सखीं कहहिं प्रभुपद गहु सीता । करति न चरन परस अति भीता ॥

श्रीसीता-रामांची जोडी अशी शोभून दिसत होती की जणू सुंदरता आणि शृंगाररस यांचे मीलन झाले आहे. सख्या म्हणत होत्या, ‘ सीते, स्वामींच्या चरणांचा स्पर्श कर. ‘ परंतु सीता फार घाबरुन गेलयाने त्यांच्या चरणांना स्पर्श करत नव्हती. ॥ ४ ॥

दोहा—गौतम तिय गति सुरति करि नहिं परसति पग पानि ।

मन बिहसे रघुबंसमनि प्रीति अलौकिक जानि ॥ २६५ ॥

गौतममुनींची पत्नी अहल्या हिच्या अवस्थेची आठवण झाल्यामुळे सीता श्रीरामांच्या चरणांना स्पर्श करीत नव्हती. सीतेचे अलौकिक प्रेम पाहून रघुकुलरत्न श्रीराम मनातून हसले. ॥ २६५ ॥

तब सिय देखि भूप अभिलाषे । कूर कपूत मूढ़ मन माखे ॥

उठि उठि पहिरि सनाह अभागे । जहँ तहँ गाल बजावन लागे ॥

त्यावेळी सीतेला पाहून काही राजांना हाव सुटली. ते दुष्टक, कुपुत्र आणि मूर्ख राजे मनातून फार संतापले. ते हतभागी उठून चिलखते घालून वाटेल ती बडबड करु लागले. ॥ १ ॥

लेहु छड़ाइ सीय कह कोऊ । धरि बॉंधहु नृप बालक दोऊ ॥

तोरें धनुषु चाड़ नहिं सरई । जीवत हमहि कुअँरि को बरई ॥

कोणी म्हणू लागला की, ‘ सीतेला हिसकावून घ्या आणि दोन्ही राजकुमारांना पकडून कैद करा. धनुष्य मोडल्याने काही इच्छा पूर्ण होणार नाही. आम्ही जिवंत असताना राजकुमारीशी विवाह कोण करु शकेल ? ॥ २ ॥

जौं बिदेहु कछु करै सहाई । जीतहु समर सहित दोउ भाई ॥

साधु भूप बोले सुनि बानी । राजसमाजहि लाज लजानी ॥

जर जनक राजाने त्यांना मदत केली तर युद्धात दोन्ही भावांसह त्यालाही जिंकू. हे बोलणे ऐकून सज्जन राजे म्हणाले, ‘ या निर्लज्ज राजांना पाहून लाजेलाही लाज वाटली असावी. ॥ ३ ॥

बलु प्रतापु बीरता बड़ाई । नाक पिनाकहि संग सिधाई ॥

सोइ सूरत कि अब कहुँ पाई । असि बुधि तौ बिधि मुहँ मसि लाई ॥

अरे, तुमचे बल, प्रताप, शौर्य, मोठेपण आणि स्वर्ग ( प्रतिष्ठा ) तर धनुष्याबरोबरच गेली. आता ही वीरता कुठुन आली ? अशी दुष्ट बुद्धी आहे, म्हणून तर विधात्याने तुमच्या तोंडाला काळे फासले. ॥ ४ ॥

  दोहा—देखहु रामहि नयन भरि तजि इरिषा मदु कोहु ।

लखन रोषु पावकु प्रबल जानि सलभ जनि होहु ॥ २६६ ॥

ईर्षा, घमेंड व राग सोडून आणि डोळे उघडून जरा श्रीरामांकडे पाहा. लक्ष्मणाचा रागही प्रचंड आग आहे, हे ओळखून त्यात पतंग बनून मरु नका. ॥ २६६ ॥ब

बैनतेय बलि जिमि चह कागू । जिमि ससु चहै नाग अरि भागू ॥

जिमि चह कुसल अकारन कोही । सब संपदा चहै सिवद्रोही ॥

ज्याप्रमाणे गरुडाचा भाग कावळ्याने घेण्याची इच्छा करावी, सिंहाचा भाग मिळवण्याची इच्छा सशाने करावी. विनाकारण क्रोध करणार्‍याने आपल्या कल्याणाची इच्छा धरावी. शिवांशी विरोध करणार्‍याने सर्व प्रकारच्या संपत्तीची आस धरावी. ॥ १ ॥

लोभी लोलुप कल कीरति चहई । अकलंकता कि कामी लहई ॥

हरि पद बिमुख परम गति चाहा । तस तुम्हार लालचु नरनाहा ॥

लोभी माणसाने कीर्तीची आशा करावी, कामी, माणसाने निष्कलंकतेची आशा धरावी, तर ती त्यांना मिळेल काय ? आणि ज्याप्रमाणे श्रीहरींच्या चरणांशी विन्मुख झालेल्याने परमगतीची कामना धरावी, त्याप्रमाणे हे राजांनो, सीतेसाठी तुम्हांला सुटलेली हाव व्यर्थ आहे. ॥ २ ॥

कोलाहलु सुनि सीय सकानी । सखीं लवाइ गईं जहँ रानी ॥

रामु सुभायँ चले गुरु पाहीं । सिय सनेहु बरनत मन माहीं ॥

हा गोंधळ ऐकून सीता साशंक झाली. तेव्हा सख्या तिला राणी सुनयनेजवळ घेऊन गेल्या. श्रीरामचंद्र मनामध्ये सीतेच्या प्रेमाची वाखाणणी करीत नेहमीच्या चालीने गुरंच्याजवळ गेले. ॥ ३ ॥

रानिन्ह सहित सोचबस सीया । अब धौं बिधिहि काह करनीया ॥

भूप बचन सुनि इत उत तकहीं । लखनु राम डर बोलि न सकहीं ॥

राण्यां आणि सीताही दुष्ट राजांचे दुष्ट बोलणे ऐकून काळजीत पडली की आता विधाता काय करणार आहे, कोण जाणे ! राजांची बोलणी ऐकून लक्ष्मणाने इकडे-तिकडे पाहिले, परंतु श्रीरामांच्या दडपणामुळे तो गप्प राहिला. ॥ ४ ॥

दोहा—अरुन नयन भृकुटी कुटिल चितवत नृपन्ह सकोप ।

मनहुँ मत्त गजगन निरखि सिंघकिसोरहि  चोप ॥ २६७ ॥

त्याचे डोळे लालबुंद झाले,भुवया चढल्या आणि तो क्रोधाने त्या दुष्ट राजांच्याकडे पाहू लागला. मस्तवाल हत्तींची झुंड पाहून सिंहाच्या छाव्याला चेव येतो तसा. ॥ २६७ ॥

खरभरु देखि बिकल पुर नारीं । सब मिलि देहिं महीपन्ह गारीं ॥

तेहिं अवसर सुनि सिवधनु भंगा । आयउ भृगुकुल कमल पतंगा ॥

गडबड गोंधळ झालेला पाहून जनकपुरातील स्त्रिया व्याकूळ झाल्या आणि सर्चजणी मिळून दुष्ट राजांना शिव्या देऊ लागल्या. त्याचवेळी धनुष्य मोडल्याचे ऐकून भृगुकुलरुपी कमलाचे सूर्य परशुराम तेथे आले. ॥ १ ॥

देखि महीप सकल सकुचाने । बाज झपट जनु लवा लुकाने ॥

गौरि सरीर भूति भल भ्राजा । भाल बिसाल त्रिपुंड बिराजा ॥

त्यांना पाहून बाज ससाण्याने झेप घेतल्यावर जसे लावा पक्षी अंग चोरुन घेतात, तसे सर्व राजे भेदरुन गेले. परशुरामांच्या गोर्‍या शरीरावर भस्माचे त्रिपुंड्र शोभून दिसत होते आणि विशाल भालावरचा त्रिपुंड्र तर उठून दिसत होता. ॥ २ ॥

सीस जटा ससिबदनु सुहावा । रिसबस कछुक अरुन होइ आवा ॥

भृकुटी कुटिल नयन रिस राते । सहजहुँ चितवत मनहुँ रिसाते ॥

शिरावर जटा होत्या सुंदर मुख क्रोधाने काहीसे लाल झाले होते. भुवया चढल्या होत्या, डोळे रागाने लाल झाले होते. ते सहजपणे पाहात होते तरी असे वाटत होते की, जणू क्रोधाने पाहात आहेत. ॥ ३ ॥

वृषभ कंध उर बाहु बिसाला । चारु जनेउ माल मृगछाला ॥

कटि मुनिबसन तून दुइ बॉंधें । धनु सर कर कुठारु कल कॉंधें ॥

बैलाप्रमाणे उंच व पुष्ट खांदे, छाती व भुजा विशाल 

होत्या. 

त्यांनी सुंदर यगोपवीत धारण केलेले होते. रुद्राक्ष माळ 

घातलेली आणि मृगजिन घेतलेले होते. कंबरेला वल्कल 

आणि दोन भाते बांधलेले होते. हातात धनुष्यबाण आणि 

खांद्यावर कुर्‍हाड घेतली होती. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment