Saturday, January 23, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 7 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ७

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 7 
Ovya 151 to 180 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ७ 
ओव्या १५१ ते १८०

तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरे ।

शरीरीं एकंदरें । केलें मन ॥ १५१ ॥

१५१) तरी वैराग्याच्या आश्रयानें अंतःकरणांतील विषयवासना बाहेर काढून देऊन त्यांनीं मनाच्या वृत्ति शरीरामध्यें अंतर्मुखानें एकाग्र केल्या;

सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।

तेथ पाठिमोरी दिठी । पारुखोनियां ॥ १५२ ॥

१५२) इडा, पिंगळा व सुषुम्ना ह्या तिघींच्या भेटीच्या संधीत जेथें भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो, तेथें दृष्टि स्थिर करुन मागें फिरवितात,

सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।

चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥ १५३ ॥

१५३) उजव्या ( पिंगळा ) व डाव्या ( इडा ) नाकपुडींतून जातयेत असलेल्या वायूची गति ( रेचक व पूरक ) बंद करुन ( म्हणजे कुंभक करुन ), प्राण ( हृदयस्थ वायू ) व अपान ( गुदस्थ वायु ) यांची सुषुम्नेंत समगति म्हणजे ऐक्य करुन त्यासह चित्तास ते व्योमगामी ( म्हणजे मूर्ध्नि आकाशाकडे जाणारे ) करतात.     

तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे ।

मग एकैक वेगळें । निवडूं नये ॥ १५४ ॥

१५४) तेथें, ज्याप्रमाणें रस्त्यावरुन वाहणारें पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्या वेळेला ( एक गटारांतील पाणी व एक गंगेचें पाणी अशी ) वेगवेगळी निवड करतां येत नाहीं;  

तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना ।

जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥ १५५ ॥

१५५) त्याप्रमाणें अर्जुना, ज्या वेळीं प्राणापानांच्या निरोधानें मूर्ध्नि आकाशांत मनाचा लय केला जातो, त्या वेळीं नानाप्रकारच्या वासनांची निवड सहज थांबते.

जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे ।

जैसें सरोवर आटे । मग प्रतिमा नाहीं ॥ १५६ ॥

१५६) ज्या ठिकाणीं हें संसाररुप चित्र उमटतें तो मनोरुपी पडदा फाटून जातो. ज्याप्रमाणें सरोवर आटलें म्हणजे प्रतिबिंब नाहींसें होतें,  

तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे ।

म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ १५७ ॥

१५७) त्याप्रमाणें मनाचें मनपण मुळींच नाहींसे झाल्यावर, मग मी देह वगैरे अहंकारादि विकार कोठें राहिले ? म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतांनाच ब्रह्म बनतो.  

आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले ।

ते येणें मार्गें आले । म्हणऊनियां ॥ १५८ ॥

१५८) जे देहधारी असतांनाच ब्रह्मभावाला पावले, असें जें आम्हीं मागे जे सांगितलें, ते या मार्गाने आलें म्हणून

आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।

क्रमोनि हे पार । पातले ते ॥ १५९ ॥

१५९) आणि यमनियमांचें डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ( ब्रह्मत्वाला ) पोंचले.

तिहीं आपणपें करुनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप ।

मग साचाचेंचि रुप । होऊनि ठेले ॥ १६० ॥

१६०) त्यांनीं स्वतःला शुद्ध करुन प्रपंचाची योग्य किंमत केली, आणि मग सत्य जे ब्रह्म तद्रूप ते होऊन राहिले.   

ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु ।

तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला ॥ १६१ ॥

१६१) जेव्हां श्रीकृष्णांनीं योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीनें थोडक्यांत सांगितला, तेव्हां अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणानें आश्र्चर्यचकित झाला.    

तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें ।

तें काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ॥ १६२ ॥

१६२) श्रीकृष्णांनीं अर्जुनाच्या मनाची स्थिति जाणली व मग हंसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्यानें तुझें चित्त प्रसन्न झाले कां ?

तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो ।

भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥ १६३ ॥   

१६३) यावर अर्जुन म्हणाला, देवा, आपण मनकवड्यांचे राजे आहांत. आपण माझ्या चित्तांतला अभिप्राय चांगला ओळखलात.    

म्यां जें कांहीं विवरुनि पुसावें । तें आधींचि कळिलें देवें ।

तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करुनि ॥ १६४ ॥

१६४) मीं जें कांहीं विचार करुन तुम्हांस विचारावें, तें देवा, आपण आधींच जाणलें. तरी आपण जें बोलला तेंच स्पष्ट करुन सांगा.  

एर्‍हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा ।

तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥ १६५ ॥

१६५) सहज पाहिलें, तर देवा, ऐका, तुम्हीं जो मार्ग दाखविला, तो पोहून जाण्यापेक्षां पायउताराने जाणें जसें सोपें,         

तैसा सांख्याहूनि प्रांजळा । तरी आम्हांसारिखियां अभोळां ।

एथ आहाति कांहीं परि काळा । तो साहों ये वर ॥ १६६ ॥

१६६) तसा हा ( योगमार्ग ) सांख्याहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना ( समजण्यास ) येथें कांही विलंब लागेल, पण तो सहज करतां येईल. 

म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा ।

विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥ १६७ ॥

१६७) म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा; जरी विस्तार होईल, तरी हरकत नाहीं. ( पण ) तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगावा.  

तंव कृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका ।

तरी काय जाहलें ऐकीजो कां । सुखें बोलों ॥ १६८ ॥

१६८) तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, असें कां ? तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे ? ऐक, आम्ही तो आनंदानें सांगतों.

अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी ।

तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ॥ १६९ ॥

१६९) अर्जुना, तूं ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणें आचरण करतोस, असें जर आहे, तर आम्ही सांगावयास कां कमी करुं ?

आधींच चित्त मायेचें । वरी मिष जाहलें पढियंतयाचे ।

आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥ १७० ॥

१७०) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात ) अगोदरच आईचें अंतःकरण, त्यांत आवडतेपणाचें निमित्त झालें, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ?        

ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि ।

हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥ १७१ ॥

१७१) ती हरीची कृपादृष्टि करुणरसाचा वर्षावच आहे, असें म्हणूं कां, अथवा नव्या स्नेहाची सृष्टि आहे असें म्हणूं ? हें राहूं द्या. कृष्णाच्या त्या दृष्टीचें वर्णन कसें करावें, हें आम्हांस कळत नाहीं.   

जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली ।

म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणे ॥ १७२ ॥

१७२) ही हरीची दृष्टि ( जणूं काय ) अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचें प्रेम पिऊन मस्त झाली होती; म्हणून अर्जुनाच्या मोहांत अडकलेल्या त्या ( हरीच्या ) दृष्टीस बाहेर निघण्याचें कळेना. 

हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल ।

परि तें स्नेह रुपा नयेल । बोलवरी ॥ १७३ ॥

१७३) या हरीच्या दृष्टीसंबंधानें जितकें जास्त बोलावें तितकी कथेची संगति सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल; परंतु हरीच्या अर्जुनाविषयींच्या प्रेमाचें यथार्थ वर्णन शब्दांनीं करतां येणार नाहीं तें नाहींच. 

म्हणोनि विसुरा काय येणें । तो ईश्र्वरु आकळावा कवणें ।

जो आपुलें मान नेणें । आपणचि ॥ १७४ ॥

यांत आश्र्चर्य तें काय ? कारण, जो आपलें मोजमाप आपणच जाणत नाहीं, तो ईश्र्वर कोणी आकलन करावा ?

तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाची मोहितु ।

जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥ १७५ ॥

१७५) तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरुन मला सहज असें वाटतें कीं, देव अर्जुनाच्या प्रेमरुपी मोहांत गुंतले आहेत, कारण त्या अर्जुनाला बलात्कारानें ‘ अरे बाबा, ऐक,’ म्हणून म्हणत होते.  

अर्जुना जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे ।

तैसें तैसें विनोदें । निरुपिजेल ॥ १७६ ॥

१७६) अर्जुना, ज्या प्रकारानें तुझ्या चित्ताला पटेल त्या त्या सोप्या रीतीनें कौतुकानें सांगण्यांत येईल.

तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु ।

अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥ १७७ ॥

१७७) तो योग हें कशाला नांव आहे ? त्याचा उपयोग काय ? अथवा, त्या योगाचा अधिकार कोणाला आहे ? 

ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं ।

तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥ १७८ ॥

१७८) याप्रमाणें जें जें कांहीं या बाबतींत ( शास्त्रांत ) सांगितलेले असेल, ते सर्वच मी तुला आतां सांगेन, पाहा.

तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणोनि श्रीहरी ।

बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥ १७९ ॥

१७९) तूं मन लावून ऐक. असें म्हणून श्रीहरि जें बोललें ती कथा पुढें आहे, ती सांगण्यांत येईल.

श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु ।

तो व्यक्त करुं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥ १८० ॥

१८०) अर्जुनाशीं असलेल्या सख्यात बिघाड होऊं न देतां श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांगयोग सांगतील. तो प्रसंग निवृत्तिनाथांचे शिष्य ( ज्ञानेश्र्वर महाराज ) म्हणतात, मी स्पष्ट करुन सांगेन.  

इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योगगर्भो नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ( श्र्लोक २९, ओव्या १८० )

॥ ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥ 

   


Custom Search

No comments:

Post a Comment