Monday, January 4, 2021

Shri RamCharitManas Part 71 श्रीरामचरितमानस भाग ७१

 

Shri RamCharitManas Part 71 
Doha 323 to 326 
श्रीरामचरितमानस भाग ७१ 
दोहा ३२३ ते ३२६ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

छं०—आचारु करि गुर गौरि गनपति मुदित बिप्र पुजावहीं ।

सुर प्रगटि पूजा लेहिं देहिं असीस अति सुखु पावहीं ॥

मधुपर्क मंगल द्रब्य जो जेहि समय मुनि मन महुँ चहैं ।

भरे कनक कोपर कलस सो तब लिएहिं परिचारक रहैं ॥ १ ॥

कुलाचार झाल्यावर गुरुजी प्रसन्न होऊन गौरी, गणेश आणि ब्राह्मणांची पूजा करविली.देव प्रकट होऊन पूजा ग्रहण करु लागले, आशीर्वाद देऊ लागले आणि सुखावून गेले. मधुपर्क इत्यादी कोणत्याही मांगलिक पदार्थाची मुनींना गरज भासताच सेवकगण त्याचक्षणी सोन्याच्या परातीत आणि कलशांमध्ये भरुन ते पदार्थ घेऊन तयार असत.

कुल रीति प्रीति समेत रबि कहि देत सबु सादर कियो ।

एहि भॉंति देव पुजाइ सीतहि सुभग सिंघासनु दियो ॥

सिय राम अवलोकनि परसपर प्रेमु काहुँ न लखि परै ।

मन बुद्धि बर बानी अगोचर प्रगट कबि कैसें करै ॥ २ ॥

प्रत्यक्ष सूर्यदेव मोठ्या प्रेमाने आपल्या कुळाची रीत सांगू लागले आणि त्या रीती आदराने पूर्ण केल्या जात होत्या. अशा प्रकारे देवांची पूजा झाल्यावर मुनींनी सीतेला सुंदर सिंहासनावर बसविले. सीता व श्रीराम परस्परांकडे बघत होते, पण त्यांचे परस्पर प्रेम कुणाला दिसून येत नव्हते. जी गोष्ट श्रेष्ठ मन, बुद्धी आणि वाणी यांच्या पलीकडची आहे, ती गोष्ट कवी कसा बरे वर्णन करु शकेल ? ॥ २ ॥

दोहा—होम समय तनु धरि अनलु अति सुख आहुति लेहिं ।

बिप्र बेष धरि बेद सब कहि बिबाह बिधि देहिं ॥ ३२३ ॥

हवनाचे प्रसंगी अग्निदेव शरीर धारण करुन मोठ्या आनंदाने आहुती ग्रहण करु लागले आणि सर्व वेद ब्राह्मणाचा वेश धारण करुन विवाहाचे विधी सांगू लागले. ॥ ३२३ ॥

जनक पाटमहिषी जग जानी । सीय मातु किमि जाइ बखानी ॥

सुजसु सुकृत सुख सुंदरताई । सब समेटि बिधि रची बनाई ॥

जनकांची जगत्विख्यात पट्टराणी आणि सीतेची माता सुनयना हिचे वर्णन कोण कसे करु शकेल ? कारण सुयश, सुकृत, सुख आणि सुंदरता यांना एकत्र करुन विधात्याने तिला बनविले होते ना ! ॥ १ ॥

समउ जानि मुनिबरन्ह बोलाईं । सुनत सुआसिनि सादर ल्याईं ॥

जनक बाम दिसि सोह सुनयना । हिमगिरि संग बनी जनु मयना ॥

वेळ होताच मुनींनी तिला बोलाविले. मग सुवासिनी स्त्रिया तिला घेऊन आल्या. पट्टराणी सुनयना जनकांच्या डाव्या बाजूस अशी शोभून दिसत होती की, जणू हिमालयाबरोबर त्याची पट्टराणी मैना शोभावी. ॥ २ ॥

कनक कलस मनि कोपर रुरे । सुचि सुगंध मंगल जल पूरे ॥

निज कर मुदित रायँ अरु रानी । धरे राम के आगें आनी ॥

पवित्र, सुगंधित आणि मंगल जलाने भरलेले सोन्याचे कलश आणि रत्नांनी भरलेल्या सुंदर पराती आपल्या हातांनी आणून राजा-राणीने श्रीरामचंद्राच्या समोर ठेवल्या ॥ ३ ॥

 पढ़हिं बेद मुनि मंगल बानी । गगन सुमन झरिअवसरु जानी ॥

बरु बोलोकि दंपति अनुरागे । पाय पुनीत पखारन लागे ॥

मुनी मंगल वाणीने वेद पठण करीत होते, योग्य वेळ पाहून आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. नवरदेवाला पाहून राजा व राणी प्रेमात मग्न झाले आणि त्यांचे पवित्र चरण धुऊ लागले. ॥ ४ ॥

छं०—लागे पखारन पाय पंकज प्रेम तन पुलकावली ।

नभ नगर गान निसान जय धुनि उमगि जनु चहुँ दिसि चली ॥

जे पद सरोज मनोज अरि उर सर सदैव बिराजहीं ।

जे सकृत सुमिरत बिमलता मन सकल कलि मल भाजहीं ॥ १ ॥

ते श्रीरामांच्या चरणकमलांचे प्रक्षालन करु लागले, तेव्हा प्रेमामुळे त्यांची शरीरे पुलकित झाली होती. आकाश व नगर येथे होणारे गायन, नगारे आणि जयजयकार यांचा ध्वनी जणू चारी दिशांना उसळला होता. जे चरणकमल भगवान शिवांच्या हृदयात नित्य विराजतात, ज्यांचे एकदा स्मरण करताच मन शुद्ध होते आणि कलियुगातील सर्व पापे पळून जातात. ॥ १ ॥

जे परसि मुनिबनिता लही गति रही जो पातकमई ।

मकरंदु जिन्ह को संभु सिर सुचिता अवधि सुर बरनई ॥

करि मधुप मन मुनि जोगिजन जे सेइ अभिमत गति लहैं ।

ते पद पखारत भाग्यभाजनु जनकु जय जय सब कहैं ॥ २ ॥

ज्यांचा स्पर्श होताच गौतम मुनींची पत्नी पापमयी अहल्या हिला परमगती मिळाली. ज्या चरणकमलांचा गंगा रुप मकरंदरस शिवांच्या मस्तकावर विराजमान आहे, त्या गंगेला देव हे पवित्रतेची परिसीमा मानतात; मुनी आणि योगीजन आपल्या मन भ्रमराला ज्या चरण कमलांचे सेवन करवून मनोवांछित गती प्राप्त करतात, त्याच चरणांचे महाभाग्यवान जनक प्रक्षालन करीत आहेत, हे पाहून सर्वजण जयजयकार करु लागले. ॥ २ ॥

बर कुअँरि करतल जोरि साखोचारु दोउ कुलगुर करैं ।

भयो पानिगहनु बिलोकि बिधि सुर मनुज मुनि आनँद भरैं ॥

सुखमूल दूलहु देखि दंपति पुलक तन हुलस्यो हियो ।

करि लोक बेद बिधानु कन्यादानु नृपभूषन कियो ॥ ३ ॥

दोन्ही कुळांचे गुरु, वर व वधू यांचे हात एकमेकांच्या हातात देऊन वेदघोष करु लागले. पाणिग्रहण झाल्याचे पाहून ब्रह्मदेवादी देव आणि मुनी आनंदित होऊन गेले. सुखाचे मूळ असलेल्या नवरदेवाला पाहून राजा-राणी रोमांचित होऊन गेले आणि हृदय आनंदामुळे भावाकुल झाले. राजांचेही भूषण असलेल्या महाराज जनकांनी लोक व वेद यांच्या पद्धतीने कन्यादान केले. ॥ ३ ॥

हिमवंत जिमि गिरिजा महेसहि हरिहि श्री सागर दई ।

तिमि जनक रामहि सिय समरपी बिस्व कल कीरति नई ॥

क्यों करै बिनय बिदेहु कियो बिदेहु मूरति सावँरीं ।

करि होमु बिधिवत गॉंठि जोरी होन लागीं भावँरीं ॥ ४ ॥

ज्याप्रमाणे हिमवानाने शिवांना पार्वती आणि सागराने भगवान विष्णूंना लक्ष्मी दिली, त्याप्रमाणे जनक राजांनी श्रीरामचंद्रांना सीता अर्पण केली. त्यामुळे विश्वामध्ये सुंदर नवी कीर्ती पसरली. विदेह ( जनक ) विनंती कशी करणार ? त्या सावळ्या मूर्तींनी त्यांना खराखुरा ( शुद्ध हरपलेला ) विदेह बनवून टाकले होते. विधिपूर्वक हवन करुन वधू-वराची विवाह-गांठ बांधली आणि सप्तपदी सुरु झाली. ॥ ४ ॥

दोहा—जय धुनि बंदी बेद धुनि मंगल गान निसान ।

सुनि हरषहिं बरषहिं बिबुध सुरतरु सुमन सुजान ॥ ३२४ ॥

जय-ध्वनी, बंदिध्वनी, वेदध्वनी, मंगल गान आणि नगार्‍यांचा ध्वनी ऐकून ज्ञानी देवगणही हरखून गेले आणि कल्पवृक्षाची फुले उधळू लागले. ॥ ३२४ ॥

कुअँरु कअँरि कल भावँरि देहीं । नयन लाभु सब सादर लेहीं ॥

जाइ न बरनि मनोहर जोरी । जो उपमा कछु कहौं सो थोरी ॥

वर व कन्या अग्नीभोवती सुंदर फेरे घालू लागले. सर्व लोक त्यांना आदराने पाहून नेत्रांचे पारणे फेडून घेत होते. त्या मनोहर जोडप्याचे वर्णन करता येणे कठीण. जी उपमा द्यावी ती तोकडीच पडे. ॥ १ ॥

राम सीय सुंदर प्रतिछाहीं । जगमगात मनि खंभन माहीं ॥

मनहुँ मदन रति धरि बहु रुपा । देखत राम बिआहु अनूपा ॥

श्रीराम व सीता यांची सुंदर प्रतिबिंबे मणिजडित स्तंभांमधून झळकत होती. जणू कामदेव आणि रती अनेक रुपे घेऊन श्रीरामांचा अनुपम विवाह पाहात होती. ॥ २ ॥

दरस लालसा सकुच न थोरी । प्रगटत दुरत बहोरि बहोरि ॥

भए मगन सब देखनिहारे । जनक समान अपान बिसारे ॥

कामदेव व रती या दोघांना दर्शनाची लालसा तर होती व संकोचही फार वाटत होता. म्हणून ती जणू वारंवार प्रकट होऊन लपत होती. पाहणारे सर्वजण आनंदमग्न झाले आणि राजा जनकाप्रमाणे आपले देहभान हरवून बसले. ॥ ३ ॥

प्रमुदित मुनिन्ह भावँरीं फेरीं । नेगसहित सब रीति निबेरीं ॥

राम सीय सिर सेंदुर देहीं । सोभा कहि न जाति बिधि केहीं ॥

मुनींनी आनंदाने फेरे पूर्ण करविले आणि आहेर, वाणे इत्यादी रीती पूर्ण करविल्या. श्रीरामचंद्र सीतेच्या भांगामध्ये सिंदूर घालू लागले, ती शोभा तर अवर्णनीय होती. ॥ ४ ॥

अरुन पराग जलजु भरि नीकें । ससिहि भूष अहि लोभ अमी कें ॥

बहुरि बसिष्ठ दीन्हि अनुसासन । बरु दुलहिनि बैठे एक आसन ॥

जणू ( श्रीरामांचे ) कर-कमल, सिंदूराच्या लाल परागाने भरुन ( श्रीरामांची सावळी भुजारुपी ) साप ( सीतेच्या ) मुख-चंद्रातील अमृत मिळविण्याच्या लोभाने त्या चंद्राला विभूषित करीत होता. जेव्हा वसिष्ठांनी आज्ञा दिली, तेव्हा वर-वधू एका आसनावर बसले. ॥ ५ ॥

छं०—बैठे बरासन रामु जानकि मुदित मन दसरथु भए ।

तनु पुलक पुनि पुनि देखि अपनें सुकृत सुरतरु फल नए ॥

भरि भुवन रहा उछाहु राम बिबाहु भा सबहीं कहा ।

केहि भॉंति बरनि सिरात रसना एक यहु मंगलु महा ॥ १ ॥

श्रीराम व सीता श्रेष्ठ आसनावर बसले, ते पाहून दशरथांचे मन आनंदाने दाटून गेले. आपल्या सुकृतरुपी कल्पवृक्षाला नवे फळ आलेले पाहून त्यांचे शरीर वारंवार रोमांचित होत होते. चौदा भुवनांमध्ये उत्साह भरला होता, सर्वांनी म्हटले की, श्रीरामचंद्रांचा विवाह झाला. जीभ एकच आहे आणि सोहळा महन्मंगल आहे. अशा सोहळ्याचे वर्णन एका जीभेने कसे पूर्ण होऊ शकणार ? ॥ १ ॥

तब जनक पाइ बसिष्ठ आयसु ब्याह साज सँवारि कै ।

मांडवी श्रुतकीरति उरमिला कुअँरि लईं हँकारि कै ॥

कुसकेतु कन्या प्रथम जो गुन सील सुख सोभामई ।

सब रीति प्रीति समेत करि सो ब्याहि नृप भरतहि दई ॥ २ ॥

मग वसिष्ठांची आज्ञा झाल्यावर जनकांनी विवाहाचे सामान सज्ज करुन मांडवी, श्रतकीर्ती आणि उर्मिला या तिन्ही राजकुमारींना बोलावून घेतले. कुशध्वजाची मोठी कन्या मांडवी ही गुण, शील, सुख व शोभेची मूर्तीच होती. राजा जनकांनी मोठ्या प्रेमाने सर्व रीति-रिवाज पूर्ण करुन तिचा विवाह भरताशी करविला. ॥ २ ॥

जानकी लघु भगिनी सकल सुंदरि सिरोमनि जानि कै ।

सो तनय दीन्ही ब्याहि लखनहि सकल बिधि सनमानि कै ॥

जेहि नामु श्रुतकीरति सुलोचनि सुमुखि सब गुन आगरी ।

सो दई रिपुसूदनहि भूपति रुप सील उजागरी ॥ ३ ॥

जानकीची छोटी बहीण ऊर्मिला ही सर्व सुंदरीत श्रेष्ठ असल्याचे पाहून तिचा सर्व प्रकारे सन्मान करुन लक्ष्मणाशी तिचा विवाह करुन दिला. जिचे नाव श्रुतकीर्ती होते, जी सुंदरनयनी, सुंदरमुखी, सर्व गुणांची खाण आणि रुपाने व शीलाने तळपत होती, तिचा विवाह राजांनी शत्रुघ्नाशी करविला. ॥ ३ ॥

अनुरुप बर दुलहिनि परस्पर लखि सकुच हियँ हरषहीं ।

सब मुदित सुंदरता सराहहिं सुमन सुर गन बरषहीं ॥

सुंदरीं सुंदर बरन्ह सह सब एक मंडप राजहीं ।

जनु जीव उर चारिउ अवस्था बिभुन सहित बिराजहीं ॥ ४ ॥

नवरे व नवर्‍या आपल्या अनुरुप जोडीला पाहून लाजत लाजत मनातून हरखत होत्या. सर्व लोक प्रसन्न होऊन त्यांच्या लावण्याची वाखाणणी करीत होते आणि देवगण फुलांचा वर्षाव करीत होते. सर्व सुंदर वधू, सुंदर वरांच्या सोबत एकाच मंडपात अशा शोभून दिसत होत्या की, जणू जीवाच्या जाग्रती, स्वप्न सुषुप्ती आणि तुरिय या अवस्था आपल्या विश्व, तैजस, प्राज्ञ व ब्रह्म या स्वामींसह विराजमान झालेल्या आहेत. ॥ ४ ॥

दोहा—मुदित अवधपति सकल सुत बधुन्ह समेत निहारि ।

जनु पाए महिपाल मनि क्रियन्ह सहित फल चारि ॥ ३२५ ॥

सर्व पुत्रांना वधूंच्यासह पाहून राजाधिराज अयोध्यापती दशरथ असे आनंदून गेले होते की, यज्ञक्रिया, श्रद्धाक्रिया, योगक्रिया आणि ज्ञानक्रिया यांच्यासह अर्थ, धर्म, काम व मोक्ष ही चारी फले त्यांना लाभली आहेत. ॥ ३२५ ॥

जसि रघुबीर ब्याह बिधि बरनी । सकल कुअँर ब्याहे तेहिं करनी ॥

कहि न जाइ कछु दाइज भूरी । रहा कनक मनि मंडप पूरी ॥

श्रीरामचंद्रांच्या विवाहाच्या विधीचे जसे वर्णन केलेले आहे, त्याच रीतीने सर्व राजकुमारांचे विवाह संपन्न झाले. आंदणाच्या वस्तू इतक्या भरपूर होत्या की, सांगता येत नाही. सर्व मंडप सोन्यारत्नांनी भरला होता. ॥ १ ॥

कंबल बसन बिचित्र पटोरे । भॉंति भॉंति बहु मोल न थोरे ॥

गज रथ तुरग दास अरु दासी । धेनु अलंकृत कामदुहा सी ॥

पुष्कळशी लोकरी व सुती वस्त्रे आणि तर्‍हेतर्‍हेचे सुंदर रेशमी कपडे हे सर्व बहुमूल्य होते. तसेच हत्ती, रथ, घोडे, दास-दासी आणि अलंकारांनी सजविलेल्या कामधेनूसारख्या गाई, ॥ २ ॥

बस्तु अनेक करिअ किमि लेखा । कहि न जाइ जानहिं जिन्ह देखा ॥

लोकपाल अवलोकि सिहाने । लीन्ह अवधपति सबु सुखु माने ॥       

इत्यादी अनेक वस्तू होत्या. त्यांची गणना कशी करणार ? त्यांचे वर्णन करणे शक्य नाही. ज्यांनी ते पाहिले त्यांनाच ते कळणार. त्या वस्तू पाहून लोकपालांनाही हेवा वाटू लागला. अयोध्यापती दशरथांनी प्रसन्न मनाने ते सर्व काही ग्रहण केले. ॥ ३ ॥

दीन्ह जाचकन्हि जो जेहि भावा । उबरा सो जनवासेहिं आवा ॥

तब कर जोरि जनकु मृदु बानी । बोले सब बरात सनमानी ॥

त्यांनी आंदण म्हणून आणलेले सामान याचकांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे देऊन टाकले. जे उरले ते जानवश्यात नेले. तेव्हा जनक हात जोडून सर्व वर्‍हाडाचा सन्मान करुन कोमल वाणीने म्हणाले, ॥ ४ ॥

छं०—सनमानि सकल बरात आदर दान बिनय बड़ाइ कै ।

प्रमुदित महा मुनि बृंद बंदे पूजि प्रेम लड़ाइ कै ॥

सिरु नाइ देव मनाइ सब सन कहत कर संपुट किएँ ।

सुर साधु चाहत भाउ सिंधु कि जल अंजलि दिएँ ॥ १ ॥

आदर, दान, विनय आणि मोठेपणा देत सर्व वर्‍हाडाचा सन्मान करुन जनक राजांनी आनंदाने, प्रेमपूर्वक व आवडीने मुनींच्या समूहाची पूजा केली आणि वंदन केले. डोके नमवून व देवांची आळवणी करुन राजा हात जोडून सर्वांना म्हणू लागले की, देव व साधू हे केवळ प्रेम-भाव इच्चितात. एक ओंजळभर पाणी दिल्याने समुद्र संतुष्ट होईल काय ? ॥ १ ॥

कर जोरि जनकु बहोरि बंधु समेत कोसलराय सों ।

बोले मनोहर बयन सानि सनेह सील सुभाय सों ॥

संबंध राजन रावरें हम बड़े अब सब बिधि भए ।

एहि राज साज समेत सेवक जानिबे बिनु गथ लए ॥ २ ॥

नंतर जनक आपल्या भावासह कोसलाधीश दशरथांना शील आणि सुंदर प्रेमाने भरलेल्या वाणीने मनोहर शब्दांत म्हणाले, ’ हे राजन ! तुमच्याशी संबंध जुळल्यामुळे आम्ही सर्व प्रकारे मोठे झालो. तुम्ही आम्हा दोघांना या राज्यासह कसली ही अपेक्षा न बाळगणारे आपले सेवक समजा. ॥ २ ॥

 ए दारिका परिचारिका करि पालिबीं करुना नई ।

अपराधु छमिबो बोलि पठए बहुत हौं ढीट्यो कई ॥

पुनि भानुकुलभूषन सकल सनमान निधि समधी किए ।

कहि जाति नहिं बिनती परस्पर प्रेम परिपूरन हिए ॥ ३ ॥

आमच्या या मुलींना सेविका समजून, नित्य नवी दया देऊन पालन करा. मी तुम्हांला येथे बोलावून घेतले, या अवमानाबद्दल क्षमा करा. ‘ मग सूर्यकुलाचे भूषण असलेल्या राजा दशरथांनी व्याही जनकांना इतका सन्मान दिला की, ते सन्मानाचे भांडार बनले. त्यांची परस्पर नम्रता सांगण्यापलीकडची होती. दोघांची मने प्रेमाने भरलेली होती. ॥ ३ ॥

बृंदारका गन सुमन बरिसहिं राउ जनवासेहि चले ।

दुंदुभी जय धुनि बेद धुनि नभ नगर कौतूहल भले ॥

तब सखीं मंगल गान करत मुनीस आयसु पाइ कै ।

दूलह दुलहिनिन्ह सहित सुंदरि चलीं कोहबर ल्याइ कै ॥ ४ ॥

देवगण फुलांचा वर्षाव करीत होते. राजा दशरथ जानवश्याकडे निघाले. नगार्‍यांचा ध्वनी, जयध्वनी व वेदध्वनी घुमत होते. आकाशात व नगरात आनंद पसरला होता. तेव्हा मुनीश्र्वरांची आज्ञा झाल्यावर सुंदरी सख्या मंगलगान करीत वधूंबरोबर वरांना घेऊन देवकाकडे निघाल्या. ॥ ४ ॥

दोहा—पुनि पुनि रामहि चितव सिय सकुचति मनु सकुचै न ।

हरत मनोहर मीन छबि प्रेम पिआसे नैन ॥ ३२६ ॥

सीता श्रीरामांना वारंवार पाहताना संकोचत होती, परंतु तिचे मन मात्र संकोचत नव्हते. प्रेमाकुल झालेले तिचे नेत्र सुंदर मासोळीची सुंदरता हरण करीत होते. ॥ ३२६ ॥

मासपारायण, अकरावा विश्राम

स्याम सरीरु सुभायँ सुहावन । सोभा कोटि मनोज लजावन ॥

जावक जुत पद कमल सुहाए । मुनि मन मधुप रहत जिन्ह छाए ॥          

श्रीरामांचे सावळे रुप स्वभावतःच सुंदर होते. त्याची शोभा कोट्यावधी कामदेवांना लाजवीत होती. मेंदी लावलेले त्यांचे चरणकमल फार शोभून दिसत होते. मुनींचे मन-भ्रमर त्यांच्यावर गुंजी घालत असतात. ॥ १ ॥

पीत पुनीत मनोहर धोती । हरति बाल रबि दामिनि जोती ॥

कल किंकिनि कटि सूत्र मनोहर । बाहु बिसाल बिभूषन सुंदर ॥

पवित्र व मनोहर असे पीतांबर प्रातःकालीन सूर्याची आणि वीजेची चमक हरण करीत होते. कटीवर सुंदर घुंगरु लावलेले कटिसूत्र होते. विशाल भुजांमध्ये सुंदर आभूषणे शोभत होती. ॥ २ ॥

पीत जनेउ महाछबि देई । कर मुद्रिका चोरि चितु लेई ॥

सोहत ब्याह साज सब साजे । उर आयत उरभूषन राजे ॥

पिवळे यज्ञोपवीत शोभून दिसत होते. हातामधील अंगठ्या चित्त चोरुन घेत होत्या. विवाहाची सर्व वेषभूषा शोभून दिसत होती. विशाल वक्षःस्थलावर सुंदर आभूषणे शोभत होती. ॥ ३ ॥

पिअर उपरना काखासोती । दुहुँ आँचरन्हि लगे मनि मोती ॥

नयन कमल कल कुंडल काना । बदनु सकल सौंदर्ज निधाना ॥

पिवळे उपरणे शोभून दिसत होते. त्याच्या दोन्ही टोकांना मणी व मोती लावलेले होते. कमळासरखे सुंदर नेत्र, कानांमध्ये सुंदर कुंडले आणि मुख हे तर लावण्याची खाण होते. ॥ ४ ॥

सुंदर भृकुटि मनोहर नासा । भाल तिलकु रुचिरता निवासा ॥

सोहत मौरु मनोहर माथे । मंगलमय मुकुता मनि गाथे ॥

सुंदर भुवया आणि मनोहर नाक आहे. ललाटावरील 

तिलक तर सौंदर्याचे माहेरघर होता. मंगलमय मोती 

आणि रत्ने गुंफलेला व मुंडावळ्या लावलेला मुकुट 

शिरावर शोभत होता. ॥ ५ ॥





Custom Search

No comments:

Post a Comment