Saturday, February 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ९

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 9 
Ovya 241 to 270 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ९ 
ओव्या २४१ ते २७०

तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें ।

तेणें तियेचेचि पीयूषें । प्राणु जिये ॥ २४१ ॥

२४१) त्या वेळीं तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडानें जें गरळ ओकतें, त्या गरळातील अमृताच्या योगानें प्राणवायू जगतो.

तो आगीआंतूनि निघे । परि सबाह्य निघवूंचि लागे ।

ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥ २४२ ॥

२४२) तो गरळरुपी अमृताचा अग्नि तिच्या तोंडांतून निघतो खरा, परंतु तो अग्नि ज्या वेळेस आंत व बाहेर शांतच करुं लागतो, त्या वेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ति पुन्हा येऊं लागते. 

मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें ।

जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥ २४३ ॥ 

२४३) नाड्यांचें वाहणें बंद पडतें व ( स्थानभेदानें असणारे ) वायूचे नऊ प्रकार नाहींसे होतात म्हणून शरीराचे धर्म राहात नाहींत.

इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।

साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥ २४४ ॥

२४४) इडा व पिंगला ह्या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गांठी सुटून चक्रांचे पदर फुटतात.  

मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु ।

तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे ॥ २४५ ॥

२४५) अनुमानिक कल्पनेनें ठरविलेले डाव्या व उजव्या नाकपुडींतून वाहणारे चंद्रसूर्यरुपी वायू नाकापुढें कापूस धरुन पाहिलें तरी दिसत नाहींत.

बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।

तोही शक्तीसवे संचरे । मध्यमेमाजी ॥ २४६ ॥

२४६) बुद्धीचा आकार ( चैतन्यांत ) नाहींसा होतो. नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ति, ती कुंडलिनीबरोबर सुषुम्ना नाडींत शिरते.   

तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें ।

कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ॥ २४७ ॥

२४७) तेव्हां वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचें तळें कलतें होऊन तें चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखांत पडतें.

तेणें नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे ।

जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥ २४८ ॥

२४८) त्या नळीनें ( कुंडलिनीनें ) रस भरतो, तो सर्वांगामध्यें संचार करतो व प्राणवायु जेथल्या तेथें मुरतो. 

तातलिये मुसे । मेण निघोनि जाय जैसें ।

कोंदली राहे रसें । वोतलेनि ॥ २४९ ॥

२४९) तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेंच भरुन राहाते,

तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे ।

वरी त्वचेचेनि पदरें । पांगुरली असे ॥ २५० ॥

२५०) त्याप्रमाणें शरीराच्या आकारानें जणूं काय त्वचेचा पदर पांघरलेलें मूर्तिमंत तेजच प्रकट झालेलें असतें. 

जैसी आभाळाची बुंथी । करुन राहे गभस्ती ।

मग फिटलिया दीप्ति । धरुं नये ॥ २५१ ॥

२५१) सूर्यावर ढगांचे आवरण आलें असतां त्याचें तेज झांकलेले असतें. पण तें ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचें तेज जसें आवरुन धरता येत नाही; 

तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा ।

तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥ २५२ ॥

२५२) त्याप्रमाणें वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो.

मग काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ ।

अवयवकांतीची भांव । तैसी दिसे ॥ २५३ ॥

२५३) मग जणूं काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरुप बीजास निघालेले अंकुरच कीं काय, अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. 

नातरी संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग ।

कीं अंतरर्ज्योतीचें लिंग । निर्वाळिलें ॥ २५४ ॥

२५४) अथवा संध्याकाळच्या आकाशरंगाचे रंग काढून बनविलेली मूर्ति किंवा प्रत्यक्ष आत्म्याचें शुद्ध लिंगच.

कुंकुमाचें भरींव सिद्धरसाचें वोतींव ।

मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥ २५५ ॥

२५५) केशरानें पूर्ण भरलेलें किंवा अमृताचें ओतलेलें, अथवा तें पाहतांना मला असें वाटतें कीं, ती मूर्तिमंत शांतीच आहे.  

ते आनंदचित्रींचे लेप । नातरी महासुखाचें रुप ।

कीं संतोषतरुचें रोप । थांबलें जैसें ॥ २५६ ॥

२५६) तें ( योग्याचें शरीर ) आनंदरुपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच, किंवा संतोषरुप झाडाचें असें कांहीं बळावलेलें रोप आहे.  

तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा ।

नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥ २५७ ॥

२५७) तो ( योगी ) सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजुकपणाचा भरास आलेला मळाच;

हो कां जे शारदियेचि बोले । चंद्रबिंब पाल्हेलें ।

कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥ २५८ ॥

२५८) किंवा शरद्ऋतुच्या ओलाव्यानें टवटवीत झालेलें चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेलें मूर्तिमंत तेजच कीं काय !

तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।

मग देहाकृती बिहे । कृतांतु गा ॥ २५९ ॥

२५९) ज्या वेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्या वेळी शरीर असें होतें, मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भितो. 

वृद्धाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे ।

लोपली उघडे । बाळदशा ॥ २६० ॥

२६०) म्हातारपण मागें फिरतें, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था ( परत ) येते.

वयसा तरी येतुलेवरी । एर्‍हवीं बळाचा बळार्थु करी ।

धैर्याची थोरी । निरुपम ॥ २६१ ॥

२६१) वय तर त्यांचे एवढेसें, तथापि जेवढीं कृत्यें बलवान पुरुष करुं शकतो, तेवढीं हा करतो, आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही. 

कनकद्रुमाचां पालवीं । रत्नकळिका नित्य नवी ।

नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥ २६२ ॥

२६२) सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य नवी कळी यावी, तशी चांगलीं नवीं नखें येतात.

दांतही आन होती । परि अपाडें सानेजती ।

जैसीं दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥ २६३ ॥

२६३) दांतहि नवे येतात. पण ते फार लहान असतात; व ते असे दिसतात कीं जणूं काय दुतर्फा हिर्‍यांची रांगच बसली आहे.

माणिकुलियांचिया कनिया । सावियाची अणुमानिया ।  

तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचिया ॥ २६४ ॥

२६४) ज्याप्रमाणे माणिकाचें अणू एवढाले कण असावेत, त्याप्रमाणें सहजच सर्व अंगावर रोमांचांचीं टोकें वर येतात. 

करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें ।

पाखाळीं होती डोळे । काय सांगों ॥ २६५ ॥

२६५) तळहात व तळपाय हे तांबड्या कमळांप्रमाणें असतात; व डोळे किती स्वच्छ होतात हें काय सांगूं  !

निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें ।

मग शिवणी जैशी उलटे । शुक्तिपल्लवांची ॥ २६६ ॥

२६६) परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोत्यें शिंपीच्या गर्भांत 

तैशी पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे ।

आधिलिचि परी होये । गगना कळिती ॥ २६७ ॥

२६७) त्याप्रमाणें दृष्टि पापण्यांच्या पात्यांत न मावतां त्या पात्यांना व्यापून बाहेर निघण्यास पाहते. दृष्टि पूर्वींचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. 

आइकें देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें ।

जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥ २६८ ॥

२६८) अर्जुना, ऐक. त्यांचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो; परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो. कारण कीं त्यांच्यांत पृथ्वीचें व पाण्याचें अंश नसतात. 

मग समुद्रापैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके ।

मनोगत वोळखें । मुंगियेचें ॥ २६९ ॥

२६९) मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहातो, स्वर्गांतील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो;

पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे ।

येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥ २७० ॥

२७०) वायुरुप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी

 पाण्यांत पाऊल शिरत नाहीं. अशा अनेक सिद्धि त्यास

 प्रसंगानुसार त्यास प्राप्त होतात.



Custom Search

No comments:

Post a Comment