Saturday, March 13, 2021

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 9 अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ९

 

श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड 
AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 9 
Doha 47 to 52 
अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ९ 
दोहा ४७ ते ५२

दोहा—काह न पावकु जारि सक का न समुद्र समाइ ।

का न करै अबला प्रबल केहि जग कालु न खाइ ॥ ४७ ॥

आग काय जाळू शकत नाही ? समुद्रात काय मावत नाही ? अबला म्हणवणारी प्रबळ स्त्रीजात काय करु शकत नाही ? आणि जगात काळ हा कुणाला खाऊन टाकीत नाही ? ॥ ४७ ॥

का सुनाइ बिधि काह सुनावा । का देखाइ चह काह देखावा ॥

एक कहहिं भल भूप न कीन्हा । बरु बिचारि नहिं कुमतिहि दीन्हा ॥

विधात्याने काय ऐकवले होते आणि आता काय ऐकवीत आहे ? काय दाखविले होते आणि आता दाखवू पाहात आहे ? ‘ एक म्हणत होता की, राजांनी काही चांगले केले नाही, दुर्बुद्धीच्या कैकेयी ला विचार करुन वर दिला नाही. ॥ १ ॥

जो हठि भयउ सकल दुख भाजनु । अबला बिबस ग्यानु गुनु गा जनु ॥

एक धरम परमिति पहिचाने । नृपहिं दोसु नहिं देहिं सयाने ॥

ते हट्टाने कैकेयीचे वचन पूर्ण करण्यासाठी तटून बसले आणि स्वतःच सर्व दुःखांना पात्र ठरले. स्त्रीच्या अधीन झाल्यामुळे जणू त्यांचे ज्ञान व गुण नष्ट झाले. जे धर्माची मर्यादा जाणतात आणि बुद्धिमान आहेत, ते राजांना दोष देत नव्हते. ॥ २ ॥

सिबि दधीचि हरिचंद कहानी । एक एक सन कहहिं बखानी ॥

एक भरत कर संमत कहहीं । एक उदास भायँ सुनि रहहीं ॥

ते शिबी, दधीची आणि हरिश्र्चंद्र यांची कथा वर्णन करुन सांगत होते. कोणी म्हणत होता की, या प्रकारात भरताचीही संमती आहे. कोणी म्हणत होता की, या प्रकारात भरताची संमती आहे. कोणी ऐकल्यावर उदासीन भावनेने गप्प राहात होते. ॥ ३ ॥

कान मूदि कर रद गहि जीहा । एक कहहिं यह बात अलीहा ॥

सुकृत जाहिं अस कहत तुम्हारे । रामु भरत कहुँ प्रानपिआरे ॥

कोणी आपल्या हातांनी कान बंद करुन आणि जीभ चावून म्हणत होते की, ‘ ही गोष्ट खोटी आहे. असे बोलल्यामुळे तुमचे पुण्य नष्ट होईल. भरताला श्रीराम हे प्राणांसमान प्रिय आहेत. ॥ ४ ॥

दोहा—चंदु चवै बरु अनल कन सुधा होइ बिषतूल ।

समनेहुँ कबहुँ न करहिं किछु भरतु राम प्रतिकूल ॥ ४८ ॥

एखादे वेळी चंद्र आग ओकू लागला आणि अमृत विषासारखे झाले तरी भरत स्वप्नातही कधी श्रीरामचंद्रांच्या विरुद्ध काही करणार नाही.’ ॥ ४८ ॥

एक बिधातहि दूषनु देहीं । सुधा देखाइ दीन्ह बिषु जेहीं ॥

खरभरु नगर सोचु सब काहू । दुसह दाहु उर मिटा उछाहू ॥

काहीजण ब्रह्मदेवाला दोष देत होते, ज्याने अमृत दाखवून विष दिले. शहरभर खळबळ माजली. सर्वांना काळजी लागून राहिली. मनाला असह्य यातना होऊ लागल्या. आनंद, उत्साह कुठल्या कुठे नाहीसा झाला. ॥ १ ॥

बिप्रबधू कुलमान्य जठेरी । जे प्रिय परम कैकेई केरी ॥

लगी देन सिख सीलु सराही । बचन बानसम लागहिं ताही ॥

ब्राह्मण-स्त्रिया, कुळातील मान्यवर वयोवृद्ध स्त्रिया आणि ज्या कैकेयीच्या फार आवडत्या होत्या, त्या सर्वजणी तिच्या शीलाची प्रशंसा करीत तिला समजावू लागल्या. परंतु त्यांचे बोलणे तिला बाणाप्रमाणे बोचत होते. ॥ २ ॥

भरतु न मोहि प्रिय राम समाना । सदा कहहु यहु सबु जगु जाना ॥

करहु राम पर सहज सनेहू । केहिं अपराध आजु बनु देहू ॥

त्या म्हणत होत्या की, ‘ तू तर नेहमी म्हणत होतीस की श्रीरामचंद्रांइतका मला भरतही प्रिय नाही. ही गोष्ट सार्‍या जगाला माहीत आहे. श्रीरामचंद्रांवर तुझे प्रामाणिक प्रेम आहे. मग आज कोणत्या अपराधासाठी त्यांना वनवास देत आहेस. ? ॥ ३ ॥

कबहुँ न कियहु सवति आरेसू । प्रीति प्रतीति जान सबु देसू ॥

कौसल्यॉं अब काह बिगारा । तुम्ह जेहि लागि बज्र पुर पारा ॥

तू सवतींचा कधी द्वेष केला नाहीस. सर्व देश तुझे प्रेम व विश्वास जाणतो. आता कौसल्येने तुझे काय वाकडे केले आहे, म्हणून तू सर्व नगरावर वज्र टाकलेस ? ॥ ४ ॥

दोहा—सीय कि पिय सँगु परिहरिहि लखनु कि रहिहहिं धाम ।

राजु कि भूँजब भरत पुर नृपु कि जिइहि बिनु राम ॥ ४९ ॥

सीता पतीची साथ सोडेल काय ? आणि लक्ष्मण श्रीरामचंद्रांविना घरी राहील ? भरत काय श्रीरामांविना अयोध्येचे राज्य भोगू शकेल ? आणि राजा दशरथ श्रीरामांविना जिवंत राहू शकेल ? सर्व उध्वस्त होईल. ॥ ४९ ॥

अस बिचारि उर छाड़हु कोहू । सोक कलंक कोठि जनि होहू ॥

भरतहि अवसि देहु जुबराजू । कानन काह राम कर काजू ॥

मनात असा विचार करुन राग सोडून दे. शोक व कलंकाचे घर बनू नकोस. भरताला युवराजपदावर अवश्य बसू दे, परंतु श्रीरामांचे वनांत काय काम आहे ? ॥ १ ॥

नाहिन रामु राज के भूखे । धरम धुरीन बिषय रस रुखे ॥

गुर गृह बसहुँ रामु तजि गेहू । नृप सन अस बरु दूसर लेहू ॥

श्रीराम हे राज्याचे भुकेले नाहीत. ते धर्माची धुरा धारण करणारे व विषय-विरक्त आहेत. मनात शंका आणू नकोस. तू दुसरा वर माग की, श्रीरामांनी घर सोडून गुरुंच्या घरी राहावे. ॥ २ ॥

जौं नहिं लगिहहु कहें हमारे । नहिं लागिहि कछु हाथ तुम्हारे ॥

जौं परिहास कीन्हि कछु होई । तौ कहि प्रगट जनावहु सोई ॥

जर तू आमच्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुझ्या हाती काहीही लागणार नाही. जर तू थट्टा केली असशील, तर तसे जाहीरपणे सांग. ॥ ३ ॥

राम सरिस सुत कानन जोगू । काह कहिहि सुनि तुम्ह कहुँ लोगू ॥

उठहु बेगि सोइ करहु उपाई । जेहि बिधि सोकु कलंकु नसाई ॥

रामासारखा पुत्र वनात जाण्याजोगा आहे काय ? हे ऐकल्यावर लोक तुला काय म्हणतील ? लवकर ऊठ आणि काही उपाय कर, म्हणजे हा शोक व कलंक दूर होईल. ॥ ४ ॥

छं०--जेहि भॉंति सोकु कलंकु जाइ उपाय करि कुल पालही ।

हठि फेरु रामहि जात बन जनि बात दूसरि चालही ॥

जिमि भानु बिनु दिनु प्रान बिनु तनु चंद बिनु जिमि जामिनी ।

तिमि अवध तुलसीदास प्रभु समुझि धौं जियँ भामिनी ॥

ज्यामुळे नगरातील शोक आणि तुझ्यावरचा कलंक नाहीसा होईल, असा उपाय करुन कुलाचे रक्षण कर. वनास निघालेल्या श्रीरामांना आग्रहाने थांबव. दुसरे काही बोलू नकोस. तुलसीदास म्हणतात की, ज्याप्रमाणे सूर्याविना दिवस, प्राणांविना शरीर आणि चंद्राविना रात्र निर्जीव व शोभाहीन होते, त्याप्रमाणे श्रीरामचंद्रांविना अयोध्या होईल. हे राणी, तू आपल्या मनात या गोष्टीचा विचार तर कर.’ ॥

सो०—सखिन्ह सिखावनु दीन्ह सुनत परिनाम हित ।

तेइँ कछु कान कीन्ह कुटिल प्रबोधी कूबरी ॥ ५० ॥

अशा प्रकारे सख्यांनी सिकवण दिली. ती ऐकण्यास गोड व परिणामी हितकारक होती. परंतु कुटिल कुबडीने पढवून तयार केलेल्या कैकेयीने तिकडे जराही लक्ष दिले नाही. ॥ ५० ॥

उतरु न देइ दुसह रिस रुखी । मृगिन्ह चितव जनु बाघिनि भूखी ॥

ब्याधि असाधि जानि तिन्ह त्यागी । चलीं कहत मतिमंद अभागी ॥

कैकेयीने काही उत्तर दिले नाही. ती दुःसह क्रोधामुळे निर्लज्जपणे तशीच राहिली. भुकेली वाघीण हरिणींना पाहते, तशी ती त्यांना पाहात होती. तेव्हा सख्यांनी हा रोग असाध्य समजून सोडून दिले. सर्वजणी तिला मंदबुद्धीची दुर्दैवी म्हणत निघून गेल्या. ॥ १ ॥

राजु करत यह दैअँ बिगोई । कीन्हेसि अस जस करइ न कोई ॥

एहि बिधि बिलपहिं पुर नर नारीं । देहिं कुचालिहि कोटिक गारीं ॥

राज्यावर अधिकार गाजविणार्‍या कैकेयीला दैवाने नष्ट करुन टाकले. तिने जे काही केले, तसे कुणीही करणार नाही. नगरातील सर्व स्त्री-पुरुष अशा प्रकारे विलाप करीत होते आणि त्या दुष्ट चालीच्या कैकेयीला शिव्यांची लाखोली वाहात होते. ॥ २ ॥

जरहिं बिषम जर लेहिं उसासा । कवनि राम बिनु जीवन आसा ॥

बिपुल बियोग प्रजा अकुलानी । जनु जलचर गन सूखत पानी ॥

लोक दुःखाच्या आगीमुळे होरपळत होते. उसासे सोडत म्हणत होते की, श्रीरामचंद्रांविना जगण्याची काही आशा नाही. महान वियोगाच्या काळजीने प्रजा अशी व्याकूळ झाली होती की, जणू पाणी सुकून गेल्यावर जलचर जीवांचा समुदाय तळमळू लागतो. ॥ ३ ॥

अति बिषाद बस लोग लोगाईं । गए मातु पहिं रामु गोसाईं ॥

मुख प्रसन्न चित चौगुन चाऊ । मिटा सोचु जनि राखै राऊ ॥

सर्व पुरुष आणि स्त्रिया अत्यंत विषादात बुडाले होते. प्रभू श्रीरामचंद्र कौसल्यामातेकडे गेले. त्यांच्या मुखावर प्रसन्नता होती आणि मनात चौपट उत्साह भरला होता. राजे आपल्याला ठेवून घेतील ही काळजी राहिली नाही. कैकेयी मातेने आज्ञा दिली आहे आणि वडिलांनी मूक संमती दिलेली आहे. ॥ ४ ॥

दोहा—नव गयंदु रघुबीर मनु राजु अलान समान ।

छूट जानि बन गवनु सुनि उर अनंदु अधिकान ॥ ५१ ॥

श्रीरामचंद्रांचे मन पकडलेल्या नव्या हत्तीप्रमाणे होते आणि राजतिलक हा त्या हत्तीला बांधून टाकणार्‍या लोखंडाच्या काटेरी बेडीप्रमाणे होता. ‘ वनात जायचे आहे. ‘ हे ऐकून आपण बंधनातून मुक्त झालो, असे मानून त्यांच्या मनातील आनंद वाढला. ॥ ५१ ॥

रघुकुलतिलक जोरि दोउ हाथा । मुदित मातु पद नायउ माथा ॥

दीन्हि असीस लाइ उर लीन्हे । भूषन बसन निछावरि कीन्हे ॥

रघुकुलतिलक श्रीरामांनी दोन्ही हात जोडून आनंदाने कौसल्या मातेच्या चरणी मस्तक ठेवले. तिने आशीर्वाद दिला आणि हृदयाशी धरले. दागिने व वस्त्रे त्यांच्यावरुन ओवाळून टाकली. ॥ १ ॥

बार बार मुख चुंबति माता । नयन नेह जलु पुलकित गाता ॥

गोद राखि पुनि हृदयँ लगाए । स्रवत प्रेमरस पयद सुहाए ॥

माता वारंवार श्रीरामांच्या मुखाचे चुंबन घेत होती. नेत्रांतून प्रेमाश्रू भरुन आले होते. तिने श्रीरामांना आपल्या मांडीवर घेऊन पुन्हा कवटाळले. तिच्या स्तनांतून प्रेमाधिक्यामुळे दूध वाहू लागले. ॥ २ ॥

प्रेमु प्रमोदु न कछु कहि जाई । रंक धनद पदबी जनु पाई ॥

सादर सुंदर बदनु निहारी । बोली मधुर बचन महतारी ॥

तिचे प्रेम व मोठा आनंद हा काही सांगता येत नव्हता. जणू कंगालाला कुबेराचे पद मिळाले होते. मोठ्या आदराने सुंदर मुख पाहात माता मधुर वाणीने म्हणाली, ॥ ३ ॥

कहहु तात जननी बलिहारी । कबहिं लगन मुद मंगलकारी ॥

सुकृत सील सुख सीवँ सुहाई । जनम लाभ कइ अवधि अघाई ॥

‘ बाळा, तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. सांग बरें, तो आनंददायक मंगल मुहूर्त केव्हा आहे ? तो माझे पुण्य, शील आणि सुखाची सुंदर परिसीमा आहे आणि जन्म घेतल्याच्या लाभाची पराकाष्ठा आहे. ॥ ४ ॥

दोहा—जेहि चाहत नर नारि सब अति आरत एहि भॉंति ।

जिमि चातक चातकि तृषित बृष्टि सरद रितु स्वाति ॥ ५२ ॥

त्या मुहूर्ताची सर्व स्त्री-पुरुष अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहेत. तहानलेले चातक आणि चातकी जशी शरदऋतूतील स्वाती नक्षत्राच्या पावसाची वाट पाहातात. ॥ ५२ ॥

तात जाउँ बलि बेगि नहाहू । जो मन भाव मधुर कछु खाहू ॥

पितु समीप तब जाएहु भैआ । भइ बड़ि बार जाइ बलि मैआ ॥

‘ सोन्या, मी कुरवंडी करते. तू लवकर स्नान करुन मनाला आवडेल ती मिठाई खाऊन घे. बाळा, मग बाबांजवळ जा. फार उशीर झाला आहे. मी औक्षण करते.’ ॥ १ ॥

मातु बचन सुनि अति अनुकूला । जनु सनेह सुरतरु के फूला ॥

सुख मकरंद भरे श्रियमूला । निरखि राम मनु भवँरु न भूला ॥

मातेचे अत्यंत मनोहर बोलणे जणू स्नेहरुपी कल्पवृक्षाची फुले होती. ती सुखरुपी मकरंदाने भरलेली होती आणि ती राजलक्ष्मीचे मूळ होती. अशा वचनरुपी फुलांना पाहून श्रीरामचंद्रांचा मनरुपी भ्रमर त्यांना भुलला नाही. ॥ २ ॥

धरम धुरीन धरम गति जानी । कहेउ मातु सन अति मृदु बानी ॥

पितॉं दीन्ह मोहि कानन राजू । जहँ सब भॉंति मोर बड़ काजू ॥

धर्मधुरीण श्रीरामचंद्रांनी धर्माची गती ओळखून आईला अत्यंत कोमल वाणीने म्हटले, ‘ आई ! बाबांनी मला वनाचे राज्य दिले आहे. तेथे माझे सर्वप्रकारे मोठे काम पूर्ण होणार आहे. ॥ ३ ॥

आयसु देहि मुदित मन माता । जेहिं मुद मंगल कानन जाता ॥

जनि सनेह बस डरपसि भोरें । आनँदु अंब अनुग्रह तोरें ॥

आई ! तू प्रसन्न चित्ताने मला जाण्याची आज्ञा दे. त्यामुळे

 माझा वनातील प्रवास आनंदमंगलमय होईल

. माझ्यावरील प्रेमामुळे चुकूनही घाबरु नकोस. हे माते,

 तुझ्या कृपेने आनंदच होईल. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment