Friday, April 2, 2021

AyodhyaKanda Part 13अयोध्याकाण्ड भाग १३

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 13 
Doha 71 to 76 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १३ 
दोहा ७१ ते ७६

दोहा—उतरु न आवत प्रेम बस गहे चरन अकुलाइ ।

नाथ दासु मैं स्वामि तुम्ह तजहु त काह बसाइ ॥ ७१ ॥

प्रेमामुळे लक्ष्मण काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने व्याकूळ होऊन श्रीरामांचे पाय धरले आणि म्हटले, ‘ हे नाथ, मी दास आहे आणि तुम्ही स्वामी. म्हणून तुम्ही मला सोडून दिले, तर मी काय करणार ? ॥ ७१ ॥

दीन्हि मोहि सिख नीकि गोसाईं । लागि अगम अपनी कदराईं ॥

नरबर धीर धरम धुर धारी । निगम नीति कहूँ ते अधिकारी ॥

हे स्वामी, तुम्ही मला उपदेश तर फार चांगला केला. पण माझ्या असमर्थपणामुळे तो माझ्या पचनी नाही पडला. जे धीर असतात व धर्माची धुरा धारण करतात, तेच शास्त्र व नीतीचे श्रेष्ठ अधिकारी असतात. ॥ १ ॥

मैं सिसु प्रभु सनेहँ प्रतिपाला । मंदरु मेरु कि लेहिं मराला ॥

गुर पितु मातु न जानउँ काहू । कहउँ सुभाउ नाथ पतिआहू ॥

मी तर प्रभूंच्या प्रेमामध्ये पोसले गेलेले लहान मूल आहे. हंस मंदराचल किंवा सुमेरु पर्वत कधी उचलू शकतो काय ? हे नाथ, मी मनापासून सांगतो, तुम्ही विश्र्वास बाळगा. तुम्हांला सोडून गुरु, माता, पिता या कुणालाही मी जाणत नाही. ॥ २ ॥

जहँ लगि जगत सनेह सगाई । प्रीति प्रतीति निगम निजु गाई ॥

मोरें सबइ एक तुम्ह स्वामी । दीनबंधु उर अंतरजामी ॥

हे प्रभू, दीनबंधू, हे अंतर्यामी, प्रत्यक्ष वेदाने सांगितले आहे की, जगात जितके म्हणून स्नेहाचे संबंध आहेत, प्रेम आणि विश्र्वास आहे. ते सर्व काही माझ्यासाठी तुम्हीच आहात. ॥ ३ ॥

धरम नीति उपदेसिअ ताही । कीरति भूति सुगति प्रिय जाही ॥

मन क्रम बचन चरन रत होई । कृपासिंधु परिहरिअ कि सोई ॥

हे कृपासिंधू, ज्याला कीर्ती, ऐश्वर्य किंवा सद्गती प्रिय आहे, त्यालाच धर्म व नीतीचा उपदेश करायला हवा. परंतु जो मन, वचन व कर्माने तुमच्या चरणी प्रेम बाळगतो, त्याला सोडून देणे योग्य आहे काय ?’ ॥ ४ ॥

दोहा—करुनासिंधु सुबंधु के सुनि मृदु बचन बिनीत ।

समुझाए उर लाइ प्रभु जानि सनेहँ सभीत ॥ ७२ ॥

दयेचा सागर असलेल्या श्रीरामचंद्रांनी भावाचे मृदु व नम्र वचन ऐकून आणि स्नेहामुळे त्याला घबरलेला पाहून हृदयाशी धरले व समजावले. ॥ ७२ ॥

मागहु बिदा मातु सन जाई । आवहु बेगि चलहु बन भाई ॥

मुदित भए सुनि रघुबर बानी । भयउ लाभ बड़ गइ बड़ि हानी ॥

ते लक्ष्मणाला म्हणाले, ‘ बंधो ! जाऊन आईचा निरोप घेऊन ये आणि लवकर वनात चल.’ रघुकुलातील श्रेष्ठ श्रीरामांची वाणी ऐकून लक्ष्मण आनंदला. मनात म्हणाला, मोठे नुकसान टळले आणि मोठा फायदा झाला. ॥ १ ॥

हरषित हृदयँ मातु पहिं आए । मनहुँ अंध फिरि लोचन पाए ॥

जाइ जननि पग नायउ माथा । मनु रघुनंदन जानकि साथा ॥

तो आनंदाने सुमित्रा मातेकडे गेला. आंधळ्याला जणू पुन्हा डोळे मिळाले. त्याने आईला नमस्कार केला. पण त्याचे मन मात्र सीतारामांच्या ठायी होते. ॥ २ ॥

पूँछे मातु मलिन मन देखी । लखन कही सब कथा बिसेषी ॥

गई सहमि सुनि बचन कठोरा । मृगी देखि दव जनु चहु ओरा ॥

आईने उदासीनतेचे कारण विचारले, तेव्हा लक्ष्मणाने सर्व हकीगत सविस्तर सांगितली. सुमित्रा त्याचे ते कठोर बोलणे ऐकून घाबरुन गेली. हरिणी ज्याप्रमाणे वनात सगळीकडे आग लागल्याचे पाहून घाबरते, तशी. ॥ ३ ॥

लखन लखेउ भा अनरथ आजू । एहिं सनेह बस करब अकाजू ॥

मागत बिदा सभय सकुचाहीं । जाइ संग बिधि कहिहि कि नाहीं ॥

आता अनर्थ होणार, असे लक्ष्मणाला दिसले. त्याला वाटले की, माता आता प्रेमामुळे काम बिघडवून टाकील, म्हणून तो निरोप मागताना भीतीने संकोचत होता. मनात विचार येत होता की, ‘ हे विधात्या, आई श्रीरामांसोबत जायला अनुमती देईल की नाही ?’ ॥ ४ ॥

दोहा—समुझि सुमित्रॉं राम सिय रुपु सुसीलु सुभाउ ।

नृप सनेहु लखि धुनेउ सिरु पापिनि दीन्ह कुदाउ ॥ ७३ ॥

सुमित्रेने श्रीरामाचे आणि सीतेचे सुंदर रुप, सुंदर शील आणि स्वभाव पाहून आणि त्यांच्यावरील महाराजांचे प्रेम पाहून डोके बडवून घेतले आणि म्हटले की, ‘ पापिणी कैकेयीने दुष्ट डाव साधला. ‘ ॥ ७३ ॥

धीरज धरेउ कुअवसर जानी । सहज सुहृद बोली मृदु बानी ॥

तात तुम्हारि मातु बैदेही । पिता रामु सब भॉंति सनेही ॥

परंतु वेळ चांगली नाही, असे पाहून तिने मन घट्ट केले आणि स्वभावतःच हित चिंतणारी सुमित्रा कोमल वाणीने लक्ष्मणाला म्हणाली, ‘ बाळा ! जानकी तुझी माता आहे आणि सर्वप्रकारे स्नेह   करणारे श्रीरामचंद्र तुझे पिता आहेत, असे समज. ॥ १ ॥

अवध तहॉं जहँ राम निवासू । तहँइँ दिवसु जहँ भानु प्रकासु ॥

जौं पै सीय रामु बन जाहीं । अवध तुम्हार काजु कछु नाहीं ॥

जिथे श्रीरामांचा निवास असेल, तेथेच अयोध्या आहे. जिथे सूर्यप्रकाश असतो, तिथे दिवस असतो. जर सीता-राम वनाला खरोखर जात असतील, तर अयोध्येमध्ये तुझे काही काम नाही. ॥ २ ॥

गुर पितु मातु बंधु सुर साईं । सेइअहिं सकल प्रान की नाईं ॥

रामु प्रानप्रिय जीवन जी के । स्वारथ रहित सखा सबही के ॥

गुरु, पिता, माता, बंधु, देव आणि स्वामी या सर्वांची सेवा आपल्या प्राणांसारखी केली पाहिजे. शिवाय श्रीरामचंद्र तर प्राणांहूनही प्रिय आहेत, हृदयाचे जीवन आहेत आणि सर्वांचे निःस्वार्थ सखा आहेत. ॥ ३ ॥

पूजनीय प्रिय परम जहॉं तें । सब मानिअहिं राम के नातें ॥

अस जियँ जानि संग बन जाहू । लेहु तात जग जीवन लाहू ॥

जगात जितके पूजनीय व परम प्रिय लोक आहेत, ते सर्व श्रीरामांच्या संबंधामुळेच पूज्य व प्रिय मानण्यास योग्य आहेत. हे लक्षात घेऊन मुला ! त्यांच्याबरोबर वनात जा आणि जीवनामध्ये जगण्याला लाभ मिळव. ॥ ४ ॥

दोहा—भूरि भाग भाजनु भयहु मोहि समेत बलि जाउँ ।

जौं तुम्हरें मन छाड़ि छलु कीन्ह राम पद ठाउँ ॥ ७४ ॥

मी तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. हे पुत्रा, माझ्यासह तू मोठा भाग्याचा ठरलास. तुझ्या चित्ताने निष्कपटपणे श्रीरामांच्या चरणी स्थान मिळविले आहे. ॥ ७४ ॥

पुत्रवती जुबती जग सोई । रघुपति भगतु जासु सुतु होई ॥

नतरु बॉंझ भलि बादि बिआनी । राम बिमुख सुत तें हित जानी ॥

जगात तीच युवती खर्‍या अर्थी पुत्रवती होय, जिचा पुत्र श्रीरघुनाथांचा भक्त आहे. अन्यथा राम विन्मुख पुत्रामुळे हित होईल, असे जिला वाटते त्यापेक्षा ती वांझ असणे चांगले. पशूप्रमाणे तिने पुत्राला प्रसवणे व्यर्थ होय. ॥ १ ॥

तुम्हरेहिं भाग रामु बन जाहीं । दूसर हेतु तात कछु नाहीं ॥

सकल सुकृत कर बड़ फलु एहू । राम सिय पद सहज सनेहू ॥

तुझ्या भाग्यामुळे श्रीराम वनात जात आहेत. बाळा ! दुसरे कोणतेही कारण नाही. श्रीसीतारामांच्या चरणी मनापासून प्रेम असणे, हेच संपूर्ण पुण्याचे सर्वांत मोठे फळ होय. ॥ २ ॥]

रागु रोषु इरिषा मदु मोहू । जनि सपनेहुँ इन्ह के बस होहू ॥

सकल प्रकार बिकार बिहाई । मन क्रम बचन करेहु सेवकाई ॥

राग,द्वेष, ईर्ष्या, मद आणि मोह यांना स्वप्नातही बळी पडू नकोस. सर्व विकारांचा त्याग करुन कायावाचामनाने श्रीसीतारामांची सेवा कर. ॥ ३ ॥

तुम्ह कहुँ बन सब भॉंति सुपासू । सँग पितु मातु रामु सिय जासू ॥

जेहिं न रामु बन लहहिं कलेसू । सुत सोइ करेहु इहइ उपदेसू ॥

वनामध्ये तुला सर्व प्रकारे सुख आहे. तुझ्याबरोबर श्रीसीतारामरुप मात-पिता आहेत. हे पुत्रा, ज्यामुळे श्रीरामचंद्रांना वनात असताना क्लेश होणार नाहीत, असेच प्रयत्न कर, हाच माझा उपदेश आहे. ॥ ४ ॥

छं०—उपदेसु यहु जेहिं तात तुम्हरे राम सिय सुख पावहीं ।

पितु मातु प्रिय परिवार पुर सुख सुरति बन बिसरावहीं ॥

तुलसी प्रभुहि सिख देइ आयसु दीन्ह पुनि आसिष दई ।

रति होउ अबिरल अमल सिय रघुबीर पद नित नित नई ॥

मुला ! तू, वनामध्ये श्रीसीतारामांची इतकी सेवा कर की, त्या सुखामुळे त्यांना पिता, माता, प्रिय परिवार आणि येथील सुखांचे विस्मरण होवो, हाच माझा उपदेश आहे. ‘ तुलसीदास म्हणतात की, सुमित्रेने अशा प्रकारे आपला प्रभू असलेल्या लक्ष्मणाला उपदेश करुन वनास जाण्याची आज्ञा दिली आणि आशीर्वाद दिला की, ‘ श्रीसीता व श्रीरघुवीर यांच्या चरणी तुझे निर्मळ व प्रगाढ प्रेम नित्य वाढत राहो.’

सो०—मातु चरन सिरु नाइ चले तुरत संकित हृदयँ ।

बागुर बिषम तोराइ मनहुँ भाग मृगु भाग बस ॥ ७५ ॥

मातेच्या चरणी मस्तक ठेवून मनातून मात्र आता कुठलेही विघ्न न येवो, म्हणून भीत भीत लक्ष्मण तेथून असा निघाला की, ज्याप्रमाणे नशिबाने एखादे हरीण जाळे तोडून पळते. ॥ ७५ ॥

गए लखन जहँ जानकिनाथू । भे मन मुदित पाइ प्रिय साथू ॥

बंदि राम सिय चरन सुहाए । चले संग नृपमंदिर आए ॥

लक्ष्मण श्रीजानकीनाथांकडे गेला आणि प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे मनातून प्रसन्न झाला. श्रीराम व सीता यांच्या चरणांना वंदन करुन त्यांच्याबरोबरच निघून तो राजमहालात आला. ॥ १ ॥

कहहिं परसपर पुर नर नारी । भलि बनाइ बिधि बात बिगारी ॥

तन कृस मन दुखु बदन मलीने । बिकल मनहुँ माखी मधु छीने ॥

नगरातील स्त्री-पुरुष परस्पर म्हणत होते की, ‘ विधात्याने पार वाटोळे केले. ‘ त्यांचे शरीर दुर्बल, मन दुःखी व मुख उदास झाले होते. मध काढून घेतल्यावर मधमाश्या व्याकूळ होतात, तसे ते व्याकूळ झाले होते. ॥ २ ॥

कर मीजहिं सिरु धुनि पछिताहीं । जनु बिनु पंख बिहग अकुलाहीं ॥

भइ बड़ि भीर भूप दरबारा । बरनि न जाइ बिषादु अपारा ॥

सर्वजण हात चोळत होते आणि डोके बडवून घेत पश्चात्ताप करीत होते. राजद्वारावर मोठी गर्दी झाली होती. तेथे अपार विषाद पसरला होता. त्याचे वर्णन करणेच कठीण. ॥ ३ ॥

सचिवँ उठाइ राउ बैठारे । कहि प्रिय बचन रामु पगु धारे ॥

सिय समेत दोउ तनय निहारी । ब्याकुल भयउ भूमिपति भारी ॥    

‘ श्रीराम आले आहेत, ‘ हे गोड शब्द बोलून मंत्र्याने राजाला उठवून बसवले. सीता व दोघे पुत्र हे वनात जाण्यास तयार झाल्याचे पाहून महाराज फार व्याकूळ झाले. ॥ ४ ॥

दोहा—सीय सहित सुत सुभग दोउ देखि देखि अकुलाइ ।

बारहिं बार सनेह बस राउ लेइ उर लाइ ॥ ७६ ॥

सीतेसह दोघा सुंदर मुलांना पाहून पाहून राजांना भडभडून येत होते आणि ते प्रेमाने वारंवार त्यांना हृदयाशी धरत होते. ॥ ७६ ॥

सकइ न बोलि बिकल नरनाहू । सोक जनित उर दारुन दाहू ॥

नाइ सीसु पद अति अनुरागा । उठि रघुबीर बिदा तब मागा ॥

व्याकूळ झाल्याने राजे बोलू शकत नव्हते. मनात शोकामुळे उत्पन्न झालेली आग होती. तेव्हा रघुकुलवीर श्रीराम यांनी अत्यंत प्रेमाने राजांच्या चरणी मस्तक ठेवले आणि जाण्यासाठी निरोप मागितला. ॥ १ ॥

पितु असीस आयसु मोहि दीजै । हरष समय बिसमउ कत कीजै ॥

तात किएँ प्रिय प्रेम प्रमादू । जसु जग जाइ होइ अपबादू ॥

‘ बाबा ! मला आशीर्वाद आणि आज्ञा द्या. आनंदाच्या या प्रसंगी शोक का करता ? हे तात, प्रिय व्यक्तीच्या प्रेमामुळे प्रमाद केल्यास जगात कीर्ती नाहीशी होईल आणि निंदा होईल. ॥ २ ॥

सुनि सनेह बस उठि नरनाहॉं । बैठारे रघुपति गहि बाहॉं ॥

सुनहु तात तुम्ह कहुँ मुनि कहहीं । रामु चराचर नायक अहहीं ॥

हे ऐकल्यावर राजांनी प्रेमाने उठून श्रीरामांचा हात धरुन त्यांना खाली बसविले आणि म्हटले, ‘ पुत्रा ! ऐक. मुनीलोक म्हणत असतात की, श्रीराम चराचराचे स्वामी आहेत. ॥ ३ ॥

सुभ अरु असुभ करम अनुहारी । ईसु देइ फलु हृदयँ बिचारी ॥

करइ जो करम पाव फल सोई । निगम नीति असि कह सबु कोई ॥

शुभ व अशुभ कर्मांचा मनात विचार करुन ईश्र्वर फळ

 देतो. जो कर्म करतो त्यालाच त्याचे फळ मिळते. सर्वजण

 म्हणतात की, वेदात हाच नियम सांगितला आहे. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment