Saturday, May 22, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 5,  Ovya 112 to 136 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ५ 
ओव्या ११२ ते १३६
मूळ श्लोक
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्यितो योगधारणाम् ॥ १२ ॥
सर्व इंद्रियांचें नियमन करुन, हृदयाच्या ठिकाणीं मनाचा निरोध करुन आणि आपला प्रणवायु मस्तकामध्यें ठेवून योगाचरणामध्यें स्थित होऊन--॥ १२ ॥     
परी हें तरीच घडे । जरी संयमाची अखंडें ।
सर्वद्वारीं कवाडें । कळासती॥ ११२ ॥
११२) परंतु, जर सर्वेंद्रियांच्या दारांत नेहमीं निग्रहाची कवाडें लावलीं, तरच हे घडेल.
तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें ।
जैसें करचरणीं मोडलें । परिचरु न संडी ॥ ११३ ॥
११३) मग ज्याप्रमाणें हातपाय मोंडलेला मनुष्य घर सोडीत नाहीं, त्याप्रमाणें मग स्वभावतःच कोंडलेलें मन अंतःकरणांत स्वरुप राहील.
तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा ।
मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥ ११४ ॥
११४) अर्जुना, तसें चित्त स्थिर झालें असतां मग प्राणवायूचा ॐकार करुन ( प्राणानें ॐकाराचें चिंतन केलें असतां प्राण प्रणवरुप होतो, ) त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गांत मूर्ध्निआकाशापर्यंत आणावा.   
तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें ।
जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबी ॥ ११५ ॥
११५) तेथें मूर्ध्निआकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल, अशा अर्धवट स्थितींत, धारणेच्या जोरावर धरुन ठेवावा, जेथपर्यंत अकार, उकार व मकार या तीन मात्रा अर्धमात्रारुप ॐकार बिंदूमध्यें नाहींशा झाल्या नाहींत.  
तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । 
मग लग्नीं जेवीं ॐकारु । बिंबींचि विलसे ॥ ११६ ॥
११६) तोंपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्निआकाशांत निश्चल करावा., मग अर्धबिंबांत मात्रात्रयाचें ऐक्य झालें असतां ॐकार अर्धमात्रेमध्यें असा शोभतो, ( लयास पावतो ) तसा प्राण मूर्ध्निआकाशांत शोभतो. ( लयास पावतो )   
मूळ श्लोक
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥
१३) ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असतां व माझें स्मरण करीत असतां, जो देहाचा त्याग करुन जातो, तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. 
तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे ।
मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥ ११७ ॥
११७) तेव्हां ॐ हें स्मरण्याचें संपून तेथेंच प्राणवायू संपतो. मग ॐकार स्मरण्याचें राहिलें कीं, जे पूर्ण परब्रह्म तेंच काय तें एक राहातें.  
म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।
जो माझें स्वरुप परम । स्मरतसांता ॥ ११८ ॥
११८) म्हणून प्रणव हें एक ज्याचें नाम आहे व जें एकाक्षर ब्रह्म आहे, तें माझें मुख्य स्वरुप असून, त्या स्वरुपाचें स्मरण करीत असतांना,   
यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें । 
जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥ ११९ ॥
११९) जो अशा स्थितींतच देहाचा त्याग करतो, तो ज्या ( ब्रह्म ) प्राप्तीपलीकडे दुसरी कांहीं एक गोष्ट साध्य करावयाची नाहीं, त्या माझ्या स्वरुपाला निश्चयानें पावतो.   
येथ अर्जुना जरी विपायें । तुझां जीवीं हन ऐसें जाये ।
ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंती ॥ १२० ॥
१२०) येथें अर्जुना, कदाचित् जर तुझ्या मनांत असें वाटेल की, ( अंतकालीं हें स्मरण करावें हें खरें परंतु ) मग अंतकालीं हे स्मरण कशानें होणार ?
इंद्रियां अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया । 
आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥ १२१ ॥
१२१) कारण इंद्रियें आपआपली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसें होऊन, आंतबाहेर मरणाची लक्षणें उघड दिसूं लागल्यावर,  
ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें ।
तेथ काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ॥ १२२ ॥
१२२) मग त्या वेळेस योगसाधनेस कोणी बसावें ? व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा ? आणि कोणत्या अंतःकरणानें ॐकाराचें स्मरण करावें ?
तरि अगा ऐसिया ध्वनी । झणें थारा देशी हो मनी । 
पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ॥ १२३ ॥
१२३) तर बाबा, अशा शंकेला कदाचित तूं मनांत जागा देशील तर अशी शंका मनात आणूं नकोस; कारण माझी जे नेहमींच सेवा करतात, त्या भक्तांच्या मरणकालीं मी त्यांचा सेवक होतो. 
मूळ श्लोक
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४ ॥
१४) पार्था, जो सतत अनन्यचित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो, त्या ( माझ्याशी ) निरंतर शकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे.   
मूळ श्लोक
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्र्तम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ १५ ॥
१५) ( ही ) श्रेष्ठ स्थिति प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर, दुःखाचे आगर असलेल्या व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही.  
जे विषयांसी तीळांजळीं देऊनि । प्रवृत्तीवरी निगड बाऊनि ।
मातें हृदयीं सूनि । भोगिताती ॥ १२४ ॥
१२४) जें विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून ( निरोधून ), मला अंतःकरणांत सांठवून माझ्या स्वरुपाचा अनुभव घेतात;  
परि भोगितया नाराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां ।
तेथ चक्षुरादिकां । कवण पाडू ॥ १२५ ॥
१२५) परंतु मला हृदयांत घालून कितीहि भोग घेतला, तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे, भूक व तहान इत्यादिकांचा त्यांस पत्ता नसतो; तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे ?  
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजसी लिगटले ।
मीचि होऊनि आटले । उपासिती ॥ १२६ ॥
१२६) अशा प्रकारें जे अखंड माझ्याशीं एकरुप होऊन अंतःकरणाने मला चिकटले, ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात.    
तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें ।
मग म्यां जरी पावावें । तरि उपास्ति ते कायसी ॥ १२७ ॥
१२७) ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावें, तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली ? 
पैं रंकु एक आडलेपणें । काकुळतीं अंतीं धांवां गा धांवां म्हणे ।
तरि तयाचिये ग्लानी धांवणें । काय न घडे मज ॥ १२८ ॥
१२८) जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयीं काकुळतीनें मला, देवा, धांवा हो धांवा, असें म्हणाला, तर त्याच्या संकटसमयीं मी धावत नाहीं काय ?    
आणि भक्ताही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा ।
म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥ १२९ ॥
१२९) आणि भक्तांचीहि तीच अवस्था होत असेल तर, मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरितां करावयाचा ? म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊं नकोस.     
तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरला कीं पावावा ।
तो आभारुही जीवा । साहवेचि ना ॥ १३० ॥
१३०) त्यांनी ज्या वेळीं माझी आठवण करावी, त्या वेळेला स्मरण करतांच मीं पावावें, एवढे ओझेंदेखील माझ्या मनाला सहन होत नाही. 
तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाची उत्तीर्णत्वालागीं ।
भक्तांचियां तनुत्यागीं । परिचर्या करी ॥ १३१ ॥
१३१) तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणीं असलेला पाहून, त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरितां मी भक्तांच्या देह पडण्याच्या चेळी त्यांची सेवा चाकरी करतो.  
देहवैफल्याचा वारा । झणें लागेल या सुकुमारा ।
म्हणोनि आत्मबोधाचा पांजिरां । सूयें तयातें ॥ १३२ ॥
१३२) देहान्तसमयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित् माझ्या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजर्‍यांत ठेवतो.     
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हींव ऐसी करीं साउली ।
ऐसेनि नित्यबुद्धि संचली । मी आणी तयातें ॥ १३३ ॥
१३३) शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण, हीच सोपी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजर्‍यावर मी करतों;  अशा तर्‍हेने आत्म्याच्या नित्यतेंविषयीं दृढ झालेली बुद्धि मी त्याला देतो. 
म्हणोनि देहांतीचें सांकडें । माझिया कहींचि न पडे ।
मी आपुलियातें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥ १३४ ॥
१३४) म्हणून मरणाचें संकट माझ्या भक्ताला कधींच पडत नाहीं; माझ्या भक्ताला मी आपल्याकडे कांहीं आयास न पडता आणतो.
वरचील देहाची गंवसणी फेडूनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी ।
शुद्ध वासना निवडुनी । आपणपां मेळवीं ॥ १३५ ॥
१३५) आत्म्यावर असणारी देहरुपी गवसणी काढून टाकून, अहंकाररुपी वरवर असणारी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन, त्या भक्तांचें ( मी ) आपल्याशी ऐक्य करतों,      
आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठाव नाहीं ।    
म्हणऊनि अव्हेरु करितां कांहीं । वियोगु ऐसा न वाटे ॥ १३६ ॥
१३६) आणि भक्तांना तरी देहांत असतांनादेखील विशेषतः देहतादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देह त्याग करतांना त्यांत ( देहाचा) वियोग असा वाटत नाही.  



Custom Search

No comments:

Post a Comment