Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 20 रामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २०

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 20 
Doha 113 and 118 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २० 
दोहा ११३ आणि ११८

दोहा—छॉंह करहिं घन बिबुधघन बरषहिं सुमन सिहाहिं ।

देखत गिरि बन बिहग मृग रामु चले मग जाहिं ॥ ११३ ॥

वाटेत ढग दाटून सावली तयार करीत. देव पुष्पे उधळून तृप्त होत. श्रीराम पर्वत, वने, पशू, पक्षी यांना पाहात पाहात वाटेने जात होते. ॥ ११३ ॥

सीता लखन सहित रघुराई । गॉंव निकट जब निकसहिं जाई ॥

सुनि सब बाल बृद्ध नर नारी । चलहिं तुरत गृह काजु बिसारी ॥

सीता व लक्ष्मण यांचेसह श्रीराम ज्या गावाजवळून जात, तेथे त्यांचे आगमन झाल्याचे ऐकताच सर्व आबाल-वृद्ध स्त्री-पुरुष आपले घर व कामधाम विसरुन लगेच त्यांना पाहण्यासाठी निघत. ॥ १ ॥

राम लखन सीय रुप निहारी । पाइ नयन फलु होहिं सुखारी ॥

सजल बिलोचन पुलक सरीरा । सब भए मगन दोउ बीरा ॥

श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचे रुप पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटे व त्यांना सुख वाटे. दोघा भावांना पाहून सर्वजण प्रेमात बुडून जात. त्यांना पाहून त्या लोकांच्या डोळ्यांत पाणी येई आणि ते पुलकित होत. ॥ २ ॥

बरनि न जाइ दसा तिन्ह केरी । लहि जनु रंकन्ह सुरमनि ढेरी ॥

एकन्ह एक बोलि सिख देहीं । लोचन लाहु लेहु छन एहीं ॥

त्यांच्या मनःस्थितीचे वर्णन करणे कठीण. जणू दरिद्री माणसांना चिंतामणीचा ढीग सापडला असावा. ते एक दुसर्‍याला हाका मार-मारुन सांगत की, या क्षणी डोळ्यांचे पारणे फेडून घ्या. ॥ ३ ॥

रामहि देखि एक अनुरागे । चितवत चले जाहिं सँग लागे ॥

एक नयन मग छबि उर आनी । होहिं सिथिल तन मन बर बानी ॥

कुणी कुणी श्रीरामचंद्रांना पाहून इतके प्रेमात पडत की, त्यांना पाहात त्यांच्याबरोबर चालू लागत. कोणी डोळ्यांनी त्यांचे रुप पाहून घेत व मनात ठेवून कायावाचामनाने मुग्ध होऊन जात. ॥ ४ ॥

दोहा—एक देखि बट छॉंह भलि डासि मृदुल तृन पात ।

कहहिं गवॉंइअ छिनुकु श्रमु गवनब अबहिं कि प्रात ॥ ११४ ॥

कोणी वडाची सावली पाहून तेथे गवत व पाने पसरुन म्हणत की, थोडा वेळ येथे बसून शीण दूर करा, मग पुढे जा किंवा सकाळी जा. ॥ ११४ ॥

एक कलस भरि आनहिं पानी । अँचइअ नाथ कहहिं मृदु बानी ॥

सुनि प्रिय बचन प्रीतिअति देखी । राम कृपाल सुसील बिसेषी ॥

कोणी घडा भरुन पाणी आणी आणि गोड शब्दांत म्हणे, ‘ हे नाथ, घोटभर पाणी घ्या. ‘ त्यांचे प्रेमाचे बोलणें ऐकून आणि त्यांचे अत्यंत प्रेम पाहून दयाळू व परम सुशील श्रीरामचंद्रांनी, ॥ १ ॥

जानी श्रमित सीय मन माहीं । घरिक बिलंबु कीन्ह बट छाहीं ॥

मुदित नारि नर देखहिं सोभा । रुप अनूप नयन मनु लोभा ॥

मनात विचार केला की, सीता थकली आहे, म्हणून त्यांनी वडाखाली थोडी विश्रांती घ्यावी. त्यावेळी स्त्री-पुरुष आनंदाने त्यांची शोभा पाहात. त्यांच्या अनुपम रुपाने लोकांचे नेत्र व मन मोहित होई. ॥ २ ॥

एकटक सब सोहहिं चहुँ ओरा । रामचंद्र मुख चंद चकोरा ॥

तरुन तमाल बरन तनु सोहा । देखत कोटि मदन मनु मोहा ॥

सर्वजण एकटक श्रीरामांचे चंद्रमुख चकोराप्रमाणे तन्मय होऊन पाहात. तेव्हा चोहीकडे सर्व शोभून दिसत होते. श्रीरामांचे नवीन तमाल वृक्षाच्या रंगाचे श्यामल शरीर अत्यंत शोभत होते. ते पाहून कोट्यावधी कामदेवांचे मन मोहित होऊन जाई. ॥ ३ ॥

दामिनि बरन लखन सुठि नीके । नख सिख सुभग भावते जी के ॥

मुनिपट कटिन्ह कसें तूनीरा । सोहहिं कर कमलनि धनु तीरा ॥

विजेसारख्या रंगाचे तेजस्वी लक्ष्मण फार चांगले वाटत होते. ते नखशिखांत सुंदर होते व मनाला फार आह्‍लाद देत. दोघांनी वल्कले इत्यादी वस्त्रे घातली होती आणि कमरेला भाले बांधले होते. कमलां-सारख्या त्यांच्या हातात धनुष्य-बाण शोभून दिसत होते. ॥ ४ ॥

दोहा—जटा मुकुट सीसनि सुभग उर भुज नयन बिसाल ।

सरद परब बिधु बदन बर लसत स्वेद कन जाल ॥ ११५ ॥

त्यांच्या शिरांवर सुंदर जटा-जूट होते. वक्ष:स्थल, भुजा आणि नेत्र विशाल होते आणि शरद पौर्णिमेच्या चंद्रासमान सुंदर मुखांवर स्वेदबिंदूंची झळकणारी शोभा होती. ॥ ११५ ॥

बरनि न जाइ मनोहर जोरी । सोभा बहुत थोरि मति मोरी ॥

राम लखन सिय सुंदरताई । सब चितवहिं चित मन मति लाई ॥

त्या मनोहर जोडीचे वर्णन मला करता येणार नाही, कारण त्यांची शोभा अपार आहे आणि माझी बुद्धी अल्प आहे. श्रीराम, लक्ष्मण व सीता यांचे सौंदर्य सर्वजण मन, चित्त व बुद्धीने तन्मय होऊन पाहात होते. ॥ १ ॥

थके नारि नर प्रेम पिआसे । मनहुँ मृगी मृग देखि दिआ से ॥

सीय समीप ग्रामतिय जाहीं । पूँछत अति सनेहँ सकुचाहीं ॥

गावातील ते प्रेमाचे भुकेले स्त्री-पुरुष तिघांच्या सौंदर्य-माधुर्याची छटा पाहून असे थक्क होत की, दिवा पाहून जसे हरीण-हरिणी स्तब्ध होऊन जातात. गावातील स्त्रीया सीतेच्याजवळ जात, परंतु अत्यंत प्रेमामुळे काही विचारताना संकोच पावत. ॥ २ ॥

बार बार सब लागहिं पाएँ । कहहिं बचन मृदु सरल सुभाएँ ॥

राजकुमारि बिनय हम करहीं । तिय सुभायँ कछु पूँछत डरहीं ॥

वारंवार तिच्या पाया पडत आणि सहजपणें साध्याभोळ्या भाषेत म्हणत, ‘ हे राजकुमारी, आम्हांला काही विचारायचे म्हटले, तर लाज वाटते. ॥ ३ ॥

स्वामिनि अबिनय छमबि हमारी । बिलगु न मानब जानि गावॉंरी ॥

राजकुअँर दोउ सहज सलोने । इन्ह तें लही दुति मरकत सोने ॥

हे स्वामिनी, आमच्या धारिष्ट्याबद्दल आम्हांला क्षमा करा. आम्ही गांवढळ आहोत, असे समजून वाईट वाटून घेऊ नका. हे दोन्ही राजकुमार स्वभावतः लावण्यमय आहेत. पाचूने व सुवर्णाने यांच्यापासूनच कांती मिळविली आहे. ॥ ४ ॥

दोहा—स्यामल गौर किसोर बर सुंदर सुषमा ऐन ।

सरद सर्बरीनाथ मुखु सरद सरोरुह नैन ॥ ११६ ॥

हे श्याम व गौर वर्णाचे दोघे सुंदर किशोर अवस्थेत आहेत. दोघेही परम सुंदर व शोभेचे माहेरघर आहेत. शरदपौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे यांचे मुख व शरद ऋतूतील कमळसारखे यांचे नेत्र आहेत. ‘ ॥ ११६ ॥

मास पारायण, सोळावा विश्राम

नवाह्नपारायण, चौथा विश्राम

कोटि मनोज लजावनिहारे । सुमुखि कहहु को आहिं तुम्हारे ॥

सुनि सनेहमय मंजुल बानी । सकुची सिय मन महुँ मुसुकानी ॥

‘ हे सुमुखी, आपल्या सौंदर्याने कोट्यावधी कामदेवांना लाजविणारे हे तुमचे कोण आहेत ? ‘ त्यांची अशी प्रेममय सुंदर वाणी ऐकून सीता संकोचली आणि मनात हसली. ॥ १ ॥              

तिन्हहि बिलोकि बिलोकति धरनी । दुहुँ सकोच सकुचति बरबरनी ॥

सकुचि सप्रेम बाल मृग नयनी । बोली मधुर बचन पिकबयनी ॥

उत्तम गौरवर्णाची सीता त्यांना पाहून जमिनीकडे पाहू लागली. दोन्हीकडून तिला संकोव वाटत होता न सांगितल्यास ग्रामीण स्त्रियांना वाईट वाटण्याचा संभव होता आणि सांगयचे म्हटले तर लज्जा वाटत होती. तेव्हा मृगनयना व कोकिल कंठी सीता संकोचाने प्रेमपूर्वक मधुर वाणीने म्हणाली, ॥ २ ॥

सहज सुभाय सुभग तन गोरे । नामु लखनु लघु देवर मोरे ॥

बहुरि बदनु बिधु अंचल ढॉंकी । पिय तनु चितइ भौंह करि बॉंकी ॥

‘ हे जे सरळ स्वभावाचे, सुंदर व गोरे आहेत, त्याचे नाव लक्ष्मण. हे माझे धाकटे दीर आहेत. नंतर सीतेने लाजून आपल्या चंद्रमुखावर पदर ओढून घेऊन आणि प्रियतम श्रीरामांकडे नजर टाकीत भुवई वर करुन, ॥ ३ ॥

खंजन मंजु तिरीछे नयननि । निज पति कहेउ तिन्हहि सियँ सयननि ॥

भईं मुदित सब ग्रामबधूटीं । रंकन्ह राय रासि जनु लूटीं ॥

खंजन पक्ष्यासारख्या सुंदर नेत्रांनी तिरका कटाक्ष टाकीत सीतेने खुणेने त्यांना सांगितले की, ‘ हे माझे पती आहेत. ‘ हे समजल्यावर गावच्या सर्व युवती अशा आनंदित झाल्या की, जणू कंगालांना धनाच्या राशी लुटण्यासाठी मिळाल्या. ॥ ४ ॥

दोहा—अति सप्रेम सिय पायँ परि बहुबिधि देहिं असीस ।

सदा सोहागिनि होहु तुम्ह जब लगि महि अहि सीस ॥ ११७ ॥

त्या अत्यंत प्रेमाने सीतेच्या पाया पडत अनेक प्रकारे शुभकामना देऊ लागल्या की, ‘ जोपर्यंत शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी आहे, तोपर्यंत तुम्ही सुवासिनी राहा. ॥ ११७ ॥

पारबती सम पतिप्रिय होहू । देबि न हमपर छाड़ब छोडू ॥

पुनि पुनिबिनय करिअ कर जोरी । जौं एहि मारग फिरिअ बहोरी ॥

 आणि पार्वतीप्रमाणे आपल्या पतीला प्रित बना. हे देवी ! आमच्यावर कृपा करीत राहा. आम्ही वारंवार हात जोडून विनंती करतो की, तुम्ही पुन्हा याच वाटेने परता. ॥ १ ॥

दरसनु देब जानि निज दासी । लखीं सीयँ सब प्रेम पिआसी ॥

मधुर बचन कहि कहि परितोषीं । जनु कुमुदिनीं कौमुदीं पोषीं ॥

आणि आम्हाला दासी समजून दर्शन द्या. ‘ सीतेने पाहिले की, त्या सर्वजणी प्रेमाच्या भुकेल्या आहेत. म्हणून मधुर वाणीने समजावून तिने त्यांचे समाधान केले. जणू चांदण्याने कुमुदिनींना आपले किरण देऊन पुष्ट केले. ॥ २ ॥

तबहिं लखन रघुबर रुख जानी । पूँछेउ मगु लोगन्हि मृदु बानी ॥

सुनत नारि नर भए दुखारी । पुलकित गात बिलोचन बारी ॥

त्यावेळी श्रीरामांचे मनोगत ओळखून लक्ष्मणाने लोकांना मृदु भाषेत लोकांना पुढचा मार्ग विचारला. ते ऐकून स्त्री-पुरुष दुःखी झाले. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि वियोगाच्या कल्पनेने त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ॥ ३ ॥

मिटा मोदु मन भए मलीने । बिधि निधि दीन्ह लेत जनु छीने ॥

समुझि करम गति धीरजु कीन्हा । सोधि सुगम मगु तिन्ह कहि दीन्हा ॥

त्यांचा आनंद मावळला आणि मन उदास झाले. जणू विधात्याने दिलेली संपत्ती हिरावून घेतली. कर्माची गती मानून त्यांनी मन घट्ट केले आणि नीट विचार करुन सोपी वाट दाखविली. ॥ ४ ॥

दोहा—लखन जानकी सहित तब गवनु कीन्ह रघुनाथ ।

फेरे सब प्रिय बचन कहि लिए लाइ मन साथ ॥ ११८ ॥

मग लक्ष्मण व जानकीसह श्रीरामांनी प्रस्थान केले आणि गोड बोलून सर्वांना परत पाठविले, परंतु त्यांची मनें आपल्यासोबत घेतली. ॥ ११८ ॥

फिरत नारि नर अति पछिताहीं । दैअहिं दोषु देहिं मन माहीं ॥

सहित बिषाद परसपर कहहीं । बिधि करतब उलटे सब अहहीं ॥

परत जातांना ते स्त्री-पुरुष पश्र्चाताप करीत होते. व मनातल्या मनात दैवाला दोष देत होते. ते परस्परांना दुःखाने म्हणत होते की, ‘ दैवाची सर्व कामे उलटीच असतात.’ ॥ १ ॥

निपट निरंकुस निठुर निसंकू । जेहिं ससि कीन्ह सरुज सकलंकू ॥

रुख कलपतरु सागरु खारा । तेहिं पठए बन राजकुमारा ॥

हा विधाता अत्यंत निरंकुश, निर्दय व बेडर आहे. ज्याने चंद्राला रोगी व कलंकित बनविले. कल्पवृझाला झाड बनविले आणि समुद्राला खारे करुन ठेवले. त्यानेच या राजकुमारांना वनात धाडले. ॥ २ ॥

जौं पै इन्हहि दीन्ह बनबासू । कीन्ह बादि बिधि भोग बिलासू ॥

ए बिचरहिं मग बिनु पदत्राना । रचे बादि बिधि बाहन नाना ॥

जर विधात्याला यांना वनांत पाठवायचे होते, तर त्याने भोग-विलास उगाच तयार केले. जर यांना अनवाणी चालवायचे होते, तर विधात्याने अनेक वाहने फुकटच बनवली. ॥ ३ ॥

ए महि परहिं डासि कुस पाता । सुभग सेज कत सृजत बिधाता ॥

तरुबर बास इन्हहि बिधि दीन्हा । धवल धाम रचि रचि श्रमु कीन्हा ॥

जर हे कुश व पाने अंथरुन जमिनीवर पहुडतात, तर

 विधात्याने पलंग, अंथरुणे अशा शय्या कशाला

 बनविल्या ? विधात्याने जर यांना मोठमोठ्या झाडाखाली

 निवास दिला, तर मग उज्ज्वल महाल बनवून त्याने

 फुकटच कष्ट घेतले म्हणायचे ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment