Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 21 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २१

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 21 
Doha 119 and 124 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २१ 
दोहा ११९ आणि १२४

दोहा—जौं ए मुनि पट धर जटिल सुंदर सुठि सुकुमार ।

बिबिध भॉंति भूषन बसन बादि किए करतार ॥ ११९ ॥

हे सुंदर व अत्यंत सुकुमार असूनही मुनींची वल्कलें नेसतात आणि जटा धारण करतात. मग विधात्याने तर्‍हेतर्‍हेचे अलंकार व वस्त्रे उगाच बनविली. ॥ ११९ ॥

जौं ए कंद मूल फल खाहीं । बादि सुधादि असन जग माहीं ॥

एक कहहिं ए सहज सुहाए । आपु प्रगट भए बिधि न बनाए ॥

हे कंद-मुळे व फळे खातात, तर जगात अमृतादी भोजन पदार्थ व्यर्थच आहेत.’ कोणी म्हणाला, ‘ हे स्वभावतःच सुंदर आहेत. हे स्वयंभू आहेत. ब्रह्मदेवाने बनविलेले नाहीत. ॥ १ ॥

जहँ लगि बेद कही बिधि करनी । भवन नयन मन गोचर बरनी ॥

देखहु खोजि भुअन दस चारी । कहँ अस पुरुष कहॉं असि नारी ॥

आमच्या डोळ्यांनी, कानांनी व मनाने अनुभवास आलेली विधात्याची करणी अशी की, वेदांत ज्यांचे वर्णन केलेले आहे, त्या चौदाही लोकांत शोधून पाहा की, असे पुरुष व स्त्रिया कुठे आहेत ? यावरुन सिद्ध होते की, हे तिघे विधात्याच्या चौदा लोकांपेक्षा वेगळे आहेत आणि ते स्वतःच्या महिम्याने निर्माण झाले आहेत. ॥ २ ॥

इन्हहि देखि बिधि मनु अनुरागा । पटतर जोग बनावै लागा ॥

कीन्ह बहुत श्रम ऐक न आए । तेहिं इरिषा बन आनि दुराए ॥

यांना पाहून विधात्याचे मन मुग्ध झाले. तेव्हा तोसुद्धा यांच्या उपमेजोगे दुसरे स्त्री-पुरुष बनवू लागला. त्याने खूप श्रम घेतले, तरी कोणी त्याच्या हातून पूर्ण उतरले नाहीत. त्यामुळे ईर्षेने त्याने यांना जंगलात आणून दृष्टीआड केले आहे.’ ॥ ३ ॥

एक कहहिं हम बहुत न जानहिं । आपुहि परम धन्य करि मानहिं ॥

ते पुनि पुन्यपुंज हम लेखे । जे देखहिं देखिहहिं जिन्ह देखे ॥

कोणी म्हणाले, ‘ आम्हांला काही फार माहीत नाही. परंतु आम्ही स्वतःला फार धन्य समजतो की, यांचे दर्शन घडत आहे. आणि ज्यांनी यांना पाहिले, पाहात आहेत, जे पाहतील, ते सर्व पुण्यवान होत.’ ॥ ४ ॥

दोहा—एहि बिधि कहि कहि बचन प्रिय लेहिं नयन भरि नीर ।

किमि चलिहहिं मारग अगम सुठि सुकुमार सरीर ॥ १२० ॥

अशा प्रकारे गोड बोलून सर्वांचे डोळे पाणावले आणि ते म्हणाले की, ‘ हे अत्यंत सुकुमार देहाचे अवघड वाटांतून कसे चालत जाणार ? ‘ ॥ १२० ॥

नारि सनेह बिकल बस होहीं । चकईं सॉंझ समय जनु सोहीं ॥

मृदु पद कमल कठिन मगु जानी । गहबरि हृदयँ कहहिं बर बानी ॥

स्त्रिया प्रेमामुळे व्याकूळ होत होत्या. जणू संध्याकाळी चकवी भावी वियोगाच्या दुःखाने दुःखी होत होत्या. यांच्या कोमल चरणकमलांसाठी तो मार्ग कठीण मानून त्या व्यथित अंतःलरणाने बोलू लागल्या, ॥ १ ॥

परसत मृदुल चरन अरुनारे । सकुचति महि जिमि हृदय हमारे ॥

जौं जगदीस इन्हहि बनु दीन्हा । कस न सुमनमय मारगु कीन्हा ॥

‘ यांच्या कोमल व लालसर पावलांच्या स्पर्शाने पृथ्वीलाही आमच्या हृदयाप्रमाणे संकोच वाटत असावा. जगदीश्र्वराला जर यांना वनवास द्यायचाच होता, तर सर्व रस्ते पुष्पमय का बरे बनविले नाहीत ? ॥ २ ॥

जौं मागा पाइअ बिधि पाहीं । ए रखिअहिं सखि आँखिन्ह माहीं ॥

जे नर नारि न अवसर आए । तिन्ह सिय रामु न देखन पाए ॥

जर ब्रह्मदेव मागू ते देणार असेल, तर त्याला आम्ही मागू की, यांना आमच्या डोळ्यांतच बसव. ‘ जे स्त्री-पुरुष या प्रसंगी आले नव्हते, त्यांना सीतारामांना पाहाता आले नाही. ॥ ३ ॥

सुनि सुरुपु बूझहिं अकुलाई । अब लगि गए कहॉं लगि भाई ॥

समरथ धाइ बिलोकहिं जाई । प्रमुदित फिरहिं जनमफलु पाई ॥

जे आले नव्हते ते व्याकूळ होऊन विचारत की, आतापर्यंत ते कुठवर पोहोचले असतील ? त्यात जे सशक्त होते ते धावत जाऊन त्यांचे दर्शन घेत होते आणि जन्माचे सार्थक झाले, असे समजून विशेष आनंदाने येत होते. ॥ ४ ॥

दोहा—अबला बालक बृद्ध जन कर मीजहिं पछिताहिं ।

होहिं प्रेमबस लोग इमि रामु जहॉं जहँ जाहिं ॥ १२१ ॥

गर्भवती व बाळंतिणी इत्यादी असमर्थ स्त्रिया, मुले व म्हातारे-कोतारे त्यांचे दर्शन न मिळाल्याने हात चोळत पश्र्चात्ताप करीत होते. अशा प्राकरे श्रीराम जेथे जेथे जात होते, तेथील लोक प्रेममग्न होत होते. ॥ १२१ ॥

गॉंव गॉंव अस होइ अनंदू । देखि भानुकुल कैरव चंदू ॥

जे कछु समाचार सुनि पावहिं । ते नृप रानिहि दोसु लगावहिं ॥

सूर्यकुलरुपी कुमुदिनीला प्रफुल्लित करणार्‍या चंद्रमास्वरुप असलेल्या श्रीरामांचे दर्शन घेतल्याने गावोगावी आनंद होत होता. यांना वनवास दिल्याचे ज्यांना समजत होते, ते राजा दशरथा व राणी कैकेयीला दोष देत होते. ॥ १ ॥

कहहिं एक अति भल नरनाहू । दीन्ह हमहि जोइ लोचन लाहू ॥

कहहिं परसपर लोग लोगाईं । बातें सरल सनेह सुहाईं ॥

कोणी म्हणे राजा फार चांगला आहे, त्यांनी यांना पाठविल्यामुळे आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले.’ सर्व स्त्री-पुरुष आपापसात सरळ भावाने स्नेहपूर्ण गोष्टी बोलत होते. ॥ २ ॥

ते पितु मातु धन्य जिन्ह जाए । धन्य सो नगरु जहॉं तें आए ॥

धन्य सो देसु सैलु बन गाऊँ । जहँ जहँ जाहिं धन्य सोइ ठाऊँ ॥

ते म्हणत की, ‘ ते माता-पिता धन्य होत, ज्यांनी यांना जन्म दिला. ते नगर धन्य होय, जेथून हे आले आहेत. तो देश, पर्वत, वन आणि गावे धन्य होत आणि ती स्थाने धन्य होत, जिथे जिथे हे जात आहेत. ॥ ३ ॥

सुखु पायउ बिरंचि रचि तेही । ए जेहि के सब भॉंति सनेही ॥

राम लखन पथि कथा सुहाई । रही सकल मग कानन छाई ॥

ब्रह्मदेवानें त्यांना उत्पन्न करुन समाधान मिळविले, ज्यांचे हे श्रीराम सर्वप्रकारे स्नेही आहेत. वाटसरु बनलेल्या श्रीराम व लक्ष्मण यांच्या सुंदर कथा सर्व मार्गांवर व जंगलात पसरल्या. ॥ ४ ॥

दोहा—एहि बिधि रघुकुल कमल रबि मग लोगन्ह सुख देत ।

जाहिं चले देखत बिपिन सिय सौमित्रि समेत ॥ १२२ ॥

रघुकुलरुपी कमलाला उमलविणारे सूर्य असलेले श्रीरामचंद्र अशा प्रकारे मार्गातील लोकांना सुख देत, सीता व लक्ष्मण यांचेसह वने पाहात चालले होते. ॥ १२२ ॥

आगें रामु लखनु बने पाछें । तापस बेष बिराजत काछें ॥

उभय बीच सिय सोहति कैसें । ब्रह्म जीव बिच माया जैसें ॥

पुढे श्रीराम आहेत, मागे लक्ष्मण होता. तपस्व्यांचा वेष घेतलेले दोघे फार शोभून दिसत होते. दोघांच्यामध्ये अशी शोभत होती की, ज्याप्रमाणे ब्रह्म व जीव यांच्यामध्ये माया असते. ॥ १ ॥

बहुरि कहउँ छबि जसि मन बसई । जनु मधु मदन मध्य रति लसई ॥

उपमा बहुरि कहउँ जियँ जोही । जनु बुध बिधु बिच रोहिनि सोही ॥

आता मी जसे रुप माझ्या मनात योजले आहे, ते सांगतो. जणू वसंतऋतू आणि कामदेव यांच्यामध्ये रती शोभून दिसते. मग आपल्या हृदयात शोधून उपमा सांगतो की, जणू चंद्राचा पुत्र बुध व चंद्रमा यांच्यामध्ये चंद्राची पत्नी रोहिणी शोभून दिसत आहे. ॥ २ ॥

प्रभु पद रेख बीच बिच सीता । धरति चरन मग चलति सभीता ॥

सीय राम पद अंक बराएँ । लखन चलहिं मगु दाहिन लाएँ ॥

प्रभू श्रीरामचंद्रांच्या भूमीवर अंकित होणार्‍या दोन्ही चरण-चिह्नांच्या मधल्या मोकळ्या जागेत पाय ठेवीत, भगवंताच्या चरणचिह्मांवर पाय पडू नये, म्हणून सावधणे वाटेत चालत होती. आणि लक्ष्मण हा मर्यादा पाळण्यासाठी सीता व रामचंद्र या दोघांच्या चरणचिह्नांना टाळून त्यांना उजवीकडे ठेवीत मार्गक्रमण करीत होता. ॥ ३ ॥

राम लखन सिय प्रीति सुहाई । बचन अगोचर किमि कहि जाई ॥

खग मृग मगन देखि छबि होहीं । लिए चोरि चित राम बटोहीं ॥

श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या सुंदर प्रेमाचे वर्णन हा काही वाणीचा विषय नव्हे. मग ते कसे सांगता येईल ? पक्षी आणि पशू हे सुद्धा त्यांना पाहून प्रेमानंदांत मग्न होत होते. पथिक असलेल्या श्रीरामांनी त्यांचे चित्त चोरुन घेतले होते. ॥ ४ ॥

दोहा—जिन्ह जिन्ह देखे पथिक प्रिय सीय समेत दोउ भाइ ।

भव मगु अगमु अनंदु तेइ बिनु श्रम रहे सिराइ ॥ १२३ ॥

सीतेसह असलेल्या त्या प्रिय पांथस्थ भावांना ज्या ज्या लोकांनी पाहिले, त्यांनी जन्म-मृत्युरुपी संसारात भटकवणारा भयानक दुर्गम मार्ग कष्टाविना आनंदाने पार केला ॥ १२३ ॥

अजहुँ जासु उर सपनेहुँ  काऊ । बसहुँ लखनु सिय रामु बटाऊ ॥

राम धाम पथ पाइहि सोई । जो पथ पाव कबहुँ मुनि कोई ॥

आजही ज्यांच्या हृदयात स्वप्नामध्ये का होईना कधी लक्ष्मण, सीता व राम हे पथिक येतात, त्यांनासुद्धा श्रीरामांच्या परमधामाचा मार्ग मिळतो. जो मार्ग कधी कोणा थोड्या मुनींनाच मिळतो. ॥ १ ॥

तब रघुबीर श्रमित सिय जानी । देखि निकट बटु सीतल पानी ॥

तहँ बसि कंद मूल फल खाई । प्रात नहाइ चले रघुराई ॥

श्रीरामांनी सीतेला थकलेली पाहून आणि जवळच एक वटवृक्ष आणि थंड पाणी पाहून तेथे त्या दिवशी मुक्काम केला. कंद, मुळे, फळे खाऊन, रात्रभर तेथे राहून प्रातःकाळी स्नान करुन श्रीराम पुढे चालले. ॥ २ ॥

देखत बन सर सैल सुहाए । बालमीकि आश्रम प्रभु आए ॥

राम दीख मुनि बासु सुहावन । सुंदर गिरि काननु जलु पावन ॥

संदर वनें, तलाव आणि पर्वत पाहात-पाहात प्रभू श्रीराम वाल्मीकींच्या आश्रमात आले. श्रीरामांनी पाहिले की, मुनींचा आश्रम फारच चांगला आहे. येथे सुंदर पर्वत, वने व पवित्र पाणी आहे. ॥ ३ ॥

सरनि सरोज बिटप बन फूले । गुंजत मंजु मधुप रस भूले ॥

खग मृग बिपुल कोलाहल करहीं । बिरहित बैर मुदित मन चरहीं ॥

सरोवरामध्ये कमळे व वनामध्ये फुले उमललेली आहेत. मकरंद-रसामुळे धुंद झालेले भ्रमर गुंजारव करीत आहेत. पुष्कळसे पक्षी व पशू कोलाहल करीत आहेत आणि आपले वैर सोडून प्रसन्न मनाने वावरत आहेत. ॥ ४ ॥

दोहा—सुचि सुंदर आश्रमु निरखि हरषे राजिवनेन ।

सुनि रघुबर आगमनु मुनि आगें आयउ लेन ॥ १२४ ॥

तो पवित्र व सुंदर आश्रम पाहून कमलनयन श्रीरामचंद्रांना हर्ष झाला. रघुश्रेष्ठ श्रीरामांचे आगमन झाल्याचे ऐकून वाल्मीकी मुनी त्यांना घेण्यासाठी आले. ॥ १२४ ॥

मुनि कहुँ राम दंडवत कीन्हा । आसिरबादु बिप्रबर दीन्हा ॥

देखि राम छबि नयन जुड़ाने । करि सनमानु आश्रमहिं आने ॥

श्रीरामांनी मुनींना दंडवत प्रणाम केला. विप्रश्रेष्ठ मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला. श्रीरामांचे लावण्य पाहून मुनींच्या नेत्रांना समाधान वाटले. मोठ्या सन्मानाने ते त्यांना घेऊन आश्रमांत आले. ॥ १ ॥

मुनिबर अतिथि प्रानप्रिय पाए । कंद मूल फल मधुर मगाए ॥

सिय सौमित्रि राम फल खाए । तब मुनि आश्रम दिए सुहाए ॥

श्रेष्ठ मुनी वाल्मिकींनी प्राणप्रिय पाहुणे आल्यामुळे त्यांच्यासाठी मधुर कंद, मुळे आणि फळे मागविली. सीता, लक्ष्मण व रामचंद्रांनी फळे घेतली. मग मुनींनी त्यांना विश्रांतीसाठी सुंदर स्थान दाखविले. ॥ २ ॥

बालमीकी मन आनँदु भारी । मंगल मूरति नयन निहारी ॥

तब कर कमल जोरि रघुराई । बोले बचन श्रवन सुखदाई ॥

मुनी श्रीरामांच्याजवळ बसले. त्यांची मंगलमूर्ति पाहून मुनी वाल्मिकींना मनातून फार मोठा आनंद होत होता. तेव्हा श्रीराम कमलसदृश हात जोडून कानांना सुखदायक मधुर शब्द बोलले - ॥ ३ ॥

तुम्ह त्रिकाल दरसी मुनिनाथा । बिस्व बदर जिमि तुम्हरें हाथा ॥

अस कहि प्रभु सब कथा बखानी । जेहि जेहि भॉंति दीन्ह बनु रानी ॥

‘ हे मुनिनाथ, तुम्ही त्रिकालदर्शी आहात तुमच्यासाठी

 संपूर्ण जग हे तळहातावर ठेवलेल्या बोरासारखे प्रत्यक्ष

 आहे. ‘ प्रभू श्रीरामचंद्रांनी नंतर कशाप्रकारे कैकेयीने
 वनवास दिला, ती कथा विस्ताराने सांगितली. ॥ ४ ॥


Custom Search

No comments:

Post a Comment