Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 22 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २२

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 22 
Doha 125 and 130 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २२ 
दोहा १२५ आणि १३०

दोहा—तात बचन पुनि मातु हित भाइ  भरत अस राउ ।

मो कहुँ दरस तुमहार प्रभु सबु मम पुन्य प्रभाउ ॥ १२५ ॥

आणि म्हटले, ‘ हे प्रभो, पित्याच्या आज्ञेचे पालन, मातेचे हित आणि भरतासारख्या प्रेमळ व धर्मात्मा भावाने राजा होणे आणि तुमचे दर्शन घडणे या सर्व गोष्टी माझ्या पुण्याच्या प्रभावामुळे घडल्या आहेत. ॥ १२५ ॥

देखि पाय मुनिराय तुम्हारे । भए सुकृत सब सुफल हमारे ॥

अब जहँ राउर आयसु होई । मुनि उदबेगु न पावै कोई ॥

हे मुनिराज, तुमच्या चरणांचे दर्शन झाल्याने आज आमचे सर्व पुण्य सफल झाले. आता आपण जेथे कोणत्याही मुनीला त्रास होणार नाही, ॥ १ ॥

मुनि तापस जिन्ह तें दुखु लहहीं । ते नरेस बिनु पावक दहहीं ॥

मंगल मूल बिप्र परितोषू । दहइ कोटि कुल भूसुर रोषू ॥

कारण ज्यांच्यामुळे मुनी व तपस्वी यांना त्रास होतो, ते राजे अग्नीशिवायच आपल्या दुष्ट कर्मामुळे जळून भस्म होतात. ब्राह्मणांचा संतोष हा सर्व मांगल्याचे मूळ आहे आणि ब्राह्मणांचा क्रोध कोट्यावधी कुलांना भस्म करुन टाकतो. ॥ २ ॥

अस जियँ जानि कहिअ सोइ ठाऊँ । सिय सौमित्रि सहित जहँ जाऊँ ॥

तहँ रचि रुचिर परन तृन साला । बास करौं कछु काल कृपाला ॥

असा विचार करुन असे स्थान सांगा की, मी, लक्ष्मण व सीता यांचेसह तेथे राहू शकेन. तेथे सुंदर पाने व गवताची कुटी बनवून हे दयाळू ! काही दिवस आम्ही तेथे राहू शकू.’ ॥ ३ ॥

सहज सरल सुनि रघुबर बानी । साधु साधु बोले मुनि ग्यानी ॥

कस न कहहु अस रघुकुलकेतू । तुम्ह पालक संतत श्रुति सेतू ॥

श्रीरामांची सहज सरळ वाणी ऐकून ज्ञानी मुनी वाल्मीकी म्हणाले, ‘ धन्य, धन्य, हे रघुकुलाचे ध्वजस्वरुप, तुम्ही असे का बरे म्हणणार नाही ? तुम्ही सदैव वेदांच्या मर्यादेचे पालन करता. ॥ ४ ॥

छं०—श्रुति सेतु पालक राम तुम्ह जगदीस माया जानकी ।

जो सृजति जगु पालति हरति रुख पाइ कृपानिधान की ॥

जो सहससीसु अहीसु महिधरु लखनु सचराचर धनी ।

सुर काज धरि नरराज तनु चले दलन खल निसिचर अनी ॥

हे राम, तुम्ही वेदांच्या मरयादेचे रक्षक असणारे जगदीश्वर आहात व तुमची स्वरुपभूत माया सीता आहे. जी कृपेचे भांडार असलेली सीतादेवी तुमचा कल पाहून जगाचे सृजन, पालन व संहार करते. जो हजार मस्तकांचा सर्पांचा स्वामी आणि शिरावर पृथ्वीला धारण करणारा आहे, तोच चराचराचा स्वामी शेष, हा लक्ष्मण आहे, देवांचे कार्य करण्यासाठी राजाचे शरीर धारण करुन दुष्ट राक्षसांच्या सेनेचा नाश करण्यासाठी तुम्ही निघाला आहात.

सो०—राम सरुप तुम्हार बचन अगोचर बुद्धिपर ।

अबिगत अकथ अपार नेति नेति नित निगम कहु ॥ १२६ ॥

हे राम, तुमचे स्वरुप वाणीला अगोचर , बुद्धीच्या पलीकडे, अव्यक्त, अकथनीय आणि अपार आहे. वेद नित्य ‘ नेति नेति ‘ म्हणून त्याचे वर्णन करतात. ॥ १२६ ॥ 

जगु पेखन तुम्ह देखनिहारे । बिधि हरि संभु नचावनिहारे ॥

तेउ न जानहिं मरमु तुम्हारा । औरु तुम्हहि को जाननिहारा ॥

हे राम, जगत हे दृश्य आहे आणि तुम्ही त्याचे द्रष्टे आहात. तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांनाही नाचविणारे आहात. ते सुद्धा तुमचे रहस्य जाणत नाहीत. तर दुसरा कोण तुम्हांला जाणणारा आहे ? ॥ १ ॥

सोइ जानइ जेहि देहु जनाई । जानत तुम्हहि तुम्हइ  होइ जाई ॥

तुम्हरिहि कृपॉं तुम्हहि रघुनंदन । जानहिं भगत भगत उर चंदन ॥

तोच तुम्हांला जाणतो की, ज्याला तुम्ही जाणवून देता आणि जाणताच तो तुमचे स्वरुप बनून जातो. हे रघुनंदन, हे भक्तांचे हृदय शीतल करणार्‍या चंदना, तुमच्या कृपेमुळेच भक्त तुम्हांला जाणू शकतात. ॥ २ ॥

चिदानंदमय देह तुम्हारी । बिगत बिकार जान अधिकारी ॥

नर तनु धरेहु संत सुर काजा । कहहु करहु जस प्राकृत राजा ॥

तुमचा देह चिदानंदमय आहे, तो प्रकृतिजन्य पंचमहाभूतांनी बनलेला व कर्मबंधनयुक्त त्रिदेहविशिष्ट मायिक नव्हे. शिवाय तो उत्पत्ति-नाश, वृद्धि-क्षय इत्यादी सर्व विकारांनी रहित आहे. हे रहस्य अधिकारी पुरुषच जाणतात. तुम्ही देव आणि संतांच्या कार्यासाठी दिव्य नर-शरीर धातण केले आहे आणि प्राकृत राजांप्रमाणे बोलत व वागत आहात. ॥ ३ ॥

राम देखि सुनि चरित तुम्हारे । जड़ मोहहिं बुध होहिं सुखारे ॥

तुम्ह जो कहहु करहु सबु सॉंचा । जस काछिअ तस चाहिअ नाचा ॥

हे राम, तुमचे चरित्र पाहून व ऐकून मूर्ख लोकांना मोह पडतो व ज्ञानीजन सुखी होतात. तुम्ही जे बोलता व करता , ते सर्व सत्यच असते. कारण जसे सोंग घ्यावे, तसेच नाचायलाही हवे ना ! ॥ ४ ॥

दोहा—पूँछेहु मोहि कि रहौं कहँ मैं पूँछत सकुचाउँ ।

जहँ न होहु तहँ देहु कहि तुम्हहि देखावौं ठाउँ ॥ १२७ ॥

तुम्ही मला विचारले की, ‘ मी कुठे राहू ?’ परंतु मला हे विचारतांना संकोच वाटतो की, जिथे तुम्ही नाही आहात, ते स्थान तरी सांगा. मग मी तुम्हांला राहणयासाठी स्थान दाखवितो. ‘ ॥ १२७ ॥

सुनि मुनि बचन प्रेम रस साने । सकुचि राम मन महुँ मुसुकाने ॥

बालमीकि हँसि कहहिं बहोरी । बानी मधुर अमिअ रस बोरी ॥

मुनींचे हे प्रेमरसाने भरलेले शब्द ऐकून श्रीरामांनी रहस्य उघड होईल, म्हणून संकोचाने स्मितहास्य केले. वाल्मीकी हसून अमृतेसाने ओथंबलेल्या मधुर वाणीने म्हणाले, ॥ १ ॥

सुनहु राम अब कहउँ निकेता । जहॉं बसहु सय लखन समेता ॥

जिन्ह के श्रवन समुद्र समाना । कथा तुम्हारि सुभग सरि नाना ॥

हे प्रभो ! ऐका. आता मी सांगतो, तेथे तुम्ही सीता व लक्ष्मण यांच्यासह निवास करा. ज्यांचे समुद्राप्रमाणे कान तुमच्या सुंदर कथारुपी अनेक सुंदर नद्यांनी--॥ २ ॥

भरहिं निरंतर होहिं न पूरे । तिन्ह के हिय तुम्ह कहुँ गृह रूरे ॥

लोचन चातक जिन्ह करि राखे । रहहिं दरस जलधर अभिलाषे ॥

निरंतर भरत असतात, तरीही पूर्णपणे तृप्त होत नाहीत, ज्यांची हृदये ही सुंदर घरेआहेत आणि ज्यांनी आपले नेत्र चातक बनविले आहेत; जे तुमच्या दर्शनरुपी मेघासाठी सदा आसुसलेले असतात. ॥ ३ ॥

निदरहिं सरित सिंधु सर भारी । रूप बिंदु जल होहिं सुखारी ॥

तिन्ह कें हृदय सदन सुखदायक । बसहु बंधु सिय सह रघुनायक ॥

तसेच जे मोठमोठ्या नद्या, समुद्र, सरोवर यांना तुच्छ मानून तुमच्या सौंदर्यरुपी मेघाच्या एका थेंबाने सुखी होतात, हे रघुनाथ, त्या लोकांच्या हृदयरुपी सुखदायक भवनांमध्ये तुम्ही, लक्ष्मण व सीतेसह निवास करा. ॥ ४ ॥

दोहा—जसु तुम्हार मानस बिमल हंसिनि जीहा जासु ।

मुकताहल गुन गन चुनइ राम बसहु हियँ तासु ॥ १२८ ॥

तुमच्या कीर्तिरुपी निर्मल मानस सरोवरामध्ये ज्याची जीभ ही हंसी बनून तुमच्या गुणसमूरुपी मोत्यांचे सेवन करते, हे राम, तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. ॥ १२८ ॥

प्रभु प्रसाद सुचि सुभग सुबासा । सादर जासु लहइ नित नासा ॥

तुम्हहि निबेदित भोजन करहीं । प्रभु प्रसाद पट भूषन धरहीं ॥

ज्यांची नासिका हे प्रभू ! तुमच्या पवित्र व सुगंधित पुष्पादी सुंदर प्रसाद नित्य आदराने ग्रहण करते आणि जे तुम्हांला अर्पण करुन भोजन करतात, तसेच तुमचा प्रसाद समजुन वस्त्राभूषणे धारण करतात. ॥ १ ॥

सीस नवहिं सुर गुरु द्विज देखी । प्रीति सहित करि बिनय बिसेषी ॥

कर नित करहिं राम पद पूजा । राम भरोस हृदयँ नहिं दूजा ॥

ज्यांचे मस्तक देव, गुरु आणि ब्राह्मण यांना पाहून नम्रतेने व प्रेमाने वाकले, ज्यांचे हात नित्य हे श्रीराम, तुमच्या चरणांची पूजा करतात आणि ज्यांच्या हृदयात हे श्रीराम, तुमचाच भरवसा आहे, दुसरा नाही. ॥ २ ॥

चरन राम तीरथ चलि जाहीं । राम बसहु तिन्ह के मन माहीं ॥

मंत्रराजु नित जपहिं तुम्हारा । पूजहिं तुम्हहि सहित परिवारा ॥

तसेच ज्यांचे चरण श्रीराम, तुमच्या तीर्थांकडे ओढले जातात, हे राम, तुम्ही त्यांच्या मनामध्ये निवास करा. जे नित्य तुमचा मंत्रराज जपतात आणि परिवारासह तुमची पूजा करतात. ॥ ३ ॥

तरपन होम करहिं बिधि नाना । बिप्र जेवॉंइ देहिं बहु दाना ॥

तुम्ह तें अधिक गुरहि जियँ जानी । सकल भाएँ सेवहिं सनमानी ॥

ते अनेक प्रकारचे तर्पण व हवन करतात आणि ब्राह्मणांना भोजन घालून पुष्कळ दानें देतात. तसेच जे गुरुंना मनात तुमच्याहून अधिक मोठा मानून सर्वभावाने सन्मान करुन त्यांची सेवा करतात. ॥ ४ ॥

दोहा—सबु करि मागहिं एक फलु राम चरन रति होउ ।

तिन्ह कें मन मंदिर बसहु सिय रघुनंदन दोउ ॥ १२९ ॥

आणि ही सर्व कर्मे करुन या सर्वांचे फल म्हणून हेच मागतात की, श्रीरामांच्या चरणी आमचे प्रेम राहो. त्या लोकांच्या मन-मंदिरांत सीता व रघुकुलाला आनंदित करणारे तुम्ही दोघे निवास करा. ॥ १२९ ॥

काम कोह मद मान न मोहा । लोभ न छोभ न राग न द्रोहा ॥

जिन्ह कें कपट दंभ नहिं माया । तिन्ह कें हृदय बसहु रघुराया ॥

ज्यांना काम, क्रोध, मद, अभिमान आणि मोह नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, प्रीति-द्वेष नाही आणि कपट, दंभ व मायाही नाही, हे रघुराज, तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा.

सब के प्रिय सब के हितकारी । दुख सुख सरिस प्रसंसा गारी ॥

कहहिं सत्य प्रिय बचन बिचारी । जागत सोवन सरन तुम्हारी ॥

जे सर्वांचे प्रिय आहेत आणि सर्वांचे हित करणारे आहेत, ज्यांना दुःख, सुख व प्रशंसा आणि निंदा हे सर्व समान वाटते, जे विचारपूर्वक सत्य व प्रिय बोलतात आणि जे जागेपणी व झोपेत तुम्हांलाच शरण आलेले असतात, ॥ २ ॥

तुम्हहि छाड़ि गति दूसरि नाहीं । राम बसहु तिन्ह के मन माहीं ॥

जननी सम जानहिं परनारी । धनु पराव बिष तें बिष भारी ॥

तुम्हांला सोडून ज्यांना दुसरा कोणताही आश्रय नाही, हे रामा, तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. जे परस्त्रीला मातेसमान मानतात आणि परक्याचे धन ज्यांना विषापेक्षाही भयंकर विष वाटते, ॥ ३ ॥

जे हरषहिं पर संपति देखी । दुखित होहिं पर बिपति बिसेषी ॥

जिन्हहि राम तुम्ह प्रानपिआरे । तिन्ह के मन सुभ सदन तुम्हारे ॥

ज्यांना दुसर्‍याची संपत्ती पाहून आनंद वाटतो आणि दुसर्‍याची विपत्ती पाहून ज्यांना विशेष करुन दुःख होते आणि हे राम, ज्यांना तुम्ही प्राणासमान प्रिय आहात, त्यांचे मन तुम्हांला राहण्याजोगे पवित्र भवन आहे. ॥ ४ ॥

दोहा—स्वामि सखा पितु मातु गुर जिन्ह के सब तुम्ह तात ।

मन मंदिर तिन्ह कें बसहु सीय सहित दोउ भ्रात ॥ १३० ॥

हे तात, ज्यांचे स्वामी, सखा, पिता, माता आणि गुरु तुम्हीच आहात, त्यांच्या मनरुपी मंदिरात सीतेसह तुम्ही दोघे बंधू निवास करा. ॥ १३० ॥

अवगुन तजि सब के गुन गहहीं । बिप्र धेनु हित संकट सहहीं ॥

नीति निपुन जिन्ह कइ जग लीका । घर तुम्हार तिन्ह कर मनु नीका ॥

जे लोक अवगुण सोडून सर्वांचे गुण ग्रहण करतात, ब्राह्मण आणि गाय यांच्यासाठी संकटे सोसतात, नीतिनैपुण्याबद्दल जे जगात प्रमाण मानले जातात, त्यांचे सुंदर मन तुमचे घर होय. ॥ १ ॥

गुन तुम्हार समुझइ निज दोसा । जेहि सब भॉंति तुम्हार भरोसा ॥

राम भगत प्रिय लागहिं जेही । तेहि उर बसहु सहित बैदेही ॥

जो गुण हे तुमचे आणि अवगुण हे आपले, असे समजतो, ज्याला सर्व प्रकारे तुमचाच आधार वाटतो आणि रामभक्त ज्याला प्रिय आहेत, त्याच्या हृदयांत तुम्ही सीतेसह निवास करा. ॥ २ ॥

जाति पॉंति धनु धरमु बड़ाई । प्रिय परिवार सदन सुखदाई ॥

सब तजि तुम्हहि रहइ उर लाई । तेहि के हृदयँ रहहु रघुराई ॥

जात-पात, धन, धर्म, मोठेपणा, आवडता परिवार आणि सुख देणारे घर हे सर्व सोडून जो तुम्हांला हृदयात धारण करतो, हे रघुनाथ, तुम्ही त्याच्या हृदयात राहा. ॥ ३ ॥

सरगु नरकु अपबरगु समाना । जहँ तहँ देख धरें धनु बाना ॥

करम बचन मन राउर चेरा । राम करहु तेहि कें उर डेरा ॥

ज्याच्या दृष्टीने स्वर्ग, नरक व मोक्ष हे समान आहेत;

 कारण ज्याला जिकडे-तिकडे धनुष्यबाण धारण केलेले

 तुम्हीच दिसता आणि जो कर्म, वचन व मन यांच्याद्वारे

 सर्वस्वी तुमचा दास आहे, हे राम, तुम्ही त्याच्या हृदयात

 वास करा. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment