Tuesday, June 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग ५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 5 
Ovya 98 to 123 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ५ 
ओव्या ९८ ते १२३
मूळ श्लोक
,सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । 
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥
७) हे कौन्तेया, कल्पान्तीं सर्व भूतें माझ्या मायेप्रत जातात. त्यांना पुन्हां ( दुसर्‍या ) कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतों.
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती ।
एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरुपा ॥ ९८ ॥
९८) जिला प्रकृति असें नांव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगितली; एक आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरुपा म्हणून सांगितली. 
हा प्रकृतीवीखो आघवा । तुवां मागां परिसिलासे पांडवा ।
म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥ ९९ ॥
९९) हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना, तूं मागें ( अध्याय ७ वा, श्लोक ४-५ मध्ये ) ऐकला आहेस, म्हणून आतां तो राहूं दे. वारंवार कशाला सांगावयास पाहिजे ?    
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंतीं ।
सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ॥ १०० ॥
१००) तरी ही सर्व भूतें महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात.
ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं ।
मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥ १०१ ॥
१०१) ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेंत बीजासहित गवतें ज्याप्रमाणे पुनः भूमीमध्यें पूर्णपणें लीन होतात;
कां वार्षीये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे ।
तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥ १०२ ॥
१०२) अथवा वर्षाऋतूचें अवडंबर नाहीसें होतें व जेव्हां शरद् ऋतूचें झांकलेंपण नाहींसे होतें ( म्हणजे शरद् ऋतू जेव्हां लागतो ) तेव्हां सर्व मेघमात्र आकाशाच्या आकाशांत नाहीसे होतात.
नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे ।
कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥ १०३ ॥
१०३) अथवा आकाशाच्या घरांत वायु शांतच होऊन नाहीसा होतो; अथवा लाटेचा आकार पाण्यामध्यें ज्याप्रमाणे नाहींसा होतो;    
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे ।
तैसे प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयीं ॥ १०४ ॥
१०४) अथवा जागृति आली म्हणजे स्वप्न मनांतल्या मनांत नाहीसें होतें, त्याप्रमाणे कल्पाक्षयाच्या वेळीं प्रकृतिपासून झालेले सर्व जग पुनः प्रकृतीत लीन होतें. 
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती ।
तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ति आइक ॥ १०५ ॥
१०५) नंतर पुनः कल्पाच्या आरंभीं मीच सृष्टि उत्पन्न करतों, असे लोक बोलतात; तर याविषयीं खरा विचार ऐक. 
मूळ श्लोक
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥
८) ( मी ) आपल्या प्रकृतिचा अंगीकार करुन प्रकृतीच्या नियंत्रणामुळें पराधीन असलेलें सर्व भूतसमुदाय मी पुनः पुनः निर्माण करतो. 
तरी हेचि प्रकृति किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं ।
तेथ तंतूसमवायपटीं । जेविं विणावणी दिसे ॥ १०६ ॥
१०६) तर अर्जुना, या माझ्या मायेचा जेव्हां मी स्वभावतः अंगीकार करतों, तेव्हां सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणें विणकर दिसते,  
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहानां चौकडियां पटत्व भरे ।
तैसी पंचात्मकें आकारें । प्रकृतिचि होये ॥ १०७ ॥
१०७) त्या विणकरीच्या आधारानें, मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन, जसें वस्त्र होतें; तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकारानें प्रकट होते.  
जैसे विरजणियाचेनि संगे । दूधचि आटेजों लागे ।
तैसी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥ १०८ ॥
१०८) ज्याप्रमाणें विरजणाच्या संयोगानें पातळ दूध दहीरुपानें घट्ट होत जातें, त्याप्रमाणें प्रकृति सृष्टिपणाच्या आकाराला येते.  
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।
तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ॥ १०९ ॥
१०९) बीजाला पाण्याचें सान्निध्य मिळालें म्हणजे तें बीजच जसें लहानमोठ्या फांद्यांच्या रुपानें विस्ताराला पावतें, त्याप्रमाणें मला प्राणीमात्रांचे हें उत्पन्न करणें आहे. 
अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचेपण कीर आलें ।
परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात ॥ ११० ॥
११०) अरे अर्जुना, नगर हें राजानें रचलें, या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे ( असें म्हणण्याचा प्रघात आहे ); पण वास्तविक पाहिलें तर, नगर रचण्यांत राजाच्या हाताला ( कांही ) श्रम पडले आहेत काय ?  
आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे ।
मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥ १११ ॥
१११) आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतों तें कसें म्हणशील तर, जसा स्वप्नामध्यें जो असतो तोच जागृतावस्थेंत प्रवेश करतो, त्याप्रमाणें, 
तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता ।
की स्वप्नामाजी असतां । प्रवासु होय ॥ ११२ ॥
११२) तर आर्जुना, स्वप्नांतून जागृतींत येतांना त्याचे पाय दुखतात काय ? अथवा स्वप्नामध्यें असतांना प्रवास होतो काय ?  
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं ।
मज एकही करणें नाही । ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥
११३) या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर, भूतसृष्टीचें मला कांहीं एक देखील करावें लागत नाहीं; असाच याचा अर्थ आहे.   
जैशी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा ।
तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥
११४) ज्याप्रमाणें राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारांत वागते, त्याप्रमाणें प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो बाकी कर्तृत्व सर्व हिचें ( प्रकृतीचें ) आहे. 
पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरतें अपार दाटी । 
तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥ ११५ ॥
११५) पाहा कीं, अर्जुना, पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या भेटीनें समुद्र भरतीनें अफाट भरुन येतो; त्या भरती येण्यांत चंद्राला श्रम पडतात काय ?
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
कवण शीण भ्रामका । सन्निधानाचा ॥ ११६ ॥
११६) ( लोहचुंबकाच्या ) जवळपणानें अचेतन लोखंड हलतें तर हालेना का ? पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे श्रम लोहचुंबकाला काय पडले ?
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारीं ।
आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥
११७) फार काय सांगावें ? याप्रमाणें मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगानें ती प्रकृति भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करुंच लागते.  
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा ।
जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि ॥ ११८ ॥
११८) अर्जुना, हा जो प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या आधीन आहे. ज्याप्रमाणें बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमि ( जमिन ) समर्थ आहे;  
नातरी बाळादिकां वयसां । गोसावी देहसंगु जैसा ।
अथवा धनावळी आकाशा । वार्षियें जेवीं ॥ ११९ ॥
११९) अथवा बाल्यादि अवस्थांस जसा देहसंगाचा आधार आहे. किंवा ज्याप्रमाणें मेघांची फळी येण्यास वर्षाऋतू आधारभूत आहे. 
कां स्वप्नासि कारण निद्रा । तैशी प्रकृति हे नरेंन्द्रा ।
या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥ १२० ॥
१२०) अथवा स्वप्नाला कारण जशी झोंप आहे. त्याचप्रमाणें हे श्रेष्ठ पुरुष, या सर्वहि भूतसमुदायाची मालकीण प्रकृति आहे.   
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा ।
हें असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥
१२१) स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना अथवा लहानांना, हे राहूं दे, सर्व भूतसमुदायांस प्रकृतीच मूळ आहे.    
म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं ।
इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥ १२२ ॥
१२२) म्हणून भूतें उत्पन्न करावींत, अथवा उत्पन्न केलेलीं भूतें रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळींच येत नाही.  
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली ।
तेंविं मातें पावोनि ठेलीं । दुरी कर्में ॥ १२३ ॥
१२३) पाण्यामध्यें चांदण्याच्या वेली पसरलेल्या दिसतात ! त्या वेली वाढविण्याचे काम जसें चंद्रानें केलें नाहीं, त्याप्रमाणें ( जगाची उत्पत्ति, स्थिती वगैरे ) कर्म माझ्या पासून दूर राहिलें आहें. 



Custom Search

No comments:

Post a Comment