Friday, August 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 12 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १२

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 9 Part 12 
Ovya 307 to 343 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १२ 
ओव्या ३०७ ते ३४३

मूळ श्लोक

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्र्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २० ॥

२०) तीन वेद जाणणारे, ( यज्ञामध्यें ) सोमपान करणारे ( व तेणेंकरुन ) पाप नष्ट झालेले याज्ञिक, हे यज्ञांनीं माझें यजन करुन स्वर्गगति मागतात; पुण्याचें फल असा जो देवेन्द्राचा लोक, तो प्राप्त करुन, ते या स्वर्गालोकीं दिव्य असे देवांचे भोग भोगतात.     

देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी ।

विविधमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥ ३०७ ॥

३०७) पाहा, अरे अर्जुना, आश्रमधर्माच्या आचरणानें विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात ( ज्यांच्या आचरणवरुन वागण्याचा विधि कळतो )     

यजन करितां कौतुकें । तिही वेदांचा माथा तुके ।

क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥ ३०८ ॥

३०८) ते सहज लीलेनें यज्ञ करावयास लागले असता, तिन्ही वेद आपली मान डोलवितात व ज्यांच्यापुढें ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी राहाते.

ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरुप ।

तिहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिले देखें ॥ ३०९ ॥

३०९) यप्रमाणें जे यज्ञांत सोमरसाचें पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ति झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणार्‍या त्या पुण्याच्या नांवानें वास्तविक पापांचा लाभ पदरांत पाडून घेतला असें समज.    

जे श्रुतित्रयातें जाणोनि । शतवरी यज्ञ करुनि ।

यजिलिया मातें चुकोनि । स्वर्गु वरिती ॥ ३१० ॥

३१०) कारण कीं, त्यांनी ऋग्वेदादि तिन्ही वेदांना जाणून, शंभरापर्यंत यज्ञ करुन, माझें आराधन करुन मला अजिबात विसरुन ते स्वर्गच पसंत करतात.

जैसें कल्पतरुतळवटीं । बैसोनि झोळिये पाडी गांठी ।

मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करुं ॥ ३११ ॥

३११) कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गांठी मारतो आणि मग अर्जुना, तो अभागी पुरुष ज्याप्रमाणें भीक मागण्यासच निघतो, 

तैसें शरक्रतूं यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें ।

आतां पुण्य की हें निरुतें । पाप नोहे ॥ ३१२ ॥

३१२) त्याप्रमाणें शंभर यज्ञ करुन त्यानीं माझें आराधन केलें आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करुं लागले. आतां हें पुण्य आहे का ? ( तर ) खरोखर हें पाप नव्हें कय ? 

म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु ।

ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥ ३१३ ॥

३१३) म्हणून माझी प्राप्ति करुन न घेतां, स्वर्गाची प्राप्ति करुन घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात.

एर्‍हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम की सुख ।

वांचूनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरुप माझें ॥ ३१४ ॥

३१४) एर्‍हवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टि देऊन स्वर्गाला सुख हें नांव आलें आहे वास्तविक पाहिलें असतां अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकालाबाधित आनंद तें माझे स्वरुप आहे.

मज येता पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा ।

स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५ ॥

३१५) अर्जुना, माझ्याकडे येत असतांना माझ्या स्वरुपापासून भलतीकडे नेणार्‍या स्वर्ग व नरक, या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत. 

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे ।

मग मातें जेणे पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥

३१६) पुण्यरुप पापानें ( बाहेरुन दिसायला पुण्य व आंतून भरलेले पाप ) स्वर्गाला येतां येंते; आणि ( आंतबाहेर जें पाप अशा ) पापरुप पापानें नरकाला जाणें होतें, मग माझी प्राप्ति ज्यानें होते, तें शुद्ध पुण्य होय.   

आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता ।

तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥ ३१७ ॥

३१७) आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरुपामध्यें असतांना ज्या कृत्यानें मी परमात्मा दुरावला जातों, त्या कृत्याला पुण्य असें म्हटलें असतां जीभ झडणार नाहीं का ?

परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरी ते दीक्षित ।

यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥

३१८) परंतु या प्रसंगीं आतां हें राहूं दे. अर्जुना, ऐक. याप्रमाणें ते यज्ञ करणारे ( वस्तुतः ) माझी आराधना करतात; पण स्वर्गांतील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात,  

मग मी न पविजे ऐसें । जें पापरुप पुण्य असे ।

तेणें लाधलेनि सोरसें । स्वर्गा येती ॥ ३१९ ॥

३१९) मग मी ज्याच्या योगानें प्राप्त होत नाहीं असें जे पापरुप पुण्य आहे, त्याच्या योगानें मिळालेल्या योग्यतेनें ते स्वर्गाला येतात.

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।

राजधानीभुवन । अमरावती ॥ ३२० ॥

३२०) ज्या स्वर्गांत न मरणें हेंच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व अमरावतीनगर ही राजधानी आहे;

जेथ महासिद्धीचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।

जियें गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥

३२१) ज्या स्वर्गांत अणिमा, लघिमा इत्यादि महासिद्धींची भांडारें आहेत, अमृताची कोठारें आहेत व ज्या गांवात कामधेनूचे कळप आहेत;

जेथ वोळगे देव पाइका । सैंध चिंतामणीचिया भूमिका ।

विनोदवनवाटिका । सुरतरुंचिया ॥ ३२२ ॥

३२२) ज्या स्वर्गांत देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतात, जेथें जिकडे तिकडे चिंतामणी नांवाच्या रत्नांच्या जमिनी आहेत, जेथें करमणुकीकरितां कल्पवृक्षांचे बगीचे केलेले आहेत,

गंधर्वगान गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणी ।

उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥ ३२३ ॥

३२३) जेथे गंधर्वांची गाणीं हीच गाणीं आहेत; व जेथें रंभेसारख्या अप्सरा नाचणार्‍या आहेत; आणि विलास करण्याकरितां ज्या स्त्रिया आहेत, त्यांत मुख्य उर्वशी आहे; 

मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांवरें ।

पवना ऐसें म्हणियारें । धावणें जेथ ॥ ३२४ ॥

३२४) जेथें शय्यागृहांत मूर्तिमंत मदन सेवाचाकरी करतो; ज्या ठिकाणीं प्रत्यक्ष चंद्र ( आपल्या अमृतकिरणांनी ) सडासंमार्जन करतो व वार्‍यासारखा चपळ जासूद जेथें म्हटलेलें ( काम ) करण्याला तयार आहे;

पैं बृहस्पति आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण ।

तटियेचे सुरगण । विकार जेथ ॥ ३२५ ॥

३२५) आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथें आहेत व जेथें पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत;

लोकपाळरांगेचे । राउत जिये पदींचे ।

उचेःश्रवा खांचे । खोलणिये ॥ ३२६ ॥

३२६) ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या ( पूर्वादि दिशांच्या इंद्रादिक स्वामींच्या ) बरोबरीचे आहेत, जेथे उच्चैःश्रवा नांवाचा इंद्राचा घोडा पुढें चालतो;

हें बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे ।

ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥ ३२७ ॥ 

३२७) हें फार वर्णन करणें पुरें. याप्रमाणें इंद्राच्या सुखासारखे ते भोग, यज्ञकर्त्याच्या पदरांत जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो; तेथपर्यंत भोगावयास मिळतात.

मूळ श्लोक

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥

२१) तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झालें म्हणजे, ते मृत्युलोकीं प्रवेश करतात. विषयांची इच्छा करुन, तीन वेदांनी सांगितलेल्या फलरुपी धर्माला अनुसरुन, कर्ममार्ग आचरण करणारांना, याप्रकारे येणेजाणें ( जन्ममृत्यु ) प्राप्त होतें. 

मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।

आणि येऊं लागती मागारें । मृत्युलोका ॥ ३२८ ॥

३२८) मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहींसा झाला, म्हणजे त्याबरोबरच यज्ञकार्यांत असलेलें इंद्राच्या ऐश्वर्याचें तेज नाहीसें होतें , आणि मग ते मृत्यु लोकाला परत येऊं लागतात.

जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें ।

तैसें लाजिरवाणे दीक्षितांचें । काय सांगों ॥ ३२९ ॥

३२९) ज्याप्रमाणें वेश्येच्या नादांत पैसा नाहींसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीहि सोय राहात नाही; त्याप्रमाणें ( पुण्याची पुंजी सरलेल्या ) यज्ञकर्त्याची स्थिति लज्जास्पद आहे; त्याचें काय वर्णन करावे ?

एवं थितिया मातें चुकले । जिद्दीं पुण्यें स्वर्ग कामिले ।

तयां अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु ॥ ३३० ॥

३३०) याप्रमाणें ज्यांनीं पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हांव धरली, ते अमरपणहि व्यर्थ गेलें असतां त्यांना ( पूर्वींचा ) मृत्युलोक पुन्हा प्राप्त झाला.

मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं ।

उकडूनि नचमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥

३३१) आईच्या उदररुपी गुहेंत, नरकाच्या उकडीतील थरांत, नऊ महिनेपर्यंत उकडून पुनः पुन्हां जे जन्माला येऊन ( पुन्हां ) मरतात, 

अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें ।

तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥

३३२) अर्जुना, स्वप्नामध्यें द्रव्याचा ठेवा सापडतो. पण जागें झालें असतां तो सर्व नाहींसा होतो, त्याप्रमाणें वेद जाणणार्‍या यज्ञकर्त्याचें स्वर्गसुख समजावें.

अर्जुना वेदु जर्‍हीजाहला । तरी मातें नेणता वायां गेला ।

कणु सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३ ॥

३३३) ज्याप्रमाणें धान्य टाकुन नुसता कोंडा उफणावा, त्याप्रमाणें अर्जुना, मला जाणलें नाहीं तर, प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय. 

म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण ।

आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥

३३४) म्हणून एका मला टाकून केलेलें तिन्ही वेदांनी सांगितलेले, धर्म ( ज्योतिष्टोमादिक यज्ञकर्में ) निरर्थक आहेत. यास्तव अर्जुना, मला एक जाणलेंस, मग जरी दुसरें कांहीं जाणलें नाहीस, तरी तूं सुखी होशील.

मूळ श्लोक

अनन्याश्चियन्तो मां ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥

२२) एकनिष्ठेनें माझें चिंतन करुन जे लोक माझी उपासना करतात, त्या सतत ( माझ्या ठिकाणीं ) युक्त असलेल्या लोकांचा ( सायुज्य अथवा मत्सेवा यांपैकपाहिजे असेल त्या गोष्टीचा ) योग ( अप्राप्त वस्तूची प्राप्ति ) व क्षेम ( प्राप्त वस्तूचे  रक्षण ) मी करतों.

पैं सर्वभावेंसी उखितें । जे वोपिले मज चित्तें ।

जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणही नेणे ॥ ३३५ ॥

३३५) जे सर्व प्रकारच्या वृत्तींसहित चित्तानें मला उक्तेविकले गेले; ज्याप्रमाणे मातेच्या गर्भांतील मूल कोणत्याहि व्यवहाराला जाणत नाहीं,

तैंसा मीवाचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं ।

मजचि नाम पाहीं । जिणेया ठेविलें ॥ ३३६ ॥

३३६) त्याप्रमाणें माझ्याशिवाय दुसरें कांहीं ज्यांना चांगलेच वाटत नाही; आणि पाहा , ज्यांनी आपल्या जगण्यास माझेंच नांव ठेवलें आहे, ( ज्यांना माझ्या करतां जगण्यांत आपल्या जीविताची सार्थकता वाटते, ) 

ऐसे अनन्यगतिकें चितें । चिंतितसांते मातें ।

जे उपासिती तयांतें । मीचि सेवीं ॥ ३३७ ॥

३३७) याप्रमाणें एकनिष्ठ चित्तानें माझें चिंतन करीत असतां जें माझी उपासना करतात, त्यांची सेवा मीच करतो.

ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणी ।

तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥ ३३८ ॥

३३८) ते ज्या क्षण एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला.

मग तिहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें ।

जैशी अजातपक्षांचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥

३३९) मग जें जें म्हणून त्यांना करावयाचें असतें, तें सर्व मलाच करावें लागतें.असें पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्यानें पक्षीण जगते.   

आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।

तैसे अनुसरले जे मज प्राणें । तयांचेन काइसेनिहि न लजें मी ॥ ३४० ॥

३४०) आपली तहानभूक ( ज्याला ) काही कळत नाहीं; त्या लहान मुलाला जे हितकारक असेल तें आईलाच करणें भाग पडतें; त्या ( मूला ) प्रमाणें जें मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचें कांहीहि करण्यास मी लाजत नाहीं,   

तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड ।

कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुयें ॥ ३४१ ॥

३४१) त्यांना जर माझ्या एकरुपतेची इच्छा असेल, तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतों, किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील, तर आम्हां दोघांमध्यें प्रेम घालतो. ( म्हणजे सद्विषयक प्रेम त्यांना देतो )

ऐसा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागें तयां देवों ।

आणि दिधलियाचा निर्वाहो । तोही मीचि करीं ॥ ३४२ ॥

३४२) याप्रमाणें  ते जो जो हेतु मनांत धरतात, तो तो मी त्यांच्या पुढं पुढें होऊन त्यांना द्यावयास लागतो; आणि दिलेल्यांचें रक्षणहि मीच करतों,  

हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा ।

जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी ॥ ३४३ ॥       

३४३) ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे त्यांच्या

 ह्या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना, माझ्यावर येऊन

 पडतो. 

 



Custom Search

No comments:

Post a Comment