Saturday, September 11, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 19 Ovya 497 to 516 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १९ ओव्या ४९७ ते ५१६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 19 
Ovya 497 to 516
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १९ 
ओव्या ४९७ ते ५१६

आतां सुखेंसि जीविता । कैंची ग्राहिकी कीजेल पांडुसुता ।

काय राखोंडी फुंकितां । दिपु लागे ॥ ४९७ ॥

४९७) आतां अर्जुना, सुखानें जगणें, हा माल येथे  खरेदी कसा करतां येईल ? राखुंडी फुंकून कधीं दिवा लागला आहे काय ?  

अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी ।

तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥

४९८) अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल, तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचें नांव अमृत ठेवून ( त्याच्या सेवनानें ) ज्याप्रमाणें अमर होण्याची खात्री धरावी,

तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख ।

परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥

४९९) त्याप्रमाणें विषयांमध्यें जें सुख आहे, तें निव्वळ कडेलोटीचें दुःखच आहे. परंतु काय करावें ? लोक मूर्ख आहेत. विषयांचें सेवन केल्यावांचून त्यांचें चालतच नाहीं. 

कां शीस खांडुनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें ।   

 तैसे मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥ ५०० ॥

५००) किंवा आपलें मस्तक तोडून तें पायात पडलेल्या जखमेवर जसें बांधावें, तसें या मृत्युलोकांतील सर्व व्यवहार चालले आहेत.

म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां श्रवणीं ।

कैंची सुखनिद्रा आंथरुणी । इंगळांचां ॥ ५०१ ॥

५०१) एवढ्या करितां या मृत्यु लोकांत सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानानें ऐकतां येईल काय ? निखारे असणार्‍या अंथरुणावर आनंदानें झोप कोठून येणार ?

जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं ।

दुःख लेऊनी सुखाची आंगी । सळित जगातें ॥ ५०२ ॥

५०२) ज्या लोकांतील चंद्र क्षयरोगानें ग्रासलेला आहे, जेथें मावळण्याकरितां ( सूर्याचा ) उदय होत असतो; ( जेथें ) दुःख हें सुखाचा पोषाख करुन जगाला सारखें छळीत आहे; 

जेथे मंगळाचां अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोरी ।

म्रुत्यु उदराचां परिवरीं । गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥

५०३) जेथें मंगळरुप अंकुराबरोबरच त्यावर अमंगळ गोष्टीची कीड पडते व ( जेथें ) पोटांत असतांनाच गर्भाला मरण घेरतें;  

जें नाहीं तयांतें चिंतवी । तंव तेंचि नेईजे गंधवीं ।

गेलियाची कवणे गांवीं । शुद्धि न लभे ॥ ५०४ ॥

५०४) जे प्राप्त नाहीं त्याचें चिंतन करावयास ( मृत्युलोकची वस्ती ) लावते. ( बरें, तें प्राप्त झालें ) तेव्हां त्याच वेळीं ते गंधर्व ( अदृश्य पुरुष ) नेतात. बरें, तें घेऊन कोणाच्या गांवाला गेले त्याचा शोधहि लागत नाहीं. 

अगां गिवसितां आघवां वाटीं । परतलें पाउलचि नाहीं किरीटी ।

निमालियांचिया गोठी । तियें पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥

५०५) अरे अर्जुना, सर्व वाटांनीं शोध केला, तरी मृत्युच्या मुखांत गेलेल्यांचें एकहि पाऊल परत फिरलेलें दिसत नाहीं व जेथलीं पुराणें, ही सर्व गेलेल्यांच्याच गोष्टींनीं भरलेली आहेत.    

जेथींचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी ।

कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां ॥ ५०६ ॥

५०६) या मृत्युलोकाची रचना करणार्‍या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हें नाहींसे होणें, कसें सरसकट व्यापकआहे तें नीट ऐक. 

ऐसी लोकीची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक ।

तयांचिये निश्र्चिंतीचें कौतुक । दिसत असे ॥ ५०७ ॥

५०७) ( अशा तर्‍हेची ) ज्या लोकांतील वागणूक आहे, त्या लोकांना ज्यांनी जन्म घेतला आहे, त्या लोकांना बेफिकीरपणाचें मोठे नवल दिसलें ! 

पैं दृष्टादृष्टींचिये जोडी- । लागीं भांडवल न सुटे कवडी ।

जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥ ५०८ ॥

अरे, ज्यापासून इहपरलोकींचा लाभ होतो, त्याकरितां ( हे लोक ) एक कवडीदेखील भांडवल सोडीत नाहींत व ज्या ठिकाणीं सर्वस्वाची हानि होते, तेथे कोट्यावधि रुपये खर्च करतात.   

जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवायें पडिला सापें ।

जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥

५०९) जो अनेक विषयविलासांत निमग्न असतो, तो सध्या सुखांत आहे. असें म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झालेला आहे त्यास या जगांत ज्ञानी म्हणतात.

जयाचे आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय ।

तयाचे नमस्कारिती पाप । वडिल म्हणोनि ॥ ५१० ॥

५१०) ज्याचें आयुष्य थोडें उरलें आहे व त्याचप्रमाणें ज्यांची  बल आणि बुद्धि हीं नाहींशीं झालीं आहेत, अशा म्हातार्‍यास वडील म्हणून नमस्कार करतात.

जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव मोजें नाचती कोडें ।

आयुष्य निमालें अंतुलियेकडे । ते म्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥

५११) जसजसें मूल वयानें वाढत जातें ( वयानें मोठे होतें ) तसतसें त्याचे आईबाप वगैरे आनंदानें व कौतुकाने नाचतात. पण वरुन जरी ( तें मूल ) मोठें वाढतांना दिसलें, तरी वास्तविक पाहिलें तर आंतून ( त्याचें ) आयुष्य सरुन जात आहे, त्याची ( त्यांना ) खंतीच नाहीं.   

जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें 

कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ ५१२ ॥

५१२) जन्मल्यापासून दिवसेंदिवस तें मूल अधिकाधिक काळाच्या  तावडींत जातें; असें असून ( आईबाप ) आनंदानें त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंदप्रदर्शक गुढ्याहि उभारतात.   

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।

परि असवें जात न गणिती । गहिंसपणें ॥ ५१३ ॥

५१३) अरे अर्जुना, कोणी कोणाला ‘ तूं मर ‘ असें म्हटलें तर तें त्यास सहन होत नाही  आणि ( त्याच्या निवृत्तीचा उपाय न करतां ) मेल्यावर रडत बसतात. पण असलेलें आयुष्य व्यर्थ जात आहे. हे त्यांना मूर्खपणानें समजत नाही.

दर्दुर सापें गिळिजतु आहु उभा । कीं तो मासिया वेटाळी जिभा ।

तैसे प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥

५१४) बेडूक सापाकडून उभा गिळला जात असतांना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्यकरितां जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो, तशाच तर्‍हेनें प्राणी कोणत्या लोभानें तृष्णा वाढवितात कोण जाणे !     

अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकींचें उफराटें ।

एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥

५१५) अरेरे ! हे वाईट आहे ! मृत्यु लोकांतील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथें अकस्मात् जन्मला आहेस,                                  

तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।

जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ ५१६ ॥

५१६) तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा

 हो; आणि या भक्तीच्या मार्गाला लाग कीं, त्या भक्तीच्या

 योगानें माझें निर्दोष स्वरुप पाहशील.



Custom Search

1 comment:

  1. HI,
    Please do the translation of mantra garbita mrityunjaya stotra of vasudevananda saraswathi

    ReplyDelete