Saturday, September 11, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 18 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 18 
Ovya 475 to 496 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १८ 
ओव्या ४७५ ते ४९६

मूळ श्लोक

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥

३३) तर मग पुण्यशील ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणें आचरण करणारे राजे, हे उत्कृष्ट गति पावतील, यांत नवल काय ? अनित्य व सुखहीन असा हा ( मर्त्य ) लोक प्राप्त झाला असतां, तूं माझीच भक्ति कर.

मग वर्णामाजी छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार ।

मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥

४७५) मग चारहि वर्णामध्यें छत्रचामराप्रमाणें सर्वांच्या वर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरितां इनाम दिलेला आहे व जे वेदांतील मंत्ररुप विद्येचें माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण,   

जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी ।

जयाचिये दिठीचां उत्संगीं । मंगळ वाढे ॥ ४७६ ॥

४७६) जेथें ( ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी ) नेहमीं यज्ञाचें राहणें असतें, जें वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टिरुप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते;

जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव ।

सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जे ॥ ४७७ ॥

४७७) जें या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचें अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेलें देवच आहेत,

जयांचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळीं गेलें ।

संकल्पें सत्य जियालें । जयांचेनि ॥ ४७८ ॥

४७८) ज्यांच्या इच्छारुप ओढीनें, चांगलें कर्म हाच कोणी वेल, तो विस्तार पावला आहे; ज्यांच्या संकल्पानें सत्य जिवंत राहिलें आहे;

जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें ।

म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥

४७९) ज्यांच्या आशीर्वादानें अग्नीचें आयुष्य वाढलें, म्हणून समुद्रानें आपलें पाणी यांच्या प्रीतीकरितां दिले;

मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतलां हातीं ।

मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥ ४८० ॥

४८०) मी लक्ष्मीला सारुन पलीकडे केली, गळ्यांतील कौस्तुभ काढून हातांत घेतला व मग ज्यांच्या पायधुळीकरितां छातीचा खळगा पुढें केला,

आझूनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा ।

जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥ ४८१ ॥

४८१) अर्जुना, अजूनपर्यंत ( त्या ) पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणीं वागवीत आहें, ती मी कां वागवितों म्हणून म्हणशील, तर आपल्या षड्गुणैश्वर्यभाग्यरुप समुद्राचें रक्षक होण्याकरितां; 

जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा ।

जयांचां प्रसादीं फुकटा । जोडली सिद्धी ॥ ४८२ ॥

४८२) अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नि नावांच्या प्रळयकाळाच्या रुद्रदेवतेचें वसतिस्थान आहे व ज्याच्या प्रसन्नतेनें अष्ट महासिद्धि फुकट म्हणजे आनायासें प्राप्त होतात;  

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझां ठायीं अतिनिपुण ।

आतां मातें पावती हें कवण । समर्थणें ॥ ४८३ ॥

४८३) याप्रमाणें पुण्याईनें पूज्य आसलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणीं अतिशय तत्पर आहेत, ते मला प्राप्त होतात, हे काय आतां निराळें सिद्ध करावयास पाहिजे ?

पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे ।

तिहीं निर्जीवींही देवांचीं निडळें । बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥

४८४) पाहा, चंदनाच्या झाडावरुन आलेल्या वार्‍यानें स्पर्श केलेलीं लिंबाचीं झाडें, जीं चंदनाच्या जवळ होतीं, ती निर्जीव ( अचेतन ) असूनहि त्यांनीं देखील देवांच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळविली. 

मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें ।

अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच ॥ ४८५ ॥ 

४८५) मग खास चंदन ती जागा मिळविणार नाहीं, असें मनांत तरी कसें आणतां येईल ? किंवा, त्यास ती जागा मिळाली आहे, हें सिद्ध केलें तरच तें खरें ठरणार, असें आहे काय ?   

जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आध ऐसा ।

वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥ ४८६ ॥

४८६)  ज्या अर्थी शंकरांनी ( हालाहल विष प्राशन केल्यानें जी आग होत होती ती ) थंड करील या आशेनें अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे,  

तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा ।

तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगीं न बैसे ॥ ४८७ ॥

४८७) त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासानें चंद्रापेक्षां अधिक असा जो चंदन, तो सहज सर्वांगाच्या ठिकाणीं कसा बसणर नाहीं ?  

कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें ।

तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥ ४८८ ॥

४८८) अथवा रस्त्यावरील पाण्यांनीं जिचा आश्रय केला असतां, जीं ( रथ्योदकें ) अनायासानें समुद्ररुप होतात, त्या गंगेला कांहीं समुद्राशिवाय दुसरी गति आहे काय ?    

म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण ।

तयां त्रिशुद्धी मीचि निर्वाण । स्थितिही मीचि ॥ ४८९ ॥

४८९) म्हणून क्षत्रिय असून ऋषि झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयानें मीच परमगति आहे; आणि त्यांचे असणेंहि मीच आहे.

यालागीं शतजर्जरें नावे । रिगोनि केविं निश्र्चिंत होआवें ।

कैसेनि उघडिया असावें । शतवर्षी ॥ ४९० ॥

४९०) याकरितां शेकडों ठिकाणीं खिळखिळ्या झालेल्या नांवेंत बसून स्वस्थ कसें राहावें ? व शस्त्रांचा वर्षाव होत असतां उघड्या अंगानें कसें असावें ?   

अंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केविं वोडण ।

रोगें दाटलिया आणि उदासपण । वोखदेंसीं ॥ ४९१ ॥

४९१) अर्जुना, अंगावर धोंडे पडत असतांना मध्यें ढाल कशी घालूं नये ! रोगानें ग्रस्त झालें असतां औषधाविषयीं बेफिकीर  कसें राहावें ? 

जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केविं पांडवा ।

तेविं लोकां येऊनिया सोपद्रवां । केविं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥

४९२) अर्जुना, जेथे चोहोंकडून वणवा लागला आहे, तेथून बाहेर कसें पडूं नये ? त्याप्रमाणें अनेक दुःखांनीं भरलेल्या या मृत्युलोकांत येऊन, मला कसें भजूं नयें बरें ?

अगा मातें न मजावयालागीं । कवण बळ पां आपुलां आंगीं ।

काइ घरीं कीं मांगीं । निश्र्चिंती केली ॥ ४९३ ॥

४९३) अरे अर्जुना, माझें भजन न करण्याला असें आपल्या ( प्राण्यांच्या ) अंगीं कोणतें सामर्थ्य आहे ? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत ? 

नातरी विद्या कीं वसया । यां प्राणियांसि हा ऐसा ।

मज न भजतां भरवंसा । सुखाचा कोण ॥ ४९४ ॥

४९४) अथवा विद्येनें अथवा तारुण्यानें हे बेपर्वा होऊन बसले आहेत ? माझें भजन न करतां असें बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे ?

तरी भोग्यजात जेतुलें । तें एक देहाचिया निकिया लागलें ।

आणि येथ देह तंव असे पडिलें । काळाचां तोंडीं ॥ ४९५ ॥   

४९५) तर जेवढे विषयमात्र म्हणून आहेत, ते सर्व एका देहाच्याच बर्‍याकरितां ( सुखाकरितां ) उपयोगांत आले आहेत ! आणि या मृत्युलोकांत देह तर काळाच्या तोंडीं पडलेला आहे !

बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले ।

तिये म्रुत्युलोकींचिये शेवटिले । येणे जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥ब

४९६) ‘ बापरे बाप ! ‘ जेथें दुःखरुपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापानें मोजला जात आहे, अशा त्या मृत्युलोकांतील ( नरदेहरुपी ) शेवटच्या बाजाराच्या वेळीं येणें झालें आहे. 

Custom Search

No comments:

Post a Comment