Saturday, September 11, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 17 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १७

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 9 Part 17
Ovya 443 to 474 
श्रीज्ञानेश्र्वरी
अध्याय ९ भाग १७ 
ओव्या ४४३ ते ४७४

मूळ श्लोक

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२ ॥

३२) कारण हे पार्था, माझा आश्रय केल्यावर स्त्रिया, वैश्य, शूद्र, त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म पापयोनींत झाला आहे, असे हे सर्व उत्कृष्ट गतीला पावतात.

अगा नांवें घेतां वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं ।

तिये पापयोनीही कीरीटी । जन्मले जे ॥ ४४३ ॥

४४३) अर्जुना, ज्या जातीच्या नांवाचा उच्चार करणें वाईट आहे, ( फार काय सांगावें ? ) जी जात सर्व निकृष्टांत निकृष्ट आहे, त्या पापरुप जातीमध्यें जे जन्मास आले आहेत,

ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड ।

परि माझां ठायीं दृढ । सर्वभावें ॥ ४४४ ॥

४४४) ते पापी जातीतील अविवेकी, दगडाप्रमाणें मूर्ख असे असेनात, परंतु सर्व भावानें ज्यांची माझ्या ठिकाणीं पक्की भक्ति आहे,  

जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टि भोगी माझेंचि रुप ।

जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥ ४४५ ॥

४४५) ज्यांच्या वाणींत माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेंच रुप पाहण्यांत गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करीत राहतें ;

माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण ।

जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥ ४४६

४४६) माझे गुण ऐकण्यावाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातींल प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा, भूषण होऊन राहिली आहे;

जयांचें ज्ञान विषो नेणे । जाणीव मजचि एकातें जाणे ।

जया ऐसें लाभे तरी जिणें । एर्‍हवीं मरण ॥ ४४७ ॥

४४७) ज्या भक्ताची ज्ञानवृत्ति विषयाचे ग्रहण न करतां मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणें ( सर्व इंद्रियांच्या व्यापारद्वारां भगवंताची सेवा करणें ) मिळाले, तरच जगण्याची सार्थकता वाटते, नाहीं तर जगणें मरणप्राय वाटतें,       

ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा ।

जियावयालागीं बोलावा । मीचि केला ॥ ४४८ ॥

४४८) याप्रमाणें अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केलें आहे;

ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां ।

परि मजसी तुकितां तुका । तुटी नाहीं ॥ ४४९ ॥

४४९) ते दुष्ट जातींतदेखील जन्माला आलेले असेनांत का ? ते ऐकून व शिकून विद्वान् झालेले नसेनात का; परंतु त्यांची माझ्याशीं तुलना केली असतां, ते वजनांत कमी भरत नाहींत.

पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें ।

माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमे ॥ ४५० ॥

४५०) अर्जुना पाहा, भक्तीच्या संपन्नतेनें राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्या प्रल्हादाच्या भक्तिमाहात्म्यासाठीं मला नरसिंहरुप हा अवतार धारण करावा लागला,    

तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें सदा किरीटी ।

कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥

४५१) अर्जुना, त्या प्रल्हादाचा माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी अंगीकार केला, ( माझी भक्ति करण्याच्या ऐवजी प्रल्हादाची भक्ति केली ) कारण मी जें द्यावयाचें तें, त्याचें ( प्रल्हादाचें ) वर्णन केलें असतांहि मिळतें.

एर्‍हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें ।

म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥ ४५२॥

४५२) एर्‍हवी त्याचें कुळ वास्तविक दैत्याचें, परंतु इंद्रालाहि त्याच्यापेक्षां जास्त योग्यता मिळत नाही; म्हणून अर्जुना, ठिकाणीं भक्तीच सरती होते. जातीला कांही किंमत नाही.

राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती ।

तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥ ४५३ ॥

४५३) राजाच्या हुकुमाची अक्षरें ज्या एका कातड्यांवर उमटलेली आहेत, त्या तुकड्याच्या मोबदल्यांत सर्व पदार्थ प्राप्त करुन घेतां येतात, 

वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे ।

तेचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥

४५४) प्रत्यक्ष सोने, रुपें जरी असलें ( आणि त्याच्यावर राजाच्या हुकुमाची अक्षरें नसली ) तर त्या सोन्यारुप्याची व्यवहारात नाणें म्हणून किंमत नाहीं. व्यवहारांत राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच जेव्हां राजाच्या हुकमाची अक्षरें असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो, तेव्हां त्यानें सर्व माल विकत घेतां येतो. 

तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे ।

जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥

४५५) त्याप्रमाणें आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल; त्या वेळेला सर्व सर्वज्ञता मान्य होईल कीं, ज्या वेळेला मन आणि बुद्धि माझ्या प्रेमाने भरुन जाईल.

म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण ।

एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ ४५६ ॥

४५६) याकरितां अरे, उत्तम कुळ, जाति अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना, एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे.

तेंचि भलतेणें भावें । मन मजआंतु येतें होआवें ।

आलें तरी आघवें । मागील वावो ॥ ४५७ ॥

 ४५७) तेंच मन वाटेल त्या हेतूनें का होईना, पण माझ्या स्वरुपांत येईल ( मद्रप होईल ) असें करावें, आणि एकदां माझ्या स्वरुपांत आले तर मागील ( जातीकुळवगैरे ) गोष्टी निष्फळ होतात.             

जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ ।

मग होऊनि ठाकती केवळ । गंगारुप ॥ ४५८ ॥

४५८) जोपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळालें नाहीं, तोंपर्यंत नाल्याओढ्यांच्या पाण्याला नाले, ओढे म्हणतात; मग ते गंगेला येऊन मिळाल्यानंतर ते केवळ गंगारुप होऊन राहतात.

कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे ।

जंव न घापती एकवटें । अग्नीनाजीं ॥ ४५९ ॥

४५९) किंवा खैराचें लांकूड , चंदनाचें लाकूड व इतर रायवळ लांकडें ही निवड, जेथपर्यंत एकत्र करुन ती अग्नीमध्यें घातलीं नाहींत, तेथपर्यंतच होऊं शकते,  

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया ।

जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥ ४६० ॥

४६०) त्याचप्रमाणें क्षत्रिय, वैश्य, शुद्र व अत्यंज आणि स्त्रिया ह्या जाति, जेथपर्यंत भक्त माझ्याशीं एकरुप झाले नाहींत तेथपर्यंत वेगवेगळ्या असतात.

मग जातीव्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भाव होती मज मीनले ।

जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥ ४६१ ॥

४६१) जसें समुद्रामध्यें मिठाचे कण घातले असतां तें समुद्ररुप होऊन, त्यांचा कणपणा नाहींसा होतो, त्याप्रमाणें जेव्हां सर्व वृत्ति मद्रुप होतात, तेव्हां त्या जाति व व्यक्ति यांच्या नांवानें शून्य पडतें.

तंववरी नदानदींची नांवें । तंवचि पूर्वपश्र्चिमेचे यावे ।

जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥

४६२) तेथपर्यंतच ( शोणभद्र व सिंधू अशीं ) नदाचीं नांवें व ( नर्मदा, गंगा अशी ) नांवें राहतील; आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्र्चिमेकडे वाहणारे ओघ, असे भेद राहतील कीं, जेथपर्यंत सर्व समुद्रांत येऊन मिळत नाहींत.  

हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझां ठायीं प्रवेशे ।

येतुलें हो मग आपैसें । मी होणें असे ॥ ४६३ ॥

४६३) कोणत्याहि एका निमित्तानें हेंच चित्त माझ्या स्वरुपांत प्रवेश करुन राहो, एवढें झालें, म्हणजे मग आपआप मद्रूप होणे ( निश्र्चित ) आहे.   

अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचां आंगी ।

कां जे मिळतिये प्रसंगीं । सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥

४६४) अर्गुना, फोडण्याच्या उद्देशानें लोखंडाचा घण परिसावर पडला तरी देखील घणाचा संबंध परिसाशीं येणार्‍या वेळेस तो घण सोनेंच बनून जाईल.    

पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें ।

मज मीनलिया काय माझें । स्वरुप नव्हतीचि ॥ ४६५ ॥             

४६५) असें पहा कीं, त्या गोपींचीं अंतःकरणें प्रेमाच्या निमित्तानें मला येऊन मिळालीं असतां, त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय ?      

नातरी भयाचेनि मिसे । मातें न पविजेचि काय कंसें ।

कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥

४६६) अथवा भीतीच्या निमित्तानें ( कां होईना ) कंस मला येऊन मिळाला नाहीं काय ? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ति करुन घेतली नाहीं काय ?

अगा  सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां ।

कीं ममत्वें वसुदेवा- । दिकां सकळां ॥ ४६७ ॥

४६७) अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेंच या यादवांना माझ्या स्वरुपाची प्राप्ति झाली; किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ति झाली.

नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।

यां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥

४६८) नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनत्कुमार यांना, अर्जुना, ज्याप्रमाणें मी भक्तीच्या योगानें प्राप्त करुन घेण्याला योग्य झालों,  

तैसाचि गोपीसि कामें । तया कंस भयसंभ्रमें ।

येरां घातकें मनोधर्में । शिशुपालादिकां ॥ ४६९ ॥

४६९) त्याचप्रमाणें गोपिकांस कामानें ( विषयबुद्धीनें ), त्या कंसाला भयाच्या भ्रांतीनें आणि त्या इतर शिशुपालादिकांस त्यांच्या त्या घातक बुद्धीनें ( मी प्राप्त झालों ).

अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मार्गें ।

भक्ती कां विषयें विरागें । अथवा वैरें ॥ ४७० ॥

४७०) अरे अर्जुना, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचें एक शेवटचें ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गानें मजकडे ( माझ्या स्वरुपीं ) येतां येतें. भक्तीनें अथवा विषय बुद्धीनें अथवा वैराग्यानें अथवा वैरानें,

म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझां ठायीं ।

उपायांची नाहीं । केणि एथा ॥ ४७१ ॥

४७१) म्हणून अर्जुना, पाहा, माझ्या स्वरुपांत मिळावयाचें असेल तर येथें साधनाचें बंधन नाहीं.

आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें ।

परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ४७२ ॥

४७२) आणि वाटेल त्या जातींत जन्माला आलें तरी चालेल, मग भक्ति किंवा वैर केलें तरी हरकत नाहीं. परंतु भक्ति किंवा वैरी व्हावयाचें तर तें माझेंच झालें पाहिजे,

अगा कवणें एकें बोलें । माझेपण जर्‍ही जाहालें ।

तरी मी होणें आलें । हाता निरुतें ॥ ४७३ ॥

४७३) कोणत्याहि का निमित्तानें होईना, जर माझ्याशी दृढ संबंध झाला, तर मद्रूप होणें हें खास हातीं आलें, असें समजावें,

यापरी पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना ।

मातें भजतां सदना । माझिया येती ॥ ४७४ ॥  

४७४) याप्रमाणें अर्जुना, दुष्ट जातींत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझें भजन केलें असतां, तीं सर्व माझ्या स्वरुपाला येऊन मिळतात.      



Custom Search

No comments:

Post a Comment