Saturday, September 11, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 16 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 16 
Ovya 415 to 442 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १६ 
ओव्या ४१५ ते ४४२

मूळ श्लोक

अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।

साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥

३०) (पूर्वी ) अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त ( होऊन ) माझी भक्ति करील तर तो साधूच मानला पाहिजे; कारण, त्याची वागणूक आतां चांगली झाली आहे. 

ऐसे भजतेनि प्रेमभावें । जया शरीरही पाठीं न पवे ।

तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥ ४१५ ॥

४१५) अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असतां त्याला पुन्हां शरीरहि मिळत नाही, तो मग कोणत्या का जातीचा असेना ? 

आणि आचरण पाहतां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।

परि जीवित वेचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥

४१६) आणि अर्जुना, त्याच्या वागणुकीचा विचार केला तर, वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे. परंतु ज्यांनी आपलें (( उरलेलें ) आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे,

अगा अंतींचियां मती । साचपण पुढिले गती ।

म्हणोनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥

४१७) अरे, मरणप्रसंगी जशी वासना असते, त्याप्रमाणें पुढचा जन्म मिळतो. याकरितां ज्यानें आपलें आयुष्य शेवटी भक्तीकरितांच खर्च केलें,

तो आधीं जरी अनाचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं ।

जैसा बुडाला महापूरीं । न मरतु निघाला ॥ ४१८ ॥

४१८) तो पूर्वींचा जरी पापाचरण करणारा असला, तरी तो सर्वोतोपरी उत्तमच आहे, हे समज. असें कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असतां, त्या स्थितीतूनन मरतां बाहेर निघाला,   

तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणोनि बुडाले जेवीं वायां गेलें ।

तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥

४१९) तो कडेला जिवंत लागल्यामुळे आतां त्याची ( पूर्वीची ) बुडत असण्याची स्थिति व्यर्थ गेली; त्याप्रमाणें पूर्वी केलेलें पाप शेवटीं भक्ति केल्यानें उरतच नाहीं.   

यालागीं दुष्कृती जर्‍हीजाहला । तरि अनुतापतीर्थी न्हाला ।

न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥ ४२० ॥

४२०) याकरितां पूर्वींचा दुराचरण करणारा असला, तरी नंतर त्या विषयींच्या पश्चात्तापारुपीं तीर्थांत त्यानें स्नान केलें; आणि अशा प्रकारचें स्नान करुन सर्व भावांनीं ( तो ) माझ्या ठिकाणीं अनन्य झाला,   

तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ ।

जन्मलेया फळ । तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥

४२१) तर आतां त्याचेंच कुळ पवित्र आहे; तसेंच शुद्ध आणि श्रेष्ठ आहे आणि जन्माला आल्याचें फळ त्यालाच मिळालें.   

तो सकळही पढिन्नला । तपें तोचितपिन्नला ।

अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥ ४२२ ॥

४२२) त्यानें सर्वहि अध्ययन केलें, त्यानें तपांची आचरणें केली किंवा अष्टांग योगाचा त्यानें अभ्यास केला,   

हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्में सर्वथा ।

जयाची अखंड आस्था । मजचिलागीं ॥ ४२३ ॥

४२३) अर्जुना, हें फार वर्णन पुरें ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणीं आहे, अरे अर्जुना, तो पूर्णपणें कर्मरुपी बंधनांतून पार पडला.  

अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेचिया पेटी ।

जेणें मजमाजीं किरीटी । निक्षेपिली ॥ ४२४ ॥

४२४) हे अर्जुना, ज्यानें आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयींची जी एकनिष्ठा, त्या एकनिष्ठेच्या पेटींत घालून, ती पेटी माझ्या स्वरुपामध्यें ठेवली,  

मूळ श्लोक

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।

कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१ ॥

३१) तो अल्पकाळांत धर्मात्मा होतो. त्याला शाश्वत अशी शांति प्राप्त होते. हे कौंतेया माझा भक्त ( कधींहि ) नाश पावत नाहीं, हें तूं निश्चयपूर्वक जाण.  

तो आतां अवसरें मजसारिखा होईल । ऐसाही भाव तुज जाईल ।

हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें ॥ ४२५ ॥

४२५) तो भक्त आतां कालांतरानें मद्रूप होईल, अशीहि कल्पना तुझ्या अंतःकरणांत येईल. अगा अर्जुना, अमृतांत राहणार्‍याला मरण कसें येईल ?

पैं सूर्य जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्रि म्हणिजे ।

तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहे ॥ ४२६ ॥

४२६) ज्या वेळेस सूर्योदय नसतो, त्या कालास रात्र असें म्हणावयाचें; तसें माझ्या भक्तीवांचून जें जें करणें, तें तें महापातक नव्हे काय ?     म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळिक पांडुसुता ।

तेव्हांचि तो तत्त्वता । स्वरुप माझें ॥ ४२७ ॥

४२७) अर्जुना, याकरितां भक्ताच्या चित्तास माझें स्वरुपसान्निध्य ज्या वेळेस प्राप्त होतें, त्या वेळेसच खरोखर तो मद्रूप होतो.  

 

जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे।

तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥ ४२८ ॥

४२८) ज्याप्रमाणें एका दिव्यानें दुसरा दिवा लावला असतां त्यांतील पहिला कोणता, हें ओळखतां येत नाही; त्याप्रमाणें जो सर्व भावांनीं माझें भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. 

मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती ।

किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥ ४२९ ॥

४२९) मग माझी नित्य असलेली जी स्वरुपशांती, तीच त्याची स्थिति व तेज आहे. फार काय सांगावें ! माझ्या जीवानें ते जगलेले आहेत.  

एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगों किती ।

जरी मियां चाड जरी भक्ती । न विसंबिजे गा ॥ ४३० ॥

४३०) हे अर्जुना, सांगितलेलीं गोष्ट पुनः पुन्हां तीच ती किती सांगू ? माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल, तर माझी भक्ति क्षणभरहि सोडूं नकोस. 

अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । आभिजात्या झणीं श्र्लाघा ।

व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वाहावा ॥ ४३१ ॥

४३१) अरे, आमचें कुळ शुद्ध आहे, या अभिमानांत राहूं नका; तसेंच आमचें कुळ श्रेष्ठ आहे, असा कदाचित् आनंद मानाल, तर मानूं नका व शास्त्राध्ययनाची पोकळ हांव व्यर्थ कां बाळगावी ? 

कां रुपें वयसा माजा । आथिलेपणें कां गाजा ।

एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥

४३२) उत्तम सुस्वरुपानें व तारुण्यानें मस्त कां व्हावें ? संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा ? ( कारण ) माझ्याविषयीं एक भक्ति जर नसेल, तर हा सर्व पसारा निष्फळ आहे.   

कणेंविण सोपटें । कणसें लागलीं आथी एक दाटें ।

काय करावें गोमटें । वोस नगर ॥ ४३३ ॥  

४३३) धान्यावांचून पिशा असलेली कणसें दाट एकसारखी आली, तरी त्यांचा काय उपयोग ? शहर चांगले आहे, पण त्यांत वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग ?

नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें ।

कां वांझ फुली फुललें । झाड जैसें ॥ ४३४ ॥

४३४) अथवा सरोवरांतील पाणी आटावें किंवा रानामध्यें एका दुःखी मनुष्याची दुसर्‍या दुःखी मनुष्याशी गांठ पडावी अथवा एखाद्या झाडाला वांझ फुलांचा बहर यावा;

तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळजातिगौरव ।

जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥

४३५) सर्व ऐश्र्वर्य अथवा कुळ व जाति याचा डौल हा त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणें एखादें शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यांत फक्त जीवच नसावा;

माझिये भक्तीविण । जळो तें जियालेपण ।

अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काईं ॥ ४३६ ॥

४३६) त्याप्रमाणें माझ्या भक्तीवांचून जें जगणें आहे, त्याला आग लागो. अर्जुना, या पृथ्वीवर दगड नाहींत काय ?

पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली ।

तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें ॥ ४३७ ॥  

४३७) हिंवराचो गर्द छाया ज्याप्रमाणें सत्पुरुष टाळतात, त्याप्रमाणें  भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्यें निघून जातात.      

निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला ।

तैसा भक्तिहिनु वाढिन्नला । दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥

४३८) निंबाच्या झाडाला दाट निंबोळ्या आल्या, तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो; त्याप्रमाणें भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरितांच वाढलेला असतो.

कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां रात्रीं सांडिले ।

ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥ ४३९ ॥

४३९) अथवा षड्रसयुक्त अन्न खापरांत वाढलें आणि ते रात्री चव्हाट्यावर टाकून दिलें असतां, तें जसें कुत्र्याच्याच उपयोगाला येतें, 

तैसें भक्तिहीनाचें जिणें । जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे ।

संसारदुःखासि आवंतणे । वोगरिलें गा ॥ ४४० ॥

४४०) त्याप्रमाणें अभक्त मनुष्याचें जीवित आहे. जो स्वप्नांत देखील पुण्य करण्याचे जाणत नाही; अरे, त्यानें संसाराच्या दुःखांना आमंत्रण देऊन ठेवलें आहे,

म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्याहि व्हावें ।

वरि देहाचेनि नांवें । पशूचेंहि लाभो ॥ ४४१ ॥

४४१) याकरितां कुळ उत्तमच असावयास पाहिजे, असें नाहीं. जातीने नीच योनीचा असला तरी चालेल. ( अत्यंजच काय ) पण देहाच्या नांवानें पशूचा देह मिळाला तरी चालेल . 

पाहें पां सावजें हातिरुं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें ।

कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पातालिया मातें ॥ ४४२ ॥

४४२) हें पाहा कीं, मगरानें गजेन्द्राला ( पाण्यांत )
 
धरलें; त्याच्या तडाख्यांतून सुटण्याकरितां त्यानें मोठ्या
काकुळतीनें माझा धांवा केला, त्या योगानें त्यास
 माझी प्राप्ति झाली आणि त्याचा पशूपणा व्यर्थ 
गेला.


Custom Search

No comments:

Post a Comment