Saturday, September 11, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 43 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४३

 

ShriRamCharitManas
AyodhyaKanda Part 43 
Doha 251 to 256 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४३ 
दोहा २५१ ते २५६

छं०—लागे सराहन भाग सब अनुराग बचन सुनावहीं ।

बोलनि मिलनि सिय राम चरन सनेहु लखि सुखु पावहीं ॥

नर नारि निदरहिं नेहु निज सुनि कोल भिल्लनि की गिरा ।

तुलसी कृपा रघुबंसमनि की लोह लै लौका तिरा ॥

सर्वजण त्यांच्या भाग्याची प्रशंसा करु लागले व प्रेमाने बोलू लागले. वनवासींच्या बोलण्याची व भेटण्याची पद्धत व श्रीरामांच्या चरणी त्यांचे प्रेम पाहून सर्वांना सुख झाले. त्या कोल, भिल्ल लोकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री-पुरुषांना आपल्या प्रेमाचा क्षुद्रपणा वाटू लागला. तुलसीदास म्हणतात की, जणू लोखंडाने भोपळ्यांना तारुन नेले. ही श्रीरामचंद्रांचीच कृपा होय. ( यावरुन या वनवासींची श्रीरामचंद्रांवरील भक्ती अयोध्यावासींहून अधिक होती, हे दिसून येते. )

सोपान—बिहरहिं बन चहु ओर प्रतिदिन प्रमुदित लोग सब ।

जल ज्यों दादुर मोर भए पीन पावस प्रथम ॥ २५१ ॥

सर्वजण दिवसेंदिवस परम आनंदित होऊन वनात चोहीकडे फिरत होते. ज्याप्रमाणे पहिला पाऊस पडल्यावर बेडूक व मोर प्रसन्न होऊन नाचू-बागडू लागतात. ॥ २५१ ॥

पुर जन नारि मगन अति प्रीती । बासर जाहिं पलक सम बीती ॥

सीय सासु प्रति बेष बनाई । सादर करइ सरिस सेवकाई ॥

त्याप्रमाणे अयोध्यापुरीतील सर्व स्त्री-पुरुष अत्यंत प्रेमात मग्न होते. त्यांचे दिवस क्षणाप्रमाणे सरत होते. जितक्या सासवा होत्या, तितकी रुपे धारण करुन सीता सर्व सासूंची आदराने एकसारखीच सेवा करीत होती. ॥ १ ॥

लखा न मरमु राम बिनु काहूँ । माया सब सिय माया माहूँ ॥

सीयँ सासु सेवा बस कीन्हीं । तिन्ह लहि सुख सिख आसिष दीन्हीं ॥

श्रीरामचंद्रांशिवाय हे गुपित दुसर्‍या कुणाला समजले नाही. सर्व पराशक्ती महामाया या सीतेच्या मायेमध्येच वसल्या होत्या. तिने आपल्या सेवेने सासूंना वश केले त्यांना सुख वाटले व त्यांनी उपदेश आणि आशीर्वाद दिले. ॥ २ ॥

लखि सिय सहित सरल दोउ भाई । कुटिल रानि पछितानि अघाई ॥

अवनि जमहि जाचति कैकेई । महि न बीचु बिधि मीचु न देई ॥

सीता व राम-लक्ष्मण यांचा सरळ स्वभाव पाहून कुटिल राणी कैकेयीला खूप पश्र्चात्ताप झाला. ती पृथ्वी व यमराज यांना याचना करीत होती. पण धरणी विदीर्ण होऊन तिला सामावून घेत नव्हती व विधाता मरण देत नव्हता. ॥ ३ ॥

लोकहुँ बेद बिदित कबि कहहीं । राम बिमुख थलु नरक न लहहीं ॥

यहु संसउ सब के मन माहीं । राम गवनु बिधि अवध कि नाहीं ॥

लोक व वेद यांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे आणी ज्ञानीसुद्धा म्हणतात की, जे श्रीरामांशी विन्मुख असतात त्यांना नरकातही जागा मिळत नाही. सर्वांच्या मनाला अशी शंका वाटून ते म्हणत होते की, हे विधात्या ! श्रीरामचंद्रांचे अयोध्येला परतणे होणार की नाही ? ॥ ४ ॥

दोहा—निसि न नीद नहिं भूख दिन भरतु बिकल सुचि सोच ।

नीच कीच बिच मगन जस मीनहि सलिल सँकोच ॥ २५२ ॥

भरताला रात्री झोप येत नव्हती की दिवसा भूक लागत नव्हती. चिखलात बुडालेली मासोळी पाण्याविना जशी व्याकुळ होते, तसा भरत चिंतेत बुडून व्याकूळ झाला होता. ॥ २५२ ॥

कीन्हि मातु मिस काल कुचाली । ईति भीति जस पाकत साली ॥

केहि बिधि होइ राम अभिषेकू । मोहि अवकलत उपाउ न एकू ॥

भरत विचार करीत होता की, मातेच्या निमित्ताने काळाने दुष्ट खेळी केली. ज्याप्रमाणे शेतात धान्य पिकू लागले, त्यावेळीच ईतीचे भय येते, तसे येथे झाले. आता श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक कसा व्हायचा ? मला एकही उपाय सुचत नाही. ॥ १ ॥

अवसि फिरहिं गुर आयसु मानी । मुनि पुनि कहब राम रुचि जानी ॥

मातु कहेहुँ बहुरहिं रघुराऊ । राम जननि हठ करबि कि काऊ ॥

गुरुजींची आज्ञा मानून श्रीराम नक्कीच अयोध्येला परत येतील, परंतु मुनी वसिष्ठ श्रीरामचंद्रांची आवड पाहूनच काही बोलतील. कौसल्या मातेच्या सांगण्यावर श्रीरघुनाथ परतू शकतील, परंतु श्रीरामांना जन्म देणारी कौसल्या माता कधी हट्ट धरील काय ? ॥ २ ॥

मोहि अनुचर कर केतिक बाता । तेहि महँ कुसमउ बाम बिधाता ॥

जौं हठ करउँ त निपट कुकरमू । हरगिरि तें गुरु सेवक धरमू ॥

मज सेवकाचे बोलणे ते किती ? त्यात काळ असा वाईट आलेला आहे आणि विधाता प्रतिकूल आहे. मी जर हट्ट धरला, तर तो घोर अधर्म होईल, कारण सेवकाचा धर्म भगवान शिवांच्या कैलास पर्वतापेक्षा मोठा व पालन करण्यास कठीण असतो. ॥ ३ ॥

एकउ जुगुति न मन ठहरानी । सोचत भरतहि रैनि बिहानी ॥

प्रात नहाइ प्रभुहि सिर नाई । बैठत पठए रिषयँ बोलाई ॥

भरताच्या मनात एकही युक्ती येईना विचार करण्यात रात्र संपून गेली. प्रातःकाळी भरताने स्नान केले व तो प्रभू श्रीरामांच्या समोर नतमस्तक होऊन बसला होता. एवढ्यात ऋषी वसिष्ठांनी त्याला बोलावणे पाठविले. ॥ ४ ॥

दोहा—गुर पद कमल प्रनामु करि बैठे आयसु पाइ ।

बिप्र महाजन सचिव सब जुरे सभासद आइ ॥ २५३ ॥

भरत गुरुंच्या चरण-कमलांना प्रणाम करुन आज्ञा मिळाल्यावर त्यांच्यासमोर बसला. त्यावेळी ब्राह्मण, श्रेष्ठी, मंत्री इत्यादी सर्व सबभासद एकत्र जमले. ॥ २५३ ॥

बोले मुनिबरु समय समाना । सुनहु सभासद भरत सुजाना ॥

धरम धुरीन भानुकुल भानू । राजा रामु स्वबस भगवानू ॥

वसिष्ठ मुनी प्रसंगानुरुप म्हणाले, ‘ हे सभासदांनो, हे सुजाण भरता, ऐकून घ्या. सूर्यकुलाचे सूर्य श्रीरामचंद्र हे धर्मधुरंधर, आणि स्वतंत्र भगवान आहेत. ॥ १ ॥

सत्यसंध पालक श्रुति सेतू । राम जनमु जग मंगल हेतू ॥

गुर पितु मातु बचन अनुसारी । खल दलु दलन देव हितकारी ॥

ते सत्यप्रतिज्ञ आहेत व वेदमर्यादेचे रक्षक आहेत. श्रीरामांचा अवतारच जगाच्या कल्याणासाठी झालेला आहे. ते गुरु, पिता व माता यांच्या वचनांप्रमाणे वागणारे आहेत. ते दुष्टांचा नाश करणारे आणि देवांचे हितकारक आहेत. ॥ २ ॥

नीति प्रीति परमारथ स्वारथु । कोउ न राम सम जान जथारथु ॥

बिधि हरि हरु ससि रबि दिसिपाला । माया जीव करम कुलि काला ॥

नीती, प्रेम परमार्थ आणि स्वार्थ यांना श्रीरामांसारखा तत्त्वतः जाणणारा कोणी नाही. ब्रह्मदेव, विष्णू, महादेव,चंद्र, सूर्य, दिक्पाल, माया, जीव, सर्व कर्मे व काल, ॥ ३ ॥

अहिप महिप जहँ लगि प्रभुताई । जोग सिद्धि निगमागम गाई ॥

करि बिचार जियँ देखहु नीकें । राम रजाइ सीस सबही कें ॥

शेष, पृथ्वी व पाताळातील इतर राजे इत्यादी, जितके म्हणून लोक व लोकपाल आहेत, तसेच योगाच्या ज्या सिद्धी वेद व शास्त्रांत सांगितल्या ,आहेत, मनात यांचा विचार करुन बघाल, तर स्पष्टपणे दिसून येईल की, श्रीरामांची आज्ञा या सर्वांच्या शिरावर आहे ( अर्थात श्रीराम हेच सर्वांचे एकमात्र महेश्र्वर आहेत. )

दोहा—राखें राम रजाइ रुख हम सब कर हित होइ ।

समुझि सयाने करहु अब सब मिलि संमत सोइ ॥ २५४ ॥

म्हणून श्रीरामांची आज्ञा व मनोगत राखण्यातच आपणा सर्वांचे हित आहे. आता तुम्ही बुद्धिमान लोक मिळून सर्वांना जे मान्य असेल ते करा. ॥ २५४ ॥

सब कहुँ सुखद राम अभिषेकू । मंगल मोद मूल मग एकू ॥

केहि बिधि अवध चलहिं रघुराऊ । कहहु समुझि सोइ करिअ उपाऊ ॥

श्रीरामांचा राज्याभिषेक हा सर्वांच्यासाठी सुखदायक आहे. मांगल्य व आनंद यांचा हा एकच मार्ग आहे. आता श्रीरघुनाथ अयोध्येला कसे येतील ? विचार करुन सांगा, तोच उपाय करता येईल. ॥ १ ॥

सब सादर सुनि मुनिबर बानी । नय परमारथ स्वारथ सानी ॥

उतरु न आव लोग भए भोरे । तब सिरु नाइ भरत कर जोरे ॥

मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी नीती, परमार्थ आणि लौकिक हिताने भरलेली वाणी सर्वांनी आदराने ऐकली, परंतु कुणालाही कोणतेही उत्तर सापडत नव्हते. सर्वजण विचारशक्ती गमावून बसले होते. तेव्हा भरताने मस्तक नम्र करुन हात जोडले, ॥ २ ॥

भानुबंस भए भूप घनेरे । अधिक एक तें एक बड़ेरे ॥

जनम हेतु सब कहँ पितु माता । करम सुभासुभ देइ बिधाता ॥

आणि म्हटले, ‘ सूर्यवंशामध्ये एकापेक्षा एक असे पुष्कळ श्रेष्ठ राजे होऊन गेले आहेत. सर्वांच्या जन्माचे कारण माता-पिता असतात आणि शुभ-अशुभ कर्मांचे फळ विधाता देत असतो. ॥ ३ ॥

दलि दुख सजइ सकल कल्याना । अस असीस राउरि जगु जाना ॥

सो गोसाइँ बिधि गति जेहिं छेंकी । सकइ को टारि टेक जो टेकी ॥

गुरुजी, हे सर्व जगाला ठाऊक आहे की, सर्व दुःखाचा नाश करुन सर्व कल्याणांची मांडणी करणारा आशीर्वाद हाच एक उपाय आहे. हे स्वामी, विधात्याचे विधान थोपवणारे तुम्हीच एकमात्र आहात. तुम्ही जो निश्र्चय कराल, तो कोण टाळू शकेल ? ॥ ४ ॥    

दोहा—बूझिअ मोहि उपाउ अब सो सब मोर अभागु ।

सुनि सनेहमय बचन गुर उर उमगा अनुरागा ॥ २५५ ॥

आता तुम्हीच मला उपाय विचारता, हे सर्व माझे दुर्भाग्य होय. ‘ भरताचे प्रेममय बोलणे ऐकून गुरुजींच्या मनात प्रेम उचंबळून आले. ॥ २५५ ॥

तात बात फुरि राम कृपाहीं । राम बिमुख सिधि सपनेहुँ नाहीं ॥

सकुचउँ तात कहत एक बाता । अरध तजहिं बुध सरबस जाता ॥

ते म्हणाले, ‘ हे भरता, हे सत्य आहे. परंतु हे सर्व श्रीरामांच्या कृपेमुळेच आहे. राम-विन्मुखाला स्वप्नातही सिद्धी मिळत नाही. बाबारे, एक गोष्ट सांगताना मला संकोच वाटतो. बुद्धिमान लोक सर्वस्व गमावले जात आहे, असे पाहून अर्धे सोडून देतात. ॥ १ ॥

तुम्ह कानन गवनहु दोउ भाई । फेरिअहिं लखन सीय रघुराई ॥

सुनि सुबचन हरषे दोउ भ्राता । भे प्रमोद परिपूरन गाता ॥

म्हणून भरता, तू व शत्रुघ्न हे दोघे भाऊ वनाला जा आणि लक्ष्मण, सीता आणि श्रीराम यांना परत पाठवू या. ‘ हे सुंदर बोलणे ऐकून दोघे बंधू हर्षित झाले. त्यांचे संपूर्ण शरीर परमानंदाने परिपूर्ण झाले. ॥ २ ॥

मन प्रसन्न तन तेजु बिराजा । जनु जिय राउ रामु भए राजा ॥

बहुत लाभ लोगन्ह लघु हानी । सम दुख सुख सब रोवहिं रानी ॥

त्यांची मने प्रसन्न झाली. शरीरामध्ये तेज उजळले. जणू काही राजा दशरथ जिवंत झाले आणि श्रीराम राजा झाले असावेत. इतर लोकांना यामध्ये जास्त लाभ व हानी कमी आहे, असे वाटले. परंतु राण्यांमध्ये दुःख-सुख सारखेच होते. कारण राम-लक्ष्मण वनात राहोत किंवा भरत-शत्रुघ्न, दोघा पुत्रांचा वियोग हा राहणारच. असे वाटून त्या सर्व रडू लागल्या. ॥ ३ ॥

कहहिं भरतु मुनि कहा सो कीन्हे । फलु जग जीवन्ह अभिमत दीन्हे ॥

कानन करउँ जनम भरि बासू । एहि तें अधिक न मोर सुपासू ॥

भरत बोलू लागला, ‘ मुनींनी जे सांगितले, ते केल्याने जगातल्या सर्व जिवांना त्यांच्या मनातील दिल्याचे फळ मिळेल. चौदा वर्षांचा अवधी काहीच नाही. मी जन्मभर वनात राहीन. मला याच्याहून मोठे सुख दुसरे काही नाही. ॥ ४ ॥

दोहा—अंतरजामी रामु सिय तुम्ह सरबग्य सुजान ।

जौं फुर कहहु त नाथ निज कीजिअ बचनु प्रवान ॥ २५६ ॥

गुरुजी, तुम्ही श्रीराम आणि सीता यांच्या मनातील जाणणारे आहात आणि सर्वज्ञ आहात. हे गुरुवर्य, जर तुम्ही सत्य सांगत असाल, तर त्याप्रमाणे व्यवस्था करा. ‘ ॥ २५६ ॥

भरत बचन सुनि देखि सनेहू । सभा सहित मुनि भए बिदेहू ॥

भरत महा महिमा जलरासी । मुनि मति ठाढ़ि तीर अबला सी ॥

भरताचे बोलणे ऐकून आणि त्याचे प्रेम पाहून सर्व सभा आणि वसिष्ठ मुनी यांना देहभान उरले नाही. जणू भरताचा मोठा महिमा हा समुद्र आहे आणि मुनींची बुद्धी त्याच्या किनारी अबलेसारखी उभी आहे. ॥ १ ॥

गा चह पार जतनु हियँ हेरा । पावति नाव न बोहितु बेरा ॥

औरु करिहि को भरत बड़ाई । सरसी सीपि कि सिंधु समाई ॥

ती समुद्र पार करु इच्छित होती. त्यासाठी तिने उपाय शोधले. परंतु नाव, जहाज किंवा नावांचे समूह यांपैकी काहीच सापडत नव्हते. भरताचा महिमा कुणी वर्णावा ? तळ्यामधील शिंपल्यामध्ये कुठे समुद्र सामावेल काय ? ॥ २ ॥

भरतु मुनिहि मन भीतर भाए । सहित समाज राम पहिं आए ॥

प्रभु प्रनामु करि दिन्ह सुआसनु । बैठे सब सुनि मुनि अनुसासनु ॥

वसिष्ठांच्या अंतरात्म्याला भरत हा फार चांगला वाटला. ते सर्वांसह श्रीरामांकडे आले. प्रभू रामचंद्रांनी प्रणाम करुन गुरुंना उत्तम आसन दिले. मुनींची आज्ञा झाल्यावर सर्व खाली बसले. ॥ ३ ॥

बोले मुनिबरु बचन बिचारी । देस काल अवसर अनुहारी ॥

सुनहु राम सरबग्य सुजाना । धरम निति गुन ग्यान निधाना ॥

वसिष्ठ मुनी देश, काल आणि कालानुरुप विचार करुन म्हणाले, ‘ हे सर्वज्ञ ! हे धर्म, नीती, गुण आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या श्रीरामा, ऐका. ॥ ४ ॥  



Custom Search

No comments:

Post a Comment