Friday, February 11, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 7 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ७

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 7 
Ovya 163 to 189 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ७ 
ओव्या १६३ ते १८९

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।

न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥

१४) हे केशवा, हें जें मला तूं सांगतोस, ते सर्व मी सत्य मानतों, हे भगवान्, देव अथवा दानव ( यांपैकीं कोणीहि ) तुझें स्वरुप जाणत नाहींत. 

ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फाकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले ।

तयां आघवयांचेंचि फिटलें । अनोळखपण ॥ १६३ ॥

१६३) आतां ती तुझी वाक्यरुपी सूर्याची किरणें माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते, त्या सर्वांचांच अपरिचितपणा नाहींसा झाला. 

जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माझिये हृदयभूमिके पडिले सखोल ।

वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणोनि संवादफळेंशीं उठले ॥ १६४ ॥

१६४) महाराज, त्यांचे वाक्यरुपी ज्ञानबीज माझ्या हृदयरुपी खोल जमिनींत पेरलें गेलें व त्यावर या आपल्या कृपेचा ओलावा झाला. म्हणून त्यास हें ( तुम्हां-आम्हांमधील संवादरुपी ) फल प्राप्त झाले. 

अहो नारदादिकां संतां । त्यांचिया युक्तिरूप सरिता ।

मी महोदधि जालां अनंता । संवादसुखाचा ॥ १६५ ॥

१६५) अहो देवा, नारदादि संतांच्या युक्तिरुपी नखांना मी संवादरुपी सुखाचा समुद्र झालों.

प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें ।

तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । सद्गुरु तुवां ॥ १६६ ॥

१६६) महाराज, या जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मांत मी जीं उत्तम पुण्यें केली, त्यांच्याकडे माझी कामगिरी शिल्लक राहिली नाहीं. कारण त्यांनी ( पुण्यांनी ) तुझ्या सारख्या योग्य सद्गुरु जोडून दिला.  

एर्‍हवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदा तूंतें कानीं आइकें ।

परि कृपा न किजेचि तुवा एकें । तंव नेणवेचि कांहीं ॥ १६७ ॥

१६७) एरवीं मी वाडवडिलांच्या मुखानें तुझें वर्णन नेहमी कानानें ऐकत होतों; पण तुमची एकाची कृपा झाली नव्हती, तेथपर्यंत मला कांहींच कळले नाही.   

म्हणोनि भाग्य जैं सानकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ ।

तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥ १६८ ॥ 

१६८) म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असतें, त्या वेळेला हातांत घेतलेंले सर्व उद्योग नेहमीं फलद्रूप होतात; त्याप्रमाणें गुरुंची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व पडलेले सर्व ज्ञान आपलें काम करतें.

जी बनकरु झाडेंसी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी ।

परि फळेंसीं तैंचि भेटी । जैं वसंतु पावे ॥ १६९ ॥

१६९) महाराज, माळी झाडांविषयी जिवापाड मेहनत करुन जन्म काढतों; परंतु ज्या वेळेला वसंत ऋतु येतो, त्याच वेळेला फळाची भेट होते. 

अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडे ।

पैं रसायनें तैं गोडे । जेव्हां आरोग्य देहीं ॥ १७० ॥

१७०) महाराज, ज्या वेळेला विषयज्वराला उतारा पडतो, त्या वेळेला गोड असलेलें पदार्थ गोड लागूं लागतात व त्या वेळेला देहांत आरोग्य प्राप्त होते, त्याच वेळेला घेतलेले भस्मादिक औषध चांगले परिणामकारक आहे. असे ठरतें.

कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचें तैंचि सार्थकपण ।

जैं चैतन्य येउनि आपण । संचरे माजीं ॥ १७१ ॥

१७१) अथवा चैतन्य ( ज्या वेळेला जीव ) आपण होऊन शरीरांत स्वतः प्रवेश करतें, त्याच वेळेला इंद्रियें, वाचा व प्राण ही सर्व असल्याचे सार्थक होते.

तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें ।

तें तैंचि म्हणों ये आपुलें । जैं सानकूळ गुरु ॥ १७२ ॥

१७२) त्याप्रमाणें अध्ययन केलेलीं सर्व शास्त्रें किंवा अभ्यास केलेलीं योगादिक साधनें, ज्या वेळेला आपलीं आहेत, असें म्हणतां येतें. 

ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्र्चयाचीं नाचतुसे भोजें ।

तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें ॥ १७३ ॥

१७३) भगवंतांचें खरें स्वरुप कळण्याच्या अशा अनुभवमदांत निश्चयाच्या संतोषानें नाचत असतां अर्जुन म्हणाला, देवा, आपलें बोलणें मला पटलें.

तरि साचचि हे कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती ।

जे तूं देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ॥ १७४ ॥

१७४) हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, खरोखर मला निश्चयानें हा अनुभव आलेला आहे कीं, तू देव अथवा दैत्य, यांच्या बुद्धींना आकळण्यासारखा नाहींस. 

तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । आपुलिया जाणे जाणिवा ।

तैंसा कहींचि नाहीं हे सद्भावा । भरवसेंनि आलें ॥ १७५ ॥

१७५) देवा, तुझा उपदेश होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणानें तुझे ज्ञान करुन घेतों, असें कोणी म्हणेल तर असा जीव बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्याजोगा तूं केंव्हांच नाहीस, हें ( माझ्या मनाला ) आतां खात्रीपूर्वक पटलें.      

मूळ श्लोक

स्वयमेवात्मनात्मात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।

भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५ ॥

१५) हें पुरुषोत्तमा, भूतभावना, भूतनाथा, देवाधिदेवा, जगन्नायका, तूं स्वतःच स्वतःला यथार्थ स्वरुपानें जाणतोस.

एथ आपुलें वाडपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें ।

का मी येतुली धनवट ऐसें । पृथ्वीचि जाणे ॥ १७६ ॥

१७६) ज्याप्रमाणें आपला विस्तार किती आहे, हें आकाशाचें आकाशालाच माहीत; अथवा मी इतकी भरीव आहे, हें प्रमाण पृथ्वीचें पृथ्वीला माहीत,

तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती ।

येर वेदादिक मती । मिरवती वायां ॥ १७७ ॥

१७७) त्याप्रमाणें आपल्या सर्व सामर्थ्यानें, हे लक्ष्मीपति देवा, तूंच जाणणारा आहेस. बाकी देवादिक जे इतर आहेत, त्यांच्या मति ( आम्ही देवाच्या स्वरुपाला जाणतों ) अशी व्यर्थ बढाई मारतात.

हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें ।

आदिशून्य उतरोनि जावें । केउतें बाहीं ॥ १७८ ॥

१७८) अहो, सर्वांत चपल असलेल्या मनालाहि ( शर्यतीत ) कसें  मागें टाकाता येईल ? वारा हातानें कसा मोजतां येईल ? मायेंतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसें पार पाडतां येईल ?  .

तैसें हें जाणणें आहे । म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे ।

आतां तुझें ज्ञान होये । तुजचिजोगें ॥ १७९ ॥

१७९) ( हें जसें असंभाव्य, ) त्याप्रमाणें तुझें ज्ञान करुन घेण्याचीहि गोष्ट असंभवनीय आहे आणि म्हणूनच तुझें ज्ञान कोणालाहि होत नाही; एवढ्याकरितां तुझ्या स्वरुपाचें ज्ञान करुन घेण्यानें काम तुलाच फक्त शक्य आहे.     

जी आपणपयातें तूंचि जाणसी । आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी ।

तरि आतां एक वेळ घाम पुसीं । आतींचिये निडळींचा ॥ १८० ॥

१८०) अरे देवा, तूं आपल्या स्वरुपाला तूंच जाणतोस; आणि तें ज्ञान दुसर्‍यास सांगण्यास देखील तूंच समर्थ आहेस. तर आता एक केवळ माझ्या इच्छारुपी कपाळावरचा घाम पुसून टाक. 

हें आइकिलें कीं भूतभावना । त्रिभुवनगजपंचानना ।

सकलदेवदेवतार्चना । जगन्नायका ॥ १८१ ॥

१८१) हे प्राणीमात्राची उत्पत्ति करणार्‍या, त्रिभुवन हत्तीचा नाश करणार्‍या सिंहा, सर्व देव व देवता यांना पूज्य असणार्‍या, हे जगाच्या स्वामी, श्रीकृष्णा, हें ऐंकलेस कां ?  

जरी थोरी तुझी पाहत आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों ।

या शोच्यता विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं ॥ १८२ ॥

१८२) जर तुझ्या स्वरुपाची थोरवी पाहूं गेलो तर आम्ही तुझ्याजवळ राहण्यालादेखील योग्य नाहीं; अशी शोचनीय स्थिती आहे. म्हणून ( जर ) आम्ही तुला विनंति करण्यास भ्यालों, तर तुझें स्वरुप जाणण्यास दुसरा उपाय उरला नाहीं.

भरले सरिता समुद्र चहूंकडे । परि ते बापियासि कोरडे ।

कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तें पाणी कीं तया ॥ १८३ ॥

१८३) जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले असले, तरी चातकाला ते कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत. कारण ज्या वेळेला खास मेघांतून थेंब पडतील, त्या वेळेलाच त्याला पाणी मिळणार.  

तैसें गुरु जी सर्वत्र आयी । परि कृष्णा आम्हां तूंचि गती ।

हें असो मजप्रती । विभूती सांगें ॥ १८४ ॥

१८४) त्याप्रमाणें देवा, गुरु खरोखर आहेत; परंतु कृष्णा, आम्हांला तूंच एक आश्रयाचें ठिकाण आहेस. हें राहूं दे ! मला विभूति सांग.       

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।

याभिर्विभूतिभिर्लोकनिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥

१६) म्हणून ज्या विभूतींनीं या सर्व लोकांना व्यापून तूं आहेस, अशा आपल्या दिव्य विभूति पूर्णत्वानें मला सांगण्यास तूंच योग्य आहेस.

जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती या शक्ती दिव्या जिया ।

तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥ १८५ ॥

१८५) महाराज, सर्व विभूति आपल्याच आहेत; परंतु दिव्य शक्तीनें व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूति आहेत, त्या आपण मला दाखवाव्या. 

जिहीं विभूतीं ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहाती अनंता ॥

तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करीं ॥ १८६ ॥

१८६) कृष्णा, ज्या विभूतींनीं सर्व लोकांस व्यापून टाकलेलें आहे, त्या मुख्य मुख्य व नामांकित विभूति आपण सांगाव्या. 

कथं विद्यामहं योगिस्त्वां सदा परिचिन्तयन् ।

केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥

१७) हे योगिन् सर्वथा तुझें चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी, त्या मी तुला कसें जाणावें ? हे भगवन् कोणकोणत्या भावांमध्यें ( विभूतींमध्ये ) मीं तुझें चिंतन करणें शक्य आहे ?

जी कैसें मियां तूंतें जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें ।

जरी तूंचि म्हणों आघवें । तरि चिंतनचि न घडे ॥ १८७ ॥

१८७) कृष्णा, तुला मी जाणावें कसें ? व काय म्हणून नेहमीं चिंतन करावें ? कारण तूंच सर्व आहेस, असें जर म्हटलें, तर चिंतनच घडणार नाहीं.

म्हणोनि मागां भाव जैसे । आपुले सांगितले तुवां उद्देशें ।

आतां विस्तारोनि तैसे । एक वेळ बोलें ॥ १८८ ॥

१८८) म्हणून मागें ( सातव्या व नवव्या अध्यायांत व या अध्यायाच्या आरंभीं ) ज्या आपल्या विभूति तूं थोडक्यांत सांगितल्यास; त्याचा आतां एक वेळ विस्तारानें सांग.  

जयां जयां भावांचा ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं ।

तो विवळ करुनि देईं । योगु आपुला ॥ १८९ ॥ 

१८९) ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणीं तुझें स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाहीं, तो आपला विभूतियोग तूं मला स्पष्ट करुन दाखव.   



Custom Search

No comments:

Post a Comment