Friday, February 11, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 8 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 8 
Ovya 190 to 214 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ८ 
ओव्या १९० ते २१४

मूळ श्लोक

विस्तरणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन् ।

भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृततम् ॥ १८ ॥

१८) जनार्दना, आपला योग आणि विभूति पुन्हां विस्तारानें मला कथन कर. कारण ( एकदा ऐकूनहि ) तुझें हें अमृतमय भाषण ऐकन्याची माझी तृप्ति होत नाहीं.

आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती ।

एथ म्हणसी जरी पुढतीं । काय सांगों ॥ १९० ॥

१९०) आणि ज्या विभूति मी विचारल्या, त्यादेखील हे जगन्नाथा, मला सांगाव्यास. या प्रसंगीं वारंवार काय सांगावयाचें आहे, असें जर म्हणशील,    

तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना ।

पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जी ॥ १९१ ॥

१९१) तर कृष्णा, अशी कल्पना कदाचित् तुझ्या मनांत येईल, पण ती येऊं देऊं नकोस. अहो महाराज, सामान्य असलेलें अमृतहि प्यावयास लागलें असतां नको म्हणवत नाहीं.  

जें काळकूटाचें सहोदर । जें मृत्युभेणें प्याले अमर ।

तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥ १९२ ॥

१९२) जें ( अमृत ) कालकूट विषाचें सख्खें भावंड आहे व जें ( अमृत ) मृत्युच्या भीतीनें देव प्याले, तरीसुद्धां ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत चौदा इंद्र होऊन जातात; 

ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु ।

तयाचाही मिठांशु । जे पुरे म्हणों नेदी ॥ १९३ ॥

१९३) असा कोणी एक क्षीरसमुद्रांतील रस ज्याला व्यर्थच अमृतपानाच आळ आला आहे, त्याची गोडीदेखील सेवन करणाराला आतां ‘ हें पुरें ‘ असें म्हणूं देत नाहीं.

तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेची आथि थोरी ।

मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें ॥ १९४ ॥ 

१९४) इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या अमृताला त्याच्या गोडीनें जर एवढें महत्त्व आलें आहें; मग पाहा, हें तर खरोखर परमामृत आहे.

जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरु न डहुळितां ।

अनादि स्वभावता । आइतें आहे ॥ १९५ ॥

१९५) जें परमामृत प्राकृत अमृताप्रमाणें मंदर नांवाच्या पर्वताला न हलवितां व क्षीरसमुद्राचें मंथन न करतां स्वभावतःच मूळचें नित्य सिद्ध आहे.

जें द्रव्य ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध ।

जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे ॥ १९६ ॥

१९६) जें परमामृत पातळ नाहीं व घट्टहि नाहीं, ज्या परमामृतामध्यें रस ( गोडी ) व गंध ( वास ) हीं आढळून येत नाहींत, जे परमामृत नित्यप्राप्त असल्यामुळें स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळतें ( अनुभवाला येतें ),   

जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो ।

बळिया नित्यता लागे येवों । आपणपेयां ॥ १९७ ॥

१९७) ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निरास होतो व अढळ अशी नित्यता आपणास प्राप्त होते ;

जन्ममृत्यूची भाख । हारपोनी जाय निःशेख ।

आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे ॥ १९८ ॥

१९८) ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्युची भाषा समूळ नाहींशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढूं लागतें. 

मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे ।

ते तुज देतां चित्त माझें । पुरे म्हणों न शके ॥ १९९ ॥

१९९) मग दैवयोगानें तें सेवन करण्याचा योग आला, तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो. असें जें परमामृत तें तूं मला देत असतांना, माझें चित्त ‘ पुरें ‘ असें म्हणू शकत नाहीं.

तंव तुझें नामचि जी आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे ।

पाठीं गोठी सांगसी सुरवाडें । आनंदाचेनि ॥ २०० ॥ 

२००) महाराज, आपलें नांवच आम्हांस आधीं आवडतें, आणि शिवाय आपली भेट होत असून आपलें सान्निध्य प्राप्त झालेलें आहे; त्याशिवाय आनंदाच्या भरानें आपण बोधाच्या गोष्टीहि सांगत आहांत.

आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें ।

तरि येतुलें जाणें जें येणें मुखें । पुनरुक्तही हो ॥ २०१ ॥

२०१) आतां हें सुख कशासारखें आहे म्हणून सांगावें ! तर मला झालेल्या आनंदानें याबद्दल कांहीच बोलवत नाहीं, तथापि मी इतकें मात्र समजतों कीं, आपणांस विचारलेल्या गोष्टीची पुरुक्तीहि झाली तरी हरकत नाहीं ( पण ती पुनः तुम्ही सांगा. )

हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वोंविळ ।

कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ॥ २०२ ॥ 

२०२) अहो, रोज उगवणार्‍या सूर्याला शिळा म्हणतां येईल काय ? अथवा नेहमीं वाहणार्‍या गंगेच्या पाण्याला पारोसपणा येतो काय ?

तुवां स्वमुखें जें बोलिलें । हे आम्हीं नादासि रुप देखिलें ।

आजि चंदनतरुचीं फुलें । तुरंवीत आहों मा ॥ २०३ ॥   

२०३) तुम्ही आपल्या मुखानें जें बोललात, तें आम्हीं मूर्तिमंत नादब्रह्म अनुभविलें.  तुमच्या मुखानें बोधाच्या गोष्टी ऐकणें म्हणजे आज साक्षात् आम्ही चंदनाच्या झाडाच्या फुलांचा वास घेत आहों ना ?

या पार्थाचिया बोला । सर्वांगें कृष्ण डोलला ।

म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥ २०४ ॥

२०४) अर्जुनाच्या या बोलण्यानें कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला, हा अर्जुन, भक्ति व ज्ञान यांचा मळा झाला आहे.

ऐसा पतिकराचिया तोषआंतु । प्रेमाचा वेग उचंबळतु ।

तो सायासें सांवरुनि अनंतु । काय बोले ॥ २०५ ॥

२०५) याप्रमाणें आपल्याला प्रिय असलेल्यांच्या आनंदानें प्रेमाचा भर उसळत असतांना, तो कष्टानें आंवरुन धरुन श्रीकृष्ण काय म्हणाले ( तें ऐका );  

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच

हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतय: ।

प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९ ॥

१९) श्रीकृष्ण म्हणाले, बरें तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूति आहेत, त्यांपैकी मुख्य तुला सांगतों. कारण, हे कुरुक्षेष्ठा, माझ्या ( विभूतींच्या ) विस्ताराच्या ) विस्ताराला अंत नाहीं.

मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता ।

कीं म्हणतसे बा पांडुसुता । भलें केलें ॥ २०६ ॥

२०६) ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात ) ब्रह्मदेवाचे आपण वडिल आहों, हें श्रीकृष्णास माहीत असूनहि याची आठवण त्यांच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, ठीक केलेंस.

अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं ।

अंगें तो लेंकरुं काईं । नव्हेचि नंदाचें ॥ २०७ ॥

२०७) कृष्ण त्या प्रसंगीं अर्जुनाला ‘ बाबा ‘ असें म्हणाले, यांत आम्हांला कांहीं आश्र्चर्य करावयाचें कारण नाही. ( हें पाहा ) तो स्वतः नंदाचें मूल झाला नाहीं काय ? 

परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो ।

मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ॥ २०८ ॥

२०८) परंतु सांप्रत हें राहूं द्या. प्रेमचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. पण श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहों, तें तू ऐक.

तरि तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती ।

ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥ २०९ ॥

२०९) अर्जुना, तूं माझ्या विभूति विचारल्यास, त्या इतक्या असंख्य आहेत कीं, त्या जरी माझ्या आहेत, तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यांत येत नाहींत.

अंगींचिया रोम किती । जयाचिया तयासि न गणवती ।

तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥ २१० ॥

२१०) आपल्या अंगावर किती केस आहेत, हें ज्याचें त्याला मोजतां येत नाहींत, त्याचप्रमाणें माझ्याच विभूति असून त्यांची गणाना मला होत नाहीं. 

एर्‍हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयाही नव्हेचि फुडा ।

यालागीं प्रधान जिया रुढा । तिया विभूती आइकें ॥ २११ ॥

२११) खरोखर मी कसा व केवढा आहे, हें माझें मला देखील पक्कें ठाऊक नाहीं; म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूति आहेत, त्या ऐक. 

जिया जाणितलियासाठीं । आघविया जाणितलिया होती किरीटी ।

जैसें बीज आलिया मुठीं । तरुचि आला होय ॥ २१२ ॥

२१२) अर्जुना, ज्या विभूति समजल्या असतां बाकीच्या सर्व जाणल्यासारख्या होतील. ज्याप्रमाणें बीं हातांत आलें असतां झाडच ताब्यांत आल्याप्रमाणें होतें;  

कां उद्यान हातां चढिलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें ।

तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्र्व सकळ ॥ २१३ ॥

२१३) किंवा बगीचा ताब्यांत आला असतां, फळाची व फुलांची प्राप्ति सहजच होते, त्याप्रमाणें त्या विभूतींचा विचार केला असतां, सर्व विश्व विचारांत घेतल्याचें श्रेय येतें.

एर्‍हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा ॥

पैं गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ॥ २१४ ॥

२१४) एर्‍हवीं अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत

 नाहीं. अमर्याद अशा आकाशालाहि माझ्यांत लपून

 बसतां येतें.



Custom Search

No comments:

Post a Comment