Friday, February 11, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ९

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 10 Part 9 
Ovya 215 to 234 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ९ 
ओव्या २१५ ते २३४

मूळ श्लोक

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।

अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २० ॥

२०) हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्यें असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदि, मध्य व अंतहि आहें.

आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका ।

मी आत्मा असें ऐकैका । भूतमात्राचां ठायीं ॥ २१५ ॥

२१५) मस्तकावर कुरळे केस शोभणार्‍या व धुनुर्विद्येंत शंकरासारख्या अर्जुना, ऐक प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे, तो मी आहे.

आंतुलीकडे मीचि यांचां अंतःकरणीं । भूताबाहेरी माझीच गंवसणी ।

आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥ २१६ ॥

२१६) आंतल्या बाजूनें मीच यांच्या अंतःकरणांत आहें, भूतांच्या बाहेरहि माझेंच आवरण आहे. प्रारंभी व शेवटीं मी आहे आणि मध्यंतरी देखील मीच आहें.    

जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी ।

आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं ॥ २१७ ॥

२१७) ज्याप्रमाणें या मेघांना खालीं, वर, आंत, बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे; आणि ऐक: ते मेघ आकाशांतच उत्पन्न झालेले आहेत आणि ते राहतातहि आकाशांतच. 

पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती ।

तेवीं आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥ २१८ ॥

२१८) शेवटीं ज्या वेळेला त्यांचा लय होतो, त्या वेळेला ते आकाशारुप होऊन राहतात. त्याप्रमाणें प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि नाशाला मीच आश्रय आहे.     

ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण ।

तरी जीवचि करुनि श्रवण । आइकोनि आइक ॥ २१९ ॥

२१९) असें हें माझें अनेकत्व व व्यापकत्व तूं विभूतियोगानें जाण. तर आतां जीवच ( अंतःकरण ) कानरुप करन ऐकलेलेंच ऐक.

याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रती ।

सांगेन म्हणितलें तुज प्रीती । त्या प्रधाना आइकें ॥ २२० ॥

२२०) माझें व्यापक स्वरुप सांगितल्यावरहि तुला माझ्या विभूति कांहीं निराळ्या सांगावयाच्या राहिल्या आहेत काय ? परंतु तुला प्रेमानें सांगतों म्हणून म्हटलें, तर आतां तुला मुख्य मुख्य विभूति सांगतों; त्या ऐक.

आदित्यानाममहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।

मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१ ॥

( बारा ) आदित्यांमध्यें मी विष्णु आहे. प्रकाशमान पदार्थांमध्ये मी किरणवान रवि आहें , मरुद् गणांपैकीं मरीचि मी आहें, नक्षत्रांमध्यें, चंद्र मी आहें.

हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्याआंतु ।

रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ॥ २२१ ॥

२२१) हें बोलून तो कृपाळू म्हणाला, आदित्य नावाच्या बारा देवतांत विष्णू नांवाची देवता माझी विभुति आहे व चंगल्या तेजस्वीपदार्थांमध्यें किरणें असलेला सूर्य माझी विभूति आहे.

मरिद् गणांचां वर्गी । मरीचि म्हणे मी शार्ङ्गी ।

चंद्र मी गगनरंगीं । तारांमाजीं ॥ २२२ ॥  

२२२) मरुद्गणांच्या ( एकूणपन्नास ) प्रकारांत मरीचि ही माझी विभूति आहे. असें शार्ङ्गधर श्रीकृष्ण म्हणाले. आकाशरुपी रंगणांतील नक्षत्रांमध्यें चंद्र ही माझी विभूति आहे. 

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।

इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२ ॥

२२) वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवांमध्ये इंद्र मी आहें, इंद्रियांमध्यें मन मी आहें, आणि भूतांच्या ठिकाणीं चेतना मी आहें.

वेदाआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु ।

देवांमाजी मरुद्बंधु । महेन्द्र तो मी ॥ २२३ ॥

२२३) ऋगवेदादि चार वेदांमध्यें सामवेद हा माझी विभूति आहे, असें गोविंद म्हणाला व देवांमध्यें मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे.

इंद्रियांआंतु अकरावें । मन तें मी हें जाणावें ।

भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ॥ २२४ ॥

२२४) इंद्रियांमध्यें अकरावें असणारें जें मन, ती माझी विभूति आहें, असें समज व सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना ती माझी विभूति आहे.  

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।

वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३ ॥

२३) ( अकरा ) रुद्रांमध्यें शंकर मी आहे, यक्ष राक्षसांमध्यें कुबेर मी आहें, ( आठ ) वसूंमध्यें अग्नि मी आहें आणि पर्वतांमध्यें मेरु मी आहें.

अशेपांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी ।

तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ॥ २२५ ॥

२२५) सगळ्या रुद्रांमध्यें कामाचा शत्रू जो शंकर, ती माझी विभूति आहे, याविषयीं कांहीं शंका ठेवूं नकोस.   

यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु ।

तो कुबेरु मी हे अनंतु । म्हणता जाहला ॥ २२६ ॥

२२६) यक्ष-राक्षसांच्या समुदायांमध्यें शंकराचा परम मित्र असलेला जो धनवान कुबेर, ती माझी विभुति आहे, असें श्रीकृष्ण म्हणाला.

मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं ।

शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ॥ २२७ ॥

२२७) मग आठ वसूंमध्यें जो अग्नि ती माझी विभूति आहे, असें समज. मोठालीं शिखरें असलेल्या पर्वतांत सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरु पर्वत, ती माझी विभूति आहे.  

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।

सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४ ॥ 

२४) हे पार्था, पुरोहितांमध्यें मुख्य जो बृहस्पति, तो मी आहें असें जाण. सेनानायकांमध्यें कार्तिकेय मी आहें, जलाशयांमध्यें सागर मी आहें,  

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।

यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५ ॥

२५) महर्षींमध्ये भृगु मी आहें, वाणींमध्ये एकाक्षर ( ॐ ) मी आहें, यज्ञांमध्यें जपयज्ञ मी आहें, स्थावर पदार्थांमध्यें हिमालय मी आहें.

जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो ।

तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ॥ २२८ ॥

२२८) जो स्वर्गाच्या राज्याला साहाय्य करणारा आहे आणि जो सर्वज्ञतेमध्यें अग्रगण्य आहे, असा जो कुलोपाध्यायांमध्यें श्रेष्ठ असलेला बृहस्पति तो माझी विभुति आहे.  

त्रिभुवनींचिया सेनापतीं- । आंत स्कंदु तो मी महामती ।

जो हरवीर्यें अग्निसंगती । कृतिकाआंतु जाहला ॥ २२९ ॥

२२९) हे बुद्धिमान् अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीनें कृतिकांच्या ठिकाणीं उत्पन्न झालेला जो कार्तिकस्वामी, तो त्रिभूवनांतील सेनापतीमध्यें माझी विभूति आहे. 

सकळिकां सरोवरांसी । माझारि समुद्र तो मी जळराशी ।

महर्षीआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥ २३० ॥

२३०) सर्व जलाशयांमध्यें पाण्याचा मोठा सांठा असणारा जो समुद्र, तो माझी विभुति आहें आणि महर्षींमध्ये तपाचा राशी जो भृगु, तो माझी विभुति आहे.

अशेषाही वाचा- । आंतु नटनाच सत्याचा ।

तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥

२३१) सर्व वाणींमध्यें ज्या अक्षरांत सत्याचा उत्कर्ष असतो, तें एक अक्षर ( ॐ ) मी आहें, असें वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाला.

समस्तांही यज्ञांचां पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं ।

जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥ २३२ ॥

२३२) या मृत्युलोकामध्यें कर्माच्या त्यागांत ॐकारादिकांच्या योगानें ज्यास उत्पन्न करतात, तो जपरुप यज्ञ सर्व यज्ञांमध्यें माझी विभूति आहे.

नामजपयज्ञु तो परम । बांधू न शके स्नानादि कर्म ।

नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥

२३३) नामजपयज्ञ हा श्रेष्ठ आहे. यास स्नानादि कर्मे अडकवू शकत नाहींत. ( स्नानादि कर्मांवाचून नाम घेतलें तरी चालतें ) नामानें धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हें परब्रह्म आहे. 

स्थावरां गिरिवरां आंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु ।

तो मी म्हणे कांतु । लक्ष्मीयेचा ॥ २३४ ॥  

२३४) अचल असलेल्या मोठ्या पर्वतांत पुण्याचा केवळ

 राशि जो हिमालय, तो माझी विभूति, असें लक्ष्मीचे पति

 म्हणाले.



Custom Search

No comments:

Post a Comment