Wednesday, April 27, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 10 Ovya 237 to 254 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १० ओव्या २३७ ते २५४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 10 
Ovya 237 to 254 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग १० 
ओव्या २३७ ते २५४

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।

यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२ ॥

१२) आकाशामध्यें सहस्रावधि सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर, ती त्या महात्म्या ( श्रीहरीच्या ) प्रभेसारखी ( कांहींशी ) होईल.

तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसयासारिखा सांगावा ।


Custom Search

कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥

२३७) धृतराष्ट्र राजा, श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावें ? ( पण कांही कल्पना करतं यावी, म्हणून दृष्टान्ताने सांगण्याचा यत्न करतों.) प्रळयकाळीं बारा सूर्यांचा जो एकदम मिलाफ होतो,   

तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं ।

तर्‍ही तया तेजाची थोरी । उपमूं न ये ॥ २३८ ॥

२३८) तसे तें हजारों दिव्य सूर्य जर एकाच वेळेला उगवले, तरी त्या ( विश्र्वरुपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते ( सूर्य ) येणार नाहींत. 

आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे ।

तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥ २३९ ॥

२३९) सर्व विजांचा समुदाय एकत्र केला व प्रलयकाळच्या अग्नीची सर्व साहित्यें गोळा केलीं, तसेंच दहाहि महातेजें एकत्र मिळविलीं;

तर्‍ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें ।

आणि तयाऐसें की चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥

२४०) तथापि, सर्वांचें हें एकत्र केलेलें तेज, त्या विश्वरुपाच्या अंगकांतीच्या बरोबरीला कांहीं अल्पस्वल्प मानानें आलें तर येईल: पण त्यासारखें शुद्ध तर खास असणार नाहीं. 

ऐसें महात्मया हरीचें सहज । फांकतसे सर्वांगींचें तेज ।

तें मुनिकृपा की मज । दृष्ट जाहलें ॥ २४१ ॥

२४१) याप्रमाणें महात्मा जे हरि, त्याचें सर्व अंगीचें तेज ( विश्वरुपाचें तेज ) स्वाभाविक रीतीनें फांकत होतें हें व्यास मुनींच्या कृपेने महाराज, मला दिसलें.

तत्रैकस्थं जगत् कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।

अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ॥ १३ ॥

१३) त्या वेळीं ( देव, पितर, मनुष्य इत्यादि ) अनेक ( भिन्न ) रुपांनीं विभाग पावलेलें ( हें ) सर्व जग, देवाधिदेवांच्या त्या शरीरामध्यें एका ठिकाणीं स्थित, असें अर्जुनानें पाहिलें.   

 आणि तिये विश्र्वरुपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें ।

जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनाने दिसती ॥ २४२ ॥

२४२) आणि त्या विश्वरुपामध्यें एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. ज्याप्रमाणें महासागरामध्यें बुडबुडे अलग अलग दिसतात;

कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर ।

नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥ २४३ ॥

२४३) अथवा आकाशांमध्यें गंधर्वनगर भासावें किंवा जमिनीवर मुंगीनें घर बांधावें अथवा मेरु पर्वतावर सूक्ष्म परमाणु पसरलेले असावेत.

विश्र्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं ।

अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥ २४४ ॥

२४४) त्याप्रमाणें सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये

( विश्वरुपांत ) त्या वेळेला अर्जुनानें पाहिलें. 

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः ।

प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥ १४ ॥

१४) तेव्हां तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन देवासमोर नस्तक नमवून, हात जोडून म्हणाला,

तेथ एक विश्र्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण ।

तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥ २४५ ॥

२४५) त्या वेळी आपण विश्वाला पाहणारा एक निराळा व विश्व पाहण्याचा विषय ) एक निराळें, असें थोडेसें द्वैत होतें, तेंहि नाहीसें झालें व अंतःकरण एकदम ( त्या विश्वरुपात ) विरघळून गेलें.

आंतुला महानंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचे बळ हारपोनि गेलें ।

आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥ २४६ ॥

२४६) अंतःकरणांत ब्रह्मानंद जागृत झाला. ( त्यामुळें ) बाहेर इंद्रियें ढिलीं पडली आणि मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. 

वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलाचें सर्वांग जैसें ।

विरुढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच आलें ॥ २४७ ॥

२४७) पावसाळ्याच्या आरंभीं पर्वताच्या अंगावरुन पाणी वाहून गेल्यावर, त्या पर्वतावर जसे कोवळे गवताचे अंकुर उत्पन्न होतात, तसे ( अर्जुनाच्या सर्व शरीरावर ) रोमांच आले.

शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो घरी ।

तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥ २४८ ॥

२४८) चंद्रकिरणांनीं स्पर्श केलेला चंद्रकांतमणि जसा पाझरतो, त्याप्रमाणें त्याच्या ( अर्जुनाच्या ) सर्व अंगावर घामाचें दाट बिंदू आले.   

माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे ।

तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ २४९ ॥

२४९) कमळाच्या कळीमध्यें भुंग्यांचा समुदाय सांपडल्यामुळें ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते, त्याप्रमाणें अंतःकरणांतील सुखाच्या लाटांच्या वेगानें बाहेर त्याचे सर्व अंग कांपत होतें.

कर्पूर केळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें ।

पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रोनि पडती ॥ २५० ॥

२५०) कापराच्या विपुलतेनें, कापुरकेळीच्या गाभ्याचीं सोपटें उकलून त्यांतून जसे एकामागून एक असें कापराचे कण गळतात, त्याप्रमाणें त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रु गळत होते.  

ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा ।

तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥ २५१ ॥

२५१) याप्रमाणें अष्टसात्त्विक भावांतदेखील एकमेकांत चढाओढ लागली होती. त्या स्थितीत ( अर्जुनाच्या ) जीवाला ब्रह्मानंदाचें राज्य प्राप्त झाले. 

उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे ।

तैसा वेळोवेळां उर्मीभरें । उचंबळत असे ॥ २५२ ॥

२५२) भरलेल्या समुद्रास चंद्रोदयानें जशा भरत्यांवर भरत्या येतात, त्याप्रमाणें आनंदाच्या लहरीच्या वेगानें त्याचें अंतःकरण वेळोवेळी उचंबळत होतें.

तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी ।

मग उससौनि किरीटी । वास पाहिली ॥ २५३ ॥

२५३) तसें त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीनें श्रीकृष्णानें द्वैताचा सांभाळ केला ( म्हणजे देव व भक्त असें वेगळेपण ठेवलें ) ; म्हणून मग अर्जुनानें दीर्घ श्र्वासोच्छवास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिलें.

तेथ बैठला होता जिया सवा । तयाचिकडे मस्तक खालविला देवा ।

जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥ २५४ ॥

२५४) आपण ज्या बाजूकडे तोंड करुन बसला होता
,
 त्याच बाजूला अर्जुनानें आपलें मस्तक लववून देवास

 नमस्कार केला व आपलें दोन्ही हात जोडून चांगल्या

 रीतीनें बोलावयास लागला.

No comments:

Post a Comment