Sunday, November 20, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 12 BhaktiYoga Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ भक्तियोग भाग १

 

Shri Dnyaneshwari Adhyay 12 
BhaktiYoga Part 1 
Ovya 1 to 15 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२
भक्तियोग भाग १ 
ओव्या १ ते १५

जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।

अनव्रत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥

१) तूं शुद्ध आहेस, तूं उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टि करणारी आहेस, गुरुकृपा दृष्टिरुपी माते, तुझा जयजयकार असतो.

विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।

ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥

२) विषयरुपी सर्पानें दंश केला असतां मूर्च्छा येते, ती कांहीं केल्या जात नाहीं, हे गुरुकृपादृष्टि, तुझ्या योगानें ती मूर्च्छा नाहींशी होते आणि सर्पदंश झालेल्या ( त्या ) प्राण्याची त्या ( विषय ) विषापासून सुटका होते.

तरि कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।

जरि प्रसादरसकल्लोळीं । पूरें येसि तूं ॥ ३ ॥

३) जर प्रसन्नतारुप पाण्याच्या लाटांची तुला भरती येईल, तर संसाराच्या त्रासाचे ( अध्यात्मादि त्रिविध तापांचे ) चटके कोणाला बसतील ? व खेद कसा बरें जाळूं शकेल ?  

योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।

सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥

४) हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळें प्राप्त होतात व भक्तांची, तें ब्रह्म मी आहें, अशा स्वरुपसिद्धीच्या प्राप्तीची हौस तूं पुरवितेस. ( ती कशी पुरवितेस हें स्पष्ट करतात, )

आधारशक्तीचां अंकीं । वाढविसी कौतुकीं ।

हृदयाकाशपल्लकीं । परिये देसी निजे ॥ ५ ॥

५) आधारचक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तूं आपल्या भक्तांना कौरुकानें वाढवितेस व त्यांना झोप येण्याकरितां हृदयाकाशरुपी पाळण्यांत घालून झोके देतेस.

प्रत्यग् ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनांचीं खेळणीं ।

आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥

६) आत्मप्रकाशरुप ज्योतीनें साधकरुपी बालकांस ओवाळतेंस आणि मन व प्राण यांचा निरोध करणें हीं खेळणीं त्यांच्या हातांत देतेस व स्वरुपानंदाचे ( लहान मुलांना घालावयाचे, ) दागिने साधकरुपी बालकांच्या अंगावर घालतेस. 

सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरु गासी ।

समाधिबोधें निजविसी । बुझाउनि ॥ ७ ॥

७) सतरावी जीवनकलारुपी ( व्योमचक्रांतील चंद्रामृतरुपी ) दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचें गाणें गातेस, आणि समाधीच्या बोधानें समजूत घालून ( स्वरुपीं ) निजवतेस.

म्हणोनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझां पाउलीं ।

या कारणें मी साउली । न संडी तुझी ॥ ८ ॥

८) म्हणून साधकांना तूं आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात; म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाहीं.

अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।

तो सकळ विद्यांचिये सृष्टी । धात्रा होय ॥ ९ ॥

९) हे सद्गुरुंची कृपादृष्टि, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल, तो सर्व विद्यारुप सृष्टीचा ( उत्पन्नकर्ता ) ब्रह्मदेवच बनतो.

म्हणोनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते ।

आज्ञापीं मातें । ग्रंथानिरुपणीं ॥ १० ॥

१०) एवढ्या करितां हे आपल्या भक्तांचा कल्पतरु व श्रीमंत अशा आई, तूं मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे.

नवरसीं भरवीं सागरु । करवी उचित रत्नांचे आगरु ।

भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ॥ ११ ॥

११) शांत, अद्भुतादि नवरसांच्या समुद्राची माझ्या भाषेंत भरती कर व ( परमार्थ निरुपणास ) शोभतील अशा योग्य अलंकाररुपी रत्नांची ( माझें निरुपण हें ) खाणच होऊन राहील असें कर. हे माउली, ( माझ्या या व्याख्यानांत ) गीतेंतील अभिप्रायाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असें कर.

साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया आक्षोणी ।

विवेकवेलीची लावणी । हों देईं सैंध ॥ १२ ॥

१२) मराठी भाषारुपी पृथ्वीमध्यें अलंकाररुपी सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मानात्मविचाररुपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊं दे.

संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें ।

लावीं म्हणें गहनें । निरंतर ॥ १३ ॥

१३) संवादरुपी फळांचे बार असलेले सिद्धान्तांचे दाट व विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर, असें ज्ञानेश्र्वर महाराज ( आपल्या गुरुंना ) म्हणतात. 

पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वादअव्हांटे ।

कुतर्काचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥ १४ ॥

१४) ( माझ्या देशीभाषारुप पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोत, असे ज्ञानेश्र्वरमहाराज आपल्या गुरुंना म्हणतात. ) नास्तिकपणारुपी दर्‍या व वितंडवादरुपीआडवाटा नाहींशा कर; आणि कुतर्करुपी दुष्ट जनावरें हाकून दे. 

श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें ।

राणिवे बैसवीं श्रोते । श्रवणाचिये ॥ १५ ॥

१५) श्रीकृष्णगुणांचे वर्णन करण्यांत मला सर्वत्र समर्थ कर

 व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव.



Custom Search

No comments:

Post a Comment