Monday, December 19, 2022

BhaktiYoga Part 6 Adhyay 12 Ovya 114 to 135 भक्तियोग भाग ६ अध्याय १२ ओव्या ११४ ते १३५

 

BhaktiYoga Part 6 
Shri Dnyaneshwari Adhyay 12
Ovya 114 to 135 
भक्तियोग भाग ६ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या ११४ ते १३५

मूळ श्लोक

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपमो भव ।

मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ १० ॥

१०) अभ्यासयोगाला देखील असमर्थ असलास तर सर्वस्वीं माझ्याकरितां कर्मे करणारा हो. माझ्याकरितांसुद्धां कर्मे केलींस तरी तूं सिद्धि मिळवशील. 

कां अभ्यासाही लागीं । कसु नाहीं तुझां आंगीं ।

तरी आहासी जया भंगीं । तैसाचि अस ॥ ११४ ॥

११४) अथवा, असा अभ्यास करण्याविषयींसुद्धां जर तुझ्या अंगीं सामर्थ्य नसेल, तर हल्लीं ज्या स्थितींत तूं आहेस, त्या स्थितींत राहा.

इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं ।

अभिमानु न संडीं । स्वजातीचा ॥ ११५ ॥

११५) इंद्रियांचा निग्रह करुं नकोस; विषयभोगांना कमी करुं नकोस; आपल्या जातीचा अभिमान सोडूं नकोस; 

कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं ।

मग सुखें तुज सरळी । दिधली आहे ॥ ११६ ॥

११६) आपल्या कुळांतील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जीं कर्में करावीं असा विधि सांगितला आहे, ती कर्में कर व जी कर्में करुं नये, असा निषेध केला आहे, ती कर्में करुं नकोस. एवढें तूं केलेंस म्हणजे सुखानें तुला वाटेल तसें वागावयास मोकळीक दिली आहे.  

परि मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये ।

तो मी करितु आहें । ऐसें न म्हणें ॥ ११७ ॥

११७) परंतु मनानें, वाचेनें व देहानें, जसें जें कर्म होईल, तें कर्म मी करीत आहें, असें म्हणूं नकोस.

करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे ।

विश्र्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥ ११८ ॥

११८) ( कारण ) ज्या परमेश्र्वराच्या सत्तेने हें विश्र्व चाललें आहे, त्यालाच कोणतीहि गोष्ट करणें अथवा न करणें, हें सर्व ठाऊक आहे. 

उणयापुरेयाचें कांहीं । उरों नेदीं आपुलां ठायीं ।

स्वजातीचि करुनि घेईं । जीवित हें ॥ ११९ ॥

११९) कर्मांत कांहीं न्यून अथवा पूर्ण झालें, तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी कांहीं ( खंती अथवा संतोष ) उरुं देऊं नकोस;, आणि तूं हे जीवित आपल्या जातीचे करुन टाक म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्या अशी कर्में करण्यांत घालव.

माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें ।

तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ॥ १२० ॥

१२०) अरे, माळ्यानें जिकडे नेले,तिकडे कांही एक तक्रार न करतां जाणार्‍या पाण्याप्रमाणें तुझें जीवित निरभिमान होऊन कर्म करणारें होऊं दे.

एर्‍हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हांटा ।

रथु काई खटपटा । करितु असे ॥ १२१ ॥

१२१) अर्जुना, सहज विचार करुन पाहिलें तर, आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे, याची वाटाघाट रथ केव्हां तरी करतो काय ?

म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इयें वोझीं नेघें मती ।

अखंड चित्तवृत्ती । आठवीं मातें ॥ १२२ ॥

१२२) म्हणून कोणतेंहि कर्म करण्याची प्रवृत्ति अथवा न करण्याची निवृत्ति हीं ओझीं, तूं आपल्या बुद्धीवर घेऊं नकोस. तर तूं आपल्या चित्तवृत्तीनें मला निरंतर स्मर.

आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे ।

निवांतचि अर्पिजे । माझां ठायीं ॥ १२३ ॥

१२३) आणि जें जें कर्म घडेल, तें कमी अथवा जास्त म्हणूं नकोस; तर तें निमुटपणानें माझ्या ठिकाणीं अर्पण कर. 

ऐसिया मद्भावना । तनुत्यागीं अर्जुना ।

तूं सायुज्यसदना । माझिया येसी ॥ १२४ ॥

१२४) अर्जुना, अशा माझ्या रुपाच्या अनुसंधानानें शरीरत्यागानंतर तूंच सायुज्य मुक्तिरुप माझ्या घरीं येशील.

मूळ श्लोक

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।

सर्वकर्मफलत्यागं ततः करु यतात्मवान् ॥ ११ ॥

११) अथवा मद्योगाचा आश्रय करुन, हें ( माझ्या ठिकाणीं कर्माचा संन्यास ) करण्यासदेखील जर तूं असमर्थ असलास, तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलांचा त्याग कर.  

ना तरी हेंही तुज । नेदवे कर्म मज ।

तरी गा तूं भज । पंडुकुमरा ॥ १२५ ॥

१२५) अथवा, हेंहि कर्म जर तुला मला देववत नसेल, ( मला अर्पण करवत नसेल ) तर अर्जुना, ( आम्ही तुला पुढें सांगतों तें ) तूं आचरण कर.

बुद्धींचां पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं ।

मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥ १२६ ॥

१२६) बुद्धीच्या मागें व पुढें व कर्माच्या आरंभी व शेवटीं, हे अर्जुना, मला बांधणें जर तुला कठीण वाटत असेल, ( कर्माची प्रेरणा करणार्‍या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे, असा विचार करणें हें बुद्धीच्या पाठीमागें परमात्मास बांधणें होय व तें कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणें योग्य आहे, असा बुद्धीनें निश्र्चय करणें, हेंच परमात्म्यास बुद्धीच्या पुढें बांधणें होय; आणि करण्याच्या अगोदर ज्या कतृत्वाच्या अभिमानानें कर्मास प्रारंभ होतो तें कर्तृत्व आपलें नसून खरोखर परमात्म्याचेंच आहे, अशा समजुतीनें कर्म करावयास लागणें, हें कर्माच्या प्रारंभीं परमात्म्यास बांधणें होय; व आरंभिलेल्या कर्मापासून मिळणारें फळ त्या कर्माच्या शेवटीं परमात्म्यास समर्पण करणें, हेंच कर्माच्या शेवटीं परमात्म्यास बांधणें होय; यप्रमाणें बुद्धीच्या अगोदर व बुद्धीच्या शेवटीं व कर्माच्या आरंभी व कर्माच्या शेवटी मला परमात्म्याला त्यांत गोवणें हें जर तुला कठीण वाटत असेल )

तरि हेंही असो । सांडीं माझा अतिसो ।          

परि सयंतिसीं वसो । बुद्धि तुझी ॥ १२७ ॥

१२७) तर हें देखील राहूं दे. माझ्याकरितां कर्म करुन मला अर्पण करण्याचा विचार जो सांगितला, त्या विषयींचा आग्रहहि एकीकडे राहूं दे परंतु तुझी बुद्धि ( कर्मफलाविषयीं ) निग्रहयुक्त असूं दे. ( तूं आपल्या बुद्धीत कर्तृत्वमद व फलस्वाद घेऊं नकोस ).    

आणि जेणें जेणें वेळें । घडली कर्में सकळें ।

तयांची तियें फळें । त्यजितु जाय ॥ १२८ ॥

१२८) आणि ज्या ज्या वेळीं कर्में घडतील, त्या त्या वेळीं त्यांची ती सर्व फळें तूं टाकीत जा.

वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं ।

तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें ॥ १२९ ॥

१२९) झाडांस अथवा वेलींस आलेलीं फळें जशी तीं झांडें व त्या वेली टाकून देतात, त्याप्रमाणें पूर्ण झालेलीं कर्में ( तूं ) टाकून दे. त्यांच्या फळांची आशा, चित्तात ठेवूं नकोस. )  

परि मातें मनीं धरावें । कां मजउद्देशें करावें ।

हें काहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं ॥ १३० ॥

१३०) परंतु मनामध्यें माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूनें कर्म करावें; हें कांहीं नको, तर तें शून्यांत जाऊं दे. ( तूंहि घेऊं ) नकोस व मलाहि अर्पण करुं नकोस, तर तें कर्म तसेंच रिकामें राहूं दे.

खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिलें ।

कर्म मानीं देखिलें । स्वप्न जैसें ॥ १३१ ॥

१३१) खडकावर पडलेला पाऊस, अथवा अग्नींत पेरलेलें बीं अथवा पाहिलेलें स्वप्न हें जसें व्यर्थ असतें, त्याप्रमाणें सर्व कर्में व्यर्थ मान.

अगा आत्मतेजां विषीं । जीवु जैसा निरभिलाषी ।

तैसा कर्मी अशेषीं । निष्कामु होईं ॥ १३२ ॥

१३२) अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयीं जसा आपला जीव निष्काम असतो, त्याप्रमाणें सर्व कर्मांच्या फलाविषयीं तूं निष्काम हो.

वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं ।

क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजीं ॥ १३३ ॥

१३३) अग्नीची ज्वाळा जशी आकाशांत व्यर्थ जाते, ( म्हणजे तिचा कांहीं परिणाम होत नाहीं ) त्याप्रमाणें तुझ्याकडून होणारी कर्में शून्यामध्यें जिरुं दे ( म्हणजे जणूं काय तीं कर्में केलीच नाहींत, अशीं तुझी चित्तवृत्ती असूं दे. ) 

अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु ।

परि योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥ १३४ ॥

१३४) अर्जुना हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमध्यें हा योग श्रेष्ठ आहे.  

येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरुढे ।

एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं ॥ १३५ ॥

१३५) जसें वेळूचें झाड एक वेळ व्यालें म्हणजे पुन्हा वीत

 नाहीं, त्याप्रमाणें या फलत्यागानें जें जें कर्म टाकलें जातें,

 त्या त्या कर्मास पुन्हां अंकुर फुटत नाहीं. ( तें कर्म

 सुखदुःखाचा भोग देण्याकरितां पुढें जन्माला कारणीभूत

 होत नाहीं. )


Custom Search

No comments:

Post a Comment