Sunday, August 30, 2020

ShriRamcharitmans Part 38 श्रीरामचरितमानस भाग ३८

 


ShriRamcharitmans Part 38
Doha 201 to 203 
श्रीरामचरितमानस भाग ३८ 
दोहा २०१ ते २०३ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
देखरावा मातहि निज अद्भुत रुप अखंड ।
रोम रोम प्रति लागे कोटि कोटि ब्रह्मंड ॥ २०१ ॥
मग भगवंतांनी मातेला आपले अखंड अद्भुत रुप दाखविले. त्याच्या एकेका रोमामध्ये कोट्यावधी ब्रह्मांडे सामावली होती. ॥ २०१ ॥
अगनित रबि ससि सिव चतुरानन । बहु गिरि सरित सिंधु महि कानन ॥
काल कर्म गुन ग्यान सुभाऊ । सोउ देखा जो सुना न काऊ ॥
अगणित सूर्य, चंद्र, शिव, ब्रह्मदेव, पुष्कळसे पर्वत, नद्या, समुद्र, पृथ्वी, वने, काल, कर्म, गुण, ज्ञान आणि स्वभाव दिसले. शिवाय कधीही पाहिले किंवा ऐकलेसुद्धा नव्हते, असे पदार्थही तिने तेथे पाहिले. ॥ १ ॥
देखी माया सब बिधि गाढ़ी । अति सभीत जोरें कर ठाढ़ी ॥
देखा जीव नचावइ जाही । देखी भगति जो छोरइ ताही ॥
सर्व तर्‍हेने बलवान असलेली माया पाहिली. ती ( भगवंतांच्यासमोर ) अत्यंत घाबरुन हात जोडून उभी होती. माया नाचवीत असलेल्या जिवाला पाहिले आणि मग त्या जिवाला ( मायेपासून ) सोडविणार्‍या अशा भक्तीलाही पाहिले. ॥ २ ॥
तन पुलकित मुख बचन न आवा । नयन मूदि चरननि सिरु नावा ॥
बिसमयवंत देखि महतारी । भए बहुरि सिसुरुप खरारी ॥
मातेचे शरीर पुलकित झाले. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेव्हा डोळे मिटून श्रीरामचंद्रांच्या चरणी तिने मस्तक ठेवले. मातेला आश्र्चर्य वाटल्याचे पाहून श्रीरामांनी पुन्हा बालरुप घेतले. ॥ ३ ॥
अस्तुति करि न जाइ भय माना । जगत पिता मैं सुत करि जाना ॥
हरि जननी बहु बिधि समुझाई । यह जनि कतहुँ कहसि सुनु माई ॥
मातेला स्तुतीसुद्धा करता येईना. ती घाबरली की, जगत्पिता परमात्म्याला मी पुत्र समजले. श्रीहरींनी मातेला पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले की, ' हे माते, ऐक. ही गोष्ट कुणलाही सांगू नकोस. ' ॥ ४ ॥
 दोहा--बार बार कौसल्या बिनय करइ कर जोरि ।
अब जनि कबहूँ ब्यापै प्रभु मोहि माया तोरि ॥ २०२ ॥
कौसल्या वारंवार हात जोडून प्रार्थना करीत होती की, ' हे प्रभो, मला कधीही तुमच्या मायेने व्यापू नये.' ॥ २०२ ॥
बालचरित हरि बहुबिधि कीन्हा । अति अनंद दासन्ह कहँ दीन्हा ॥
कछुक काल बीतें सब भाई । बड़े भए परिजन सुखदाई ॥
भगवंतांनी पुष्कळ प्रकारच्या बाललीला केल्या आणि आपल्या सेवकांना अत्यंत आनंद दिला. काही काळ लोटल्यावर चारीही भाऊ मोठे होऊन कुटुंबियांना सुख देऊ लागले. ॥ १ ॥
चूड़ाकरन कीन्ह गुरु जाई । बिप्रन्ह पुनि दछिना बहु पाई ॥
परम मनोहर चरित अपारा । करत फिरत चारिउ सुकुमारा ॥
मग गुरुजींनी चूडाकर्म संस्कार केला. ब्राह्मणांना खूप दक्षिणा मिळाली. चारी सुंदर राजकुमार फार मनोहर अपार लीला करीत फिरत असत. ॥ २ ॥
मन क्रम बचन अगोचर जोई । दसरथ अजिर बिचर प्रभु सोई ॥
भोजन करत बोल जब राजा । नहिं आवत तजि बाल समाजा ॥
जे मन, वचन व कर्म यांना अगोचर आहेत, तेच प्रभू दशरथ राजांच्या अंगणात फिरत होते. राजे जेव्हा त्यांना भोजनास बोलवत, तेव्हा ते आपल्या बाल सोबत्यांना सोडून येत नसत. ॥ ३ ॥
कौसल्या जब बोलन जाई । ठुमुकु ठुमुकु प्रभु चलहिं पराई ॥
निगम नेति सिव अंत न पावा । ताहि धरै जननी हठि धावा ॥
कौसल्या माता जेव्हा बोलवायला जाई, तेव्हा प्रभू ठूमकत ठूमकत पळून जात. वेद ज्यांचे ' नेति ' ( हे नाही ) म्हणून वर्णन करतात आणि श्रीशिवांनाही ज्यांचा थांग लागत नाही, त्यांना बळेच पकडण्यासाठी ती धावत असे. ॥ ४ ॥
धूसर धूरि भरें तनु आए । भूपति बिहसि गोद बैठाए ।
अंगाला धूळ लागलेल्या स्थितीत आलेल्या त्यांना राजा हसत हसत आपल्या मांडीवर बसवी. ॥ ५ ॥
दोहा--भोजन करत चपल चित इत उत अवसरु पाइ ।
भाजि चले किलकत मुख दधि ओदन लपटाइ ॥ २०३ ॥
( पकडून आणल्यावर ) श्रीराम भोजन करु लागत, परंतु चित्त चंचल असे. संधी मिळताच तोंडाला दही-भात लागलेला असतानाच किलकारी मारत ते इकडे-तिकडे पळून जात. ॥ २०३ ॥
बालचरित अति सरल सुहाए । सारद सेष संभु श्रुति गाए ॥
जिन्ह कर मन इन्ह सन नहिं राता । ते जन बंचित किए बिधाता ॥
श्रीरामचंद्रांच्या फार भोळ्या आणि मनमोहक बाललीलांचे सरस्वती, शेष, शिव व वेद यांनी गायन केले आहे. या लीलांमध्ये ज्यांचे मन लागले नाही, त्यांना विधात्याने अभागी बनविले. ॥ १ ॥
भए कुमार जबहिं सब भ्राता । दीन्ह जनेऊ गुरु पितु माता ॥
गुरगृहँ गए पढ़न रघुराई । अलप काल बिद्या सब आई ॥
सर्व भाऊ कुमारावस्थेस येताच, गुरु, पिता व माता, यांनी त्यांचा यज्ञोपवीत संस्कार केला. श्रीरघुनाथ ( भावांसह ) गुरुगृही विद्या शिकण्यास गेले आणि थोड्याच काळात त्यांना सर्व विद्या प्राप्त झाल्या. ॥ २ ॥
जाकी सहज स्वास श्रुति चारी । सो हरि पढ़ यह कौतुक भारी ॥
बिद्या बिनय निपुन गुन सीला । खेलहिं खेल सकल नृप लीला ॥
चारही वेद ज्यांचा स्वाभाविक श्र्वास आहेत, ते भगवान विद्या शिकतात ही मोठी आश्र्चर्याची गोष्ट. चारी भाऊ विद्या, विनय, गुण व शील यांमध्ये मोठे निपुण होते आणि ते सर्वजण राजांचे खेळ खेळत. ॥ ३ ॥
करतल बान धनुष अति सोहा । देखत रुप चराचर मोहा ॥
जिन्ह बीथिन्ह बिहरहिं सब भाई । थकित होहिं सब लोग लुगाई ॥
त्यांच्या हाती बाण व धनुष्य शोभत असत. त्यांचे रुप पाहताच चराचर मोहून जात असे, ते सर्व भाऊ ज्या ज्या ठिकाणी खेळायला जात, तेथील सर्व स्त्री-पुरुष त्यांना पाहून प्रेमाने देहभान विसरत किंवा स्तब्ध होऊन त्यांना पाहात राहात. ॥ ४ ॥




Custom Search

Saturday, August 22, 2020

ShriRamcharitmans Part 37 श्रीरामचरितमानस भाग ३७

 

ShriRamcharitmans Part 37
Doha 198 to 200 
श्रीरामचरितमानस भाग ३७ 
दोहा १९८ ते २०० 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
 दोहा--ब्यापक ब्रह्म निरंजन निर्गुन बिगत बिनोद ।
सो अज प्रेम भगति बस कौसल्या कें गोद ॥ १९८ ॥
जे सर्वव्यापक, निरंजन ( मायारहित ), निर्गुण, विनोदरहित आणि अजन्मा ब्रह्म आहे, तेच प्रेम आणि भक्तीला वश होऊन कौसल्येच्या मांडीवर खेळत होते. ॥ १९८ ॥
काम कोटि छबि स्याम सरीरा । नील कंज बारिद गंभीरा ॥
अरुन चरन पंकज नख जोती । कमल दलन्हि बैठे जनु मोती ॥
त्यांच्या नील कमल किंवा पूर्ण ( जल भरलेल्या ) मेघासमान श्यामल शरीरामध्ये कोट्यावधी कामदेवांची शोभा आहे. लाल-लाल चरणकमलांच्या नखांची शुभ्र कांती लाल कमलांच्या पानांवर स्थिरावलेले जणू मोती वाटत होते. ॥ १ ॥
रेख कुलिस ध्वज अंकुस सोहे । नूपुर धुनि सुनि मुनि मन मोहे ॥
कटि किंकिनी उदर त्रय रेखा । नाभि गभीर जान जेहिं देखा ॥
( चरणतळांवर ) वज्र, ध्वजा आणि अंकुश यांची चिन्हे शोभत होती. पैंजणांचा ध्वनी ऐकून मुनींचेही मन मोहित होते. कमरेला करदोटा आणि उदरावर तीन वळ्या होत्या. नाभीची गंभीरता ज्यांनी पाहिली आहे, तेच ती जाणत. ॥ २ ॥
भुज बिसाल भूषन जुत भूरी । हियँ हरि नख अति सोभा रुरी ॥
उर मनिहार पदिक की सोभा । बिप्र चरन देखत मन लोभा ॥
अनेक आभूषणांनी सुशोभित झालेल्या भुजा होत्या. हृदयावर रुळणार्‍या वाघनखांची छटा तर आगळीच होती. छातीवर रत्नजडित हारांची शोभा विलसत असे आणि ( भृगूंचे ) चरणचिन्ह पाहून मन लोभून जाई. ॥ ३ ॥
कंबु कंठ अति चिबुक सुहाई । आनन अमित मदन छबि छाई ॥
दुइ दुइ दसन अधर अरुनारे । नासा तिलक को बरनै पारे ॥
कंठ शंखाप्रमाणे ( चढ-उताराचा तीन रेखांनी शोभित ) होता. हनुवटी सुरेख होती. मुखावर असंख्य कामदेवांचे सौंदर्य पसरलेले होते. दोन-दोन सुंदर कोवळे दात आणि लाल चुटूक ओठ होते. नाक व भालप्रदेशावरील तिलकाच्या ( सौंदर्याचे ) तर वर्णन कोण करु शकेल ? ॥ ४ ॥
सुंदर श्रवन सुचारु कपोला । अति प्रिय मधुर तोतरे बोला ॥
चिक्कन कच कुंचित गभुआरे । बहु प्रकार रचि मातु सँवारे ॥
त्यांचे कान व गाल फारच सुंदर होते. बोबडे बोल तर मनाला मोहवीत. जन्मापासूनच असलेले कुरळे केस आई वारंवार विंचरीत असे. ॥ ५ ॥
पीत झगुलिआ तनु पहिराई । जानु पानि बिचरनि मोहि भाई ॥
रुप सकहिं नहिं कहि श्रुति सेषा । सो जानइ सपनेहुँ जेहिं देखा ॥
अंगात पिवळे झबले घातले होते. त्यांचे रांगणे मला फारच आवडत होते. त्यांच्या रुपाचे वर्णन वेद आणि शेषसुद्धा करु शकणार नाहीत. ज्याने ते कधी स्वप्नात को होईना पाहिले असेल, तोच ते जाणू शकेल. ॥ ६ ॥
 दोहा--सुख संदोह मोहपर ग्यान गिरा गोतीत ।
दंपति परम प्रेम बस कर सिसुचरित पुनीत ॥ १९९ ॥
जे सुखाची खाण आहेत, मोहापलीकडचे आहेत. ज्ञान, वाणी आणि इंद्रियातीत आहेत, ते भगवान दशरथ-कौसल्या यांच्या अत्यंत प्रेमाच्या अधीन होऊन पावन बालक्रीडा करीत आहेत. ॥ १९९ ॥
एहि बिधि राम जगत पितु माता । कोसलपुर बासिन्ह सुखदाता ॥
जिन्ह रघुनाथ चरन रति मानी । तिन्ह की यह गति प्रगट भवानी ॥
अशा रीतीने सर्व जगाचे माता-पिता असणारे श्रीराम अयोध्यावासींना आनंद देत. ज्यांनी श्रीरामांच्या चरणांवर प्रेम केले असेल, त्यांना हे भवानी ! हा आनंद प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. ॥ १ ॥
रघुपति बिमुख जतन कर कोरी । कवन सकइ भव बंधन छोरी ॥
जीव चराचर बस कै राखे । सो माया प्रभु सों भय भाखे ॥
श्रीरघुनाथांशी विन्मुख होऊन मनुष्य कोट्यावधी उपाय करो, परंतु त्याला संसार-बंधनातून कोण मुक्त करु शकेल ? जिने संपूर्ण चराचर जीवांना आपल्या मुठीत ठेवले आहे, ती मायासुद्धा प्रभूंना भीत असते. ॥ २ ॥
भृकुटि बिलास नचावइ ताही । अस प्रभु छाड़ि भजिअ कहु काही ॥
मन क्रम बचन छाड़ि चतुराई । भजत कृपा करिहहिं रघुराई ॥
भगवंत त्या मायेला भृकुटीच्या इशार्‍यावर नाचवत असतात. अशा प्रभूंना सोडून इतर कुणाचे भजन करावे, सांग बरे ? निष्कपट भावाने कायावाचामनाने भजताच श्रीरघुनाथ कृपा करतील. ॥ ३ ॥
एहि बिधि सिसुबिनोद प्रभु कीन्हा । सकल नगरबासिन्ह सुख दीन्हा ॥
लै उछंग कबहुँक हलरावै । कबहुँ पालने घालि झुलावै ॥
अशा प्रकारे प्रभू श्रीरामचंद्रांनी बालक्रीडा केली आणि सर्व नगरवासियांना आनंद दिला. कौसल्या माता कधी त्यांना मांडीवर घेऊन हालवीत-डोलवीत असे आणि कधी पाळन्यांत झोपवून झोके देत असे, ॥ ४ ॥
दोहा--प्रेम मगन कौसल्या निसि दिन जात न जान ।
सुत सनेह बस माता बालचरित कर गान ॥ २०० ॥
कौसल्या माता प्रेमात अशी बूडून जाई की, दिवस-रात्र केव्हा आली व गेली, याचे तिला भान राहात नसे. पुत्राच्या स्नेहामुळे माता त्यांच्या बाल-चरित्राचे गायन करी. ॥ २०० ॥
एक बार जननीं अन्हवाए । करि सिंगार पलनॉं पौढ़ाए ॥
निज कुल इष्टदेव भगवाना । पूजा हेतु कीन्ह आस्नाना ॥
एकदा मातेने श्रीरामचंद्रांना न्हाऊ घातले आणि शृंगार करुन पाळण्यांत झोपविले, नंतर कुलदेवतेच्या पूजेसाठी स्नान केले. ॥ १ ॥
करि पूजा नैबेद्य चढ़ावा । आपु गई जहँ पाक बनावा ॥
बहुरि मातु तहवॉं चलि आई । भोजन करत देख सुत जाई ॥
पूजा करुन नैवेद्य दाखविला आणि जिथे स्वयंपाक केला होता, तिथे ती गेली. पुन्हा आई ( पूजेच्या ठिकाणी ) परत आली. तर आपला मुलगा ( कुलदेवाला दाखविलेला नैवेद्य ) खात असलेला तिला दिसला. ॥ २ ॥
गै जननी सिसु पहिं भयभीता । देखा बाल तहॉं पुनि सुता ॥
बहुरि आइ देखा सुत सोई । हृदयँ कंप मन धीर न होई ॥
आई ( पाळण्यात झोपवला असताना इथे कुणी आणून बसविला, या गोष्टीने घाबरुन ) मुलाजवळ गेली. पाहते तर तेथे तो झोपलेला दिसला. मग देवघरात परत येऊन पाहिले, तर आपला मुलगा तेथे जेवत होता. तिला कापरे भरले आणि तिचे अवसान गळून गेले. ॥ ३ ॥
इहॉं उहॉं दुइ बालक देखा । मतिभ्रम मोर कि आन बिसेषा ॥
देखि राम जननी अकुलानी । प्रभु हँसि दीन्ह मधुर मुसुकानी ॥
( ती विचार करु लागली की, ) इथे आणि तिथे मी दोन मुले पाहिली. हा माझ्या मनाचा भ्रम आहे की काही विशेष कारण आहे. प्रभू रामचंद्रांनी मातेला घाबरुन गेल्याचे पाहून मधुर हास्य केले. ॥ ४ ॥


Custom Search

ShriRamcharitmans Part 36 श्रीरामचरितमानस भाग ३६

 

ShriRamcharitmans Part 36 
Doha 195 to 197 
श्रीरामचरितमानस भाग ३६ दोहा १९५ ते १९७ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--मास दिवस कर दिवस भा मरम न जानइ कोइ ।
रथ समेत रबि थाकेउ निसा कवन बिधि होइ ॥ १९५ ॥
एक महिन्याचा दीर्घ दिवस झाला. याचे रहस्य कुणाला समजले नाही. सूर्य आपल्या रथासह तेथेच थांबला. मग रात्र कशी होणार ? ॥ १९५ ॥
यह रहस्य काहूँ नहिं जाना । दिनमनि चले करत गुनगाना ॥
देखि महोत्सव सुर मुनि नागा । चले भवन बरनत निज भागा ॥
हे रहस्य कुणालाच कळले नाही. सूर्यदेव ( भगवान श्रीरामांचे ) गुणगान करीत गेला. हा महोत्सव पाहून देव, मुनी आणि नाग आपल्या भाग्याची प्रशंसा करीत आपापल्या घरी गेले. ॥ १ ॥
औरउ एक कहउँ निज चोरी । सुनु गिरिजा अति दृढ़ मति तोरी ॥
काकभुसुंडि संग हम दोऊ । मनुजरुप जानइ नहिं कोऊ ॥
हे पार्वती, तुझी बुद्धी ( श्रीरामांच्या चरणी ) पूर्ण रमलेली आहे. म्हणून मी आणखी एक गुपित तुला सांगतो ते ऐक. काकभुशुंडी आणि मी दोघेजण बरोबर होतो, परंतु आम्ही मनुष्यरुपात असल्यामुळे आम्हांस कोणी ओळखू शकले नाही. ॥ २ ॥
परमानंद प्रेम सुख फूले । बिथिन्ह फिरहिं मगन मन भूले ॥
यह सुभ चरित जान पै सोई । कृपा राम कै जापर होई ॥
परम आनंद आणि प्रेम-सुखाने प्रफुल्लित झालेले आम्ही आनंदमग्न मनाने नगरीच्या गल्ल्यांमधून स्वतःला विसरुन फिरत होतो. परंतु हे शुभ चरित्र श्रीरामांची ज्याच्यावर कृपा असेल, तोच जाणू शकेल. ॥ ३ ॥
तेहि अवसर जो जेहि बिधि आवा । दीन्ह भूप जो जेहि मन भावा ॥
गज रथ तुरग हेम गो हीरा । दीन्हे नृप नानाबिधि चीरा ॥
त्यावेळी जो जसा आला आणि ज्याला मनाला जे आवडले, ते राजांनी त्याला दिले. हत्ती, रथ, घोडे, सुवर्ण, गाई, हिरे आणि तर्‍हेतर्‍हेची वस्त्रें राजांनी वाटली. ॥ ४ ॥
 दोहा--मन संतोषे सबन्हि के जहँ तहँ देहिं असीस ।
सकल तनय चिर जीवहुँ तुलसिदास के ईस ॥ १९६ ॥
राजांनी सर्वांना संतुष्ट केले. ( त्यामुळे ) सर्व लोक सर्वत्र आशीर्वाद देत होते की, तुलसीदासाचे स्वामी असलेले सर्व पुत्र चिरंजीव होवोत. ॥ १९६ ॥
कछुक दिवस बीते एहि भॉंती । जात न जानिअ दिन अरु राती ॥
नामकरन कर अवसरु जानी । भूप बोलि पठए मुनि ग्यानी ॥
अशाप्रकारे काही दिवस निघून गेले. दिवस-रात्र कसे जात होते, हेच कळत नव्हते. तेव्हा नामकरण-संस्काराची वेळ झाल्याचे पाहून राजांनी ज्ञानी मुनी वसिष्ठांना बोलावणे पाठविले. ॥ १ ॥
करि पूजा भूपति अस भाषा । धरिअ नाम जो मुनि गुनि राखा ॥
इन्ह के नाम अनेक अनूपा । मैं नृप कहब स्वमति अनुरुपा ॥
मुनींची पूजा केल्यावर राजांनी सांगितले की, ' हे मुनी, तुमच्या मनात जो विचार असेल, त्याप्रमाणे नावे ठेवा. ' ( मुनी म्हणाले, ) ' हे राजा, यांची अनेक अनुपम नावे आहेत, तरीही मी आपल्या विचाराप्रमाणे सांगतो. ॥ २ ॥
जो आनंद सिंधु सुखरासी । सीकर तें त्रैलोक सुपासी ॥
सो सुखधाम राम अस नामा । अखिल लोक दायक बिश्रामा ॥
हा जो आनंदाचा सागर व सुखाचे भांडार आहे, ज्याच्या ( आनंद सिंधूच्या ) एका कणाने तिन्ही लोक सुखी होतात, त्या ( तुमच्या सर्वांत मोठ्या पुत्राचे ) नाव ' राम ' आहे, तो सुखाचे माहेर आणि संपूर्ण लोकांना शांती देणारा आहे. ॥ ३ ॥
बिस्व भरन पोषन कर जोई । ताकर नाम भरत अस होई ॥
जाके सुमिरन तें रिपु नासा । नाम सत्रुहन बेद प्रकासा  ॥
जो जगाचे भरण-पोषण करतो, त्या ( तुमच्या दुसर्‍या ) पुत्राचे नाव ' भरत ' असेल. ज्याच्या स्मरणानेच शत्रूचा नाश होतो, त्याचे वेदांमध्ये प्रसिद्ध असलेले ' शत्रुघ्न ' नाव आहे. ॥ ४ ॥
दोहा--लच्छन धाम राम प्रिय सकल जगत आधार ।
गुरु बसिष्ट तेहि राखा लछिमन नाम उदार ॥ १९७ ॥
जो शुभ लक्षणांचे धाम आहे, श्रीरामांचा आवडता आहे आणि जगाचा आधार आहे, त्याचे गुरु वसिष्ठांनी ' लक्ष्मण ' असे सुंदर नाव ठेवले. ॥ १९७ ॥
धरे नाम गुर हृदयँ बिचारी । बेद तत्व नृप तव सुत चारी ॥
मुनि धन जन सरबस सिव प्राना । बाल केलि रस तेहिं सुख माना ॥
गुरुंनी विचारपूर्वक ही नावे ठेवली ( आणि म्हटले ) ' हे राजा, तुमचे चारी पुत्र हे वेदाचे तत्त्वास्वरुप ( प्रत्यक्ष परात्पर भगवान ) आहेत. जे मुनिजनांचे धन, भक्तांचे सर्वस्व आणि श्रीशंकरांचे प्राण आहेत, ते ( या प्रसंगी तुम्हा लोकांच्या प्रेमापोटी ) बाललीलेमध्ये सुख मानत आहेत. ' ॥ १ ॥
बारेहि ते निज हित पति जानी । लछिमन राम चरन रति मानी ॥
भरत सत्रुहन दूनउ भाई । प्रभु सेवक जसि प्रीति बड़ाई ॥
लहानपणापासूनच श्रीरामांना आपले परम कल्याण करणारे स्वामी मानून लक्ष्मणाने त्यांच्या चरणी प्रेम केले. भरत व शत्रुघ्न या दोघा भावांमध्ये स्वामी-सेवकाच्या ज्या प्रेमाची प्रशंसा होते, तशी प्रीती होती. ॥ २ ॥
स्याम गौर सुंदर दोउ जोरी । निरखहिं छबि जननीं तून तोरी ॥
चारिउ सील रुप गुन धामा । तदपि अधिक सुखसागर रामा ॥
श्याम व गौर देहाच्या दोन्ही सुंदर जोड्यांचे लावण्य पाहून माता ( त्यांना दृष्ट लागू नये म्हणून ) मीठमोहर्‍या ओवाळून टाकत. तसे पाहाता चारीही पुत्र शील, रुप आणि गुणांचे निधाम होते, तरीही सुख-सागर श्रीराम हे सर्वांत श्रेष्ठ होते. ॥ ३ ॥
हृदयँ अनुग्रह इंदु प्रकासा । सूचत किरन मनोहर हासा ॥
कबहुँ उछंग कबहुँ बर पलना । मातु दुलारइ कहि प्रिय ललना ॥
त्यांच्या हृदयांत कृपारुपी चंद्र प्रकाशित होता. मनाला मोहून टाकणारे त्यांचे हास्य त्या कृपारुपी चंद्राच्या किरणांचे द्योतक होते. कधी मांडीवर ( घेऊन ) तर कधी सुंदर पाळण्यात ( घालून ) माता ' माझ्या लाडक्या ' म्हणून त्यांना जोजवत होती. ॥ ४ ॥



Custom Search

Dnyaneshwari Adhyay 3 Part 4 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ४

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 4 
Ovya 76 to 100 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ४ 
ओव्या ७६ ते १००
तूं मानसा नियमु करीं । निश्र्चळु होय अंतरीं ।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
७६) तूं मनाला आंवरुन धर व अंतःकरणांत स्थिर हो; मग ही कर्मेंद्रियें आपापले व्यवहार करीत खुशाल राहूं देत.  
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे ।
आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारीं पां ॥ ७७ ॥
७७) कर्म टाकून देऊं असें म्हणशील, तर विहित कर्में करणें टाकून कर्मातीत ( होणें ) देहधार्‍यास संभवत नाहीं, आणि ( असें जर आहे तर मग ) शास्त्रबाह्य कर्माचें आचरण काय म्हणून करावें, याचा तूं विचार कर;    
म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरुनि प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥ ७८ ॥
७८) म्हणून जें जें करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेलें कर्म आहे, तें तें तूं फलाशा सोडून करीत जा. 
पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । 
जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥
७९) अर्जुना, अशा या निष्काम कर्माचें आणखीहि, एक कौतुक आहे, ते तुला ठाऊक नाहीं, तें हें कीं असें ( अहंकाररहित व निष्काम बुद्धीनें केलेलें विहित, नित्य वा नैमित्तिक ) कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करतें.   
देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । 
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्र्चित पावे ॥ ८० ॥  
८०) पाहा, वर्णाश्रमधर्माप्रमाणें जो आपणांस योग्य असलेल्या धर्माचें आचरण करतो त्यास त्या आचरणानें मोक्षाची प्राप्ति निश्र्चित होते.
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।  
म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ ८१ ॥
८१) अरे बाबा आपला जो धर्म आहे, तोच नित्य यज्ञ होय, असें समज; म्हणून त्याचें आचरण करीत असतांना त्यांत पापाचा शिरकाव होत नाहीं,  
हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मीं रति घडे ।
तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥ ८२ ॥
८२) स्वधर्माचरण सुटलें म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणीं आसक्ति उत्पन्न होते. आणि तेव्हांच त्या वाईट कर्में करणर्‍या पुरुषास संसारबंध प्राप्त होतो.  
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञयाजन । 
जो करी तया बंधन । कहींच नाहीं ॥ ८३ ॥
८३) म्हणून स्वधर्माचें आचरण करणें हेंच नित्य यज्ञयाजन करण्यासारखें होय. जो असे स्वधर्माचरण करतो, तो केव्हांच बंधांत पडत नाहीं.   
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला ।
तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणोनियां ॥ ८४ ॥
८४) हे ( कर्माधिकारी ) लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले, म्हणून कर्मानें बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले.
आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा ।
जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥ ८५ ॥
८५) अर्जुना, याच संबंधाची तुला एक गोष्ट सांगतों. ब्रह्मदेवानें सृष्ट्यादि रचना जेव्हां केली,
तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें ।
परी नेणतिचि तियें यज्ञातें । सूक्ष्म म्हणउनी ॥ ८६ ॥
८६) तेव्हा नित्य यज्ञा ( कर्मा ) सहित सर्व प्राणी त्यानें उत्पन्न केले; परंतु यज्ञ ( कर्म ) सूक्ष्म असल्यामुळें ते प्राणी आपल्या कर्तव्यकर्मांना मुळीच जाणत नव्हते. 
ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां ।
तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥ ८७ ॥
८७) त्या वेळीं सर्व प्राण्यांनीं ब्रह्मदेवाला विनंती केली कीं, देवा, या लोकांत आम्हांला आधार काय ? तेव्हां ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, 
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ॥ ८८ ॥
८८) तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्हीं सांगितला आहे. याचें आचरण करा म्हणजे तुमच्या मनांतील इच्छा आपोआप पूर्ण होतील.  
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । 
दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा ॥ ८९ ॥
८९) ( याखेरीज ) तुम्हाला आणखी व्रतें व नियम करण्याची जरुरी नाहीं व दूर कोठें तीर्थाला जाण्याचें कारण नाहीं.
योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें ।
मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥ ९० ॥
९०) योग वगैरे साधनें, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रतंत्र इत्यादिकांचें अनुष्ठान कदाचित कराल, तर करुं नका.  
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें ।
तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥ ९१ ॥
९१) स्वधर्म सोडून अन्य देवतांस भजावयाचें कारण नाही. हें सर्व करण्याचें मुळीच कारण नाहीं; तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरणरुप यज्ञ करावा.  
अहेतुकें चित्ते । अनुष्ठा पां ययातें ।
पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ९२ ॥
९२) ज्याप्रमाणें पतिव्रता, आपल्या पतीला एकनिष्ठेने भजते त्याप्रमाणें तुम्ही मनांत कोणताहि हेतु न धरतां याचें आचरण करा.   
तैसा स्वधर्मरुप मखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु ।
ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥ ९३ ॥
९३) अशा रीतीने तुम्हांला हाच एक स्वधर्मरुपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे, याप्रमाणें सत्यलोकांचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला.
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल ।
मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा ॥ ९४ ॥
९४) पाहा. स्वधर्माचें आचरण जर कराल, तर हा धर्म कामधेनूप्रमाणें इच्छा पुरविणारा होईल. मग लोकहो, ही ( स्वधर्मरुपी ) कामधेनू तुम्हांला नेहमीं ( केव्हांहि ) सोडणार नाहीं.  
जें येणेंकरुनि समस्तां । परितोषु होईल देवतां ।
मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थांतें देती ॥ ९५ ॥
९५) कारण, या धर्माच्या आचरणामुळें सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हांला इच्छिलेले विषय देतील. 
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां ।
योगक्षेमु निश्र्चिता । करिती तुमचा ॥ ९६ ॥
९६) या स्वधर्मरुप पूजेनें सर्व देवतांना आराधिलें असतां, त्या तुमचा खात्रीनें योगक्षेम चालवितील.
तुम्ही देवतांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील ।
ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥ ९७ ॥
९७) तुम्ही देवांचें आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील; अशी एकमेकांवर जेव्हां प्रीति जडेल;
तेथ तुम्ही जें करुं म्हणाल । तें आपैसें सिद्धी जाईल ।
वांछितही पुरेल । मानसींचें ॥ ९८ ॥
९८) तेव्हां तुम्ही जें करुं म्हणाल, तें सहजच सिद्धीस जाईल आणि मनांतील इच्छित गोष्टीहि पूर्ण होतील.
वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल ।
म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ ९९ ॥
९९) तुम्ही बोलाल तें खरें होईल आणि तुम्ही आज्ञा करणारें व्हाल. तुम्हांला ' आपली काय आज्ञा आहे,' म्हणून महाऋद्धि विचारतील.
जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । 
वोळगे फळभार । लावण्येंसी ॥ १०० ॥
१००) ऋतुपति वसंताच्या द्वारांत वनशोभा ज्याप्रमाणें फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते; 



Custom Search

Saturday, August 15, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 3 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ३

 

Dnyaneshwari Adhyay 3 
Ovya 51 to 75 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ३ 
ओव्या ५१ ते ७५
आणि आपुलालिया चाडे । आपादिलें हें मांडे ।
की त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ॥ ५१ ॥
५१) आणखी ( असें पाहा कीं, ) आपल्या इच्छेप्रमाणें कर्माचा स्वीकार केला असतां तें घडतें आणि कर्म सोडल्यानें कर्माचा त्याग होतो, असें आहे काय ?
हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे ।
परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ॥ ५२ ॥
५२) हें उगीच कांहींतरी बोलणें आहे. याचा नीट विचार करुन पाहिलें, तर कर्म करण्याचें टाकलें म्हणजे कर्म त्याग होतो असें नाहीं, हें तूं निःसंशय समज.
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।
जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥
५३) जोंपर्यंत शरीराचा आश्रय आहे, तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हें म्हणणें मूर्खपणाचें आहे. कारण कीं, जेवढें म्हणून कर्म घडणें आहे, ते स्वभावतः गुणांच्या अधीन आहे. 
देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें ।
तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥
५४) पाहा, जेवढें म्हणून विहित कर्म आहे तेवढें हट्टानें जरी करावयाचें सोडून दिलें, तरी इंद्रियांचें स्वभाव नाहींसे झाले आहेत काय ?   
सांगें श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझलें । परिमळु नेघे ॥ ५५ ॥
५५) सांग, कानांनीं ऐकण्याचे बंद झालें आहे काय ? अथवा डोळ्यांतील पाहाण्याचें सामर्थ्य गेलें आहे काय ? या नाकपुड्या बुजुन वास घेईनाशा झाल्या आहेत काय ?
ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मति । 
की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥ ५६ ॥
५६) अथवा प्राण व अपान, या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय ? किंवा बुद्धीनें कल्पना करण्याचें सोडले आहे काय ? किंवा भूक, तहान इत्यादिकांची पीडा होण्याचें थांबलें आहे काय ? 
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले ।
हें असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥ ५७ ॥
५७) जागृति व स्वप्न ह्या अवस्था थांबल्या का ? अथवा पाय चालावयाचें विसरले काय ? हें सर्व असूं दे. जन्म आणि मरण संपली आहेत काय ?  
हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी । 
म्हणोनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंतां ॥ ५८ ॥
५८) हें जर कांहीं राहात नाहीं तर मग त्याग तो काय केला ? म्हणून शरीराच्या आश्रयानें असणार्‍यांना कर्मत्याग ( केव्हांहि ) घडत नाही.
कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें ।
येरीं घरीं मोकली अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥
५९) कर्म हें परतंत्र असल्यामुळें तें शरीरांतील सत्त्वादि गुणांनुसार उत्पन्न होत असतें. म्हणून एखाद्यानें मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन, असा अंतःकरणांत अभिमान बाळगणें, हें व्यर्थ आहे.  
देखें रथीं आरुढिजे । मग निश्र्चळा बैसिजे ।
तरी चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥
६०) पाहा. रथावर स्वार होऊन, मग जरी स्वस्थ बसलें, तरी तेथें बसणारा रथाच्या अधीन असल्यानें सहजच रथाच्या हालचालींमुळें त्यास प्रवास घडतो. 
कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें ।
निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥ ६१ ॥
६१) अथवा, वायूच्या सपाट्यांत सांपडून उंच उडालेलें वाळलेलें पान ज्याप्रमाणें आपण स्वतः हालचाल न करतां वायुवेगामुळें आकाशांत इकडे तिकडे फिरत असतें;  
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें ।
निष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥
६२) त्याप्रमाणें कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषहि शरीराच्या आश्रयानें कर्मेंद्रियांच्या द्वारां, नेहमीं कर्में करीत असतो. 
म्हणऊनि संगु जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा ।
ऐसियाहि करुं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें ॥ ६३ ॥
६३) म्हणून जेथपर्यंत शरीराशी संबंध आहे, तेथपर्यंत कर्मांचा त्याग घडणें शक्य नाहीं; असें असूनहि ' त्याग करुं ' असें जे कोणी म्हणतील, तर त्यांचा हट्ट मात्र उरणार आहे.  
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ ६४ ॥
६४) जे पुरुष आपल्या वांट्याला आलेलें कर्म टाकतात व त्यायोगें कर्मातीत अवस्थेला पोहोंचूं पाहतात; परंतु केवळ कर्मेंद्रियप्रवृत्तीचा निरोध करुनच !   
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।
वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥ ६५ ॥
६५) त्यांस कर्मत्याग तर घडत नाहीं, कारण त्यांच्या अंतःकरणांत कर्तव्यबुद्धि असते; असे असूनहि तें बाह्यात्कारीं कर्मत्यागाचा जो डौल आणतात, तें खरोखर दैन्य आहे, असे समज.
 ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा ।
ओळखावे तत्त्वत्ता । येथ भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥
६६) अर्जुना, असे ते लोक खरोखरच केवळ विषयासक्त आहेत, असें निःसंशय समज.
आतां देईं अवधान । प्रसंगें तुज सांगेन । 
या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥ ६७ ॥
६७) अर्जुना, प्रसंग आलेला आहे, म्हणुन तुला या निष्काम पुरुषाचें लक्षण सांगतों. इकडे तूं लक्ष दे.
जो अंतरीं दृढु । परमात्मरुपीं गूढु ।
बाह्य तरी रुढु । लौकिकु जैसा ॥ ६८ ॥
६८) जों अंतर्यामीं निश्चळ व परमात्म्याच्या स्वरुपांत गढलेला असतो आणि बाहेरुन मात्र लोकांप्रमाणें व्यवहार करीत असतो;
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । 
प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥
६९) तो इंद्रियांना हुकूम करीत नाहीं आणि विषय बांधतील अशी त्यास भीति नसते. तो अधिकारपरत्वें प्राप्त झालेलें जें जें विहित कर्म त्याचा अनादर करीत नाहीं.
तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी ।
परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥
७०) कर्मेंद्रियें कर्में करीत असली तरी त्यांना तो पुरुष आवरीत नाहीं; पण त्यामुळें उत्पन्न होणार्‍या विकारांनीं तो लिप्त होत नाहीं.
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे ।
जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥ ७१ ॥
७१) ज्याप्रमाणें पाण्यांतील कमलाचें पान पाण्यानें लिप्त होत नाहीं, त्याप्रमाणें तो कोणत्याही कामनेनें लिप्त होत नाहीं व अविवेकरुपी मलाच्या योगानें तो मलिन होत नाहीं.
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे ।
जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥
७२) त्या कमलाच्या पानाप्रमाणें तो अलिप्तपणानें संगामध्यें राहातो. तो दिसण्यांत सामान्य लोकांप्रमाणें दिसतो. ज्याप्रमाणें सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनहि ( प्रतिबिंबामुळें ) पाण्याच्या संगतींत राहतांना दिसतें,  
तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । 
येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥ ७३ ॥
७३) त्याप्रमाणें वरवर पाहिलें तर, तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्यासंबंधीं निश्चित विचार ठरवूं म्हटलें तर त्याच्या स्थितीविषयीं कांहींच कल्पना करतां येत नाहीं.    
ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु ।
आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥
७४) अशा लक्षणांनीं युक्त असलेला जो तुला दिसेल, तोच आशापाशरहित व मुक्त आहे. असें तूं ओळख.  
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं ।
म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥ ७५ ॥   
७५) अर्जुना, जगामध्यें ज्याचें विशेष वर्णन केलें जातें, असा तोच योगी होय. याकरितांच तूं असा हो, म्हणून मी तुला म्हणतों.




Custom Search

Wednesday, August 12, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग २

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 2 Ovya 26 to 50 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग २ ओव्या २६ ते ५०
तरी आपुलिया सवेसा । कां न मगावासि परेशा ।
देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥
२६) तर मग हे परमेश्र्वरा, आपल्या इच्छेला येईल तसें तुजजवळून कां मागून घेऊं नये ? देवा, माझ्या मनांतील हेतु पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. 
देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासी आलें ।
हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥
२७) पाहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झालें, आज माझें पूर्व पुण्य यशस्वी झालें व माझ्या मनातील हेतु आज तडीस गेले.
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । 
तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥ २८ ॥
२८) कारण, अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचें स्थान आणि ( सर्व ) देवांत श्रेष्ठ अशा देवा, तूं आमच्या ताब्यांत आला आहेस, म्हणून  
जैसें मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं ।
स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥
२९) पाहा, जसें लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणीं वेळ-अवेळ अशी कांहींच नसते;   
तैसें देवा तूतें । पुसिजतसें आवडे तें ।
आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥ ३० ॥
३०) तसें हे कृपानिधि देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणें तुला वाटेल तें विचारीत आहें.
तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित ।
तें सांगें एक निश्र्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
३१) तर मग परलोकीं कल्याणकारक आणि ( इहलोकीं ) आचरण्याला तर योग्य असें जें असेल तें एक मला निश्र्चित करुन सांग, असें अर्जुन म्हणाला.
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । 
अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥
३२) अर्जुनाच्या या भाषणानें श्रीकृष्ण आश्र्चर्यचकित होऊन म्हणूं लागले, अर्जुना, आम्हीं, तुला हा थोडक्यांत मतलब सांगितला
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । 
प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥ ३३ ॥
३३) कारण कीं, निष्काम कर्मयोग सांगत असतांना प्रसंगानें सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ( ज्या हेतूनें ) स्पष्ट केली,
तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणोनि क्षोभलासि वायांचि ।
तरी आतां जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
३४) तो आमच्या प्रतिपादनाचा हेतु तूं जाणलाच नाहींस, म्हणून उगीच रागावला आहेस. तर आतां ध्यानांत ठेव कीं, हे दोनहि मार्ग मीच सांगितलेलें आहेत.
अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।
मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
३५) हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ऐक. या लोकाममध्यें हे दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रकट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत.
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे ।
जेथ ओळखीसवें पाविजे । तद् रुपता ॥ ३६ ॥
३६) त्यांपैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचें आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्यांत ओळखीबरोबर परमात्मस्वरुपाशीं तन्मयता प्राप्त होतें.  
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण ।
होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥
३७) दुसरा तो कर्मयोग समज. जेथें साधक लोक निष्णात होऊन परम गतीला पावतात, ( परंतु ) ते कांहीं कालानें पावतात.   
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं ।
जैसीं सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी ॥ ३८ ॥
३८) हे मार्ग तर दोन आहेत; परंतु ते शेवटीं एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणें तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणांत सारखीच तृप्ती असते; 
कां पूर्वापर सरिता । भिन्न दिसती पाहतां ।
मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥
३९) किंवा पूर्वेकडून व पश्र्चिमेकडून वाहणार्‍या नद्या पाहिल्या तर वाहतांना वेगळाल्या दिसतात, मग समुद्रांत मिळाल्या असतां शेवटी एकच होतात; 
तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें ।
परी उपास्ति ते योग्यते-। आधीन असे ॥ ४० ॥
 ४०) त्याप्रमाणें ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवितात. परंतु त्यांचे आचरण करणें करणाराच्या योग्यतेवर अवलंबून आहे. 
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥ ४१ ॥
४१) हें पाहा. ज्याप्रमाणें पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणें मनुष्याला त्या वेगानें तें फळ कसें प्राप्त करुन घेतां येईल ? सांग बरें. 
तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे ।
मार्गाचेनि बळें । निश्र्चित ठाकी ॥ ४२ ॥
४२) तो हलके हलके एका फांदीवरुन दुसर्‍या फांदीवर जात जात, कांहीं वेळानें त्या मार्गाच्या आधारानें त्या फळापर्यंत खात्रीनें पोंचतो.  
तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
४३) पाहा. तसें वरील दृष्टान्तांतील पक्ष्याच्या मार्गाप्रमाणें ज्ञानमार्गाचा आश्रय करुन ज्ञानी तत्क्षणींच मोक्ष आपल्या अधीन करुन घेतात.
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥
४४) दुसरे जे कर्मयोगी, ते कर्मयोगाच्या आश्रयानें वेदांत सांगितलेला आपला आचारच पाळून, कांहीं कालानें पूर्णतेस पोहोंचतात.   
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत ।
कर्महीना निश्र्चित । होईजेना ॥ ४५ ॥
४५) शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करतांच कर्महीनाला सिद्धाप्रमाणें ( निष्कर्म ) निश्र्चयानें होतां येणार नाहीं. 
कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥
४६) किंवा अधिकारपरत्वें आपल्या भागाला आलेलें कर्म टाकून द्यावें व एवढ्यानेंच निष्कर्म व्हावे, हें बोलणें अर्जुना, व्यर्थ व मूर्खपणाचें आहे.   
सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।
तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥ ४७ ॥
४७) पलीकडील तीराला कसें जावें अशी जेथें अडचण पडली आहे, तेथें नावेचा त्याग करुन कसें चालेल ? सांग बरें
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेननि पाकु न कीजे ।
कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥ ४८ ॥
४८) अथवा, जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वतंपाक न करुन कसें चालेल ? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करतां कसें चालेल ? सांग.
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं ।
मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥ ४९ ॥
४९) जोंपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाहीं तोंपर्यंत कर्म करणें हें राहाणारच, असें समज ; व मग आत्मतृप्ति प्राप्त झाली असतां कर्म सहजच थांबतें.
म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥
५०) म्हणून अर्जुना, ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे, त्यानें आपली विहित कर्में टाकणें मुळींच योग्य होणार नाहीं.   
 


Custom Search

ShriRamcharitmans Part 35 श्रीरामचरितमानस भाग ३५

 


ShriRamcharitmans Part 35 Doha 192 to 194
श्रीरामचरितमानस भाग ३५ दोहा १९२ ते १९४
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--बिप्र धेनु सुर संत हित लीन्ह मनुज अवतार ।
निज इच्छा निर्मित तनु माया गुन गो पार ॥ १९२ ॥
भगवंतांनी ब्राह्मण, गाई, देव आणि संत यांच्यासाठी मनुष्याचा अवतार घेतला. ते ( अज्ञानमय, मलिन ) माया आणि तिचे गुण ( सत्त्व, रज, तम ) आणि ( बाह्य व आंतरिक ) इंद्रियांच्या पलीकडील आहेत. त्यांचे ( दिव्य ) शरीर हे स्वेच्छेने बनले आहे. ( कोणत्याही कर्मबंधनामुळे परवश होऊन त्रिगुणात्मक भौतिक पदार्थांनी बनलेले नाही. ) ॥ १९२ ॥
सुनि सिसु रुदन परम प्रिय बानी । संभ्रम चलि आईं सब रानी ॥
हरषित जहँ तहँ धाईं दासी । आनँद मगन सकल पुरबासी ॥
मुलाच्या रडण्याचा आनंददायी आवाज ऐकून सर्व राण्यांनी उतावीळ होऊन धाव घेतली. दासी आनंदाने इकडे तिकडे धांवू लागल्याा. सर्व पुरवासी आनंदात बुडून गेले. ॥ १ ॥
दसरथ पुत्रजन्म सुनि काना । मानहुँ ब्रह्मानंद समाना ॥
परम प्रेम मन पुलक सरीरा । चाहत उठन करत मति धीरा ॥
राजा दशरथ पुत्र-जन्माची वार्ता ऐकून जणू ब्रह्मानंदात बुडाले. मनात अत्यंत प्रेम उचंबळून आले, शरीर पुलकित झाले. ( आनंदाने अधीर झालेल्या ) बुद्धीला मोठ्या धैर्यानें स्थिर करुन ( प्रेमाने विव्हळ झालेले शरीर सावरत ) ते उठण्याचा प्रयत्न करु लागले. ॥ २ ॥
जाकर नाम सुनत सुभ होई । मोरें गृह आवा प्रभु सोई ॥
परमानंद पूरि मन राजा । कहा बोलाइ बजावहु बाजा ॥
ज्यांचे नाव फक्त श्रवण केल्याने कल्याण होते, तेच प्रभू माझ्या घरी आले आहेत, ( असा विचार करुन ) राजाचे मन परमानंदाने भरुन आले. त्यांनी वादकांना बोलावून म्हटले, ' नगारे वाजवा. नगारे वाजवा. ' ॥ ३ ॥
गुर बसिष्ठ कहँ गयउ हँकारा । आए द्विजन सहित नृपद्वारा ॥
अनुपम बालक देखेन्हि जाई । रुप रासि गुन कहि न सिराई ॥
गुरु वसिष्ठांच्याकडे बोलावणे गेले. ते ब्राह्मणांना बरोबर घेऊन राजवाड्यात आले. त्यांनी जाऊन त्या अलौकिक बालकाला पाहिले. ते रुपाची खाण होते आणि त्याचे गुण सांगुन संपणारे नव्हते. ॥ ४ ॥
दोहा--नंदीमुख सराध करि जातकरम सब कीन्ह ।
हाटक धेनु बसन मनि नृप बिप्रन्ह कहँ दीन्ह ॥ १९३ ॥
नंतर राजांनी नांदीमुख श्राद्ध करुन जातकर्म-संस्कार इत्यादी सर्व केले आणि ब्राह्मणांना सुवर्ण, गाई, वस्त्रे आणि रत्नांचे दान केले. ॥ १९३ ॥
ध्वज पताक तोरन पुर छावा । कहि न जाइ जेहि भॉंति बनावा ॥
सुमनबृष्टि अकास तें होई । ब्रह्मानंद मगन सब लोई ॥ 
ध्वज, पताका आणि तोरणांनी नगर सजून गेले. ज्याप्रकारे ते सजविले होते, त्याचे वर्णन करणे अशक्य. आकाशातून फुलांचा वर्षाव होत होता, सर्व लोक ब्रह्मानंदात मग्न झाले होते. ॥ १ ॥
 बृंद बृदं मिलि चलीं लोगाईं । सहज सिंगार किएँ उठि धाईं ॥
कनक कलस मंगल भरि थारा । गावत पैठहिं भूप दुआरा ॥
स्त्रियांचे समूहच्या समूह निघाले. त्या स्वाभाविक शृंगार करुन धावल्या. सोन्याचा कलश घेऊन आणि तबकांमध्ये मांगलिक द्रव्ये घेऊन त्यांनी गात-गात राजमहालात प्रवेश केला. ॥ २ ॥            
करि आरति नेवछावरि करहीं । बार बार सिसु चरनन्हि परहीं ॥
मागध सूत बंदिगन गायक । पावन गुन गावहिं रघुनायक ॥
त्यांनी आरती ओवाळून ओवाळण्या दिल्या आणि त्या वारंवार मुलाच्या पाया पडू लागल्या. मागध, सूत, बंदीजन आणि गवई रघुकुलाच्या स्वामींच्या पवित्र गुणांचे गायन करु लागले. ॥ ३ ॥
सर्बस दान दीन्ह सब काहू । जेहिं पावा राखा नहिं ताहू ॥
मृगमद चंदन कुंकुम कीचा । मची सकल बीथिन्ह बिच बीचा ॥
अयोध्येत सर्वजणांनी सर्वस्वाचे दान केले. ज्यांना ते मिळाले, त्यांनीही ते ( आपल्याजवळ ) ठेवले नाही. ( लूटून टाकले. ) ( नगरातील ) सर्व गल्ल्यांमध्ये कस्तुरी, चंदन आणि केशर यांचा जणू सडा पडला होता. ॥ ४ ॥
 दोहा--गृह गृह बाज बधाव सुभ प्रगटे सुषमा कंद ।
हरषवंत सब जहँ तहँ नगर नारि नर बृदं ॥ १९४ ॥
घरोघरी मंगल वाद्ये गुंजू लागली. शोभेचा कंद असलेले भगवान प्रकट झाले होते. नगरातील स्त्री-पुरुषांच्या झुंडी सर्वत्र आनंदमग्न होत होत्या. ॥ १९४ ॥
कैकयसुता सुमित्रा दोऊ । सुंदर सुत जनमत भैं ओऊ ॥
वह सुख संपति समय समाजा । कहि न सकइ सारद अहिराजा ॥
कैकेयी आणि सुमित्रा या दोघींनीही सुंदर मुलांना जन्म दिला. त्या प्रसंगी सुख, संपत्ती, शुभवेळ आणि समाज यांचे वर्णन सरस्वती आणि सर्पराज शेषही करु शकणार नाहीत. ॥ १ ॥
अवधपुरी सोहइ एहि भॉंती । प्रभुहि मिलन आई जनु राती ॥
देखि भानु जनु मन सकुचानी । तदपि बनी संध्या अनुमानी ॥
अयोध्यापुरी अशी सुशोभित झाली होती की, रात्र ही जणू प्रभूंना भेटण्यासाठी आली होती आणि सूर्याला पाहून मनातून संकोच पावत होती, तरी पण मनात विचार करीत ती जणू संध्याकाळ बनून गेली होती. ॥ २ ॥
अगर धूप बहु जनु अँधिआरी । उड़इ अबीर मनहुँ अरुनारी ॥
मंदिर मनि समूह जनु तारा । नृप गृह कलस सो इंदु उदारा ॥
आगुरु-धूपाचा इतका धूर पसरला की, जणू तो संध्याकाळचा अंधार वाटला आणि जो गुलाल उधळला जात होता तो तिचा लालिमा आहे. महालांवर जडविलेले रत्नांचे समूह जणू तारागण आहेत. राजमहालाचा जो ( चमकणारा ) कळस होता , तो जणू तेजस्वी चंद्रमा आहे. ॥ ३ ॥
भवन बेदधुनि अति मृदु बानी । जनु खग मुखर समयँ जनु सानी ॥
कौतुक देखि पतंग भुलाना । एक मास तेइँ जात न जाना ॥
राजभवनात अत्यंत कोमल वाणीने जो वेदध्वनी होत होता, तो जणू पक्ष्यांचा समयोचित किलबिलाट होता. हे कौतुक पाहून सूर्यसुद्धा आपली गती विसरुन गेला. एक महिना केव्हा गेला, हे सूर्याला कळलेच नाही. ( अर्थात त्याचा एक महिना तेथेच गेला. ) ॥ ४ ॥



Custom Search

Tuesday, August 11, 2020

ShriRamcharitmans Part 34 श्रीरामचरितमानस भाग ३४


 ShriRamcharitmans Part 34 

Doha 189 to 191

श्रीरामचरितमानस भाग ३४

दोहा १८९ ते १९१

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा--तब अदृस्य भए पावक सकल सभहि समुझाइ ।

परमानंद मगन नृप हरष न हृदयँ समाइ ॥ १८९ ॥

नंतर अग्निदेव संपूर्ण सभेला समजावून सांगून अंतर्धान पावले. राजा परमानंदात मग्न झाला. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. ॥ १८९ ॥  

तबहिं रायँ प्रिय नारि बोलाईं । कौसल्यादि तहॉं चलि आई ॥

अर्ध भाग कौसल्यहि दीन्हा । उभय भाग आधे कर कीन्हा ॥ 

मग राजाने आपल्या प्रिय पत्नींना बोलावून घेतले. कौसल्या इत्यादी सर्व राण्या तेथे आल्या. राजाने पायसाचा अर्धा भाग कौसल्येला दिला आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे दोन भाग केले. ॥ १ ॥

कैकेई कहँ नृप सो दयऊ । रह्यो सो उभय भाग पुनि भयऊ ॥

कौसल्या कैकेई हाथ धरि । दीन्ह सुमित्रहि मन प्रसन्न करि ॥

त्यापैकी एक भाग राजाने कैकेयीला दिला. उरलेल्या भागाचे दोन भाग केले आणि राजाने ते कौसल्या आणि कैकेयी यांच्या हातावर ठेवून ( त्यांच्या संमतीने ), त्यांचे मन प्रसन्न ठेवून सुमित्रेला दिले. ॥ २ ॥

एहि बिधि गर्भसहित सब नारी । भईं हृदयँ हरषित सुख भारी ॥

जा दिन तें हरि गर्भहिं आए । सकल लोक सुख संपति छाए ॥

अशाप्रकारे सर्व राण्या गर्भवती झाल्या. त्यांना मनातून खूप आनंद झाला. त्यांना फार सुख वाटले. ज्या दिवशी श्रीहरी ( आपल्या लीलेने ) गर्भामध्ये आले, त्या दिवसापासून सर्व लोकांमध्ये सुख व संपत्ती पसरली. ॥ ३ ॥

मंदिर महँ सब राजहिं रानीं । सोभा सील तेज की खानीं ॥

सुख जुत कछुक काल चलि गयऊ । जेहिं प्रभु प्रगट सो अवसर भयऊ ॥

शोभा, शील व तेज यांची खाण ( बनलेल्या ) सर्व राण्या राजमहालामध्ये शोभून दिसू लागल्या. अशाप्रकारे काही काळ सुखात गेला. प्रभूंची प्रकट होण्याची वेळ आली. ॥ ४ ॥

दोहा--जोग लगन ग्रह बार तिथि सकल भए अनुकूला ।

चर अरु अचर हर्षजुत राम जनम सुखमूल ॥ १९० ॥

योग, लग्न, ग्रह, वार आणि तिथी सर्वच अनुकूल बनले. सर्व चराचर आनंदाने भरुन गेले. कारण श्रीरामांचा जन्म सुखाचे मूळ आहे. ॥ १९० ॥

 नौमी तिथि मधु मास पुनीता । सुकल पच्छ अभिजित हरिप्रीता ॥

मध्य दिवस अति सीत न घामा । पावन काल लोक बिश्रामा ॥

चैत्राचा पवित्र महिना होता, नवमी तिथी होती. शुक्लपक्ष आणि भगवंताचा प्रिय अभिजित मुहूर्त होता. दुपारची वेळ होती. फार थंडी नव्हती आणि फार ऊनही नव्हते. ती पवित्र वेळ सर्व लोकांना शांतता देणारी होती. ॥ १ ॥

सीतल मंद सुरभि बह बाऊ । हरषित सुर संतन मन चाऊ ॥

बन कुसुमित गिरिगन मनिआरा । स्रवहिं सकल सरिताऽमृतधारा ॥

शीतल, मंद आणि सुगंधित वारा वाहात होता. देव आनंदित होते आणि संतांच्या मनामध्ये मोठा उत्साह भरला होता. वने फुललेली होती. पर्वतांचे समुदाय रत्नांनी चमचमत होते. सर्व नद्यांतून अमृताच्या धारा वाहात होत्या. ॥ २ ॥

सो अवसर बिरंचि जब जाना । चले सकल सुर साजि बिमाना ॥

गगन बिमल संकुल सुर जूथा । गावहिं गुन गंधर्ब बरुथा ॥

जेव्हा ब्रह्मदेवांनी ती ( भगवंतांच्या प्रकट होण्याची ) वेळ जाणली, तेव्हा ( त्यांच्यासह ) सर्व देव विमाने सजवून निघाले. आकाश देवांच्या समुदायाने भरुन गेले. गंधर्वांचे समूह गुणगान करु लागले. ॥ ३ ॥

बरषहिं सुमन सुअंजुलि साजी । गहगहि गगन दुंदुभी बाजी ॥

अस्तुति करहिं नाग मुनि देवा । बहुबिधि लावहिं निज निज सेवा ॥

आणि ओंजळीमध्ये सुंदर फुले भरुन पुष्पांचा वर्षाव करु लागले. आकाशात नगारे दुमदुमू लागले. नाग, मुनी आणि देव स्तुती करु लागले आणि अनेक प्रकारे आपापल्या सेवा अर्पण करु लागले. ॥ ४ ॥

 दोहा--सुर समूह बिनती करि पहुँचे निज निज धाम ।

जगनिवास प्रभु प्रगटे अखिल लोक बिश्राम ॥ १९१ ॥

सर्व लोकांना शांतता देणारे, जगदाधार प्रभू प्रगट झाले. देवांचे समुदाय प्रार्थना करुन आपापल्या लोकांमध्ये गेले. ॥ १९१ ॥

छं०--भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी ।

हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रुप बिचारी ॥

लोचन अभिरामा तनु घनस्यामा निज आयुध भुज चारी ।

भूषन बनमाला नयन बिसाला सोभसिंधु खरारी ॥ १ ॥

दीनांच्यावर दया करणारे, कौसल्येचे हितकारी कृपाळू प्रभू प्रकट झाले. मुनींचे मन हरण करणारे, त्यांचे अद्भुत रुप पाहून माता आनंदून गेली. नेत्रांना सुख देणारे मेघांसारखे त्यांचे सावळे शरीर होते. चारी हातांमध्ये आपली वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होती. विशाल नेत्र होते. अशा प्रकारे सौंदर्याचे सागर भगवान श्रीराम प्रकट झाले. ॥ १ ॥

कह दुइ कर जोरी अस्तुति तोरी केहि बिधि करौं अनंता ।

माया गुन ग्यानातीत अमाना बेद पुरान भनंता ॥

करुना सुख सागर सब गुन आगर जेहि गावहिं श्रुति संता ।

सो मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकंता ॥ २ ॥

दोन्ही हात जोडून माता कौसल्या म्हणू लागली, ' हे अनंता, मी तुमची स्तुती कशी करु ? वेद आणि पुराणे म्हणतात की माया, गुण आणि ज्ञान यांच्या पलीकडील आणि परिमाणरहित तुम्ही आहात. श्रुती आणि संतजन ज्यांचे दया आणि सुखाचे सागर, सर्व गुणांचे धाम म्हणून गायन करतात, तेच भक्तांवर प्रेम करणारे लक्ष्मीपती भगवान माझ्या कल्याणासाठी प्रकट झाले आहेत. ॥ २ ॥

ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति बेद कहै ।

मम उर सो बासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहै ॥

उपजा जब ग्याना प्रभु मुसुकाना चरित बहुत बिधि कीन्ह चहै ।

कहि कथा सुहाई मातु बुझाई जेहि प्रकार सुत प्रेम लहै ॥ ३ ॥

वेद म्हणतात की, तुमच्या प्रत्येक रोमामध्ये मायेने रचलेले ब्रह्मांडाचे समूह भरलेले आहेत. तुम्ही माझ्या उदरात राहिलात, ही हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट ऐकून विवेकी पुरुषांची बुद्धीसुद्धा अचंबित होते. जेव्हा मातेला ज्ञान झाले, तेव्हा भगवंतांनी स्मित हास्य केले. त्यांना बर्‍याच लीला करावयाच्या होत्या. म्हणून त्यांनी ( पूर्वजन्मीच्या ) सुंदर कथा सांगून मातेला समजावले. ज्यामुळे तिला आपल्याविषयी पुत्रप्रेम वाटावे. ॥ ३ ॥

माता पुनि बोली सो मति डोली तजहु तात यह रुपा ।

कीजै सिसुलीला अति प्रियसीला यह सुख परम अनूपा ॥

सुनि बचन सुजाना रोदन ठाना होइ बालक सुरभूपा ।

यह चरित जे गावहिं हरिपद पावहिं ते न परहिं भवकूपा ॥ ४ ॥

त्याबरोबर मातेची ती ( ज्ञान ) बुद्धी बदलली. ती म्हणाली, ' हे रुप सोडून आईला आवडणारी बाललीला कर. ( माझ्यासाठी ) ते सुख परम अनुपेय ठरेल. ' मातेचे हे वचन ऐकताच देवाधिदेव ज्ञानस्वरुप भगवंतांनी बालरुप धारण करुन रुदन सुरु केले. ( तुलसीदास म्हणतात, ) जे या चरित्राचे गायन करतात, त्यांना श्रीहरींचे परमपद लाभते आणि मगते संसाररुपी अंधकूपात पडत नाहीत. ॥ ४ ॥





Custom Search

ShriRamcharitmans Part 33 श्रीरामचरितमानस भाग ३३


 ShriRamcharitmans Part 33, 

Doha 186 to 188,

श्रीरामचरितमानस भाग ३३,

दोहा १८६ ते १८८,

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा--जानि सभय सुर भूमि सुनि बचन समेत सनेह ।

गगनगिरा गंभीर भइ हरनि सोक संदेह ॥ १८६ ॥

देव आणि पृथ्वी भयभीत झाल्याचे पाहून आणि त्यांचे स्नेहयुक्त बोलणे ऐकून शोक व संदेह दूर करणारी गंभीर आकाशवाणी झाली. ॥ १८६ ॥

जनि डरपहु मुनि सिद्ध सुरेसा । तुम्हहि लागि धरिहउँ नर बेसा ॥

अंसन्ह सहित मनुज अवतारा । लेहउँ दिनकर बंस उदारा ॥ 

' हे मुनींनो, सिद्धांनो व देवाधिदेवांनो ! घाबरु नका. तुमच्यासाठी मी मनुष्यरुप धारण करीन आणि पवित्र सूर्यवंशामध्ये आपल्या अंशासह अवतार घेईन. ॥ १ ॥

कस्यप अदिति महातप कीन्हा । तिन्ह कहुँ मैं पूरब बर दीन्हा ॥

ते दसरथ कौसल्या रुपा । कोसलपुरीं प्रगट नरभूपा ॥ 

कश्यप आणि अदिती यांनी मोठे तप केले होते. मी पूर्वीच त्यांना वर दिलेला आहे. तेच दशरथ आणि कौसल्या यांच्या रुपाने मनुष्यांचे राजा बनून अयोध्यापुरीत प्रकट झालेले आहेत. ॥ २ ॥

तिन्ह के गृह अवतरिहउँ जाई । रघुकुल तिलक सो चारिउ भाई ॥

नारद बचन सत्य सब करिहउँ । परम सक्ति समेत अवतरिहउँ ॥

त्यांच्या घरी मी रघुकुलात श्रेष्ठ चार भावांच्या रुपाने अवतार घेईन. नारदांचे ( शाप ) वचन मी पूर्णपणे सत्य करीन आणि आपल्या पराशक्तीसह अवतार घेईन. ॥ ३ ॥

हरिहउँ सकल भूमि गरुआई । निर्भय होहु देव समुदाई ॥

गगन ब्रह्मबानी सुनि काना । तुरत फिरे सुर हृदय जुड़ाना ॥

मी पृथ्वीचा सर्व भार हरण करीन. हे देववृंदांनो ! तुम्ही निर्भय व्हा. ' आकाशात झालेली ही भगवंतांची वाणी ऐकून देव लगेच परत गेले. त्यांचे मन संतुष्ट झाले. ॥ ४ ॥

तब ब्रह्मॉं धरनिहि समुझावा । अभय भई भरोस जियँ आवा ॥

मग ब्रह्मदेवांनी पृथ्वीला समजावून सांगितले. तीसुद्धा निर्भय झाली आणि तिला धीर आला. ॥ ५ ॥

दोहा--निज लोकहि बिरंचि गे देवन्ह इहइ सिखाइ ।

बानर तनु धरि धरि महि हरि पद सेवहु जाइ ॥ १८७ ॥

सर्व देवांना सांगितले की, ' वानरांचे रुप घेऊन तुम्ही पृथ्वीवर जाऊन भगवंतांच्या चरणाची सेवा करा. ' असे म्हणून ब्रह्मदेव आपल्या लोकी परत गेले. ॥ १८७ ॥

गए देव सब निज निज धामा । भूमि सहित मन कहुँ बिश्रामा ॥

जो कछु आयसु ब्रह्मॉं दीन्हा । हरषे देव बिलंब न कीन्हा ॥

सर्व देव आपापल्या लोकी गेले. पृथ्वीसह सर्वांच्या मनाला शांती लाभली. ब्रह्मदेवांनी जी आज्ञा दिली, त्यामुळे देव फार प्रसन्न झाले आणि त्यांनी ( तसे करण्यास ) वेळ घालविला नाही. ॥ १ ॥

बनचर देह धरी छिति माहीं । अतुलित बल प्रताप तिन्ह पाहीं ॥

गिरि तरु नख आयुध सब बीरा । हरि मारग चितवहिं मतिधीरा ॥

देवांनी पृथ्वीवर वानरदेह धारण केले. त्यांच्यामध्ये अपार बळ आणि पराक्रम होता. सर्वजण शूर होते. पर्वत, वृक्ष व नखें हीच त्यांची शस्त्रे होती. ते सर्व धीरबुद्धीचे ( वानररुप देव ) भगवंताच्या येण्याची वाट पाहू लागले. ॥ २ ॥

गिरि कानन जहँ तहँ भरि पूरी । रहे निज निज अनीक रचि रुरी ॥

यह सब रुचिर चरित मैं भाषा । अब सो सुनहु जो बीचहिं राखा ॥

ते वानर पर्वतांमध्ये व जंगलामध्ये जिकडे तिकडेआपल्या चांगल्या सेना बनवून सर्वत्र पसरले. हे सर्व चरित्र मी सांगितले. आता मध्येच सोडून दिलेले चरित्र ऐका. ॥ ३ ॥

अवधपुरी रघुकुलमनि राऊ । बेद बिदित तेहि दसरथ नाऊँ ॥

धरम धुरंधर गुननिधि ग्यानी । हृदयँ भगति मति सारँगपानी ॥

अयोध्यापुरीत रघुकुलशिरोमणि दशरथ नावाचा राजा झाला. त्यांचे नांव वेदामध्येही प्रसिद्ध आहे. ते धनुर्धर गुणांचे भांडार आणि ज्ञानी होते. त्यांच्या मनात शार्ङ्गधनुष्य धारण करणार्‍या भगवंतांची भक्ती होती आणि त्यांची बुद्धीही त्यांच्यामध्येच रमली होती. ॥ ४ ॥

दोहा--कौसल्यादि नारि प्रिय सब आचरन पुनीत ।

पति अनुकूल प्रेम दृढ़ हरि पद कमल बिनीत ॥ १८८ ॥

त्यांच्या कौसल्या इत्यादी प्रिय राण्या पवित्र आचरणाच्या होत्या. त्या फार नम्र आणि पतीला अनुकूल वागणार्‍या होत्या. श्रीहरींच्या चरणकमलांमध्ये त्यांचे निःसीम प्रेम होते. ॥ १८८ ॥

एक बार भूपति मन माहीं । भै गलानि मोरें सुत नाहीं ॥

गुर गृह गयउ तुरत महिपाला । चरन लागि करि बिनय बिसाला ॥

एकदा राज्याच्या मनात अतिशय खेद झाला की, मला पुत्र नाही. राजा त्वरित गुरुंच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणांना प्रणाम करुन त्याने विनवणी केली. ॥ १ ॥

निज दुख सुख सब गुरहि सुनायउ । कहि बसिष्ठ बहु बिधि समुझायउ ॥

धरहु धीर होइहिं सुत चारी । त्रिभुवन बिदित भगत भय हारी ॥

राजाने आपले सारे दुःख गुरुंना सांगितले. गुरु वसिष्ठ यांनी त्यांना अनेक प्रकाराने समजावून सांगितले. ( आणि म्हटले, ) ' धीर धरा. तुम्हांला चार पुत्र होतील, ते तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आणि भक्तांचे भय हरण करणारे होतील. ' ॥ २ ॥

सृंगी रिषिहि बसिष्ठ बोलावा । पुत्रकाम सुभ जग्य करावा ॥

भगति सहित मुनि आहुति दीन्हें । प्रगटे अगिनि चरु कर लीन्हें ॥

वसिष्ठांनी शृंगी ऋषींना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून पुत्रकामेष्ठी यज्ञ करवून घेतला. मुनींनी भक्तिपूर्वक आहुती दिल्यावर अग्निदेव हातामध्ये पायस घेऊन प्रगट झाले. ॥ ३ ॥    

जो बसिष्ठ कछु हृदयँ बिचारा । सकल काजु भा सिद्ध तुम्हारा ॥

यह हबि बॉंटि देहु नृप जाई । जथा जोग जेहि भाग बनाई ॥

अग्निदेव ( दशरथ राजांना ) म्हणाले, ' वसिष्ठांनी मनांत जे ठरवले होते, त्यानुसार तुमचे सर्व काम पूर्ण झाले. हे राजा, तू जाऊन हा पायस योग्य वाटेल, त्याप्रमाणे भाग करुन ( राण्यांना ) वाटून दे.' ॥ ४ ॥







Custom Search

Monday, August 10, 2020

ShriRamcharitmans Part 32 श्रीरामचरितमानस भाग ३२

 

ShriRamcharitmans Part 32  

Doha 183 to 185

श्रीरामचरितमानस भाग ३२

दोहा १८३ ते १८५
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
छं०--जप जोग बिराग तप मख भागा श्रवन सुनइ दससीसा ।
आपुनु उठि धावइ रहै न पावइ धरि सब घालइ खीसा ॥
अस भ्रष्ट अचारा भा संसारा धर्म सुनिअ नहिं काना ।
तेहि बहुबिधि त्रासइ देस निकासइ जो कह बेद पुराना ॥
जप, योग, वैराग्य, तप आणि यज्ञात देवांना भाग मिळाल्याचे कळताच, तो तत्क्षणी स्वतः धावून जात असे. तेथे मग काहीही उरत नसे. तो सर्वांना पकडून विध्वंस करीत असे. जगात असे भ्रष्ट आचरण पसरले की, धर्माचे नावही ऐकू येत नसे.जो कोणी वेद व पुराण सांगत असे, त्याला रावण त्रास देत असे व देशातून हाकलून देत असे.
सो०--बरनि न जाइ अनीति घोर निसाचर जो करहिं ।
हिंसा पर अति प्रीति तिन्ह के पापहि कवनि मिति ॥ १८३ ॥
राक्षस जे घोर अत्याचर करीत, त्यांचे वर्णनही करता येणार नाही. हिंसेबद्दलच ज्यांना प्रेम वाटे, त्यांच्या पापांबद्दल किती सांगावे ? ॥ १८३ ॥
मासपारायण, सहावा विश्राम
 बाढ़े खल बहु चोर जुआरा । जे लंपट परधन परदारा ॥ 
मानहिं मातु पिता नहिं देवा । साधुन्ह सन करवावहिं सेवा ॥
परक्याचे धन व परस्त्रीबद्दल लोभ धरणारे, दुष्ट, चोर आणि जुगारी यांची संख्या खूप वाढली. लोक, माता-पिता आणि देवांना जुमानत नव्हते आणि साधूंकडून सेवा करुन घेत होते. ॥ १ ॥
जिन्ह के यह आचरन भवानी । ते जानेहु निसिचर सब प्रानी ॥
अतिसय देखि धर्म कै ग्लानी । परम सभीत धरा अकुलानी ॥
( श्रीशिव म्हणतात-) ' हे भवानी, ज्यांचे असे आचरण असते, त्या प्राण्यांना राक्षसच समज. अशा प्रकारे धर्माविषयी लोकांची अरुची व अनास्था पाहून पृथ्वी अत्यंत भयभीत व व्याकूळ झाली. ॥ २ ॥   
गिरि सरि सिंधु भार नहिं मोही । जस मोहि गरुअ एक परद्रोही ॥
सकल धर्म देखइ बिपरीता । कहि न सकइ रावन भय भीता ॥
( ती विचार करुं लागली की, ) पर्वत, नद्या व समुद्र यांचे ओझे मला कधी इतके वाटले नाही, जितके एक परद्रोह्याचे वाटते. पृथ्वीला सर्व धर्म विपरीत झाल्याचे दिसत होते, परंतु रावणाच्या भीतीमुळे ती बोलू शकत नव्हती. ॥ ३ ॥
धेनु रुप धरि हृदयँ बिचारी । गई तहाँ जहँ सुर मुनि झारी ॥
निज संताप सुनाएसि रोई । काहू तें कछु काज न होई ॥
( शेवटी ) मनात विचार करुन व गाईचे रुप घेऊन जेथे देव व मुनी ( लपले ) होते, तेथे ती गेली. पृथ्वीने रडत-रडत आपले दुःख उघड केले, परंतु कुणाकडूनही काही काम झाले नाही. ॥ ४ ॥
छं०-सुर मुनि गंधर्बा मिलि करि सर्बा गे बिरंचि के लोका ।
सँग गोतनुधारी भूमि बिचारी परम बिकल भय सोका ॥
ब्रह्माँ सब जाना मन अनुमाना मोर कछू न बसाई ।
जा करि तैं दासी सो अबिनासी हमरेउ तोर सहाई ॥
तेव्हा देव, मुनी आणि गंधर्व हे सर्व मिळून ब्रह्मदेवाच्या सत्यलोकी गेले. भय आणि शोकामुळे ती अत्यंत व्याकूळ झालेली बिचारी पृथ्वीसुद्धा गायीच्या रुपात त्यांच्याबरोबर होती. ब्रह्मदेवांनी सारे ओळखले. त्यांनी विचार केला की, यात माझे कांहीं चालणार नाही. ( तेव्हा त्यांनी पृथ्वीला म्हटले, ) ' ज्याची तू दासी आहेस, तोच अविनाशी तुम्हां-आम्हांला मदत करणारा आहे. 
सो०--धरनि धरहि मन धीर कह बिरंचि हरिपद सुमिरु ।
जानत जन की पीर प्रभु भंजिहि दारुन बिपति ॥ १८४ ॥   
ब्रह्मदेव म्हणाले, ' हे धरणी, मनात धीर धरुन श्रीहरींच्या चरणांचे स्मरण कर. प्रभु हे आपल्या सेवकांची यातना जाणतात. ते तुझ्या कठीण संकटाचा नाश करतील.' ॥ १८४ ॥
बैठे सुर सब करहिं बिचारा । कहँ पाइअ प्रभु करिअ पुकारा ॥
पुर बैकुंठ जान कह कोई । कोउ कह पयनिधि बस प्रभु सोई ॥
सर्व देव बसून विचार करु लागले की, प्रभूंना शोधायचे कोठे ? त्यांच्याजवळ तक्रार कुठे करायची ? कोणी म्हणाले की, वैकुंठाला जाऊया, कोणी म्हणत होता की, प्रभु क्षीरसमुद्रात निवास करतात, तेथे जाऊया. ॥ १ ॥
जाके हृदयँ भगति जसि प्रीति । प्रभु तहँ प्रगट सदा तेहिं रीती ॥
तेहिं समाज गिरिजा मैं रहेऊँ । अवसर पाइ बचन एक कहेऊँ ॥
ज्याच्या मनात जशी भक्ती आणि प्रीती असते, तेथे प्रभू त्याच पाहून मी म्हणाले, ॥ २ ॥
हरि ब्यापक सर्बत्र समाना । प्रेम तें प्रगट होहिं मैं जाना ॥
देस काल दिसि बिदिसिहु माहीं । कहहु सो कहाँ जहाँ प्रभु नाहीं ॥
भगवान सर्व ठिकाणी समानपणे भरलेले असतात. प्रेमामुळे ते प्रगट होतात. देश, काल, दिशाविदिशा यांमध्ये जिथे भगवान नाही, अशी जागा कुठे आहे ? सांगा बरे ! ॥ ३ ॥
अग जगमय सब रहित बिरागी । प्रेम तें प्रभु प्रगटइ जिमि आगी ॥
मोर बचन सब के मनमाना । साधु साधु करि ब्रह्म बखाना ॥
ते चराचरात व्याप्त असूनही सर्वांपासून अलिप्त च विरक्त आहेत. ( त्यांना कशातही आसक्ती नाही. ) ते प्रेमामुळे प्रगट होतात. जसा अग्नी प्रगट होतो. ( अग्नी हा अव्यक्त रुपाने व्याप्त आहे. परंतु जिथे त्याच्यासाठी अरणि मंथन इत्यादी साधन केले जाते, तेथे तो प्रकट होतो. त्याप्रमाणेच सर्वत्र व्याप्त असलेले भगवानही प्रेमामुळे प्रगट होतात. ) माझे बोलणें सर्वांना आवडले. ब्रह्मदेवांनी ' छान छान ! ' म्हणून माझी प्रशंसा केली. ॥ ४ ॥
दोहा--सुनि बिेंरचि मन हरष तन पुलकि नयन बह नीर ।
अस्तुति करत जोरि कर सावधान मतिधीर ॥ १८५ ॥
माझे म्हणणे ऐकून ब्रह्मदेवांना फार आनंद झाला. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांतून प्रेम वाहू लागले. तेव्हा ते धीरबुद्धीचे ब्रह्मदेव एकाग्र होऊन हात जोडून स्तुती करु लागले. ॥ १८५ ॥
छं०--जय जय सुरनायक जन सुखदायक प्रनतपाल भगवंता ।
गो द्विज हितकारी जय असुरारी सिंधुसुता प्रिय कंता ॥
पालन सुर धरनी अद्भुत करनी मरम न जानइ कोई ।
जो सहज कृपाला दीनदयाला करउ अनुग्रह सोई ॥ १ ॥
' हे देवांचे स्वामी, सेवकांना सुख देणारे, शरणागतांचे रक्षण करणारे भगवन, तुमचा विजय असो, विजय असो. हे गो-ब्राह्मणांचे हित करणारे, असुरांचा विनाश करणारे, लक्ष्मीचे प्रिय स्वामी, तुमचा विजय असो. हे देव आणि पृथ्वीचे पालन करणारे, तुमची लीला अद्भुत आहे. तिचे रहस्य कोणीही जाणू शकत नाही. अशा प्रकारे जे स्वभावतःच कृपाळू व दीनदयाळू आहेत, तेच आम्हांवर कृपा करोत. ॥ १ ॥
जय जय अबिनासी सब घट बासी ब्यापक परमानंदा ।
अबिगत गोतीतं चरित पुनीतं मायारहित मुकुंदा ॥
जेहि लागि बिरागी अति अनुरागी बिगत मोह मुनिबृंदा ।
निसि बासर ध्यावहिं गुनगन गावहिं जयति सच्चिदानंदा ॥ २ ॥
२) हे अविनाशी, सर्वांच्या हृदयांत वसणारे सर्वव्यापक, परम आनंदरुप, अज्ञेय, इंद्रियातीत, पवित्रचरित्र, मायेने रहित मुकुंदा ! तुमचा विजय असो, विजय असो. ( या लोकीच्या व परलोकीच्या सर्व भोगांपासून ) विरक्त आणि मोहातून सर्वथा मुक्त ( ज्ञानी )मुनिवृंदसुद्धा अत्यंत प्रेमाने ज्यांचे रात्रंदिवस ध्यान करतात आणि ज्यांच्या गुणांच्या समुच्चयाचे गान करतात, त्या सच्चिदानंदांचा विजय असो. ॥ २ ॥    
जेहिं सृष्टि उपाई त्रिबिध बनाई संग सहाय न दूजा ।
सो करउ अघारी चिंत हमारी जानिअ भगति न पूजा ॥
जो भव भय भंजन मुनि मन रंजन गंजन बिपति बरुथा ।
मन बच क्रम बानी छाड़ि सयानी सरन सकल सुरजुथा ॥ ३ ॥
ज्यांनी दुसर्‍या कुणा मित्राविना किंवा सहाय्यकाविना एकट्यानेच ( किंवा स्वतःच आपणाला त्रिगुणरुप-ब्रह्मा, विष्णू, महेश बनवून किंवा कोणत्याही उपादान कारणाविना, अर्थात स्वतःच सृष्टीचे एकमात्र निमित्त व उपादान कारण बनून ) तीन प्रकारची सृष्टी निर्माण केली, त्या पापनाशक भगवान यांनी आमची आठवण ठेवावी. आम्ही भक्ती जाणत नाही, पूजा जाणत नाही. जे जन्म-मृत्युच्या भयाचे नाश करणारे, मुनींच्या मनाला आनंद देणारे आणि विपत्तींच्या राशींचा नाश करणारे आहेत, त्या भगवंतांना आम्ही सर्व देवांचे समुदाय कायावाचामनाने, मखलाशी करण्याचा स्वभाव सोडून ( प्राजंळपणे ) शरण आलो आहोत. ॥ ३ ॥   
सारद श्रुति सेषा रिषय असेषा जा कहुँ कोउ नहिं जाना ।
जेहि दीन पिआरे बेद पुकारे द्रवउ सो श्रेबहगवाना ॥
भव बारिधि मंदर सब बिधि सुंदर गुनमंदिर सुखपुंजा ।
मुनि सिद्ध सकल सुर परम भयातुर नमत नाथ कंजा ॥ ४ ॥
सरस्वती, वेद, शेष आणि सर्व ऋषी, यांपैकी कोणीही ज्यांना जाणत नाही, ज्यांना दीनजन प्रिय आहेत, असे वेद उच्चरवाने सांगतात, तेच भगवान आम्हांवर दया करोत. जे संसाररुपी समुद्राच्या मंथनासाठी ममदराचलरुप आहेत, सर्व प्रकारे सुंदर, गुणांचे धाम आणि सुखांचे राशी आहेत, असे हे नाथ ! तुमच्या चरणकमळी आम्ही मुनी, सिद्ध आणि सर्व देव भयाने अत्यंत व्याकूळ होऊन नमस्कार करतो.' ॥ ४ ॥


Custom Search