Friday, October 9, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 11 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ११

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 11 
Ovya 251 to 276 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ११ 
ओव्या २५१ ते २७६

साध्वी शांति नागविली । मग माया मांगी शृंगारिली ।

तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें ॥ २५१ ॥

२५१) या कामक्रोधांनीं पतिव्रता जी शांति तिला वस्त्रहीन केलें; व त्या वस्त्रालंकारांनीं मायारुप मांगीण सजविली व मग अशा या सजविलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनीं भ्रष्ट करविले.  

इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली ।

जितया मान मोडिली । उपशमाची ॥ २५२ ॥

२५२) यांनीं विचाराचा आश्रय नाहींसा केला, वैराग्याचीं कातडीं काढलीं व निग्रहाची जिवंतपणींच मान मुरगळून टाकली.    

इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले ।

आनंदरोप सांडिलें । उपडूनियां ॥ २५३ ॥

२५३) यांनीं संतोषरुपी वन तोडून टाकलें व धैर्यरुपी किल्ले पाडले व आनंदरुपी लहान रोपटें उपटून टाकलें. 

इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपि पुसिली ।

जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥ २५४ ॥

२५४) यांनीं बोधरुपी रोपें उपटलीं आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयांत विविध तापांचे निखारे पसरले.

हे आंगा तव घडले । जीवींची आथी जडले ।

परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥

२५५) हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत व अंतःकरणांत सारखे चिकटून राहिले आहेत ? परंतु धुंडाळले तरी ब्रह्मादि देवांना हातीं लागत नाहींत.

 

हें चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाचां एका हारीं ।

म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥ २५६ ॥

२५६) हे काम क्रोध जीवात्म्याजवळ असतात व वृत्तिज्ञानाच्या पंक्तीला राहातात; म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहींत.

हें जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती ।

न बोलतां कवळिती । प्राणियांतें ॥ २५७ ॥

२५७) हे पाण्यावांचून बुडवितात, अग्नीवांचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात.

हे शस्त्रेंवीण साधिती । दोरेंवीण बांधिती ।

ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनी ॥ २५८ ॥

२५८) हे शस्त्रावांचून ठार करतात. दोरावांचून बांधतात आणि ज्ञान्यांना तर प्रतिज्ञापूर्वक ठार करतात. 

चिखलेंवीण रोंविती । पाशिकेंवीण गोंविती ।

हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणें ॥ २५९ ॥

२५९) हे चिखलावांचून रोवतात व जाळ्यावांचून अडकवितात. हे फार आंत असल्यामुळें कोणालाहि आटोक्यांत आणतां येत नाहींत. 

जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळीं ।

ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥ २६० ॥

असे चंदनाच्या मुळीला साप वेढें घालून असतात किंवा पोटांत असणार्‍या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते;    

कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु ।

जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥ २६१ ॥

२६१) अथवा प्रकाशावांचून सूर्य , धुरावांचून अग्नि किंवा मळाशिवाय आरसा कधींच नसतो;

तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें ।

जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥ २६२ ॥

२६२) तसें या कामक्रोधाशिवाय एकटें असलेलें ज्ञान आमच्या नजरेला आलें नाहीं, ज्याप्रमाणें बीं कोंड्यासकट उत्पन्न होतें;

तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध ।

म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥ २६३ ॥

२६३) तसें ज्ञान स्वभावतः जरी निर्लेप आहे, परंतु तें या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादिलेलें असतें. म्हणून तें प्राप्त होण्यास कठीण होऊन राहिलेले आहे.

आधीं यातें जिणावें । मग तें ज्ञान पावावें ।

तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥ २६४ ॥

२६४) अगोदर यांना जिंकावें आणि मग ज्ञानाची प्राप्ति करुन घ्यावी. परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊं शकत नाहीं.

यांतें साधावयालागीं । जें बळ आणिजे आंगीं ।

तें इंधन जैसें आगी । सावावो होय ॥ २६५ ॥

२६५) उलट यांचा नाश करण्याकरितां जेवढें सामर्थ्य अंगांत आणावें, तेंवढें अग्नीला ज्याप्रमाणें सरपण ( अधिक प्रज्वलितकरण्यास कारण ) त्याप्रमाणें त्यांनाच उलट साहाय्य करणारें होतें.

तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे ।

म्हणोनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥ २६६ ॥

२६६) अशा रीतीनें जे जे उपाय योजावेत, ते ते सर्व या कामक्रोधांनाच साहाय्य करतात; म्हणून या जगांत हेच हठयोग्यांना जिंकतात. 

ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला ।

तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥

२६७) असे हे कामक्रोध जिंकण्याला कठीण म्हटले, तरी पण त्यास जिंकण्याचा एक मात्र चांगला उपाय आहे; तो जर तुझ्याकडून होईल तर ( पाहा ) तुला सांगतों.

यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये ।

आधीं निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव ॥ २६८ ॥

२६८) तर याचें पहिलें आश्रयस्थान इंद्रियें आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ति होते; तेव्हां अगोदर त्या इंद्रियांनाच आधीं पूर्णपणें ठेंचून टाक ( नाश कर. ).  

मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल ।

इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥ २६९ ॥  

२६९) मग मनाचें धावणें थांबेल आणि बुद्धि मोकळी होईल. एवढें झालें म्हणजें या दुष्टांचा आश्रय नाहींसा होईल.  

हे अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले ।

जैसें रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥ २७० ॥

२७०) हे कामक्रोध अंतःकरणांतून पार गेले कीं ते निःसंशय नाहीसे झाले असें समज. ज्याप्रमाणें सूर्यकिरणांशिवाय मृगजळ राहात नाहीं;

तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें ।

मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥ २७१ ॥

२७१) तसें कामक्रोध जर निःशेष गेले, तर ब्रह्मप्राप्तिरुप स्वराज्य मिळालें असें समज. मग तो पुरुषच आपणच आपलें सुख उपभोगितो.  

जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।

तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं ॥ २७२ ॥

२७२) गुरुशिष्याच्या संवादांत येणार्‍या विचारानें प्राप्त झालेली जीवपरमात्म्याची जी एकता, तिच्या ठिकाणीं स्थिर होऊन तूं कधीं हालूं नकोस.

ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो ।

राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥ २७३ ॥

२७३) असें सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पति व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो म्हणाला, ' हे राजा धृतराष्ट्रा, ऐक, ' ( असें संजय म्हणाला. )   

आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु ।

सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥ २७४ ॥

२७४) आतां पुन्हां तो श्रीकृष्ण ( आणखी ) एक प्राचीन कथा सांगेल, त्या वेळीं अर्जुन प्रश्न करील.

तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु ।

येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥

२७५) त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनांत स्पष्ट अनुभवास येणारे ( शांतादि ) रस ह्या योगानें श्रोत्यांना श्रवणसुखाची रेलचेल होईल. 

ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करुनि उन्मेषाचा ।

मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोगा बापा ॥ २७६ ॥

२७६) निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगलें जागें करुन मग बाबांनो, कृष्णार्जुनांचा संवादाचा आनंद भोगा. 

इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतियोऽध्यायः । ( श्लोक ४३; ओव्या २७६ )

॥ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥   



Custom Search

No comments:

Post a Comment