Saturday, January 23, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ४

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 4
Ovya 91 to 120
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ४
ओव्या ९१ ते १२०

तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे ।

जेणें सानें थोर नेणिजे । कवणे काळीं ॥ ९१ ॥

९१) तो सहजच जितेंन्द्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावें व त्याला लहानथोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही.

देखें सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ ।

आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥ ९२ ॥

९२) पाहा, शुद्ध सोन्याचा मेरुपर्वताएवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ ( तो ) सारखेंच मानतो. 

पाहतां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें ।

देखे दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥ ९३ ॥

९३) पाहावयास गेले तर, पृथ्वीची किंमत ज्यापुढें कांहीं नाहीं, असें शुद्ध अमूल्य रत्न, ( पण तो तें ) दगडासारखेंच मानतो; असा तो निरिच्छ असतो.

तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु ।

हा भावभेद विचित्रु । कल्पूं कैचा ॥ ९४ ॥

९४) त्याच्या ठिकाणीं हितचिंतक व शत्रु किंवा उदास आणि मित्र, अशा तर्‍हेची वेगवेगळ्या वृत्तीची कल्पना कोठून करावी ?

तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।

मीचि विश्र्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥ ९५ ॥

९५) मीच विश्र्व आहे, अशी प्रतीती ज्यास आली आहे, त्याला नातलग कोण आणि कशाचा ? व त्याला वैरी तरी कोण ?

मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी ।

काय परिसाचिया कसवटी । वानिया कीजे ॥ ९६ ॥

९६) मग त्याच्या दृष्टीने अर्जुना, वाईट-चांगलें असेल काय ? परिसाच्या कसवटीवर घासलें असतां सोन्यांत निरनिराळे प्रकार करतां येतील काय ?  

ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाची बुद्धि चराचरीं ।

होय साम्याची उजरी । निरंतर ॥ ९७ ॥

९७) ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणें त्याच्या बुद्धीमध्यें चराचराविषयींच्या समतेचा निरंतर उदय होतो. 

जे ते विश्र्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनानें आकारें ।

तरी घडले एकेंचि भांगारें । परब्रह्में ॥ ९८ ॥

९८) कारण, विश्र्वांतील प्राणीरुप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकारांचे आहेत, तरी ते एक परब्रह्मरुप सोन्याचेच बनलेले आहेत. 

ऐसें जाणणें जें बरवें । ते फावलें तया आघवें ।

म्हणोनि आहाचवाहाचें न झकवे । येणें आकारचित्रें ॥ ९९ ॥   

९९) असें जें उत्तम ज्ञान, तें त्याला सर्व प्राप्त झालें, म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारच्या आकारांनीं फसत नाहीं. 

धापे पटामाजीं दृष्टी । दिसे तंतूंची सैंध सृष्टी ।

परि तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥ १०० ॥

१००) वस्त्राच्या आंत पाहिलें तर त्या वस्त्रामध्यें ( जिकडे-तिकडे अनेक ) तंतूंचीच रचना दिसते; तरीहि पण त्या वस्त्रांत एका सुतावाचून दुसरी गोष्टच नाहीं.  

ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे ।

तोचि समबुद्धी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥ १०१ ॥

१०१) अशा या तंतुपटन्यायानें, हा आधी सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे, तोच समबुद्धि होय; यांत अन्यथा नाहीं, असें समज.

जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो ।

जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासी ॥ १०२ ॥

१०२) ज्याचें नांव तीर्थराज आहे व ज्याचें दर्शन झालें असतां समाधान होतें व ज्याच्या संगतीनें भ्रमलेल्यास ब्रह्मत्व मिळते,

जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये ।

देखें स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥ १०३ ॥

१०३) ज्याच्या बोलण्यानें धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धींना उत्पन्न करते, पहा, स्वर्गसुखादिक ( देणें ) हीं ज्याला खेळ आहेत.

विपायें जरी आठवलें चित्ता । तरी दे आपुली योग्यता ।

हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥ १०४ ॥

१०४) अशा पुरुषाच्या नांवाचें मनांत सहज जरी स्मरण केलें तरी तो आपली योग्यता देतो; हें राहूं दे. त्याची स्तुति केल्यास लाभ होतो. 

पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें ।

मग आपणपांचि आपण असे । अखंडित ॥ १०५ ॥

१०५) पुन्हा मावळणार नाहीं अशा ऐक्यरुपी दिवसानें ज्यास उजाडलें आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणींच ( निमग्न ) असतो, 

ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी ।

सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ॥ १०६ ॥

१०६) अशा दृष्टीनें जो विवेकी आहे, अर्जुना, तो एकाकी आहे कारण तिन्ही लोकांत तोच आहे. म्हणून तो सहज परिग्रहशून्य असतो.  

ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें ।

आपुलेनि बहुवसपणें । कृष्ण म्हणे ॥ १०७ ॥ 

१०७) ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात ) अशीं प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणें कृष्ण आपल्या सर्वज्ञतेनें सांगतात.

तो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु ।

जया दादुलयाचा संकल्पु । विश्र्व रची ॥ १०८ ॥

१०८) जो ( श्रीकृष्ण ) ज्ञानी लोकांत श्रेष्ठ आहे, सर्व पाहणार्‍यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो,

प्रणवाचिवे पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें ।

तें जयाचिये यशा धाकुटें । वेढुं न पुरे ॥ १०९ ॥

१०९) ॐकाराच्या पेठेंत तयार झालेलें वेदरुप वस्त्र, तें ज्याच्या सहा गुणांपैकी एक जें यश, त्या यशाला अपुरें पडल्यामुळें वेढूं शकलें नाहीं, ( वेदांकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचेंसुद्धा संपूर्ण वर्णन होऊं शकलें नाहीं. )

जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे ।

म्हणऊनि जग हें वेसजे-। वीण असे तया ॥ ११० ॥

११०) ज्याच्या ( श्रीकृष्णाच्या ) अंगांतील तेजानें सूर्यचंद्राच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हें त्याच्या प्रकाशावांचून प्रकाशित आहे काय ?

हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचें ।

गुण एकेक काय तयाचे । आकळशील तूं ॥ १११ ॥

१११) ( ज्ञानेश्र्वरमहाराज आपल्या मनाला म्हणतात, हें मना, ) ज्या भगवंतांच्या नामाचें माहात्म्य पाहिलें असतां त्याच्यापुढें आकाशहि कमी दिसतें, त्या भगवंताचे एक एक गुण तूं कसे जाणशील ? 

म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें ।

दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥ ११२ ॥

११२) म्हणून हें वर्णन करणें पुरें. या ( संतांचीं ) लक्षणें सांगण्याच्या निमित्तानें देवानें कोणाचीं लक्षणें सांगितलीं व तीं कां सांगितलीं, हें मला सांगतां येत नाही.  

ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी ।

तरि अर्जुनु पढिये हे गोडी । नासेल हन ॥ ११३ ॥‘

११३) ( पण मला असें वाटतें ) ऐक, द्वैताचा ठावठिकाणा नाहींसा करणारें असें जें आत्मज्ञान, तें उघड उघड व्यक्त केलें, तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहींशी होईल.   

म्हणोनि तें तैसें बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें ।

केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥ ११४ ॥

११४) म्हणून भगवंत तसें बोलले नाहींत. परंतु मध्यें अगदी बारीक असा पडदा ठेवला ( म्हणजे साधूच्या अद्वैतस्थितीच्या वर्णनानें अप्रत्यक्ष रीतीनें महावाक्याचाच बोध केला व अशा रीतीने  देवभक्त यांचीं ) मनें प्रेमसुख भोगण्याकरितां वेगळीं ठेवलीं.   

जय सोहंभाव हा अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु ।

तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥ ११५ ॥

११५) जे ‘ मी ब्रह्म आहें ‘ अशा बोधांत अडकले आहेत व जे मोक्षसुखाकरितां दीन झाले आहेत, अशांच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित् लागेल. 

विपायें अहंभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल ।

तरि मग काय कीजेल । एकलेया ॥ ११६ ॥

११६) कदाचित् याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल, तर मग मी एकट्यानें काय करावें ? 

दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे ।

नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ॥ ११७ ॥

११७) डोळ्यांनींच पाहून शांत व्हावें किंवा तोंड भरुन बोलावें अथवा कडकडून आलिंगन द्यावें, असें ( दुसरें ) कोण आहे ?

आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं ।

ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥ ११८ ॥

११८) जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जीवांत मावत नाहीं अशी गोष्ट, जर अर्जुनाचें आपणाशीं ऐक्य झालें तर, कोणास सांगावी ?  

इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें ।

बोलामाजीं मन मनें । आलिंगूं सरलें ॥ ११९ ॥

११९) या काकुळतीनें ( काळजीनें ) अन्योपदेशाच्या हातवटीनें ( साधूंच्या वर्णनानें ) बोलण्यामध्यें श्रीकृष्णांनी अर्जुनाचें अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनानें अर्जुनाच्या मनास आलिंगन दिलें.

हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें ।

कृष्णसुखाचेंचि रुपडें । वोतलें गा ॥ १२० ॥

१२०) हें ऐकण्यास जरी अवघड वाटलें, तरी असें समज 

कीं, अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड

मूर्ति आहे.



Custom Search

No comments:

Post a Comment