Friday, February 5, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 5 
Ovya 121 to 150 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ५ 
ओव्या १२१ ते १५०

हें असो वयसेचिये शेवटीं । जैसे एकचि विये वांझोटी ।

मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥ १२१ ॥

१२१) हें राहूं द्या. ज्याप्रमाणें वय झाल्यावर एखाद्या वांझ स्त्रीला एकुलतें एक मूल झालें असतां त्या स्त्रीच्या रुपानें मग मूर्तिमंत मोहच वावरतो ( तशी देवाची स्थिति झाली ).

तैसें जाहले अनंता । ऐसें तरि मी न म्हणतां ।

जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥ १२२ ॥

१२२) अर्जुनाविषयीं देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मीं पाहिला नसतां तर मीं असें ( वांझोट्या बाईसारखें ) देवाला झालें, असें म्हटलें नसतें.

पाहा पां नवल कैसे चोज । के उपदेशु केउतें झुंज ।

परि पुढें वालभाचें भोज । नाचत असे ॥ १२३ ॥

१२३) आश्र्चर्य पाहा कीं, भगवंतांचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसें आहे ! कसला युद्धप्रसंग व कोणत्या ठिकाणीं हा उपदेश ! ( युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदीं अयोग्य; परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळें भगवंतांनीं वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देतां आर्मज्ञानाचा उपदेश केला. ) परंतु निश्चयेंकरुन श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे.   

आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।

पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ॥ १२४ ॥

१२४) प्रेम आहे आणि तें लाज उत्पन्न करतें, तर तें प्रेम कसचें ? तसेंच व्यसन आहे आणि त्यानें जर शीण होत असेल, तर तें व्यसन कसलें ? वेड आहे, परंतु भ्रम पाडीत नाहीं, तर तें वेड कसचें ? .  

म्हणऊनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा ।

कीं सुखें शृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥ १२५ ॥  

१२५) म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच कीं, अर्जुन हा भगवंताच्या सख्यभक्तीचा आश्रय आहे, अथवा सुखानें शृंगारलेल्या ( भगवंताच्या ) मनाचा तो आरसा आहे. 

यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।

तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥ १२६ ॥

१२६) याप्रमाणें तो अर्जुन धन्य असून पुण्यानें पावन आहे. या जगांत भक्तिरुप बीं पेरण्यास तो चांगलें शेत आहे; आणि म्हणून कृष्णकृपेला तो पात्र झाला आहे.   

हो कां आतमनिवेदनातळींची । जे पीठिका आहे सख्याची ।

पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥ १२७ ॥

१२७) अथवा आत्मनिवेदनरुपी भक्तीच्या खालची जी ‘ सख्य ‘ भक्तीची भूमिका आहे, त्याची अर्जुन ही मुख्य देवता आहे. 

पासींचि गोसावी व्रर न वानिजे । मग पाइकाचा गुण घेईजे ।

ऐसा अर्जुनुचि तो सहजें । पढिये हरी ॥ १२८ ॥

१२८) शेजारींच असलेल्या प्रभूंचे वर्णन टाकून द्यावें व भक्तांच्या गुणांचें वर्णन करावें, इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीनें देवास आवडतो. 

पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे ।

ते पतीहीहूनि काय न वर्णिजे । पतिव्रता ॥ १२९ ॥

१२९) पाहा, जी नवर्‍याला प्रेमानें भजते व जिला नवरा मानतो, त्या पतिव्रतेचें वर्णन तिच्या नवर्‍यापेक्षांदेखील जास्त करावयास नको काय ?

तैसा अर्जुनुचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा ।

जे तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ॥ १३० ॥

१३०) त्याचप्रमाणें अर्जुनाचेंच विशेष वर्णन करावें, असेंच माझ्या मनाला पसंत पडतें, कारण त्रिभुवनांतील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणीं राहिलें आहे.

जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे ।

पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥ १३१ ॥

१३१) ज्याच्या प्रेमाच्या आधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रुप घेतो व तो ( देव ) पूर्ण आहे. परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो.

तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव ।

काय नादातें हन बरव । जिणोनि आली ॥ १३२ ॥

१३२) तेव्हां श्रोते म्हणतात, काय भाग्य आमचें ! काय बोलण्याचा रंग आहे ! याच्या बोलण्याची शोभा नादब्रह्मास जिंकून आली कीं काय न जाणों ! ( म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेपुढें नादब्रह्म फिकें पडलें ! )

हां हो नवल नोहे देशी । मर्‍हाटी बोलिजे तरी ऐसी ।

वाणें उमटताहे आकाशीं । साहित्यरंगाचें ॥ १३३ ॥

१३३) अहो, देशी भाषारुपी आकांशात अलंकाररुपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट येत ( होत ) आहेत, अशी मराठी भाषा बोलतां येते, हें आश्र्चर्य नव्हे काय ?

कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार ।

हेचि श्र्लोकार्थकुमुदी तरी फार । साविया होती ॥ १३४ ॥

१३४) ज्ञानरुपी चांदणें कसें स्वच्छ व टपोर पडलें आहे ! ( पाहा, ) त्या व्याख्यानांतील निरनिराळें अभिप्राय, हाच त्या चांदण्याचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळें सहज विकसित होत आहेत !      

चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी ।

तेणें विवळलेअंतरीं । तेथ डोलु आला ॥ १३५ ॥

१३५) हेव्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी एवढी आहे कीं, निरिच्छ पुरुषाला देखील हें व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल, असा श्रोत्यांच्या मनांत व्याख्यानाविषयीं प्रकाश पडल्यामुळें ते डोलूं लागले.   

तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें ।

नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥ १३६ ॥

१३६) निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वरमहाराज, यांनी तें जाणलें व मग ते श्रोत्यांस म्हणाले, महाराज, लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्यें कृष्णरुपी अद्भुत दिवस उगवला आहे.

देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।

कीं शेखीं उपेगा गेला । पांडवासी ॥ १३७ ॥

१३७) देवकीने आपल्या उदरांत त्याला वाढविलें, यशोदेनें कष्टाने त्याचे पालन केलें (  पण ) शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला.

म्हणऊनि बहु दिवस वोगळावा । कां अवसरु पाहोनि विनवावा ।.

हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥ १३८॥

१३८) म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा ( योग्य ) वेळ पाहून विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान ( अर्जुनास ) पडला नाहीं.

हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी ।

देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ॥ १३९ ॥

१३९) श्रोते म्हणतात, तें राहूं दे, लवकरच चालूं विषय सांग. ( यावर ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात, ) मग अर्जुन सलगीनें म्हणाला, कृष्णा हीं संतांचीं लक्षणें माझ्या अंगात वसत नाहींत.  

एर्‍हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा ।

परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥ १४० ॥

१४०) एर्‍हवीं या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला, तर मी खरोखरच फारच अपुरा पडेन. परंतु ऐका. जर माझ्यांत मोठेपणा यावयाचा असेल तर तो तुमच्या बोलण्यानेंच येईल. 

जी तुम्हीं चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल ।

काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल तें ॥ १४१ ॥

१४१) महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन, आणि सांगाल तो अभ्यास करीन; न करायला काय झालें ?

हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्र्लाधत असों अंतःकरणीं ।

ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥ १४२ ॥

१४२) अहो देवा, आपण कोणती गोष्ट सांगतां हें कळत नाहीं. ( परंतु ) ती ऐकून मनांत मी त्यांची स्तुति करीत आहे, अशी लक्षणें ज्यांच्या अंगांत सिद्ध असतील, त्यांचें महत्व केवढें असेल बरें ?  

हें आंगें म्यां होईजो कां । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां ।

तंव हासोनि कृष्ण हो कां । करुं म्हणती ॥ १४३ ॥

१४३) तें मी स्वतः व्हावें, एवढें प्रभू, मी आपला आहे असें समजून आपण करावें, तेव्हां, श्रीकृष्ण हासून म्हणतात, एवढें कां तुझें म्हणणें आहे ? तर तसें करुं बरें !

देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंध सांकडें ।

मग जोडिलिया कवणेकडे । अपुरें असे ॥ १४४ ॥

१४४) पाहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झालें नाहीं, तोंपर्यंत सुखाचा चोहोंकडे दुष्काळ असतो. पण एकदां संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठें कमी आहे ?

तैसा सर्वेश्र्वरु बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें ।

परि कैसा भारें आतला पिके । दैवाचेनि ॥ १४५ ॥

१४५) त्याप्रमाणें सर्व शक्तिमान् सर्वेश्र्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्महि होईल, पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या भारानें श्रीकृष्ण कशा प्रकारें फलद्रूप झाला, ( तें पाहा. )

जो जन्मसहस्त्रांचियांसाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी ।

तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुही न साहे ॥ १४६ ॥

१४६) इंद्रादिकांनादेखील हजारों जन्म घेतले तरी ज्याची भेट होणें दुर्लभ, तो ( श्रीकृष्ण ) अर्जुनाच्या किती आधीन झाला आहे ! अर्जुन प्रश्र्ण करीपर्यंत त्याला धीर धरवत नाहीं.

मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें ।

तें अशेषही देवें । अवधारिलें ॥ १४७ ॥

१४७) मग ऐका. अर्जुनानें ‘ मी ब्रह्म व्हावें ‘ असें जे म्हटलें तें श्रीकृष्णानीं सर्व ऐकलें.

तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले ।

परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥ १४८ ॥

१४८) परंतु भगवंतांनीं तेथें असा एक विचार केला कीं, ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे झाले आहेत, त्या अर्थी याच्या बुद्धीच्या पोटांत वैराग्यरुपी गर्भ राहिला आहे.  

एर्‍हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें ।

जे सोहंभावमहुरें । मोडोनि आला ॥ १४९ ॥

१४९) एर्‍हवीं ब्रह्म होण्याला यास अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्यरुपी वसंताच्या भरानें ‘ मी ब्रह्म आहे ‘ असा भावरुपी मोहोर दाट आला आहे.   

म्हणोनि प्राप्तिफळें फळतां । यासि वेळु न लागेल आतां ।

होय विरक्तु ऐसा अनंता । भरवंसा जाहला ॥ १५० ॥

१५०) म्हणून ब्रह्मप्राप्ति हें फळ येण्यास आतां यास फार

 वेळ लागणार नाहीं; हा वैराग्यसंपन्न झाला आहे, अशी

 देवाची पूर्ण खात्री झाली.



Custom Search

No comments:

Post a Comment