Friday, February 5, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ६

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 6 
Ovya 151 to 180 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ६ 
ओव्या १५१ ते १८०

 म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आतां आरंभींच यया फळेल ।

म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु बापां ॥ १५१ ॥

१५१) श्रीकृष्ण ( आपल्याशीं ) म्हणाले कीं, हा अर्जुन ज्या ज्या कर्माचें आचरण करील, तें तें याला आतां आरंभालाच फळास येईल; म्हणून याला सांगितलेला अभ्यास वायां जाणार नाहीं, 

ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं ।

अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥ १५२ ॥

१५२) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात, ) श्रीकृष्णानें असा दूरवर विचार करुन त्या वेळेला म्हटलें अर्जुना हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक.

तेथ प्रवृत्तितरुंचा बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी ।

जिये मार्गिंचा कापडी । महेशु आझुनी ॥ १५३ ॥

१५३) या मार्गामध्यें प्रवृत्तिरुप झाडाच्या बुडालाच निवृत्तिरुप कोट्यवधि फळे दिसत आहेत, ( म्हणजे ज्या मार्गाचें आचरण करावयास लागलें असतां मोक्षरुपी फळ मिळतें ) व या मार्गाचे श्रीशंकर अद्यापपर्यंत यात्रेकरु आहेत. 

पैं योगिवृंदें वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं ।

कीं तेथ अनुभवाचां पाउलीं । धोरणु पडिला ॥ १५४ ॥   

१५४) योग्यांचे समुदाय आडव्या तिडव्या मार्गानें मूर्ध्निआकाशाकडे सत्वर जावयास निघाले व हे समुदाय अनुभवाच्या पावलांनीं जातां जातां तो मार्ग सुलभ झाला.     

तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें ।

कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनियां ॥ १५५ ॥

१५५) त्यांनीं इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाची सरळ मार्गानें एकसारखी धाव घेतली.

पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहाले ।

आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥ १५६ ॥

१५६) नंतर महर्षि याच मार्गानें आले; याच मार्गानें साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गानें आत्मज्ञानी पुरुष मोठेपणा पावले.

हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे ।

रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥ १५७ ॥

१५७) या मार्गाची ओळख झाली असतां, तहानभुकेची आठवण राहात नाहीं; या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाहीं.

चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे ।

आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥ १५८ ॥

१५८) या मार्गानें जात असतां जेथें पाऊल पडेल, तेथें मोक्षाची खाणच उघडते; आणि या मार्गाचें आचरण करणारा जरी भलत्या आडमार्गाला लागला, तरी त्यास स्वर्गसुख मिळतें. 

निगिजे पूर्वीलिया मोहरा । कीं येईजे पश्र्चिमेचिया घरा ।

निश्र्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ॥ १५९ ॥

१५९) अर्जुना, ( या मार्गांत ) पूर्व दिशेच्या मार्गानें निघून पश्चिम दिशेच्या घरास यावें, असें आहे. मनाचा स्थिरपणा हेंच या मार्गानें चालणें आहे. 

येणें मार्गें जया ठायां जाइजे । तो गांवो आपणचि होईजे ।

हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ॥ १६० ॥

१६०) या मार्गानें ज्या मुक्कामास पोहोंचावयाचें तो गांवच आपण होतो, हें कशास सांगावयास पाहिजे ? तुला तें सहजच कळून येईल.

तेथ म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां ।

कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥ १६१ ॥

१६१) तेव्हां ( अर्जुन ) म्हणाला, कृष्णा, ( तर मग ) तेंच तुम्ही केव्हां करणार ? मी उत्कंठारुप समुद्रांत बुडत असतांना त्यांतून तुम्ही मला काढूं नये काय ?

तंव कृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें ।

आम्ही सांगतसों आपैसें । वरि पुशिलें तुवां ॥ १६२ ॥

१६२) तेव्हां कृष्ण म्हणाले, असें हें उतावळीचें भाषण कशा करितां ? आम्ही आपण होऊनच सांगत होतों, आणखी त्यांत तूं तेंच विचारलेंस. 

तरी विशेषें आतांचि बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल ।

म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पाहावें ॥ १६३ ॥

१६३) तर आतांच त्याचें सविस्तर प्रतिपादन केलें जाईल. परंतु त्याप्रमाणें अनुष्ठान करुन अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरिता त्या अभ्यासाला योग्य असें ठिकाण पाहाणें जरुर आहे.

जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे ।

वैराग्यासी दुणीव चढे । देखिलिया जें ॥ १६४ ॥

१६४) ज्या ठिकाणी सहज बसलें असतां, असें समाधान प्राप्त होतें कीं, तेथून उठावें असें वाटत नाहीं व जें पाहिल्या बरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो;

जो संतीं वसविला ठावो । संतोषासि सावावो ।

मना होय उत्सावो । धैर्याचा ॥ १६५ ॥

१६५) जेथें संतांनी वास्तव्य केलें आहे आणि ज्या ठिकाणीं समाधानाला साहाय्य मिळून मनाला धैर्याचा उत्साह येतो.; 

अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरी ।

ऐसीं रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥ १६६ ॥

१६६) ( जेथें ) अभ्यासच आपण आपल्याला साधकांकडून करवून घेतो व अनुभव आपण होऊन साधकाच्या अंतःकरणाला माळ घालतो; याप्रमाणें जेथें रम्यपणाचे माहात्म्य निरंतर आहे;

जया आड जातां पार्था । तपश्र्चर्या मनोरथा ।

पाखंडियाही आस्था समूळ होय ॥ १६७ ॥

१६७) अर्जुना ज्या स्थानावरुन सहजगत्या गेलें असतां नास्तिकाला देखील तपश्र्चर्या करावी, अशी मनापासून आस्था वाटते.

स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां ।

तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥ १६८ ॥

१६८) सहज वाटेनें येत असतां जर कोणी अकस्मात् त्या ठिकाणी आला व तो जरी विषयासक्त असला, तरीहि तो परत फिरण्याचें विसरतो.

ऐसें न राहातयातें रहावी । भ्रमतयातें बैसवी ।

थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥ १६९ ॥

१६९) याप्रमाणें जें स्थान, न राहणार्‍याला राहावयास लावतें व भटकणार्‍याला एके ठिकाणीं बसवितें आणि वैराग्याला थापटी मारुन जागें करतें;   

हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे ।

ऐसें शृंगारियांहि उपजे । देखतखेवों ॥ १७० ॥

१७०) जें स्थान पाहिल्याबरोबर, एखाद्या विलासी पुरुषालासुद्धा असें वाटावें कीं, या स्थानावरुन राज्य ओवाळून टाकावें व येथेंच स्वस्थपणें राहावें,

जें येणें मानें वरवंट । आणि तैसेंचि अति चोखट ।

जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥ १७१ ॥

१७१) जें स्थान इतकें सुंदर आणि तसेंच अतिशय पवित्र असून जेथें डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसतें;

आणिखही एक पाहावें । जें साधकीं वसतें होआवें ।

आणि जनाचेनि पायरवें । मैळेचिना ॥ १७२ ॥

१७२) आणखी एक ह्या स्थानाचें लक्षण पाहावें; तें हें कीं, ज्या स्थानीं साधकांनीं वस्ती केलेली असावी व जें स्थान लोकांच्या येण्याजाण्यानें वहिवाटलेले नसावें,

जेथ अमृताचेनि पाडें । मुळेंहीसकट गोडें ।

जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥ १७३ ॥

१७३) जेथें अमृताच्या सारखी मुळासकट गोड असलेली व नेहमीं फळणारी अशीं दाट झाडें आहेत;

पाउला पाउला उदकें । परि वर्षाकाळींही चोखें ।

निर्झरें कां विशेखें । सुलभे जेथ ॥ १७४ ॥

१७४) ज्या ठिकाणीं पावलोंपावलीं पाणी आहे. पण तें पावसाळ्यांतहि निर्मळ असतें व जेथें विशेषेकरुन पाण्याचे झरे सहज आढळतात;

हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु ।

पवनु अति निश्र्चळु । मंद झुळके ॥ १७५ ॥

१७५) हें ऊनदेखील जेथें सौम्य भासतें आणि जेथें वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळका येत असतात;   

बहुतकरुनि निःशब्द । दाट न रिगे श्र्वापद ।

शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥ १७६ ॥

१७६) जें स्थान बहुतेक निःशब्द असावें व ज्या ठिकाणीं श्वपदांची गर्दी असूं नये व ज्या ठिकाणीं राघू आणि भ्रमर हे नसावेत; 

पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।

कवणें एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥ १७७ ॥

१७७) ज्या ठिकाणीं पाण्याच्या जवळ असणारे हंस, दोन चार चक्रवाक, कधीं एखाद्या वेळेला कोकिळहि असाला तरी चालेल.

निरंतर नाहीं । तरि आलीं गेलीं कांहीं ।

होतु कां मयूरेंही । आम्ही ना न म्हणों ॥ १७८ ॥

१७८) ( जेथें ) नेहमीं जरी नाहीं, तरी येऊन जाऊन असणारे कांहीं मोरहि असले तर त्यास आमची ना नाहीं,

परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।

तेथ निगूड मठ होआवा । कां शिवालय ॥ १७९ ॥

१७९) परंतु अर्जुना, असलें स्थान जरुर शोधून ठेवावें. त्या ठिकाणीं सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकरांचें देऊळ असावें.

दोन्हीं माजि आवडे तें । जें मानलें होय चित्तें ।

बहुतकरुनि एकांते । बैसिजे गा ॥ १८० ॥

१८०) या दोहोंतील जें मनाला पसंत पडेल असें एक स्थान

 असावें. बहुतकरुन एकांतांत बसावें.



Custom Search

1 comment:

  1. If you want to to be on the best website, then it means you better read this

    Hanuman Idol

    ReplyDelete