Saturday, February 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 7 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ७

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 7 
Ovya 181 to 210 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ७ 
ओव्या १८१ ते २१०

म्हणोनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।

राहेल तेथ रचावें । आसन ऐसें ॥ १८१ ॥

१८१) म्हणून तें स्थान, तसें आहे कीं, नाहीं, तें पाहावें; आणि राहात असेल, तर तेथें असें आसन लावावें. 

वरी चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।

तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥ १८२ ॥

१८२) तळास साग्र दर्भ घालून त्यावर कृष्णजिन घालून, त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी.

सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे ।

एकें पाडें तैसे । वोजा घालीं ॥ १८३ ॥

१८३) ते दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकांना लागलेले एकसारखे राहतील असे व्यवस्थेनें घालावेत.

परि सावियाचि उंच होइल । तरि आंग हन डोलेल ।

नीच तरी पावेल भूमिदोषु ॥ १८४ ॥

१८४) परंतु तें ( आसन ) कदाचित् जर उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर, जमिनीचे ( गारवा वगैरे ) दोष ( त्याला ) प्राप्त होतील;

म्हणोनि तैसें न करावें । समभावें धरावें ।

हे बहु असो होआवें । आसन ऐसें ॥ १८५ ॥

१८५) म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर तें सारखें ( उंचसखल न होईल असें ) घालावें. आतां हें फार वर्णन करणें पुरे. अशा प्रकारचें आसन असावें.

मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण ।

करुनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥ १८६ ॥

१८६) मग तेथें आपण एकाग्र अंतःकरण करुन मनांत सद्गुरुचे स्मरण करावें.

तैसें स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे ।

जंव कठिणपण विरे । अहंभावाचें ॥ १८७ ॥

१८७) त्या स्मरणाच्या आदरानें अहंकाराचा कठीणपणा इतका नाहींसा होतो की, तो ( स्मरण करणारा ) आंतबाहेर सात्त्विक भावांनीव्याप्त होतो;

विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे ।

मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥ १८८ ॥

१८८) ( त्याला ) विषयांचा विसर पडतो, ( त्याच्या ) इंद्रियांची रग मोडते, अंतःकरणाच्या ठिकाणीं मनाची स्थिरता होते.

ऐसें ऐक्य हें सहजें । फावे तंव राहिजे ।

मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥ १८९ ॥

१८९) याप्रमाणें ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावें व मग त्यांच ऐक्यबोधानें आसनावर बसावें.

आतां आंगातें आंग करी । पवनातें पवनुचि वरी ।

ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥ १९० ॥

१९०) आता अंगाला अंग आपण होऊन सावरुन धरतें, वायूला वायूच आपण होऊन आंवरुन धरतो; याप्रमाणें अनुभवाचा उदय होऊं लागतो. 

प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे ।

आघवें अभ्यासूं सरे । बैसतखेवो ॥ १९१ ॥

१९१) प्रवृत्ति माघारी फिरते, समाधि अलीकडील तीराला प्राप्त होते ( आटोक्यांत येते ) व बसतांक्षणीच सर्व अभ्यास संपतो.

मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।

तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं ॥ १९२ ॥

१९२) मुद्रेची थोरवी अशी आहे; तीच आतां सांगतों. ऐक. तर पोटर्‍याला चिकटून मांडी घालावी; 

चरनतळें देव्हडीं । आधारद्रुमाचां बुडीं ।

सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥ १९३ ॥

१९३) दोन्ही तळपाय वांकडे करुन ते आधारचक्राखालीं ( गुदस्थानावर शिवणीपाशीं ) चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. 

सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे ।

वरी बैसे तो सहजें । वामचरणु ॥ १९४ ॥

१९४) ( पण त्यांत ) उजव्या पायाची टांच खालीं घालावी व तिनें शिवण दाबावी म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो.

गुदमेढ्रांआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं ।

तेथ सार्ध प्रांतीं । सांडुनियां ॥ १९५ ॥

१९५) गुद व शिश्न यांमधील बरोबर जी चार बोटें जागा आहे त्यापैकीं दीड बोट वर व दीड बोट खाली जागा सोडून,

माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें ।

नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि ॥ १९६ ॥

१९६) मध्यें जी एक बोट जागा राहाते, तेथें उजव्या पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूनें आपलें अंग वर तोलून घट्ट दाबावें. 

उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे ।

गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥ १९७ ॥

१९७) उचलला आहे कीं नाहीं हें न कळेल अशा तर्‍हेनें पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारें दोन्ही घोटे उचलून धरावेत.

मग शरीरसंचु पार्था । अशेषही सर्वथा ।

पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥ १९८ ॥

१९८) अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा कांहीं अगदीं खालच्या पायाच्या टांचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो.

अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण ।

वज्रासन गौण । नाम यासी ॥ १९९ ॥

१९९) अर्जुना, हें मूळबंधाचे लक्षण आहे, असें समज; याचेंच वज्रासन असें गौण नांव आहे.

ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे ।

तेथ अपानु आंतलीकडे । वोहोटों लागे ॥ २०० ॥

२००) याप्रमाणें आधारचक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायू आंतल्या बाजूस संकुचित होऊं लागतो.

तंव करसंपुट आपैसें । वामचरणीं बैसे ।

बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥ २०१ ॥

२०१) तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजुळी सहज डाव्या पावलावर बसते व त्यामुळें दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात.    

माजि उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें ।

नेत्राद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥ २०२ ॥

२०२) पाठीच्या उभ्या कण्याच्या योगानें वर चढलेल्या खांद्यांत मस्तक घट्ट राहतें व डोळ्यांच्या पापण्या झांकावयास लागतात.

वरचिलें पातीं ढळती । तळींचीं तळीं पुंजाळती ।

तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥ २०३ ॥

२०३) वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात; तेव्हां अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिति होते.

दिठी राहोनी आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें ।

ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥ २०४ ॥

२०४) दृष्टि ही आंतल्या आंत डोळ्यांतच राहते. जर कौतुकानें बाहेर आलीच, तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते.

ऐसें आंतुचां आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे ।

म्हणोनि राहणें आघिये दिठीचें । तेथेंचि होय ॥ २०५ ॥

२०५) अशी आंतल्या आंतच दृष्टि राहते, ती पुन्हां बाहेर येत नाहीं; म्हणून अर्ध्या दृष्टीचें राहाणें नाकाच्या शेंड्यावरच होतें.  

आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रुपाची वाट पाहावी ।

हे चाड सरे आघवी । आपैसया ॥ २०६ ॥

२०६) आतां दिशांची गांठ घेण्याची ( चोहोंकडे पाहण्याची ) अथवा रुप-विषय पाहण्याची ही सर्व इच्छा आपोआप नाहींशी होते.

मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौती दाटे ।

ते गाढी होवोनी नेहटे । वक्षःस्थळीं ॥ २०७ ॥

२०७) मग गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खळगींत हनुवटी अडकून बसते. ती तेथें घट्ट बसून छातीवर दाबून असते.

माजि घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे ।

तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥ २०८ ॥

२०८) अर्जुना, त्यामध्यें कंठमणी ( गळ्याची घाटी ) अदृश्य होतो; असा जो बंध पडतो, ‘ त्यालाच जालंधरबंध ‘ म्हणतात.

नाभी वरी पोखे । उदर हें थोके ।

अंतरीं फांके । हृदयकोशु ॥ २०९ ॥

२०९) वोढियाणा बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जातें आणि हृदयकमल आंत प्रफुल्लित होतें.

स्वाधिष्ठानावरिचिले कांठी । नाभिस्थानातळवटीं ।

बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥ २१० ॥

२१०) अर्जुना, शिश्नावरील कांठास ( व ) बेंबीच्या

 खालच्या भागास जो बंध पडतो, त्यास वोडियाणा बंध ‘

 असें म्हणतात.

  


Custom Search

No comments:

Post a Comment