Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
साधिभूताधिदैवं
मां साधियज्ञं च ये विदुः ।
प्रयाणकालेऽपि
च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३० ॥
३०) जे
अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ ह्यांसह मला जाणतात ते स्वस्थ चित्तानें युक्त असलेले
पुरुष, प्रयाणकालींहि मला जाणतात.
जिहीं
साधिभूता मातें । प्रतितीचेनि हातें ।
धरुनि
अधिदैवातें । शिवतलें गा ॥ १८० ॥
१८०)
अधिभूतासह ( शरीरासह ) मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारां यथार्थ जाणून,
त्यांनीं अधिदैवाला ( जीवाला ) आकलन केलें ( जाणले ) ;
जया
जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञु दृष्टी रिगे ।
ते तनूचेनि
वियोंगें । विरहे नव्हती ॥ १८१ ॥
१८१)
ज्यांस वरील ज्ञानाच्या बळानेअधियज्ञ जो मी, तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या
वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत.
एर्हवीं आयुष्याचें
सूत्र बिघडतां । भूतांची उमटे खडाडता ।
काय न
मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥ १८२ ॥
१८२)
सहज विचार करुन पाहिलें तर आयुष्याची दोरी तुटली की ( मरणार्या ) प्राण्यांची
खळबळ उडते. ( ती पाहून ) न मरणार्यांच्याहि चित्ताला प्रलयकाळ ओढवला असे वाटत
नाहीं काय ?
परी नेणों
कैसें पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा ।
ते
प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥ १८३ ॥
१८३)
परंतु ज्ञानी पुरुषांच्या बाबतींत कोण जाणें कसें होतें तें ! जे माझ्या
स्वरुपाशीं एकरुप होऊन गेले आहेत. ते अंतःकरणाच्या गडबडीत मला विसरतच नाहींत
!
एर्हवीं
तरी जाण । ऐसे जे निपुण ।
तेचि
अंतःकरण--। युक्त योगी ॥ १८४ ॥
१८४)
सहज विचार करुन पाहिलें तर, असें जे निपुण आहेत, तेच ( माझ्या ठिकाणीं ) स्थिर
अंतःकरण झालेले योगी आहेत, असे समज.
तंव इये
शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी ।
जे नावेक
अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥ १८५ ॥
१८५) (
ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात ) त्या वेळीं श्रीकृष]णाने सांगितलेल्या शब्दरुपी
कुपीच्या खालीं अर्जुनाची लक्षरुपी ओंजळ प्राप्त झाली नाही; कारण अर्जुन त्या
वेळीं क्षणभर मागेंच होता. ( देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. )
जेथ तद्
ब्रह्मवाक्यफळें । जियें नानार्थरसें रसाळें ।
बहकाते
आहाती परिमळें । भावाचेनि ॥ १८६ ॥
१८६)
त्या ठिकाणीं तीं ब्रह्माचें प्रतिपादन करणारीं वाक्यें हीच कोणीं फळें नाना
प्रकारच्या अर्थरुपी रसानें भरलेली होती; व तीं अभिप्रायाच्या सुगंधानें वरवळलीं
होतीं.
सहज
कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाचि वचनफळें ।
अर्जुनश्रवणाचिये
खोळे । अवचित पडिलीं ॥ १८७ ॥
१८७)
अशी ही श्रीकृष्णरुप वृक्षाचीं वचनरुपी फळें, सहज कृपारुपी मंद वार्यानें,
अर्जुनाच्या कानरुपी ओटींत, अकस्मात पडली.
तियें
प्रमेयाचींच हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाचां सागरीं चुबुकळिलीं ।
मग तैसींच
का घोळिली । परमानंदे ॥ १८८ ॥
१८८)
तीं वाक्यरुपीं फळें तत्त्वज्ञानाच्या सिद्धान्ताचींच जणू काय बनविलेली असून ब्रह्मसाच्या
समुद्रांत बुडवून मग तशींच तीं जणूं काय परमानंदानें घोळलेली होती.
तेणें
बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे ।
घेताति
गळाळे । विस्मयामृताचे ॥ १८९ ॥
१८९)
त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणानें अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे
आश्र्चर्यरुपी अमृताचे घुटके घेऊं लागले.
तिया
सुखसंपत्ति जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया ।
हृदयाचां
जीवी गुतकुलिया । होत आहाती ॥ १९० ॥
१९०) त्या
सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळें मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवूं लागला व
त्याच्या हृदयाच्या जीवांत गुदगुल्या होऊं लागल्या.
ऐसें
वरचिलिचि बरवा । सुख जावों लागलें फावा ।
तंव
रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥ १९१ ॥
१९१)
याप्रमाणें त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचें अर्जुनास सुख अनुभवास येऊं लागलें,
तों इतक्यांत त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेनें त्वरा
केली,
झाकरी
अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें ।
प्रतीतिमुखीं
एक वेळे । घालूं पाहिलीं ॥ १९२ ॥
१९२)
ताबडतोब अनुमानाच्या तळहातांत तीं वाक्यफळें घेऊन अनुभवरुपी मुखांत तीं एकदम
घालावयास ( अर्जुन ) पाहूं लागला.
तंव
विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूचांहि दशनीं न फुटती ।
ऐसें जाणोनि
सुभद्रापती । चुंबीचिना ॥ १९३ ॥
१९३)
तेव्हां विचारांच्या तोंडांत तीं फळें मावेनात. आणखी हेतूच्याहि दातांनीं ती फळें
फुटेनात. ( म्हणजे भगवंताचा हेतु काय आहें हें त्याला कळेना. ) असें जाणून अर्जुन,
तीं वाक्यरुपीं फळें तोंडाला लावीना.
मग
चमत्कारला म्हणे । इये जळींचीं मा तारांगणें ।
कैसा
झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ १९४ ॥
१९४) मग
चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, हीं वाक्यें म्हणजे पाण्यांत पडलेलें तार्यांचे
प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या सुलभपणानें ( नुसत्या अक्षरांवरुन ) कसा फसलों
?
इयें पदें
नव्हती फडिया । गगनाचियाचि घडिया ।
येथ आमुची
मति बुडिया । थाव न निघे ॥ १९५ ॥
१९५)
हीं खरोखर वाक्यें नाहींत, तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत. तेथें आमच्या बुद्धीनें
किती जरी धडपड केली, तरी तिला थांग लागत नाहीं.
वांचुनि
आणावयाची कें गोठी । ऐसें जीवी कल्पूनि किरीटी ।
तिये पुनरपि
केली दृष्टी । यादवेंद्रा ॥ १९६ ॥
१९६)
असें जर आहे, तर मग तीं वाक्यें कळावयाची गोष्ट कशाला ? असा अर्जुनानें मनांत
विचार करुन, त्यानें पुन: भगवंताकडे दृष्टी केली.
मग विनविलें
सुभटें । हां हो जी यें एकवाटें ।
सातही पदें
अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥ १९७ ॥
१९७) मग
अर्जुनानें विनंती केली कीं, अहो देवा, हीं सातहि पदें ( १ ब्रह्म, २ अध्यात्म, ३
कर्म, ४ अधिभूत, ५) अधिदैव, ६) अधियज्ञ, ७) प्रयाणकालीं योग्यंना होणारें तुझें
स्मरण ) एकसारखीं कधीं न ऐकलेलीं अशीं आश्र्वर्यकारक आहेत.
एर्हवीं
अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचे उगाणे ।
काय
श्रवणाचेनि आंगणें । बोलों लाहाती ॥ १९८ ॥
१९८) सहज
विचार करुन पाहिलें तर या सात वाक्यांतील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा, वेगानें
अवधान देऊन श्रवण केलें असतां, त्या श्रवणाच्या बलानें कांहीं बोलतां येईल. ( असें
मला वाटले होतें. )
परि तैसें
हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा ।
आणि
विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥ १९९ ॥
१९९) पण
देवा, हें तसें नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि ( माझ्या ) आश्रचर्याच्या
जीवाला आश्र्चर्य झालें,
कानाचेनि
गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें ।
पाहेना तंव
चमत्कारें । अवधान ठकलें ॥ २०० ॥
२००) कानाच्या
झरोक्यावाटें शब्दाचे किरण आंत प्रवेश करतात न करतात तोंच, माझें लक्ष चमत्कारानें
चकित झालें
तेविंचि
अर्था चाड मज आहे । ते सांगताही वेळु न साहे ।
म्हणूनि
निरुपण लवलाहें । कीजो देवा ॥ २०१ ॥
२०१)
त्याचप्रमाणें अर्थाची मला इच्छा आहे. ( ती इच्छा किती आहे ) तें सांगतांना जो वेळ
लागेल, तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचें निरुपण
लवकर करावें.
ऐसा मागील
पडताळा घेउनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी ।
तेविंचि
माजि शिरवुनी । आतीं आपुली ॥ २०२ ॥
२०२)
अशा रीतीनें देवानें मागे काय सांगितलें, याचा विचार करुन व देव काय सांगतील, त्या
अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणें आपली इच्छाहि मध्यें शिरकावून,
कैसी पुसती
पाहे पाहें पां जाणिव । भिडोचि तरी लंघो नेदी शिंव ।
एर्हवीं
कृष्णहृदयासि खेंव । देवों सरला ॥ २०३ ॥
२०३)
अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पाहा ! तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन
करीत नाही, एर्हवीं श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त
झाला.
अगा गुरुतें
जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें ।
हें एकचि
जाणे आवघें । सव्यसाची ॥ २०४ ॥
२०४)
अहो, श्रीगुरुला जेव्हां विचारावयाचें असेल, त्या वेळीं असें अवधान ठेवावें
लागतें; हें सर्व एक अर्जुन जाणतो.
आतां तयाचें
तें प्रश्र्ण करणें । वरी सर्वज्ञा हरीचें बोलणें ।
हें संजयो
आवडलेपणें । सांगेल कैसें ॥ २०५ ॥
२०५)
आतां त्या अर्जुनाचें खुबीदार प्रश्न करणें व त्या सर्वज्ञ श्रीकृष्ण
परमात्म्याचें बोलणें, हें संजयास आवडल्यामुळें तो तें बोलणें कशा प्रेमाने
सांगेल,
तिये अवधान
द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्हाटी ।
जैसी कानाचे आधीं दृष्टी । उपेगा जाये ॥ २०६ ॥
२०६) तें सरळ मराठी भाषेंत सांगितलें जाईल; त्या निरुपणाकडे
लक्ष द्यावें. जसें कानाच्या आधीं दृष्टीचा उपयोग होतो;
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।
अक्षरांचियाचि भांवा । इंद्रियें जिती ॥ २०७ ॥
२०७) ( तसें ) बुद्धीच्या जिव्हेनें शब्दांतील अर्थ न
चाखतां केवळ अक्षरांच्याच शोभेनें इंद्रियें जगतील ( इंद्रियांचे समाधान होईल )
पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें ।
परि वरचिली बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ॥ २०८ ॥
२०८) अहो, असे पाहा कीं, मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर
सुगंधानें चांगल्या वाटल्या; पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटत
नाहीं काय ?
तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।
मग प्रमेयाचिया गांवा । लेसा जाइजे ॥ २०९ ॥
२०९) त्याप्रमाणें मराठी भाषेच्या सौंदर्यानें इंद्रियें
राज्य करतील व मग सिद्धान्ताच्या गांवाला त्यास चांगल्या तयारीनें जातां येईल.
ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें ।
ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥ २१० ॥
२१०) जेथें शब्द नाहींसा होतो, तें बोलणें अशा सुंदर
रीतीनें मी सांगेन, तें तुम्ही ऐका, असें निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव म्हणाला.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषद्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ( श्लोक
३०, ओव्या २१० )
॥ सच्चिदानंदार्पणमस्तु ॥